India

“देश विकला याची तुम्हाला लाज वाटत नाही का?” राहुल गांधींचा सरकारवर घणाघात

लोकसभेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रियेच्या भाषणात बोलताना विरोधी पक्षनेते गांधींची आक्रमक मांडणी.

Credit : इंडी जर्नल

 

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी अर्थसंकल्पाच्या प्रतिक्रियेत केलेल्या भाषणात सरकारवर गंभीर टीका केली. “आपला देश, आपली भारत माता तुम्ही विकली, याची तुम्हाला लाज वाटत नाही का?” असा आक्रमक प्रश्न विचारत गांधी यांनी सरकारला भारत-अमेरिका व्यापारी करारावरून धारेवर धरलं.

 

“भारताचा डेटा सरकारनं शरण केला”

इंटर्नल कंबशन इंजिनच्या काळात ज्याप्रमाणे तेल महत्त्वाचं होतं, तसाच आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयच्या जगात डेटा महत्त्वाचा आहे, असं सांगत गांधी म्हणाले, “एआयच्या जगात भारतीय माहितीतंत्रज्ञान क्षेत्र संकटात सापडणार आहे. इतकी वर्ष केंद्रस्थानी असणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरची जागा आता एआय यंत्रणा घेऊ लागतील. अशावेळी अर्थसंकल्पात याबाबत काही धोरण अपेक्षित होतं, मात्र त्याबाबत काहीही तरतूद केलेली दिसत नाही.”

“मात्र अर्थसंकल्पाच्या समांतर भारत सरकारनं अमेरिकेशी केलेला आहे. अमेरिका आणि चीनच्या स्पर्धेत भारतीय डेटा हे सर्वात मोठं संसाधन आहे. भारताची लोकसंख्या यामध्ये एक मोठं संसाधन आहे. भारतीयांची बुद्धिमत्ता, त्यांचं शहाणपण, त्यांची कल्पकता, हे डेटाच्या जगात सर्वात मोठं संसाधन आहे.”

 

"तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांसोबत स्न्हेभोजन करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्याचा जाब विचारल्याशिवाय गप्प बसलो नसतो.”

 

या काळात इंडिया आघाडीचं सरकार असलं असतं, तर आम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना सुनावलं असतं, असं म्हणत गांधी म्हणाले, “आम्ही त्यांना म्हणालो असतो, अमेरिकेला आपला डॉलर मजबूत ठेवायचा असेल, तर भारतीय डेटा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तो तुम्हाला हवा असेल, तर आमच्याशी नोकराप्रमाणे नाही तर समानतेने वागावं लागेल. तुम्हाला तुमचा शेतकरीवर्ग मतदार म्हणून महत्त्वाचा आहे, तुम्ही त्यांचे हितसंबंध जपणं साहजिक आहे, मात्र त्याचप्रमाणे आम्हालादेखील आमच्या शेतकऱ्यांची सुरक्षा करणं भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमची ऊर्जा सुरक्षा हा आमचा प्रश्न आहे. काहीही झालं तरी आम्ही तो अधिकार सुरक्षित ठेऊ.”

“तुम्ही आम्हाला पाकिस्तानच्या पातळीवर आणून पाहू शकत नाही. तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांसोबत स्न्हेभोजन करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्याचा जाब विचारल्याशिवाय गप्प बसलो नसतो,” गांधी म्हणाले.

 

 

यानंतर या करारातील तरतुदींवर हल्लाबोल करत गांधी म्हणाले, “आपण या करारात काय काय मान्य केलं आहे पहा. आपण आपल्या डिजिटल व्यापार नियमांवरचं नियंत्रण सोडू. [आपला] डेटा देशांतर्गत पातळीवरच ठेवला जाण्याची तरतूदच नाही. त्यानंतर अमेरिकेला पूर्णतः मोफत डेटा अपलोड करून दिला जाईल. डिजिटल करांवर मर्यादा घातली जाईल आणि त्यांच्या कंपन्यांना कोणताही सोर्स कोड उघड करण्याचं बंधन असणार नाही!”

 

टॅरिफ आणि ऊर्जा स्वायत्ततेशी तडजोड

डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताविरोधात वापरलेल्या टॅरिफ, म्हणजे व्यापार शुल्काच्या नीतीवर बोट ठेवत गांधींनी म्हटलं, “आधी जे शुल्क सरासरी ३% होते, ते आता वाढून १८% झाले आहेत. अमेरिकेकडून आपली होणारी आयात ४६ अब्ज डॉलर्सवरून तब्बल १४६ अब्ज डॉलर्सवर नेली जाणार आहे. हे समजण्यापलीकडं आहे. त्यांच्याकडून मात्र आपल्याला कोणतंही आश्वासन मिळणार नाही. आपण फक्त मूर्खासारखं पाहत राहायचं. त्याचवेळी त्यांच्या वस्तूंवरचा आयातशुल्क १६% वरून ०% केला गेला आहे!”

 

 

“शेजारच्या बांगलादेशला ०% शुल्क अमेरिकेनं लावले आहेत. आता बांग्लादेशच्या कापड उद्योगासमोर देशातला कापडउद्योग पूर्णतः उध्वस्त होणार आहे. दुसरीकडे अमेरिका आपल्याला सांगणार की आपण कुठून तेल खरेदी करायचं आणि ते आपल्या व्यवहारांवर लक्ष ठेवणार, आपल्याला शिक्षा देणार. शेतीमध्येही तुम्ही दरवाजे खुले केले आहेत. मका, सोयाबीन, लाल ज्वारी, कापूस, आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही झोपवण्याची तयारी केली आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे!” गांधी पुढं म्हणाले.

 

“तुम्हाला लाज वाटत नाही का?”

आपली मांडणी पुढं नेत गांधी म्हणाले, “इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी असल्या कराराला मान्यता दिली नसती, आणि मी खात्री देतो भविष्यातही कोणी देणार नाही. तुम्ही स्वतःच म्हणता की जगभरात आता अर्थ आणि ऊर्जा या बाबींचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जात आहे. आणि तुम्हाला हे समजत असूनही तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या विरोधात या शास्त्रांचा वापर होऊ देत आहात!”

सरकारवर आपल्या टीकेची धार वाढवत ते म्हणाले, “जेव्हा अमेरिका आपल्याला तेल कुठून घ्यायचं ते सांगतं, तेव्हा आपल्या ऊर्जा क्षेत्राचा शस्त्र म्हणून वापर केला जात असतो. जेव्हा आपला व्यापार शुल्क कमी-जास्त केला जातो, तेव्हा ते आर्थिक शस्त्र असतं. तुम्ही हे कसं होऊ दिलं? तुम्हाला स्वतःची लाज वाटत नाही का? तुम्ही हा देश विकला, भारत मातेला विकलं, याची तुम्हाला लाज वाटत नाही का?”

 

पंतप्रधानांवर दबाव

राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात करताना आपल्या मार्शल आर्टस् मधील अनुभवाचा दाखला देत म्हटलं की या खेळातील हातापाईमध्ये सुरुवात ग्रीप अर्थात पकडीनं होते. विरोधकावर एकदा पकड मजबूत झाली की तुम्हाला त्याच्या डोळ्यात दिसू लागतं की तो भेदरलेला आहे.”

 

 

पंतप्रधान मोदींवर अमेरिकेनं अशीच पकड बनवली असल्यानं त्यांनी देशाच्या माहिती-तंत्रज्ञान, आर्थिक, सामरिक आणि ऊर्जा संबंधी बाबींवर तडजोड केली असल्याचं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री हरदीप सिंग पुरी आणि उद्योजक अनिल अंबानी यांच्या एप्सटिन फाईल्समधील उल्लेख असण्याकडं आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत सुरु असलेल्या खटल्याकडं बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. 

मात्र सभापतींच्या खुर्चीवर बसलेल्या जगदंबिका पाल यांनी त्यांना संसदीय कारवाई मंत्री किरेन रिजिजू यांच्या मदतीनं थांबवलं. त्यानंतर सत्तापक्षाच्या खासदारांनी पुन्हा गोंधळ सुरु केला व सभापतींनी या आरोपांचा उल्लेख नोंद होणार नसल्याचं म्हटलं. त्यानंतर गांधी यांनी आपले मुद्दे पुन्हा मांडून आपलं भाषण संपवलं.