India

एक्सक्लुझिव्ह मुलाखत: केरळनं लॉकडाऊनमध्येही यशस्वीरीत्या शालेय शिक्षण सुरु कसं ठेवलं, सांगत आहेत केरळचे शिक्षणमंत्री

सी. रवींद्रनाथ केरळचे शिक्षणमंत्री आहेत.

Credit : डेक्कन क्रॉनिकल

कोरोनाच्या प्रार्दुभावातही डिजीटल क्लासरूम्सच्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक सुविधा पोहचण्यात केरळ राज्य यशस्वी ठरलंय. डिजीटल लर्निंगच्या मर्यादा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी इंटरनेट सुविधांबरोबरच टेलिव्हिजनचाही प्रभावी वापर केल्यामुळे राज्य सरकारला यात भरीव यश मिळालंय. या पार्श्वभूमीवर केरळचे शिक्षणमंत्री प्रोफेसर सी. रवींद्रनाथ यांनी कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात डिजिटल डिव्हाईडवर मात करून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन पोहचण्यात केरळ सरकारला आलेलं यश, याबाबत इंडी जर्नलशी खास बातचीत केली.

 

टाळेबंदीच्या काळात आॉनलाउन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात इतर राज्यांना अनेक अडचणी येतायेत. या तुलनेत तुम्ही राबवलेल्या फर्स्ट बेल योजनेअंतर्गत टेलिव्हिजनचा प्रभावी वापर सुरू करून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्यात केरळ सरकार यशस्वी ठरलंय. हे तुम्हाला कसं शक्य झालं?

सी. रवींद्रनाथ: इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी आमचं प्रशासन सर्व परीने प्रयत्नशील आहे. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांकडे विशेषत: तळागाळातल्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेट आणि स्मार्ट फोन्सची सुविधा नसल्याकारणानं हे शक्य नव्हतं. त्यामुळेच आम्ही हे वर्ग भरवण्यासाठी ऑनलाइन माध्यमांबरोबरच टीव्हीचाहीवापर करण्याचं ठरवलं. डिजिटल माध्यमांसोबतच सॅटेलाइट टीव्हीच्या वापरामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास आम्हाला मदत झाली. अर्थात डोंगराळ आणि तुलनेनं अतिशय मागास भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही सेट्ससुद्धा नाहीत, याची आम्हाला कल्पना होतीच. अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांनी वैयक्तिकरित्या या भागात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून भेट द्यावी आणि या विद्यार्थ्यांना शिकवावं, अशी तरतूद आम्ही केलेली आहे. यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप्स, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच शैक्षणिक साहित्य या शिक्षकांना पुरवण्यात आलेलं आहे. अशाप्रकारे जे जे शक्य होईल त्या त्या मार्गांचा वापर करून १००% विद्यार्थ्यांपर्यंत या काळातही शैक्षणिक सुविधा पोहोचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. 

 

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता सीबीएससी सोबतच इतरही अनेक राज्य आणि त्यांच्या शिक्षण मंडळांनी या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मात्र आतापर्यंत ताटकळत राहिलेल्या सगळ्या परीक्षा केरळने मागच्याच महिन्यात घेतल्या. शिवाय या परिक्षांदरम्यान एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली नाही. हे कसं शक्य झालं?

सी. रवींद्रनाथ:टाळेबंदी दरम्यान रखडलेल्या सर्व परीक्षा सुरक्षितरित्या यशस्वीपणे पार पडण्यासाठी आवश्यक ते सगळे खबरदारीचे उपाय काळजीपूर्वक राबवले गेले. यासाठी आम्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करून परीक्षा प्रक्रियेत काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढवली. परीक्षेदरम्यान एका वर्गात एका बेंचवर एक याप्रमाणं ठरवून वीसच विद्यार्थी बसवले गेले. प्रत्येक वर्गात  सॅनिटायजर्सचा वापर, विद्यार्थी आणि शिक्षकांची थर्मल स्क्रिनिंग तसेच प्रत्येक शाळेतील खोल्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. अशा पद्धतीनं सर्व खबरदारी घेत एकालाही कोरोनाची लागण न होता १३ लाख विद्यार्थी परीक्षा देऊ शकले. 

 

 

कोरोनामुळे अत्यावश्यक बनलेली डिजीटल लर्निंगची प्रक्रिया विशेषतः मागास स्तरातील विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक आणि किचकट ठरणारी आहे. भारतासारख्या विकसनशील देशात हे जास्तच अवघड जाईल, अशी चिंता शिक्षणतज्ञांनीही व्यक्त केलेली होती. याउलट केरळने आणि इथल्या विद्यार्थ्यांनी डिजीटल लर्निंगची प्रक्रिया सहजतेनं आत्मसात केल्याचं दिसतंय. यामागे इथला अनुकूल असलेला साक्षरतेचा दर कारणीभूत असू शकेल का?

सी. रवींद्रनाथ: टाळेबंदी नंतर इथल्या शाळा बंद झाल्या. त्यामुळे मग घर हेच विद्यार्थ्यांची क्लासरूम बनलं. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालकही शिक्षित असल्याकारणानं या ऑनलाईन शिकवणीत ते आपल्या पाल्याला मदत करताना दिसत आहेत. यासोबतच नव्या पिढीचे हे विद्यार्थी आपल्या पालकांना ही नवीन डिजिटल लर्निंग ची प्रक्रिया समजावून सांगत आहे. यातून केरळमध्ये शिकण्याचा आणि शिकवण्याचा एक नवीन पायंडा पडत असून ही बाब भविष्याच्या दृष्टीने देखील निश्चितच आश्वासक म्हणावी लागेल. 

 

टाळेबंदीनंतर बंद पडलेल्या शाळा पुन्हा उघडण्याचा तुमचा विचार आहे का? कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग आणि त्याचा दैनंदिन आयुष्यावर कायमचा पडलेला प्रभाव लक्षात घेता या शाळा पुन्हा उघडल्यानंतर आगामी काळातील शिक्षणप्रक्रियेत कोणते मूलभूत बदल तुम्हाला अपेक्षित आहेत?

सी. रवींद्रनाथ: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला बऱ्यापैकी यश येत असून परिस्थिती वरचेवर अशीच सुधारत गेली तर पुढच्या काही महिन्यातच शाळा पुन्हा सुरू होतील. ज्याप्रमाणं मागच्या महिन्यात सर्व खबरदारी घेऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या त्याचप्रमाणं पुढच्या दोन-तीन महिन्यात शाळा पुन्हा उघडण्याचा आमचा हेतू आहे. नजीकच्या भविष्यात काय होईल हे सांगता येणं अवघड असलं तरी एका बाबतीत मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. ती बाब म्हणजे कोणत्याही कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत आम्ही तडजोड होऊ देणार नाही. या आलेल्या परिस्थितीकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिल्यास नवनवीन तंत्रज्ञान आणि क्लुप्त्या वापरून यावर्षीचाही शैक्षणिक अभ्यासक्रम दरवर्षीप्रमाणंच आम्ही पार पाडू, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही.

 

मूळ इंग्रजी मुलाखत इथं वाचता येईल. अनुवाद- प्रदीप बिरादार