India

मुंबई विद्यापीठात आयोजित हिंदुत्व आणि झायनवाद कार्यक्रमावरून वाद

झायनिझमसारख्या द्वेषपूर्ण विचारसरणीला सामान्यीकरण करण्याचा विद्यार्थी संघटनेकडून विरोध

Credit : Tejas Mhatre

मुंबई: मुंबई विद्यापीठामध्ये २६ ऑगस्ट रोजी कॉन्सुलेट ऑफ इस्राएल व इंडो-इस्राएल फ्रेंडशिप असोसिएशन द्वारे 'Leaders' Idea of the Nations in the context of Zionism-Hindutva' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप नेते व राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी तसेच इस्रायलच्या हिब्रू विद्यापीठाचे प्राचार्य गादी ताऊब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते होते. हे दोघे आपापल्या शैलीमुळे व वैचारिक मांडणीमुळे नेहमीच चर्चेत असतात तसेच आपल्या विचाराचे बेधडक समर्थन ही करतात.

विद्यापीठातील 'दिशा विद्यार्थी संघटनेने कालिना कॅम्पस गेट जवळ विरोध प्रदर्शन आयोजित केले. "आपल्याला एक सामान्य फरक समजून घ्यावे लागेल ते म्हणजे एखादी कट्टरवादी संघटना असणे आणि खुद्द सरकारच कट्टरवादी असणे. फिलिस्तीनी जनतेवर आज जो काही अन्याय, अत्याचार झाला आणि होते आहे ह्याचे मूळ ह्या झायनवादी विचारातून आहे.भारतात हिंदुत्वही अशाचप्रकारे आपण वांशिकतः श्रेष्ठ आहोत अशी मांडणी करतो आणि वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला हे विचार कट्टरवादी बनवतात. या मानसिकतेतून मुस्लिम वा इतर द्वेष उद्भवतो आणि मॉब लिंचींग सारख्या गोष्टी घडतात. कत्तली करण्याची भाषा आजकाल कोणी ही सोशल मीडियावर टाकत असतात. अशा कट्टरवादी विचारांचे कार्यक्रम हे मुंबई विद्यापीठात कसे काय आयोजित केले जाऊ शकतात, हे शिक्षणाचे भगवेकरण नाही तर अजून काय आहे? तसेच BDS(boycott, divestment saction) साठी इस्राएलच्या कंपन्याही तितक्याच जबाबदार आहेत. मी सर्व शांतताप्रिय, न्यायप्रिय नागरिकांना आणि युवा वर्गाला आव्हान करतो की ह्याचा पुर्जोर विरोध करा," असे दिशा विद्यार्थी संघटनेचे सदस्य अविनाश म्हणाले.

मात्र मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार अजय देशमुख म्हणाले, "हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. विद्यापीठाने कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही किंवा तो कोणत्याही प्रकारे संबद्ध नाही. नेहमीच्या प्रथेप्रमाणे दीक्षांत सभागृह तृतीय पक्षाला भाड्याने देण्यात आले होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी याचा निषेध करण्याचे आणि विद्यापीठाच्या हेतूंवर प्रश्न करण्याचे कोणतेही कारण नव्हते."

 

झायनवाद म्हणजे काय?

झायनवादात 'झायन' ही ज्यू लोकांच्या प्राचीन जन्मभुमी असल्याचे सांगितले जाते, ज्यू लोकांच्या राज्य-स्थापनेच्या माध्यमातून ज्यू लोकांच्या स्वायत्त हक्काची पुष्टी करणारी ही धार्मिक-राष्ट्रवादी चळवळ आहे. ही जगातील सर्वात वादग्रस्त विचारसरणींपैकी एक आहे. छळांच्या हजारो वर्षानंतर ज्यू लोकांना मुक्त करण्यात आणि इस्राईलची निर्मिती सुरक्षित ठेवण्यात यश मिळाल्याबद्दल त्याचे समर्थक त्याचे कौतुक करतात. परंतु त्याच्या विरोधकांना, या विचाराने पॅलेस्टाईनच्या भूभागावर इस्रायलच्या ताब्यात घेतलेल्या वंशवादी विचारसरणीवर अवलंबून आहे आणि जगातील औपनिवेशिक दडपशाहीच्या शेवटच्या अभिव्यक्तींपैकी एक आहे. १९९०च्या नंतर, जागतिक बातम्यांमधील पॅलेस्टाईन-इस्त्रायली संघर्षाच्या केंद्राने हा वाद आणखी तीव्र केला आहे.