India

बर्ड फ्लूबाबतच्या गैरसमजांमुळे ३०० कोटींचं नुकसान

पोल्ट्री व्यवसायासह ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात.

Credit : सुरेश ईखे

राज्यात बर्ड फ्लूच्या संकटांबाबत नागरिकांमध्ये पसरलेल्या भीतीमुळे चिकन, अंडी यांचे भाव कमी झालेले आहेत. राज्य व केंद्र सरकारनं याबाबत, लोकांनी कोणत्याही अफवा व गैरसमजांवर विश्वास न ठेवता मांसाहार करावा, असं सांगितलेलं असतानाही लोकांनी चिकन आणि अंड्यांचं सेवन कमी केलं आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झालेला असून एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे.

राज्यात दरमहा ६ कोटी पक्षी विक्रीसाठी उपलब्ध होतात. या पक्ष्यांचं वजन प्रत्येकी दोन किलो (सरासरी) धरलं तरी बारा कोटी पक्ष्यांच्या (कोंबड्या) विक्रीमध्ये सध्या उत्पादनखर्चापेक्षा साधारण २५ रुपये कमी मिळत आहेत. दर किलोमागे पंचवीस रुपयांचा तोटा असं गणित केलं तर राज्याला महिन्याभरात साधारण ३०० कोटी रुपयांचं नुकसान या व्यवसायात झालेलं आहे. किलोमागे उत्पादनखर्चापेक्षा २५ रुपये कमी मिळतात, हेही सतत बदलत जाणारं गृहीतक असून त्यापेक्षा अधिकच नुकसान होत आहे, उदा., आज कोंबड्यांचा उत्पादकांना मिळणारा दर आहे, प्रतिकिलो चाळीस रुपये. हा दर उत्पादन खर्चापेक्षा ३५ रुपयांनी कमी आहे. महिन्याभरात ३०० कोटी रुपयांचं नुकसान हा राज्याचा आकडा असला तरी यावरून संबंध देशाला यातून किती नुकसान झालं असेल, याची कल्पना आपण करु शकतो. कुक्कुटपालन व्यवसायातून दरमहा देशपातळीवर जी उलाढाल होते, त्यातला १० टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.     

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर इंडी जर्नलनं काही कुक्कुटपालन व्यावसायिकांशी संवाद साधला. परभणीच्या सोनपेठमधल्या सुरेश इखे यांचं एक हजार पक्ष्यांचं शेड आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायावर झालेल्या परिणामाची माहिती दिली. “कोरोनानंतर लॉकडाऊन झालं. त्या काळातही नॉन वेज खाल्यानं कोरोना होतो, अशी अफवा पसरली होती. त्यामुळं तेव्हाही चिकन, अंड्यांचे भाव पडले होते. त्या काळातही पाच सहा महिने आमचे नुकसानातच गेले, आता दोन तीन महिन्यांपासून सगळी परिस्थिती सुरळीत झाल्यावर परत बर्ड फ्लू आला. त्यामुळं परत नुकसान. एरवीच आमच्या पक्ष्यांना किलोमागं ७० ते ७५ रुपये भाव मिळतो. बाजारभाव ९० रुपये किलो जरी असला तरी ट्रेडर त्यातून त्याचे १० ते १५ रुपये किलोमागे कमिशन काढून घेतो. बर्ड फ्लूच्या आधी ९५ ते १०० रुपये किलोला भाव होता. आता ६५ - ७० रुपये किलोचा भाव आहे. आता ७० रुपयातून पण  ट्रेडरनं त्याचे पैसे कापून घेतले, तर आम्हाला खाली काही उरतच नाही. ट्रेडरचे पैसे वजा जाता जर किलोला ८० रुपये भाव आमच्या हातात पडला तरच आम्हाला परवडतं, नाही तर उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही, त्यामुळं खिशातून पैसा घालावा लागतोय.”

आपल्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, “माझी दर ४५ दिवसाला १,००० पक्ष्यांची बॅच असते. एका बॅचला साधारण दीड लाख रुपये गुंतवणूक लागते. पण सध्याच्या परिस्थितीमुळं फायदा तर होतच नाहीये पण घातलेले पैसेही निघत नाहीयेत. माझ्या दोन बॅचचं असंच नुकसान झालं. खरं म्हणजे बर्ड फ्लूचं संकट मीडीया दाखवतो तेवढं मोठं नाही पण चुकीच्या बातम्या आणि व्हाट्सअपवरच्या अफवांमुळे लोक चिकन, अंडी खात नाहीयेत.”  

कुक्कुटपालन हा शेतीला जोडव्यवसाय म्हणून करणाऱ्या छोट्या उद्योजकांना तरी शेती किंवा इतर काही आधारामुळे किमान जगण्याची भ्रांत तरी पडत नाही, पण ज्या उद्योजकांच्या मोठ्या पोलट्री आहेत आणि हाच एकमेव व्यवसाय आहे, त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे.

बर्ड फ्लु मुळं राज्यात जितकं नुकसान झालेलं नाही, त्यापेक्षा किती तरी पटीनं अधिक नुकसान मुख्य माध्यमांनी या विषयाच्या केलेल्या चुकीच्या वार्तांकनानं झालेलं आहे, अशी खंत या क्षेत्रातल्या अनेकांनी इंडी जर्नलशी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र ब्रीडर्स एंड पोल्ट्री असोसिएशनचे सदस्य असलेले राजू थोरात याबद्दल म्हणाले, “आपल्याकडे सुरुवातीला उत्तर भारतातल्या बातम्या आल्या, त्या स्थलांतरित पक्ष्यांच्या होत्या. नंतर त्यांचे विषाणू परसबागेत पाळल्या जाणाऱ्या काही देशी कोंबड्यांमध्ये आढळले. पण ही रुटीन गोष्ट आहे. ठराविक काळानं असे आऊटब्रेक होतच असतात. अगदी दरवर्षी राणीखेत किंवा मरतुकीचेही आऊटब्रेक होतात. पण त्यामुळं एवढं घाबरून जाण्याची गरज नसते. मुळात परसबागेत पाळल्या जाणाऱ्या काही तुरळक कोंबड्यांमध्ये याची लागण होते, कारण त्यांचं लसीकरण झालेलं नसतं, इतर कमर्शिअल पोल्ट्रीजमध्ये अजूनही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची केस कुठे रिपोर्ट झालेली नाही आणि आपल्याकडे २००६ नंतर आतापर्यंत जेवढे असे आऊटब्रेक झाले आहेत, ते परसबागेतल्या देशी कोंबड्यांमध्येच आढळले आहेत. तरीही मीडिया अशा प्रकारे बातम्या देते, की लोक घाबरून चिकन, अंडी खायचं बंद करतात.” राजू थोरात स्वत: कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. पुण्यातील रावेतजवळ त्यांची पोलट्री फार्म्स असून सध्या त्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्याची माहिती त्यांनी दिली.  

कुक्कुटपालन व्यावसायिकांना पक्ष्यांच्या खाद्यासाठी दररोज साडेचार रुपये प्रतिकोंबडी इतका खर्च येतो आणि सध्या विक्री नसल्यामुळे हा माल फार्मवर पडूनच आहे. असं असलं तरीही व्यावसायिकांना कोंबड्यांच्या खाद्यावर खर्च तर करावाच लागतो, त्यामुळे सध्या लोक मिळेल त्या भावाला विक्री पक्ष्यांची विक्री करताहेत आणि आताच्या परिस्थितीत हा माल काढून टाकण्यासाठी व्यावसायिकांमध्ये चढाओढ असल्यानं मालाचे भाव अजूनच पडत आहेत.

बर्ड फ्लू आणि त्याचा राज्यातील पोल्ट्री व्यवसायावर होणारा परिणाम याबद्दल कृषीतज्ञ दीपक चव्हाण सांगतात, “हा फक्त पोल्ट्री व्यवसायाला बसलेला फटका नसून एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पोल्ट्री इंडस्ट्रीवर परिणाम झाला की मका आणि सोयाबीनचे भावही पडतात. मका, सोयाबीन हे या पक्ष्यांचं खाद्य असून कुक्कुट उत्पादनसाखळीतला महत्वाचा घटक आहेत. या व्यवसायाचा शेती आणि शेती उत्पादनांशीही संबंध असल्यामुळे कृषी उत्पादनसाखळीवरही त्याचा परिणाम होतो.” 

चव्हाण यांनी आणखीही काही महत्वाचे मुद्दे मांडले. “राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं चिकन प्रॉडक्ट्स सुरक्षित असल्याचं सांगूनही ग्राहकांनी चिकन, अंड्यांचं सेवन कमी केलं. बर्ड फ्लूआधी दर १०० नगांमागे ५०० रुपये असा अंड्याचा भाव होता आणि ब्रॉयलर चिकनचा प्रतिकिलो ९० रुपये इतका होता. आता हे भाव खूप पडलेत. तरी त्यात अंडी किमान कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येतात पण ब्रॉयलरचं तसं नाही, ब्रॉयलर विकणारे लोक खूप जास्त चिंतेत आहेत. ही परिस्थिती उद्भवण्यासाठी माध्यमं जबाबदार आहेत. माध्यमांनी याबाबत वस्तुस्थिती नीट समजून घेऊन मग बातम्या द्यायला हव्यात.” 

भारतीय आहारशैलीत चिकन वा कोणत्याही प्रकारचं मांस हे उकडून, शिजवून खाल्लं जातं, समजा एखाद्या देशी पक्ष्यांत असा विषाणू आढळला जरी, तरी ज्या तापमानाला मांस शिजवलं जातं, तेवढ्या तापमानात हे विषाणू जिवंत राहण्याची शक्यता नसतेच, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वा खोट्या माहितीवर, अफवांवर विश्वास न ठेवता चिकन, अंडी इ. चं सेवन सुरु ठेवलं पाहिजे, असंही चव्हाण यांनी सांगितलं.