Quick Reads

माझ्या प्रिय कट्टर देशभक्तांस

माझ्या प्रिय 'कट्टर' देशभक्तांस एक शरणागतीचं पत्र

Credit : क्वोरा

माझ्या प्रिय 'कट्टर' देशभक्तांस,

सप्रेम नमस्कार.

पत्रास कारण की, आज आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. कितवा, त्या तपशिलात जात नाही, 'पण मागच्या ७० वर्षात' अशा शब्दांनी सुरु झालेली वाक्यं आजकाल सारखी ऐकू येत असताना ७० वगैरे वर्षच झाली असावीत असं समजू. तर, पुन्हा, पत्रास कारण की, मला इतकंच सांगायचं आहे, की तुम्ही जिंकलात. तुम्ही या देशावर तुमच्या प्रखर देशभक्तीनं आणि जाज्वल्य देशाभिमानानं तुमची जरब बसवली आहे, आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदनच. तुम्ही, तुमचा विचार आणि तुमच्या मागण्या, जिंकल्या. तुम्ही बांधत असलेल्या नव्या भारताला आमच्या शुभेच्छा. आता यापुढं तुम्हाला आमच्याकडून कसलाही त्रास दिला जाणार नाही. 

यापुढं कधीच, तुमच्या जमिनी, तुमचे अधिकार, तुमचे पैसे आणि या देशाच्या निर्णयप्रक्रियेत तुम्ही, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, एक आवाज, या तुमच्या सहभागाचा अवमान होत असेल, ते अधिकार तुमच्याकडून कधी कोणी काढून घेत असेल, तर आम्ही काहीही बोलणार नाही, अगदी तेव्हाही नाही, जेव्हा आज कुठल्यातरी राज्याला जितक्या सहज गुढगे टेकवायला लावता येतं, तितक्याच सहज तुमच्या शेतातून खाजगी कंपनीच्या प्रकल्पाची लाईन जात असेल आणि तुमची ती जमीन सोडण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला नामवता येईल. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर फक्त 'अर्बन नक्सल, लिबरल, एलिट, देशद्रोही' लोकांसाठीच उपयोगी आहे. तुम्हाला अभिव्यक्ती करायचीच कुठंय? अभिव्यक्ती म्हणजे, घरातल्या मिठावर अवाजवी कर लागला असताना शेकडोंच्या संख्येनं जाऊन समुद्रकाठचं मीठ हातात घेऊन आपला मिठाचा हक्क सांगणं थोडेच असतं. अभिव्यक्ती म्हणजे तर फक्त नाच-गाणं, लेख आणि नग्न पेंटिंग. यापुढं तुम्हाला कधीच आम्ही अभिव्यक्तीचे गोडवे गाऊन दाखवणार नाही, शेवटी गाऊन दाखवणं म्हणजेपण अभिव्यक्तीच की, मग ती तुमच्याच अधिकारांच्या रक्षणासाठी का असेना, नकोच ती.  

यापुढं आम्ही तुम्हाला सांगणार नाही की कुठल्यातरी मुक्या राज्यात, कुठल्यातरी अदृश्य वस्तीत, कुठल्यातरी कोपऱ्यात, कोणातरी अभागी लेकराच्या डोळ्यात बंदुकीचे छर्रे जाऊन ते कण्हत पडलं आहे, त्याच्यावर गोळी चालवणारा तोच सैनिक, ज्याचा बाप शेतीसाठी आंदोलनाला उतरलेला असताना इथल्या कोणीतरी पोलिसानं त्याच्यावर गोळी चालवलेली. आम्ही नाही बोलणार काहीच, कारण व्यक्ती आणि समूह यातला फरक आपण समजू शकत नाहीये आणि काही सैनिक, काही पोलीस काही गैरकृत्य करूही शकतात आणि त्याच्यावर बोट ठेवणं म्हणजे अख्ख्या सैन्यावर आणि पोलीस दलावर हल्ला करणं असा अर्थ होत नाही. आम्ही नाही बोलणार की फक्त ते राज्य तुमच्यापासून शेकडो किलोमीटर दूर आहे म्हणून तुम्ही इथं बसून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला, जबरदस्तीला मान्यता द्या, कारण साहजिकच आहे, आपण काय ठेका घेतलाय का त्यांचे अधिकार सांभाळायचा? आपणही पाकिस्तानचा नेक आदर्श घेत घुसून मारलं पाहिजे, कारण आपले आदर्श तेच तर आहेत. हौज द जोश!!!!  

आम्ही तुम्हाला नाही म्हणणार यापुढं की पुराणांमधलं ज्ञान हे तत्वज्ञानात्मक आहे, त्याला आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी ओढून ताणून विज्ञान ठरवणं चूक होईल, कारण आम्हाला माहित आहे तुम्हाला किती बरं वाटतंय कॅन्सर बरं करणारं गोमूत्र पिऊन. आम्ही नाही सांगणार की गाय कार्बन डायओक्सइडचा श्वास घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडू शकत नाही, कारण ती इतर प्राण्यांप्रमाणे उर्जेवरच जगते आणि खाल्लेल्या अन्नाला पचवण्यासाठी, म्हणजे त्याला पोटाच्या यज्ञात जाळण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा असतो, त्यातून ऊर्जा निर्माण होते आणि जळून जे उरतं ते कार्बन डायऑकसाइड रूपात बाहेत येतं. आम्ही नाही सांगणार, की इतर कुठल्याही प्राण्याप्रमाणे गाईच्या मूत्रातसुद्धा अमोनिया आणि जंतू असतात, कारण त्यासाठीच कुठलंही शरीर मूत्र तयार करतं, जेणेकरून ते सगळं त्यावाटे शरीरातून बाहेर काढता येईल. यापुढं तुम्हाला असलं काही सांगून तुम्ही आजारी पडू नये, तुमच्या लिव्हरला इजा होऊ नये असला काहीही प्रयत्न आम्ही करणार नाही. आम्ही नाही सांगणार की पुष्पक विमानाची तुम्ही दाखवत असलेली डिझाईन उडू शकत नाहीत कारण निसर्गानं पक्ष्यांचा बनवलेला आकार हवेला वितरित करण्यात मदत करतो आणि म्हणून ते उडू शकतात आणि आज उडणारी विमानं त्या तत्वावर रचलेली आहेत म्हणून उडतात, पाश्चात्य आहेत म्हणून नव्हे. कारण आम्हाला हिंदू विरोधी म्हणवून घेण्याची हौस आता उरली नाहीये. 

आम्ही तुम्हाला नाही सांगणार, की आपल्या देशात जात बघितल्याशिवाय आपण नातीही जोडत नाही पण आपण स्वतःला राष्ट्रवादी म्हणून घेतो, हा विरोधाभास आहे. कारण आम्ही असं जरी म्हणालो, की जोवर तुम्ही तुमच्या देशातल्या कुठल्याही इतर माणसाला तो तुमच्या देशाचा नागरिक आहे इतक्याच ओळखीवर आदरार्थी बघणार नाही तोवर तुमच्या देशभक्तीचा अर्थ नाही आणि तुम्ही फक्त तुमच्या जात किंवा धर्म याच्यासाठी असेल तोच देश मानत बसणार. तुम्हाला माहित नाही का आम्ही किती नालायक आणि क्रूर आहोत, आम्ही चक्क तुम्हाला तुमच्या देशातील इतरांशी समानतेनं वागा असं म्हणालो! हिम्मत कशी झाली आमची? कापून काढा एकमेकांना, आम्ही तुम्हाला कुठलाही देशद्रोही एकात्मतेचा नारा देणार नाही किंवा कसला शहाणपणा शिकवणार नाही, तुम्हाला यापुढं आम्ही कसलाही त्रास देणार नाही.

यापुढं, कधीच, जळत्या चितेवर असलेल्या पतीच्या पार्थिवावर जबरदस्ती नशजन्य पदार्थ पाजून तुमच्या ओळखीची, बहीण, ताई, अक्का, वहिनी, काकी, मावशी, माय जेव्हा पुन्हा 'पवित्र' सतीच्या अग्नीत फेकली जाईल, तिच्या जळत बाहेर पडू पाहणाऱ्या शरीराला, तिच्या किंचाळण्याकडं दुर्लक्ष करत जेव्हा लांब काठी घेऊन आत ढकललं जाईल, अगदी तेव्हाही आम्ही काही बोलणार नाही. आम्ही तुम्हाला त्या ख्रिस्ती छुपा एजंट राजा राम मोहन रॉयसारखं नाही म्हणणार की अशी प्रथा प्रथा असली तरी तिचं आजच्या जगात त्याचं प्रयोजन नाही. कारण सुधारणा करणं, टीका करणं हे हिंदू धर्मविरोधी आहे, हा देश हिंदूंचा आहे, आधी मुसलमानांकडं बघितलं पाहिजे आणि हो आफ्रिकेतल्या काही देशात कुठल्यातरी मुस्लिम समाजाचे लोक मुलींचा खतना करतातच की. त्यांनी त्यांच्या स्त्रियांवर केलेल्या अत्याचार शोभेल असं आपलं उत्तर द्यायला नको? अर्थात, द्यायलाच पाहिजे, म्हणून आम्ही आता काहीच बोलणार नाही. 

तुम्ही आज टीव्ही बघू शकता, एसी लावू शकता, सिनेमाला जाऊ शकता, घरपोच जेवण-किराणा सगळं मागवू शकता, हे मान्यच आहे. तुम्हाला कशाला पाहिजेत नसत्या चौकशा सरकार कुठं खदानी मंजूर करतंय, कुठली शेती बळकावतय, कुठली जंगलं कापतंय, कुठे प्रकल्प मंजूर करतंय, त्या आमच्या मेधा पाटकर मॅडम सारखं मॅड थोडी आहोत आम्ही की तुमच्या कोणाच्या तरी, म्हणजे ते हजारो शेतकरी आणि गावकरी का असेनात, त्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या म्हणून ३०-३० वर्ष आंदोलन करू किंवा आपली जंगलं आणि जमीन वाचवू पाहणाऱ्या आदिवासी बांधवाच्या खांद्याला खांदा लावून त्याला फक्त नक्षलवादी म्हणून 'विकासविरोधी' ठरवला जाण्यापासून वाचवायचा प्रयत्न करू. कारण तुम्ही तर एसीची हवा घेता, तुमचा एसी ऑक्सिजन निर्माण करतो, पाणी पावसातून नाही तर बंद बाटलीतून मिळतं आणि दूध गाई नाही, चितळे तयार करतात, मग कशाला पाहिजे पर्यावरण संवेदना वगैरे, आम्हाला पण पाहिजे विकास. तुम्हाला आमचा पाठिंबा. उलट तुम्हाला जितकं गोड वाटेल, छान वाटेल, तितकं आणि तसंच तुमच्याशी खोटं बोलत जाऊ.  

शेवटी काय आहे, आज 'चू' जरी केलं, तर अचानक आकाशातून एक मोठी आकाशवाणी झाल्यासारखा आवाज येत, 'ए देशद्रोही! ए विकासविरोधी! ए नक्सली! ए हिंदू विरोधी!' खरंच आहे की. आजवर तुमचं नुकसान कोणी केलंय? यांनीच तर केलंय, ज्यांनी तुमच्या जमिनीचे लढे दिले, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचे लढे दिले, तुम्हाला चांगली औषधं मिळावी म्हणून लढे दिले, तुमच्यापर्यंत सरकारची योग्य माहिती पोहोचावी म्हणून लढे दिले, तुमचे हक्क कोणी काढून घेऊ नये म्हणून लढे दिले आणि तुम्ही धार्मिक उन्मादात जनावर होऊन तुमच्यासारख्याच, पण दुसऱ्या धर्माच्या-जातीच्या, माणसाला मारताना किंवा मरू देताना तुमच्यातल्या माणूसपणाला जिवंत ठेवण्याची विनंती केली, यांनीच तर केलं आहे या देशाचं नुकसान. तुम्ही आजपासून एकमेकाला मारू शकता, हव्या त्या जनावरांचं मूत्र पिऊ शकता, तुमच्या धर्माला दुसऱ्या कट्टरपंथीय मान्यतांचा आदर्श घेऊन नव्या उंचीवर नेऊ शकता आणि सैन्य, देशप्रेम, रंग, प्रतीकं अशा अमूर्त कारणांनी स्वतःच स्वतःच्या हातातल्या लोकशाही शक्तीचा गळा दाबून मारून टाकू शकता, तसेही तुम्ही आता असं टोळक्यानं मारून टाकण्यात तबरेज, सॉरी, तरबेज होत आहात. तुम्ही जिंकलात, अपेक्षा करतो, की किमान जिंकल्यावर तरी तुम्ही थोडे समाधानी व्हाल. 

 

तुमच्याइतकाच देशप्रेमी पण तुमच्यापेक्षा वेगळं मत ठेवण्याची हिम्मत कधीकाळी असलेला,

अर्बन नक्सल - पुरोगामी - झोळीवाला - मेणबत्तीवाला -ख्रिस्ती कमिशन एजन्ट - देशद्रोही - अल्पसंख्यांक लांगूलचालक - विकासविरोधी - धर्मद्रोही