Quick Reads

पॅरासाईट: गरिबीचा रोलप्ले आणि श्रीमंतीची फँटसी

दक्षिण कोरियाची कथा सांगणारा पॅरासाईट त्याच्या अनुभूतीमध्ये मात्र वैश्विक आहे.

Credit : ‎Barunson E&A

हलके स्पॉईलर्स

होनोरे दे बोलझॅक या फ्रेंच लेखकाच्या 'द ह्युमन कॉमेडी' या कादंबरीतलं वाक्य आहे,"The secret of a great fortune made without apparent cause is soon forgotten, if the crime is committed in a respectable way." अर्थात, "एखाद्याच्या अकारण आलेल्या श्रीमंतीचं लोक गूढ विचारत नाहीत, जर त्यामागचा अपराध प्रतिष्ठित पद्धतीनं केला असेल." जगभरात आज सगळीकडेच गेल्या ३० ते ४० वर्षांच्या अविरत 'व्यवस्थापरिवर्तना'नंतर एक प्रश्न उभा राहतोय, संपत्ती आपण सर्वानीच निर्माण केली, आपण इतकी प्रगती केली, पण तरीही आज प्रत्येक काम करणारा हात त्रासात का? प्रत्येकाचाच का संघर्ष सुरु आहे? ही समृद्धी गेली तरी कुठं? 

पॅरासाईट, या नुकत्याच 'ऑस्कर' आणि 'पाम दि ओर' या दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कारानं नावाजलेल्या कोरियन सिनेमामध्ये याची प्रचिती कथेच्या प्रत्येक कोपऱ्यावर येत राहते. मी आधीच स्पष्ट करतो, हे सिनेमाचं समीक्षण नाही. कथेमध्ये दोन परिवार केंद्रस्थानी आहेत. रस्त्याच्या पातळीच्याही खाली एका गरीब वस्तीत घर असणारं किम कुटुंब आणि शहराच्या प्रतिष्ठित भागात एका टेकडीवर आलिशान बंगल्यात राहणारं पार्क कुटुंब. या दोनी कुटुंबांची भेट घडणार आहे, आणि प्रत्येक कुटुंब आपली पायरी कोणती, त्याचा अनुभव घेणार आहे. 

कार्ल मार्क्स या जर्मन तत्वज्ञानं जवळपास २५० वर्षांपूर्वी तेव्हा नुकत्याच बाल्यावस्थेत असणाऱ्या भांडवलशाहीची चिकित्सा केली होती. त्याहीपलीकडे त्याने सामाजिक रचनेचीच मूलभूत चिकित्सा केली होती. त्याच्या चिकित्सेचा गाभा होता वर्ग सिद्धांत. त्याने कल्पना केली, की समाज एक इमारत आहे, आणि प्रत्येक मजला एक वर्ग आहे. सर्वात खालच्या, तळमजल्यात मजूर, गरीब, मेहनतकश लोक आहेत, त्यांच्या वरती ते ज्यांना सेवा पुरवतात तो सैनिक वर्ग आहे, जो त्याच्या वरच्या व्यापारी वर्गाला संरक्षण पुरवतो, त्या व्यापारी वर्गाच्या वर जमीनदार आणि समाजातले अभिजन आहेत जे त्या समाजाच्या संस्कृती आणि श्रीमंतीवर मक्तेदारी ठेवतात आणि त्याच्यावरती सर्वात वर, पुरोहित आणि राजेशाही वर्ग आहे. दिग्दर्शक बॉंग जून हू च्या पॅरासाईट मधल्या भूगोल त्या रचनेसारखाच आहे.

सिनेमाची कथा फक्त इतकी आहे, की गरीब किम कुटुंबाला स्वतःला किमान स्वाभिमानाचं आयुष्य जगायचं आहे, ज्यात त्यांना कुठल्याही सामान्य माणसाच्या असतील तितक्याच अपेक्षा पूर्ण करता येतील आणि आजूबाजूच्या जगाने दाखवलेली श्रीमंतीची फँटसी पैसे कमवून मिळवता येईल. एका घटनेनं त्यांच्यासमोर पार्क कुटुंबियांच्या स्वरूपात ही संधी चालून येते. किम कुटुंबातल्या मुलाला त्याचा मित्र सांगतो की तो ज्या श्रीमंत मुलीला, अर्थात पार्क कुटुंबाची कन्या, शिकवत आहे, तिला शिकवण्यासाठी त्याच्या जागी कोणीतरी तो शोधतोय. तो त्याच्या मित्राची शिफारस करतो आणि हा तिथं इंग्रजी शिकवायला म्हणून जाऊ लागतो. हळूहळू त्या श्रीमंत कुटुंबाचा विश्वास संपादन करत हे अख्ख किम कुटुंबच पार्क कुटुंबाच्या सेवेत रुजू होतं. अट इतकीच, की त्यांना त्यांची गरिबी आणि सत्य ओळख लपवून वरच्या वर्गातील प्रशिक्षित कामगार असल्याचा बनाव करावा लागणार आहे.

 

 

पण भांडवलशाहीची, वर्गव्यवस्थेची किमया अशी, की ती सहजासहजी आपले जिने खालच्या वर्गातल्याना उघडे करत नाही. मग खालचे वर्ग ते जिने चढायला, ते कुंपण ओलांडून वरती यायला अनेक शक्कल लढवतात, प्रयत्न करत राहतात, धडका मारत राहतात, तेही आपल्याच मजल्यावरच्या आपल्या वर्गातल्या प्रतिस्पर्धीशी जीवघेणी स्पर्धा करायचीही तयारी ठेऊन. पण वरचे वर्ग त्यांच्या त्यांच्या पायऱ्यांवर वेटोळा मारून बसलेले असतात. त्यांच्या वर्चस्वाच्या पद्धती बदलत राहतात, कधी त्या कला, घराची बनावट, त्यातलं स्थापत्य बनून तर कधी त्यांना गरीबाच्या शरीरातून येणाऱ्या वासाच्या होणाऱ्या त्रासातून. त्यांची त्यांच्यापेक्षा 'खाली' असणाऱ्यांसाठीची घृणा ही अनेक पद्धतीनं व्यक्त होत राहते आणि या खालच्यांना परत त्यांची जागा दाखवत राहते.

भांडवली व्यवस्था मानवी अपेक्षांना एक स्वप्न विकते. त्यांच्या यशस्वितेला एक व्याख्या देते आणि त्यानंतर त्यांना ती स्वप्नं मिळवण्याची खरी साधनं काढून घेऊन एका अविरत स्पर्धेत ढकलून देते. संपूर्ण सिनेमात ते सामान्य रोजगार शोधणारं, स्वप्न असणारं आणि स्वप्नांसाठी काम करायची तयारी असणारं कुटुंब अनेक प्रकारे त्या स्वप्नांना सत्यात आणायचा प्रयत्न करत राहतं. त्यांच्यात क्षमता आहेत आणि त्या क्षमातांसोबत मेहनत करायची तयारी. पण तरीही त्यांची गरिबी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवते आणि परिस्थिती उत्कर्षाच्या साधनांपासून. तुम्ही कितीही प्रयत्न करा, वैतागून, कंटाळून, चिडून विद्रोह करा, पण नव-उदारमतवादातली शून्यतावादी हताशा तुम्हाला पुन्हा तुमच्या 'योग्य' ठिकाणीच आणून ठेवेल. कधीकाळी वर्ग आणि जातीत फरक करताना वर्गात किमान येणं-जाणं होऊ शकतं, जातीमध्ये वर्ग बंदिस्थ असतो असा फरक केला जात असे. मात्र नव-उदारमतवादातली वर्गव्यवस्था ही जातिव्यवस्थेइतकीच घट्ट आणि बंदिस्थ आहे. 

 

 

पण इतकं होऊनही एका सीनमध्ये, पार्क पती-पत्नी एका सोफ्यावर, मोठाल्या काचेच्या भिंतीतून बाहेर आपल्या लहानग्याला खेळत बघत असताना एकमेकांच्या जवळ येतात. तेव्हाच कथेतल्या काही घटनाक्रमामुळं किम कुटुंब तिथंच त्यांच्या सोफ्याजवळच्या टेबलाखाली लपून बसलं आहे. पार्क कुटुंबीय त्यांच्या सेवेतल्या या किम कुटुंबाबद्दल बोलू लागतात. तेव्हा पार्क आपल्या पत्नीला स्पर्श करता करता म्हणतो, की किमच्या शरीरातून कुबट वास येतो जो त्याला किळसवाणा वाटतो आणि असं स्पर्श करत करत तो त्याच्या पत्नीला 'तू गरीब, नशा करणारी महिला असल्याचं नाटक कर, मला त्यानं अजून उत्तेजित वाटेल' असं म्हणून तिला आणखी चेव आणून स्पर्श करू लागतो. श्रीमंतांसाठी गरिबी किळसवाणी असली तरी रोलप्ले फँटसी असते. 

पॅरासाईट म्हणावं तर थरारकथा आहे, म्हणावं तर व्यंग्य आहे, म्हणावं तर स्लाइस ऑफ लाईफ आहे, पण माझ्या मते, पॅरासाईट ही एक भयकथा आहे, ज्यात खरं आयुष्य, खरं जग आणि त्या खऱ्या जगातली खऱ्या माणसांची अवस्थाच अशी आहे, की तिच्यासमोर काल्पनिक भुतंही कमी भीती दाखवणारी वाटू लागतात. पॅरासाईट म्हणजे परजीवी. एक असा जीव, जो स्वतःची गरज दुसऱ्या जीवाचं रक्त शोषून भागवतो. तसं पाहायला गेलं तर किम कुटुंब पार्क कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन पैसे कमवू पाहतायत, पण पार्क कुटुंब एका अशा व्यवस्थेचा भाग आहेत, की जी रोज अशा लाखो किम कुटुंबियांना त्यांच्या स्वाभिमानाच्या, श्रमाच्या किंमतीवर त्यांच्यावर हिंसा करत चालत आहे, पण ही हिंसा कधीच महत्त्वाची वाटत नाही, कारण तिच्यावर मिळवलेल्या श्रीमंतीचा मार्ग प्रतिष्ठेचा आहे. 

आणि अशात दिग्दर्शक बॉंग जून हू आपल्याला प्रश्न विचारतो, की या कथेतल्या पॅरासाईट नक्की कोण? पॅरासाईट कोरियन फिल्म आहे. सोवियत समाजवाद आणि अमेरिकी भांडवलशाही यांच्या स्पर्धेत कोरियन युद्धात कोरियाचे दोन तुकडे झाले. उत्तर कोरिया सोवियत मॉडेलवर आधारित बनला आणि दक्षिण कोरिया अमेरिकी नव-उदारमतवादाची प्रयोगशाळा. उत्तर कोरियाबद्दल, तिथल्या एकाधिकारशाहीबद्दल पाश्चिमात्य माध्यमात शेकड्याने बातम्या आणि माहितीपट उपलब्ध आहे, मात्र नव-उदारमतवादानं दक्षिण कोरियाला काय दिलं, यावर क्वचितच भाष्य होतं. 

याच दक्षिण कोरियाची कथा सांगणारा पॅरासाईट त्याच्या अनुभूतीमध्ये मात्र वैश्विक आहे. त्यात दाखवलेली परिस्थिती आज जगभरातल्या कोट्यवधी जनतेचा दैनंदिन अनुभव आहे. आज जग एका अभूतपूर्व वर्ग संघर्षाच्या उंबरठ्यावर आहे. आजच्या जगाची अदृश्य केली गेलेली घुसमट म्हणजे हा सिनेमा. दिग्दर्शक हू एका मुलाखतीत म्हणतो, "मी फक्त कोरिया या माझ्या देशातल्या एका विशिष्ट परिस्थितीवर फिल्म बनवली, पण ती पाहताना जगातला जवळपास प्रत्येक देशातला माणूस एकसारखीच प्रतिक्रिया देत होता. त्याचं कारण आपण एक वैश्विक अनुभव घेत आहोत, आपण सगळेच एकाच देशात राहतोय आणि त्या देशाचं नाव आहे भांडवलशाही." पॅरासाईट हा खऱ्या अर्थानं आजच्या जगाचा वैश्विक सिनेमा आहे, स्वतःचं जग किती भीतीदायक आहे, हे अनुभवायला एकदा नक्की बघा.