Quick Reads

सत्योत्तर जगात सत्यशोधकांची प्रासंगिकता

आजपासून सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला सुरुवात होत आहे.

Credit : Prathmesh Patil

सत्य सर्वांचे आदी घर || सर्व धर्मांचे माहेर ||धृ||

जगांमाजी सुख सारे || खास सत्याची ती पोरे ||१||

सत्य सुखाला आधार || बाकी सर्व अंधकार ||

आहे सत्याचा बा जोर || काढी भंडाचा तो नीर ||२||

सत्य आहे ज्याचे मूळ || करी धूर्तांची बा राळ||

बळ सत्याचे पाहुनी || बहुरूपी जले मनी ||३||

खरे सुख नटा नोव्हे || सत्य ईशा वर्जू पाहे ||

जोती प्रार्थी सर्व लोकां || व्यर्थ डंभा पेटू नका ||४||

आजपासून सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने पुढील वर्षभर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्याचे नियोजन अनेकांनी केले आहेत. महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाची व विचारांची या निमित्ताने अनेक ठिकाणी उजळणी होईल याची मला खात्री आहे. परंतु, आजच्या तथाकथित सत्योत्तर जगात सत्यशोधक विचारांची प्रासंगिकता कशी आहे याबद्दल चर्चा होईल की नाही याबद्दल मला माहिती नाही. म्हणूनच, आजच्या सत्योत्तर जगात सत्यशोधकांची प्रासंगिकता या संदर्भात काही चर्चा करण्याचे ठरविले आहे. खोटी माहिती आणि चुकीच्या माहितीद्वारे ‘फेक न्यूज’ (बनावट बातमी) पसरविण्याच्या काळात कधी नव्हे एवढी आजच्या काळात सत्यशोधनासाठी लागणाऱ्या सत्यशोधकदृष्टी गरज निर्माण झालेली आहे. जगभरात लोकांचे लढे, चळवळी, आंदोलने आणि मोर्च्यांच्या माध्यमातून समोर येणारे विषमतेचे, बेरोजगारीचे, दमनाचे, शोषणाचे आणि महामारीचे ‘सत्य’ नाकारून सगळीकडे सत्योत्तर चर्चाविश्वाचे ‘वर्चस्व’ स्थापन करण्याचे प्रयत्न चालू आहे. यास्थितीत, महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक विचारांची वसा आणि वारसा समजावून घेणे गरजेचे बनते. कारण, आजही सत्यशोधकवृत्ती आणि सत्यशोधकदृष्टीची समाजाला तेवढीच गरज आहे. 

  

भयग्रस्त पर्यावरण आणि जोतीबांची ‘सत्यवर्तना’ची कल्पना  

महात्मा जोतीराव फुल्यांच्या लिखाणामध्ये ‘विद्या’, ‘ज्ञान’ आणि शिक्षणाला अत्यंत महत्व आहे. अविद्येमुळे सर्व नुकसान झाले आहे असे आग्रही मांडणी म. फुल्यांनी केली आहे. तसेच, लबाडी, खोटारडेपणा, कपटीपणा आणि नीचवृत्तीमुळे सर्व मानवसमूहाला भेदभावाला,  गुलामगिरीला, शोषणाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सर्व स्त्री-पुरुष मानव जातीचे कल्याण झालेले नाही आणि संपूर्ण मानवजातीचे कल्याण करायचे असेल तर सर्वांनी ‘सत्यवर्तन’ केले पाहिजे अशी भूमिका महात्मा जोतीराव फुल्यांनी घेतली आहे. त्यांच्या मते, सर्व धर्म हे सत्यच सांगतात. म्हणूनच त्यांनी ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ अशी भूमिका घेतली होती. आजच्या आपल्या काळात धार्मिक व्देष पसरवला जातो. धार्मिक भेदभाव जाणीवपूर्वक पेरला जात आहे अशा काळात महात्मा फुल्यांची ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

तसेच, आजच्या काळात लोकांना फसवून, गंडवून, लुबाडून आणि शोषण करून पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळवला जातो. सोबतच, लोकांचे हक्क, अधिकार नाकारले जातात. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. लोकांच्या लिहिण्यावर, बोलण्यावर आणि फिरण्यावर बंदी आणली जाती. लोक भयग्रस्त होतात आणि भीतीग्रस्त सामाजिक-राजकीय पर्यावरणात लोकांना जगावे लागते. या सगळ्या स्थितीला महात्मा जोतीरावांनी कुनितीचा व्यवहार असे म्हटले असते. कारण, त्यांच्या सत्यवर्तनाच्या कल्पनेत माणसाला सर्व हक्क, अधिकार आहेत. स्वातंत्र्य, समता, श्रमप्रतिष्ठा, भावंडभाव, प्रेम, करुणा आहे. व्देष – तिरस्काराला स्थान नाही. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात एक संवाद आहे. त्यामध्ये गणपत्तराव दर्याजी थोरात यांनी, ‘सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावे?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यावर महात्मा फुल्यांनी उत्तर दिले आहे. ते लिहितात, “सत्यवर्तन करणाऱ्यांविषयी नियम देतो, ते येणेप्रमाणे:

 • आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केले. त्यापैकी स्त्रीपुरुष हे उभयता जन्मतांच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र केले आहेत, असे कबूल करणारे, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री असो अथवा पुरुष असो, ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने या विस्तीर्ण पोकळीतील निर्माण केलेल्या अनंतर सूर्यमंडळासह त्यांचे ग्रहोपग्रहास अथवा एखाद्या विचित्र ताऱ्यास अथवा एखाद्या धातू दगडाच्या मूर्तीस निर्मिकाच्या ऐवजी मान देत नसल्यास, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व वस्तूंचा यच्यावत प्राणीमात्रांस उपभोग घेऊ न देता, निरर्थक निर्मिकास अर्पण करून त्यांचे पोकळ नामस्मरण जे करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपणां सर्वाच्या निर्माणकर्त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व प्राणीमात्रांस समस्त वस्तूंचा यथेच्छ उपभोग घेऊन त्यांस निर्मिकाचा आभार मानून त्याचे गौरव करू देतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत. 
 • विश्वकर्त्याने निर्माण केलेल्या प्राणीमात्रांस जे कोणी कोणत्याहि प्रकारचा निरर्थक त्रास देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्रीपुरुषांस सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहेत. त्यांतून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही व त्याप्रमाणे जबरी न करणारांस, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे, ज्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याहि तऱ्हेचे नुकसान करिता येत नाही, अथवा जे कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजून इतरांस पीडा देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांस निर्माण केले आहे. त्यापैकी हरएक स्त्रीने एका पुरुषास मात्र आपला भ्रतार करण्याकरिता वजा करून व तसेच हरएक पुरुषाने एका स्त्रीस मात्र आपली भार्या करण्याकरिता वजा करून, एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष एकमेकांबरोबर मोठ्या आवडीने बहिण भावंडाप्रमाणे आचरण करतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व स्त्रियांस अथवा पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्कांविषयी आपले पाहिजेल तसे विचार, आपली पाहिजेल तशी मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यांस स्वतंत्रता दिली आहे; परंतु ज्या विचारांपासून व मतांपासून कोणत्याहि व्यक्तीचे कोणत्याच तऱ्हेचे नुकसान मात्र होऊ नये म्हणून जे खबरदारी ठेवितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
 • आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने व्यवस्थेवरून एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष दुसऱ्याच्या धर्मासंबंधी मतांवरून अथवा राजकीयसंबंधी मतांवरून त्यांस कोणत्याहि प्रकारे नीच मानून त्यांचा छळ करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस एकंदर धर्मसंबंधी गावकी अथवा मुलकी अधिकाराच्या जागा त्यांच्या योग्यतेनुरूप व सामर्थ्यानुरूप मिळाव्यात, म्हणून त्यांस समर्थ केले आहेत, असे कबूल करणारे, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याच्या नियमास अनुसरून एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुष धर्म, गावकी व मुलकी यासंबंधीची प्रत्येक मानवाची स्वतंत्रता, मालमत्ता, संरक्षण आणि त्याचा जुलुमापासून बचाव करण्याविषयी जे कोणी बाध आणीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या मात्यापित्याचा वृध्दापकाळी परामर्ष करून इतर मानववृध्द शिष्टांस सन्मान देतात अथवा मातापित्याचा परामर्ष करून इतर मानववृध्द शिष्टांस सन्मान देणारांस बहुमान देतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे वैद्यांच्या आज्ञेवांचून अफू, भांग, मद्य वगैरे अमली पदार्थाचे सेवन करून नाना तऱ्हेचे अन्याय करण्यास प्रवृत्त होत नाहीत अथवा ते सेवन करणारास आश्रय देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे पिसू, ढेकूण, ऊं वगैरे किटक, विंचू, सरपटणारे सर्प, सिंह, वाघ, लांडगे वगैरे आणि त्याचप्रमाणे लोभी मानव दुसऱ्या मानवप्राण्यांचा वध करणारे किंवा आत्महत्या करणारे खेरीजकरून, जे स्त्री अथवा पुरुष, दुसऱ्या मानवप्राण्यांची हत्या करीत नाहीत अथवा हत्या करणारास मदत देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या हितासाठी दुसऱ्याचे नुकसान करण्याकरिता लबाड बोलत नाहीत अथवा लबाड बोलणारास मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत, 
 • स्त्री अथवा पुरुष जे व्याभिचार करीत नाहीत अथवा व्याभिचारांचा सन्मान ठेवीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे हरएक प्रकारची चोरी करीत नाहीत अथवा चोरास मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे व्देषाने दुसऱ्याच्या घरास व त्यांच्या पदार्थास आग लावीत नाहीत अथवा आग लावणाऱ्यांचा स्नेह करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे स्वत:च्या हितासाठी न्यायाने राज्य करणाऱ्या संस्थानिकांवर अथवा राज्यावर अथवा एकंदर सर्व प्रजेने मुख्य केलेल्या प्रतिनिधींवर बंड करून लक्षावधी लोकांची कुटुंबे उघडी पाडीत नाहीत अथवा बंड करणारांस मदत देत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व जगाच्या हितासाठी धर्मपुस्तक तयार केले आहे, म्हणून मोठ्या बढाईने वाचाळपणा करितात; परंतु ते धर्मपुस्तक आपल्या बगलेत मारून इतर मानवांस दाखवीत नाहीत, अशा कपटी बढाईखोरांवर जे विश्वास ठेवीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदासह, आपल्या सोयऱ्या-धायरयांसह आणि आपल्या इष्टमित्र साथ्यांस मोठ्या तोऱ्याने पिढीजादा श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यांस पिढीजाजा कपटीने अपवित्र मानून त्यांस नीच मानीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे पूर्वी कपटाने लिहिलेल्या ग्रंथाच्या वहिवाटीवरून काही मानवांस पिढीजादा दास मानीत नाहीत अथवा दास मानणाऱ्यांचा बोज ठेवीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या लोकांचे वर्चस्व मुद्दाम राहण्याकरिता शाळेमध्ये शिकवतांना इतर लोकांच्या मुलांबरोबर दुजाभाव करीत नाहीत अथवा शाळेत शिकवितांना दुजाभाव करण्याचा धिकार करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे न्यायाधीशाचा हुद्दा चालवितांना अन्यायी लोकांना, त्यांच्या अन्यायाप्रमाणे त्यांस योग्य शिक्षा देण्यास कधीही, पक्षपात करीत नाहीत अथवा अन्यायाने पक्षपात करणाऱ्यांचा धिकार करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे शेतकी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरणारांस श्रेष्ठ मानितात; परंतु शेतकरी वगैरयांस मदत करणारांचा आदरसत्कार करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
 • स्त्री अथवा पुरुष, जे चांभाराच्या घरी का होईना, बिगारयांचा धंदा करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांस तुच्छ मानीत नाहीत; परंतु त्या कामी मदत करणारांची वहावा करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
 • स्त्री अथवा पुरुष, जे स्वतः काही उद्योगधंदा न करता निरर्थक धार्मिकपणाचा डौल घालून अज्ञानी जनांस नवग्रहांची पीडा दाखवून त्यांस भोंदाडून खात नाहीत अथवा तत्संबंधी पुस्तके करून आपली पोटे जाळीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
 • स्त्री अथवा पुरुषास, जे भावीक मूढांस फसवून खाण्याकरिता ब्रह्मर्षीचे सोंग घेऊन त्यांस आंगाराधुपारा देत नाहीत, अथवा तत्संबंधी मदत करीत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे कल्पित देवाची शांती करण्याचे निमित्ताने अनुष्ठानी बनून अज्ञानी जनांस भोंदाडून खाण्याकरिता जपजाप करून आपली पोटे जाळीत नाहीत अथवा तत्संबंधी मदत करणारांचा बोज ठेवीत नाहींत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे आपली पोटे जाळण्याकरिता अज्ञानी जनात कलह उपस्थित करीत नाहीत अथवा तत्संबंधी मदत करणाऱ्यांच्या सावलीसदेखील उभे राहत नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या सर्वांच्या निर्मिकाने निर्माण केलेल्या प्राणिमात्रांपैकी मानव स्त्रीपुरुषांमध्ये कोणत्याच तऱ्हेची आवडनिवड न करतां त्यांचे खाणेपिणे व लेणेनेसणे याविषयी कोणत्याच प्रकारचा विधीनिषेध न करिता त्यांच्याबरोबर शुद्ध अंतकरणाने आचरण करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.  
 • स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांपैकी कोणाची आवडनिवड न करितां त्यांतील महारोग्यांस, पंगूस व पोरक्या मुलांस आपल्या शक्तीनुसार मदत करतात अथवा त्याला मदत करणाऱ्यांस सन्मान देतात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.(कीर, मालशे, फडके (संपा.), २००६, पृ. ४४३-४४७)    

आजच्या आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक जीवन आणि क्षेत्रांमध्ये जे भ्रष्ट वर्तन आणि अनैतिक व्यवहार चालू आहेत. ते सगळं महात्मा जोतीराव फुल्यांच्या दृष्टीने ‘असत्यवर्तन’ आहे. फुल्यांच्या सत्यवर्तनाच्या कल्पनेतून समाज, धर्म, कुटुंब, स्त्री-पुरुष नातेसंबंध, भावकी, गावकी, निसर्ग, प्राणीमात्रा, पंगु, अंध, अनाथ, स्वातंत्र्य, अंधश्रद्धा अशा सगळ्याच गोष्टी आल्या आहेत. वाचाळपणा, व्देषभाव, तिरस्कार, शोषण, फसवणूक, तुच्छता, दुजाभाव, बढाईखोरपणा, पिढीजात श्रेष्ठत्वाची कल्पना, जबरदस्ती, व्यसनाधीनता, लोभीवृत्ती या सगळ्या गोष्टी ‘सत्यवर्तना’त अडथळा निर्माण करतात. त्यामुळे जे लोक या गोष्टी करतात. ती लोक महात्मा फुल्यांच्या दृष्टीने सत्यवर्तन करणारी नाहीत.  

 

धर्मांधतेच्या अंधारयुगात वैश्विक मानवतावादाची सत्यशोधकीय प्रकाशवाट  

महात्मा जोतीराव फुल्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी जरी महाराष्ट्र असला तरी विचारांच्या आणि चिंतनाच्या क्षेत्रात मात्र जोतीरावांनी संपूर्ण जगाला आणि मानव जातीला गवसणी घातली आहे. त्यामुळेच ते म्हणू शकले की,  

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||

न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा || आंनद करावा || भांडू नये ||२||

धर्मराज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाठी ||३||

सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||

महात्मा फुल्यांच्या वैश्विक मानवतावादात फक्त मानवालाच नव्हे तर निसर्ग आणि प्राण्यांनाही तेवढेच स्थान आहे. ‘मानवाचा धर्म एक’ यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 

निर्मिकाने जर एक पृथ्वी केली ||  वाही भार भली || सर्वत्रांचा||१||

तृणवृक्षभार पाळी आम्हासाठी|| फळे ती गोमटी|| छायेसह||२||

सुखसोईसाठी गरगर फेरे|| रात्रंदिन सोरे || तीच करी ||३||

मानवाचे धर्म नसावे अनेक || निर्मिक तो एक|| जोती म्हणे|| ४||

एक सूर्य सर्वां प्रकाशास देतो|| उद्योगा लावीतो|| प्राणीमात्रा ||१||

मानवासहीत प्राण्यांचे जीवन|| सर्वांचे पोषण|| तोच करी||२||

सर्वां सुख देई जनकाच्या परी|| नच धरी दूरी|| कोणी एका||३||

मानवाचा धर्म एकच असावा|| सत्याने वर्तावा|| जोती म्हणे||४||

एक चंद्र नित्य भ्रमण करितो|| सर्वां सुख देतो|| निशीदिनी|| १||

भरती आहोटी समुद्रास देती|| जल हालवितो|| क्षारासह||२||

पाणी तेच गोड मेघा योगे होते|| संतोषी करीते|| सर्व प्राण्या||३||

मानवाचे साठी बहु धर्म कसे|| झालां कां हो पिसे|| जोती म्हणे||४||

सर्वांसाठी एक वायु केला खास|| घेती श्र्वासोच्छवास|| प्राणीमात्र||१||

वृक्षवल्लीसह सर्वांचे जीवन|| करीतो पालन|| जगामाजीं||२||

वायुच्या योगाने हवा शुध्द होती|| प्राण्या सुख देती|| निशीदिनी||३||

मानवांनो, तुम्ही ईशा नित्य भ्यावे|| सर्व सुखी व्हावे|| जोती म्हणे||४||

सर्व मानव जातीला जसा एकच निसर्ग आहे आणि तो सूर्य, चंद्र, वायु, वृक्ष यांच्यामाध्यामातून जगातील सर्व माणसांना उपयोगी पडतो. तसेच, जगभरातील लोकांना वेगवेगळ्या धर्मांची गरज नाही. एकच धर्म माणसांना उपयोगाचा आहे आणि तो आहे मानवधर्म. त्यालाच आपण वैश्विक मानवतावादही म्हणू शकतो. आज जगभरात राष्ट्रवाद, दहशतवाद, युध्द, देशीवाद, साम्राज्यवाद, भांडवलशाही यामुळे वैश्विक आरोग्य बिघडत आहे. जागतिक शांतीची चर्चा ही फक्त चर्चा ठरत आहे. आजचे अनेक प्रश्न हे वैश्विक असल्यामुळे वैश्विक पातळीवर सामंजस्य, संवाद निर्माण केल्याशिवाय ते सुटणार नाहीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे पण तरीही जागतिक शांती आणि वैश्विक सामंजस्य निर्माण होत नाही. 

म्हणूनच, महात्मा जोतीराव फुल्यांचा वैश्विक मानवतावादाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आज जगभरात लष्करावर मोठा खर्च होत आहे. त्याच्या मागे मोठा ‘युध्द बाजार’ उभा आहे असेही अनेक अभ्यासक म्हणतात. जागतिक शांती आणि वैश्विक सामंजस्य हे युध्द बाजाराला नको आहे. एका ठिकाणी महात्मा जोतीराव फुल्यांनी अज्ञान, युध्द आणि शेतकरी, कारागिरांचा घामाचा पैसा याचा संबंध जोडत म्हटले आहे की, “एकंदर सर्व जगांतील लोकांनी आपआपल्या मुलीमुलांस शाळेत घालवून त्यांस सत्यज्ञानविद्या दिल्याबरोबर सहजच ते सर्व लोक सद्गुणी झाल्यामुळे कोणी कोणाच्या राष्ट्रांवर स्वाऱ्या करणार नाहीत आणि यामुळे एकंदर सर्व जगांत जागोजाग शेतकऱ्यांसह कारागिरांच्या निढळाच्या घामाचे कोट्यावधि रुपये खर्ची घालून निरर्थक फौजफाटे ठेवण्याचा त्या सर्व सरकारांस प्रसंग येणार नाही.” (कीर, मालशे, फडके (संपा.), २००६ पृ. ४५८)

 

महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजावर काही मंडळी दबक्या आवाजात चुकीची आणि खोटी माहिती पसरवतात.

 

महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजावर काही झापडबंददृष्टीच्या आणि कोत्या मनोवृत्तीच्या लोकांनी दोषारोप केले होते. अजूनही, काही मंडळी दबक्या आवाजात चुकीची आणि खोटी माहिती पसरवतात. त्यातील एक मुद्दा म्हणजे ब्राह्मणद्वेषाचा आणि दुसरा म्हणजे ख्रिस्तीधर्म स्वीकाराचा. हे दोन्ही आरोप अर्थहीन आहे. मागील दोन- तीन दशकांमध्ये देशी-विदेशी अभ्यासकांनी मराठी आणि इंग्रजीत महात्मा फुले, सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेत्तर चळवळ याविषयी विपुल संशोधन केले आहे. त्यामुळे या आरोपांना काहीही अर्थ नाही. तरीही, काहीजण जाणीवपूर्वक महात्मा फुल्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न हाणून पाडला जातो. 

‘खिस्त महंमद मांग ब्राह्मणासी|| धरावे पोटाशी|| बंधूपरी|| मानव भावंडे सर्व एक सहा|| त्याजमध्ये आहां || तुम्ही सर्व|| ही महात्मा जोतीराव फुल्यांची भूमिका होती. अलीकडच्या काळात काही मंडळी त्यांच्या लिखाणातील काही ओळी काढून त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणासाठी, ब्राह्मणविरोधासाठी वापरण्याचा प्रयत्न करतात. पण, महात्मा जोतीरावांना जातीच्या, धर्माच्या, राज्याच्या चौकटीत अडकवणे शक्य नाही. कारण, त्यांच्या दृष्टीत सर्व धर्म, सर्व स्त्री-पुरुष मानव समूह सारखेच आहेत. म्हणूनच, त्यांनी ख्रिस्ती, मुस्लीम, मांग आणि ब्राह्मण सगळ्यांना बंधू म्हणून पोटाशी धरण्याची भूमिका घेतली आहे. महात्मा जोतीराव फुले आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी सर्व धर्मांना समान मानत असले तरी ते धर्माच्या कर्मकांडामध्ये अडकत नव्हते. माणसासाठी धर्म आहे धर्मासाठी माणूस नव्हे अशीच काहीशी त्यांची भूमिका होती.  

१८९३ मध्ये मुंबई शहरात हिंदू-मुस्लीम दंग्यामुळे मोठी वित्तहानी आणि मानवहानी झाली होती. सोबतच, हिंदू मुस्लिमांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. त्यावेळी दंगा शमवण्यामध्ये आणि दंग्यानंतर लोकांची मने जुळवण्यासाठी सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे, पंडित धोंडीराम नामदेव आणि इतर मंडळीनी हिंदू- मुस्लिमांचा प्रीती मेळावा भरवला होता. त्यात ६०,००० हजारांवर मनुष्ये हजर झाली होती.(८ ऑक्टो. १८९३, दीनबंधू, ) प्रीती मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांची मने जुळवण्याचे आणि जोडण्याचे प्रयत्न सत्यशोधकांनी मुंबई शहरात त्यावेळी केले होते. ४ ऑगस्ट १८९५ च्या दीनबंधूमधून सत्यशोधकांची धर्मविषयक भूमिका नेमकी कशी होती हे स्पष्ट होते. 

 

‘ख्रिस्ती व हिंदू लोकांतील चर्चमिशन व आर्यधर्म रक्षक वाद’ या लेखामध्ये दीनबंधूकारांनी म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडेंनी म्हटले आहे की, “ह्या संबंधाने पूर्वी अनेक वेळा विद्वान लोकांत चांगले कडाक्याचे वादविवाद झाले आहेत. आमच्या धर्मातील देव अमूक होते व तमक्या धर्मातील देव तमुक होते अशा बद्दल सध्या अनमान करण्याचे काहीच प्रयोजन नाही. जो धर्म मनुष्यास मनुष्यपण देतो किंवा ज्या धर्माचे लोक किंवा धर्मगुरू आपल्या एकंदर स्वधर्मीय बांधवांच्या हितास्तव काळजी बाळगतात तोच धर्म चांगला आहे आणि हेच आंता दाखविण्या करिता प्रत्येक धर्माच्या मनुष्याने व धर्मगुरूने झटले पाहिजे. निरर्थक बाचा बाच करण्यात व कोटिक्रम लढविण्यात काही एक फायदा नाही. धर्म चांगला आहे परंतु त्या धर्माचे स्वरूप खरे रहस्य काय आहे हे जर त्या त्या धर्मातील लोकांस समजत नाही तर त्या धर्माच्या चांगलेपणाचा उपयोग काहीच नाही.” (२६ मे १८९५, दीनबंधू) या दोन्ही उदाहरणांमधून सत्यशोधकांची मानवधर्माची भूमिका स्पष्ट होते.  

आज आपल्या समाजात आंतरधर्मीय प्रेम करणाऱ्या लोकांना जाणीवपूर्वक छळले जात आहे. तसेच, आंतरधर्मीय विवाह होवू नयेत म्हणून कायदा आणण्याचाही प्रयत्न चालू आहे. महात्मा फुल्यांनी मात्र दीडशे वर्षांपूर्वी सर्वधर्मीय कुटुंबांचे स्वप्न पाहिले होते. एका कुटुंबातील स्त्री ही बौद्ध असू शकते तर पती हा ख्रिस्ती होवू शकतो. मुलगी ही मुस्लीम धर्म स्वीकारू शकते तर मुलगा हा सत्यधर्मी राहू शकतो असे महात्मा फुले म्हणतात. तसेच, या कुटुंबातील सर्व मातापित्यासह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत असता प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये आणि सर्वांनी आपण सर्व निर्माणकर्त्याने निर्माण केलेली लेकरे असून त्याच्याच (निर्मिकाच्या) कुटुंबातील आहोत, असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकाशी वर्तन करावे. अशा सर्वधर्मीय कुटुंबाचे स्वप्न महात्मा फुल्यांनी पाहिले होते. आजच्या धार्मिक द्वेषाच्या, तिरस्काराच्या असहिष्णू, अमानुष शोषणाच्या, विषमतेच्या वातावरणात अजूनही महात्मा जोतीराव फुल्यांचा वैश्विक मानवतावाद आणि मानवधर्म दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. म्हणूनच, तथाकथित सत्योत्तर काळातही सत्याग्रह करणाऱ्या, सत्यशोधकदृष्टी ठेवणाऱ्या आणि सत्यवर्तन करणाऱ्या सत्यशोधकांचे विचार प्रासंगिक आहेत. 

 

डॉ. देवकुमार अहिरे, इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

आपल्या प्रतिक्रिया  indiejournalindia@gmail.com वर कळवा.