Quick Reads

न्युरेमबर्ग खटले: हिंसेचा, गुन्हेगारीचा न्यायिक इतिहास!

न्युरेमबर्ग खटल्यांच्या माध्यमातून महायुद्धाच्या अनेक गोष्टींचा, जागतिक सत्तासंबंधाचा अभ्यास करता येतो.

Credit : Archives

न्युरेमबर्ग खटले ही मानवी इतिहासातील अशी गोष्ट आहे की, तिच्यामुळे सामाजिक शास्त्रे, कायदा, लष्करी इतिहास, हिंसा, मानवी हक्क अनेक विषयांना भविष्यकालीन दिशा मिळाली. जागतिक इतिहासात या खटल्यांच्या प्रक्रियेमुळे अनेक गोष्टींची नोंद झाली. त्यामुळेच ‘न्युरेमबर्ग खटले’ आणि त्यांची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती समजून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. दुसरे जागतिक महायुद्ध दोस्त राष्ट्रांच्या आघाडीने जर्मनीचा पाडाव करून जिंकले. त्यावेळी जर्मनीच्या युद्धकैदींचे- गुन्हेगारांचे काय करायचे? हा प्रश्न दोस्त आघाडी समोर निर्माण झाला. त्यांच्यासमोर तीन पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे सोडून देणे, दुसरा त्यांची बाजू न ऐकता मारून टाकणे आणि तिसरा म्हणजे पूर्ण आणि न्याय्य खटला चालवणे. न्युरेमबर्ग खटल्यांच्या माध्यमातून आपणास महायुद्धाच्या अनेक गोष्टींचा आणि जागतिक सत्तासंबंधाचा अभ्यास करता येतो. 

 

आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायासानाची स्थापना

१९४३ च्या मॉस्को जाहीरनाम्यानुसार आणि १९४४ च्या अमेरिकेच्या युद्ध विभागाच्या योजनेनुसार जर्मन युद्ध गुन्हेगारांविरुद्ध पूर्ण आणि न्याय्य खटला चालवावा असे ठरले. त्याला सहमती दर्शविणारे निवेदन याल्टा परिषदेत अमेरिकेचे रूझवेल्ट, इंग्लंडचे चर्चिल आणि रशियाचे स्टालीन यांनी प्रस्तूत केले. विजेत्या दोस्त राष्ट्रांच्या आघाडीत चार प्रमुख देश असल्याने आणि त्यांची प्रत्येकाची न्यायिक पद्धती असल्यामुळे कोणत्या प्रकारे खटले चालवावेत, या संदर्भात विचारमंथन करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी २६ जून १९४५ ला लंडन येथे बैठक झाली. सलग १० दिवसांच्या चर्चेने खटल्याची प्रक्रिया कशी असेल याची कल्पना स्पष्ट झाली. यातूनच ७ कलमी ‘लंडन करार’ ८ ऑगस्ट १९४५ रोजी अस्तित्वात आला.  

 

'हॉल ऑफ जस्टीस' बाहेर चार विजयी राष्ट्रांचे झेंडे. (wikimedia commons)

लंडन कराराच्या पहिल्या कलमानुसार ३० कलमी ‘आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायासाना’ची (International Military Tribunal= IMT)  स्थापना झाली. या न्यायासनात दोस्त राष्ट्रांचा प्रत्येकी एक प्राथमिक सदस्य असेल आणि त्यासोबत एक पर्यायी सदस्य असेल असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार इंग्लंडकडून लॉर्ड न्या.लॉरेन्स यांची प्राथमिक सदस्य म्हणून तर न्या. बर्केट यांची पर्यायी सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्याचप्रमाणे अमेरिकेकडून फ्रांसिस बिडल हे प्राथमिक सदस्य तर न्या. जॉन पार्कर हे पर्यायी सदस्य, फ्रान्सकडून प्रो. डोंन्नेद्यू दे वाब्र हे प्राथमिक सदस्य आणि कौन्सलर आर. फाल्को हे पर्यायी सदस्य आणि सोविएत रशियाकडून मेजर जनरल आय.टी.निकीत्चेन्को हे प्राथमिक सदस्य आणि ले. कर्नल ए.एफ. वोलशकोव हे पर्यायी सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. न्यायासनाच्या कलमानुसारच प्रतिवादी पक्षाला आपली बाजू मांडण्यासाठी जर्मन वकील घेता येईल असे ठरले. 

१८ ऑक्टोबर १९४५ रोजी जर्मन युद्ध गुन्हेगारांवरील आरोपपत्र निश्चित करण्यासाठी बर्लिन शहरात बैठक झाली. या बैठकीत ‘आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायासाना’चे अध्यक्ष म्हणून इंग्लंडच्या लॉर्ड न्या. लॉरेन्स यांची निवड करण्यात आली.  याच दरम्यान खटले कोणत्या शहरात चालवले पाहिजे अशी चर्चा सुद्धा करण्यात आली. सोविएत रशियाची पसंती बर्लिन शहराला असतानाही न्युरेमबर्ग शहराचा इतिहास आणि त्याचा नाझी गतीविधींशी असलेला संबंध पाहता त्याची निवड करण्यात आली. न्युरेमबर्ग हे त्या निवडक शहरांपैकी एक शहर होते की, जिथे हिटलरच्या मोठमोठ्या सभा आणि यात्रा झाल्या होत्या. ज्यू लोकांचे मूलभूत अधिकार आणि संपत्ती हिसकावून घेणारा कुप्रसिद्ध ‘न्युरेमबर्ग कायदा’ याच शहरात नाझी नेत्यांनी जाहीर केला होता.  

 

गुन्ह्यांचे प्रकार आणि वेगवेगळे खटले

१४ नोव्हें. १९४५ रोजी ‘आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायासना’च्या खटल्याला सुरुवात झाली. या खटला अमेरिका, फ्रांस, इंग्लंड आणि सोविएत रशिया विरुद्ध २३ जर्मन वरिष्ठ नेते (उदा. हर्मन गोरिंग, रुडॉल्फ हेस, हान्स फ्रांक इत्यादी) आणि राइख मंत्रिमंडळ, नाझी पार्टीचे नेतेमंडळी, एस.एस., एस.डी., गेस्टापो, एस.ए., जर्मन सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी असा चालवला गेला.  या खटल्यात चार प्रकारचे आरोपपत्र केले गेले. सर्व युद्धगुन्हेगारांवर  किमान दोन प्रकारचे आरोप होते. काहींवर तर चारही प्रकारचे आरोप होते. 

खटल्यासाठीचे पुरावे! (wikimedia commons)

‘आक्रमक युद्ध पुकारल्याचे कारस्थान’ (conspiracy to wage aggressive war)  हा पहिला आरोप होता. दुसरा आरोप हा ‘शांतता विरोधी गुन्हे किंवा आक्रमक युद्ध पुकारणे’ (crimes against peace or waging aggressive war) होता. ‘युद्ध गुन्हे’ (war crimes) हा तीसरा आणि ‘मानवता विरोधी गुन्हे’ (crimes against humanity) हा चौथा आरोप होता.  फिर्यादी पक्षाने दोन टप्प्यांमध्ये केसचे विभाजन केले. पहिल्या टप्प्यात नाझी कार्यकाळात झालेल्या गुन्हेगारी आणि त्यातील घटकांवर अधिक लक्ष दिले गेले, तर दुसऱ्या टप्प्यात संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर वैयक्तिकपणे चर्चा केली गेली. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर १ आक्टो १९४६ रोजी न्यायासनाच्या अध्यक्ष, सदस्य आणि पर्यायी सदस्यांनी आपला निकाल दिला. त्यामध्ये राइख मंत्रिमंडळ, नाझी पार्टीचे नेतेमंडळी, एस.एस., एस.डी., गेस्टापो, एस.ए., जर्मन सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी यातील सगळ्यांवरील आरोप सिद्ध झाले परंतू हालमर शाख्त, फ्रान्झ व्हॉन पापेन, हांस फ्रित्झचे या तिघांना निर्दोष म्हटले गेले. सोविएत रशियाच्या सदस्याने न्यायासनाच्या निकालाशी असहमत होवून काहीशी वेगळी भूमिका मांडली आणि वरील तिघेही गुन्ह्यांमध्ये सहभागी होते अशी भूमिका घेतली.८  

आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायासनाचा खटला संपल्यानंतर अमेरिकेच्या अधिपत्याखालील जर्मन लष्करी सरकारने १८ ऑक्टोबर १९४६ रोजी ‘काही लष्करी न्यायासनांची संस्था आणि अधिकार’ या नावाचा २३ कलमांचा वटहुकूम काढला. कलम क्र.२ मध्ये संरक्षण परिषद कायदा नं.१०, आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायासन आणि लंडन करार यांचा आधार घेवून काही न्यायासने ‘लष्करी न्यायासने’ म्हणून स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार ‘न्युरेमबर्ग लष्करी न्यायासने’ (Nuremberg Military Tribunals, NMT) स्थापित करण्यात आले. ऑक्टोबर १९४६ पासून ते एप्रिल १९४९ पर्यंत या न्यायासनांचे काम चालले. एकूण १२ खटले न्युरेमबर्ग लष्करी न्यायासनांच्या अंतर्गत चालवली गेली. त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे.१० 

 

१. मेडिकल केस, अमेरिका विरुद्ध कार्ल ब्रांड (Karl Brandt) आणि इतर.

२. मील्च केस, अमेरिका विरुद्ध एर्हार्ड मिल्च (Erhard Milch).

३. जस्टीस केस, अमेरिका विरुद्ध जोसेफ अल्टस्टोटर (Josef Altstotter) आणि इतर.

४. पोल केस, अमेरिका विरुद्ध ओसवाल्ड पोल (Oswald Pohl) आणि इतर.

५. फ्लिक केस, अमेरिका विरुद्ध फिड्रीच फिल्क (Friedrich Flick) आणि इतर.

६. आय.जी. फार्बन केस, अमेरिका विरुद्ध कार्ल क्राऊच (Carl Krauch) आणि इतर.

७. होस्टेज केस, अमेरिका विरुद्ध व्हील्हेम लिस्ट (Wilhelm List) आणि इतर.

८. रुषा केस, अमेरिका विरुद्ध उलरिक ग्रीफेल्त (Ulrich Greifelt) आणि इतर.

९. आइन्साट्झगृप्पेन (Einsatzgruppen) केस, अमेरिका विरुद्ध ऑट्टो ओहलेनडोर्फ (Otto Ohlendorf), इतर

१०. क्रुप्प केस, अमेरिका विरुद्ध आल्फ्रेड क्रुप्प (Alfred Krupp) आणि इतर

११. मिनिस्ट्रीज केस, अमेरिका विरुद्ध अर्न्स्ट वोन वाईजसाकर (Ernst von Weizsaecker) आणि इतर

१२. हाय कमांड केस, अमेरिका विरुद्ध व्हील्हेम वोन लीब (Wilhelm von Leeb) आणि इतर

 

सर्वात डावीकडे नाझी कुकृत्यांचा प्रमुख आरोपी हर्मन गोहरिंग आणि इतर आरोपी.  (wikimedia commons)

 

‘मेडिकल केस’  आणि ‘जस्टीस केस’ 

न्युरेमबर्ग लष्करी न्यायासनाच्या या बारा खटल्यांमध्ये ‘मेडिकल केस’  आणि ‘जस्टीस केस’ हे दोन खटले खूपच प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी जस्टीस खटल्यावर “Judgment at Nuremberg” नावाचा हॉलीवूडचा चित्रपट सुद्धा आला आहे. न्युरेमबर्ग लष्करी न्यायासन हे जर्मन युद्धगुन्हेगारांनी वैयक्तिक, सामुहिक आणि संघटना- संस्थात्मक पातळीवर जे गुन्हे, अत्याचार, दमन आणि अन्याय केला होता त्याचा चौकशी करून दोषींना शिक्षा करण्यासाठी स्थापन झाले. ‘मेडिकल केस’ ला ‘डॉक्टर्स ट्रायल’ असेही म्हटले जाते. मेडिकल केसमध्ये २३ डॉक्टरांना आरोपी म्हणून न्यायासनासमोर उभे केले होते. संबंधित डॉक्टरांनी अनेकांना शारीरिकदृष्ट्या व्यंग, मानसिकदृष्ट्या आजारी किंवा मंद केले होते. छळछावण्यांमध्ये लोकांच्या सहमतीशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग त्यांच्यावर डॉक्टरांनी केले. त्यामुळे अनेक लोकांचे जीवन उध्वस्त झाले. 

या खटल्यांमध्ये चार प्रकारचे आरोपपत्र तयार करण्यात आले. त्यामध्ये ‘युद्धाची सामूहिक योजना किंवा कारस्थान’ (common design or conspiracy of war), ‘युद्ध गुन्हे’ (war crimes), ‘मानवताविरोधी गुन्हे’ (crimes against humanity), आणि ‘गुन्हेगारी संघटनेचे सदस्यत्व’ (membership of criminal organisation) ह्या आरोपांचा समावेश होता. १४० दिवस मेडिकल केस चालली. या डॉक्टरांमध्ये काही प्रसिद्ध वैज्ञानिक सुद्धा होते. विज्ञान आणि औषधशास्त्राच्या नावाखाली खून करणे,  अतोनात छळ करणे आणि अत्याचार करणे असे दोषारोप त्यांच्यावर करण्यात आले. तेवीस पैकी सोळा डॉक्टरांना गुन्हे सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवले गेले आणि उरलेल्या सात डॉक्टरांना निर्दोष म्हणून सोडून दिले.११  

‘जस्टीस केस’ ही न्युरेमबर्ग लष्करी न्यायासनातील सर्वात रोचक केस होती. या केसमध्ये एकूण सोळा लोकांना आरोपी म्हणून उभे केले गेले. त्यामध्ये राइखचे कायदा मंत्री, लोकन्यायालये  (People's courts), विशेष न्यायालये (special courts) यातील न्यायाधीशांचा समावेश समावेश होता. ‘युद्ध गुन्हे करण्याच्या कटकारस्थानात सहभागी होणे’ (participation in a conspiracy to commit war crimes and crimes against humanity), ‘नागरिकांविरुद्धचे युद्ध गुन्हे’ (war crimes against civilians), ‘मानवताविरोधी गुन्हे’ (crimes against humanity),गुन्हेगारी संघटनांचे सदस्यत्व (membership of criminal organisation) हे चार प्रकारचे आरोप जस्टीस केसमध्ये आरोपींवर लावण्यात आले.१२ बहुतेक न्यायाधीश हे ‘अतीपुराणमतवादी राष्ट्रवादी’ (ultraconservative nationalist) होते व नाझी ध्येयाप्रती सहानुभूती बाळगत होते. त्यामुळेच जर्मन कायद्याचे ‘नाझीकरण’ (Nazifictation) न्यायाधीशांच्या साह्याने घडून आले. छळ, नसबंदी, वंशसंहार आणि असंख्य मानवी हक्कांचे उलंघन करण्यासाठी कायद्याचा वापर करण्यात आला.१३ ‘जर्मन रक्त आणि सन्मान संरक्षण कायदा’ सारखा करून नाझी तत्वज्ञानाला कायदेशीर मान्यता प्राप्त करून देण्यात आली होती. या खटल्यात सगळे न्यायाधीश या केसमध्ये दोषी ठरले. 

‘मेडिकल केस’ आणि ‘जस्टीस केस’ प्रमाणेच उर्वरित दहा केसेच्या खटल्यांमध्ये युद्ध गुन्हेगारांना शिक्षा झाल्या. न्युरेमबर्ग खटल्यांचा संपूर्ण जगाच्या न्यायिक आणि मानवी हक्कांच्या घडामोडींवर प्रभाव पडला म्हणून तर काही अभ्यासकांच्या मते, ‘राज्यपुरस्कृत होणाऱ्या हत्या आणि अत्याचारांवर भाष्य करणारे १९६१ च्या अडॉल्फ आईखमनचा इस्त्रायल खटला, पूर्वीच्या युगोस्लावियासाठीचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायासन (ICTY), रवांडासाठीचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायासन (ICTR) आणि ग्वाटेमाला आणि जर्मनीसाठीचे स्थानिक (domestic) न्यायासन यांचे मूळ हे १९४५ च्या आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायासन, न्युरेमबर्ग मध्ये आहे१४ असे म्हटले जाते. 

युद्धांचा इतिहास, अतिरेकी राष्ट्रवाद पुरुस्कृत हिंसा आणि गुन्हेगारी, कायदा आणि विज्ञान नाझीकरण, मानवी हक्क-अल्पसंख्याक लोकांच्या हक्कांचे हनन, हॉलोकॉस्ट आणि जिनोसाईड यांना समजून घेण्यासाठी न्युरेमबर्ग खटल्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे असे वाटते.   

 

संदर्भसूची

१. Tessa McKeown, The Nuremberg Trial: Procedural due process at the International MilitaryTribunal,https://papers.ssrn.com/sol3/papers.cfm?abstract_id=2647780#,13/09/2017,12:00PM.

२. Douglas O. Linder, Famous trials,http://www.famous-trials.com/nuremberg/1901-home,02/09/2017/ 12:09 PM.

३. Trial of the Major War Criminals Before the International Military Tribunal, Vol. 1, Nuremberg, 1947, Page No. 8 

४. कित्ता, Page No. 25 

५. पूर्वोक्त, Famous trials,http://www.famous-trials.com/nuremberg/1901-home,02/09/2017/ 12:09 PM.

६. पूर्वोक्त, Trial of the Major War Criminals...Vol. 1, Page No. 27

७. पूर्वोक्त, Famous trials,http://www.famous-trials.com/nuremberg/1901-home,02/09/2017/ 12:09 PM.

८. पूर्वोक्त, Trial of the Major War Criminals...Vol. 1, Page No. 364

९. Trial of the Major War Criminals before Nuremberg Military Tribunal under Control Council Law no. 10, Nuremberg, Oct. 1946- April 1949, Vol. 3, Page No. XXIII

१०. https://web.archive.org/web/20160809033217/http://nuremberg.law.harvard.edu/php/docs_swi.php?DI=1&text=nur_13tr,07-09-2017,5:29 PM

११. पूर्वोक्त, Famous trials,http://www.famous-trials.com/nuremberg/1901-home,02/09/2017/ 12:09 PM.

१२. पूर्वोक्त, Trial of the Major War Criminals... Vol. 3, Page No. 3

१३. पूर्वोक्त, Famous trials,http://www.famous-trials.com/nuremberg/1901-home,02/09/2017/ 12:09 PM.

१४. Hilary C. Karl, Legacies of the Nuremberg SS-Einsatzgruppen trials after 70 years, Loy. L.A. Int’l & Comp. L. Rev. Vol. 39:95, Page No. 96