Quick Reads

कांजीवरम: एक दीर्घ विद्रोहकविता

कामगाराच्या श्रमाची चोरी हा किती खोलात जाणारा आघात असतो याची कथा

Credit : Percept Pictures

कांजीवरम म्हटलं की साड्या आठवतात, रेशीम धाग्यात बारीक कलाकुसर केलेल्या हातमागावरच्या साड्या. १९३०-४०च्या आसपास घडणाऱ्या 'कांजीवरम' या सिनेमात याच साड्यांचं विणकाम करणाऱ्या हातांची संघर्षगाथा सांगितली आहे. कांजीवरम हा सिनेमा एकूणच दर्जेदार तामिळ सिनेमातही एक वेगळीच उंची गाठतो आणि एका दीर्घ विद्रोहकवितेसारखा उलगडत जातो आणि जागतिक स्तरावर ज्याचा उल्लेख व्हायला हवा असा सिनेमा क्वचितच इथं चर्चेत आला किंवा प्रसिद्ध झाला याबाबत आश्चर्य आणि दुःख वाटायला लावतो. 

कांजीवरम आपल्याला तामिळनाडूच्या कांचीपुरम गावात घेऊन जातो. हे गाव इथल्या विणकरांच्या कौशल्याबाबत प्रसिद्ध आहे. ब्रिटिश अजूनही भारतावर राज्य करताहेत आणि जमीनदारीवर गाव चालत आहे. शेठजी बाहेरून रेशीम धागे आणतो आणि इथल्या विनाकारांकडून साड्या विकत घेऊन इतरत्र विकतो. वेंगडम (प्रकाश राज) गावातल्या अनुभवी आणि सर्वोत्तम विणकाराचा मुलगा आहे. बाप मारतो तेव्हा आयुष्यभर विणकाम केलेल्या म्हाताऱ्याच्या फक्त पायाच्या अंगठ्याना बांधता येईल इतकं रेशीम व्यंगडमकडं आहे. स्वतःच्या मुलीच्या लग्नावेळी शेटजी व्यंगडमला तिच्या लग्नाची साडी विणायला सांगतो आणि व्यंगडम त्याच्या कलेचा अविष्कार दाखवत उत्कृष्ट साडी पेश करतो, ज्याचे शेटजी त्याला ७ रुपये आणि वर उत्तम कामाची शाबासकी म्हणून १ रुपया देतो. जास्त काही सांगत नाही, पण त्याच सीन मध्ये, हा जमीनदार शेटजी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला तीच आवडते म्हणून आपल्या मुलीच्या लग्नासाठीची साडी ८०० रुपयांना विकायचा प्रयत्न करतो!

पुढं व्यंगडम लग्न करतो आणि त्याला मुलगी होते. मुलगी झाल्यावर तिच्या कानात एक वचन देण्याची तिथं परंपरा असते. व्यंगडम बापाच्या उघड्या पार्थिवाचं दुःख विसरलेला नसतो. तो मुलीच्या कानात म्हणतो, 'मी तुझ्या लग्नात तुला रेशीम साडी नेसवून सासरी पाठवीन!' आणि तिथं उपस्थित असलेला प्रत्येक जण त्याच्या अशा वचनाने आश्चर्यचकित होतो, एक विणकर आपल्या मुलीला चक्क रेशीम साडी नेसवणार! पण व्यंगडम हुशार आहे. त्याच्या मुलीच्या लग्नाचा खर्च म्हणून त्यानं आधीच पैसे साठवायला सुरुवात केली आहे. घरी बायको, सासरी राहू शकत नसलेली बहीण आहे. तिचा नवरा बरेच दिवस तिला घ्यायला आला नाहीए. तो एकदिवस अचानक येतो, बहिणीला नांदवायला घेऊन जातो पण मला पैसे हवेत म्हणून हट्ट करतो आणि व्यंगडम मुलींसाठी साठवलेले पैसे त्याला देऊन टाकतो. 

kanjee

एकदिवस एक कारागीर जमीनदाराला तीन साड्यांचं रेशीम नेऊन दोनच साड्या बनवून देतो. वरचं रेशीम चोरलं म्हणून शेटजीची माणसं त्याला बेदम मारतात. त्यादिवसापासून ठरतं की यापुढं घरी विणकाम करता येणार नाही तर सार्वजनिक ठिकाणी मंदिरात हातमाग लावले जातील आणि तिथं विणकाम करावं लागेल. २५ रुपयात ३ साड्या. आता पैसे नसलेला व्यंगडम रोज थोडं रेशीम चोरू लागतो आणि घरी जाऊन त्याच्या मुलीसाठीची साडी विणू लागतो. त्याच काळात गावात शेटजी बिन घोड्याची चालणारी गाडी आणतात जिला 'मोटार नावाच्या माणसानं बनवलं त्यामुळं तिला मोटारकार म्हणतात'. ही मोटारकार काय असते हे बघायला आलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होते आणि व्यंगडमची बायको मरण पावते. 

गावात काही दिवसात एक परगावाहून लेखक येतो आणि तो भाड्यानं राहायला खोली शोधात असतो. व्यंगडम त्याच्याशी मैत्री करतो आणि लेखक हळूहळू देशोदेशीच्या गप्पा मारत त्यांना पथनाट्य दाखवू लागतो. या नाट्यात विळा हाती घेऊन कामगार जमीनदाराकडून आपले हक्क मागतोय आणि जेव्हा जमीनदार अपमान करून नाकारतो, तेव्हा तो विळा जमीनदारांचा जीव घेतो. लेखक कम्युनिस्ट आहेत आणि सध्या कम्युनिस्ट पक्षावर बंदी असल्यानं पोलिसांना सापडू नयेत म्हणून इथं आलेले आहेत. त्यांच्या तालमीत रंगल्यावर व्यंगडम आणि त्याचा मित्र पार्थसारथी कम्युनिस्ट कार्यकर्ते बनतात आणि जमीनदाराला आव्हान देत कारागिरांच्या हक्कासाठी लढू लागतात. मात्र वीस रुपये वाढवून मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्याची ही सत्य घटनांवर आधारित कथा आहे. 

kanji

सिनेमा कम्युनिस्ट चळवळीच्या सुरुवातीच्या काळाची कथा सांगतो. पिचलेल्या, नाडलेल्या माणसांची वर्षानुवर्षे झालेली मुस्कटदाबीला दक्षिणेत अनेक ठिकाणी कम्युनिस्ट कार्यकर्तांनी प्रश्न विचारले आणि लढे उभे केले. जमीनदाराच्या अमानवी शोषणातून जगण्याच्या किमान गरजाही आणि सामान्य अपेक्षाही पूर्ण करण्याची क्षमता कारागिराची नाही. तोच कारागीर जो एकाहून एक सुंदर साड्या विणतो, आपल्या मृत बापाच्या शरीरावर तो रोज विणत असलेल्या रेशीमचा एक कपडा ठेऊ शकत नाही तेव्हा त्याच्या श्रमाची चोरी करणाऱ्या जमीनदारांविरुद्ध बंड पुकारण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही आणि तो पर्याय त्याला कम्युनिस्ट चळवळीच्या रूपानं तेव्हा दिसतो. श्रमिकाची निर्मिती फक्त एक क्रयवस्तू नसून त्याच्या आत्म्याचा, कलेचा आणि श्रमाचा तुकडा असतो. त्याला त्याचा तुटपुंजा मोबदला देऊन त्यानंच निर्माण केलेल्या उत्पादनाचा कधी आस्वादही घेता येत नाही ही १९२०ची कथा एखाद्या कार फॅक्ट्री मध्ये आज काम करूनही कार विकत न घेऊ शकणाऱ्या किंवा अगदीच डब्बा पोहोचवत असताना भूक लागली म्हणून पार्सलमधलं खाताना पकडल्या गेलेल्या झोमॅटोवाल्याहून काहीच वेगळं नाही. याला मार्क्सवादी विश्लेषणात श्रमांची चोरी आणि परात्मभावाची निर्मिती म्हणतात. 

सिनेमा कारागिरांच्या हक्काची आणि एकूण मानवी न्याय्यतेची बाजू घेतो आणि कुठलेही आढेवेढे न घेता आणि तरीही सिनेमा कुठंच प्रबोधनात्मक, मिशनरी होत नाही. विचारधारा हे फक्त कथेतील पात्र म्हणूनच समोर येतं. चित्रपट त्या कामगारांना 'व्हिक्टीमाइज' करून त्यांचा भावनिक वापरही करत नाही, सिनेमा सिनेमा असण्याशी शेवटपर्यंत प्रामाणीक राहतो. प्रकाश राज, ज्यांना या फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं, आपल्या करियरच्या सर्वोत्तमपैकी एक भूमिकेत आहेत. सिनेमातल्या प्रत्येक कलाकारानं आपापल्या पात्रांमध्ये जीव ओतला आहे. श्रेया रेड्डीनं साकारलेलं व्यंगडमच्या बायकोचं पात्र डोळ्यातून इतकं बोलतं की काही ओळींचेच संवाद तिच्या तोंडी पूर्ण फिल्म मध्ये आहेत. त्याच्या मुलीचा अभिनय करणारी शंमू ही अभिनेत्रीदेखील कमल करते. थोडक्यात, अभिनयाच्या जोरावर तो काळच नव्हे तर या पात्रांच्या परिस्थितीची घुसमट आणि हतबलता उत्तमरीत्या उभी राहते. 

सिनेमाची एक एक फ्रेम एखाद्या कॅनव्हासवर जिवंत केलेल्या पेंटिंगसारखी आहे. एस.तिर्रू यांचा कॅमेरा क्लोज-अप्स आणि स्थिर लॉन्ग शॉट्स मधून पात्रांच्या भावना आणि पात्रांचा भवताल जिवंत करत टिपतो. प्रत्येक शॉटचा कॅमेरा आणि मुव्हमेंट मापून, ठरवून आणि कलात्मक निर्णयातून ठरवली गेल्याचं स्पष्ट जाणवतं. या सिनेमातले एका सीनमधून दुसऱ्या सीनमध्ये नेणारे ट्रान्झिशन तर निव्वळ अफाट आहेत, ज्याला भारतीय सिनेमात क्वचितच तोड माझ्या तरी पाहण्यात आहे. त्याचं श्रेय एडिटर अरुण कुमार यांना आणि ब्रिटिशपूर्व काळ अगदी जिवंत करण्याचं श्रेय सबू सिरील यांच्या प्रोडक्शन डिझाईनला जातं. एम.जी श्रीकुमार यांचं पार्शवसंगीत अंगावर शहरे आणतं.   

एक गोष्ट मी मुद्दाम शेवटी सांगण्यासाठी ठेवली आणि ती म्हणजे हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे प्रियदर्शन या प्रसिद्ध दिग्दर्शकानं. तोच, ज्यानं हेरा फेरी, मालामाल विकली आणि हल चल सारखे सिनेमे बनवले. कांजीवरम त्याच्याच नव्हे तर जागतिक सिनेमातला एक लँडमार्क सिनेमा ठरायला हवा. मात्र अर्थातच सिनेमाची कथा आणि चित्रण तसं न होण्यामागचं एक कारण असावं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष काही करू शकला नाही. अर्थात क्वचितच दर्जेदार सिनेमा भारतीय प्रेक्षकांच्या पचनी पडतो. पण कांजीवरम ज्या प्रश्नांविषयी बोलत होता, तो त्यांचाही प्रश्न होताच, पण सिनेमा थेटरमध्ये कोण श्रममूल्याचे आणि आपल्या अधिकारांचे प्रश्न बघायला जातं म्हणा...

 

कांजीवरम हॉटस्टार वर पाहता येऊ शकतो. युट्युबवर कमी दर्जाची प्रत उपलब्ध आहे.