Mid West

कट्टरतावादी मौलवी इब्राहिम रैसी इराणचे नवे राष्ट्रपती

रैसी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत पुढे असल्याचे अंदाज आधीच वर्तवला होता.

Credit : Indie Journal

शुक्रवारी १९ जुने रोजी पार पडलेल्या इराण च्या निवडणुकीत इराणच्या मतदान केलेल्या जनतेने आपला कौल कट्टरतावादी नेते मौलवी इब्राहिम रैसी यांना दिला आहे. अनेक तज्ञांनी इराणच्या त्रुटीयूक्त निवडणूक यंत्रणेचा दाखला देत, रैसी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत पुढे असल्याचे अंदाज आधीच वर्तवला होता. आता पर्यंत ९० टक्के मतदान झालेले असून रैसी यांना ६२ टक्के मते म्हणजेच १ कोटी ७८ लाख मते, तसेच पूर्व सेनाप्रमुख मोहसेन रेजी यांना ११ टक्के म्हणजेच ३३ लाख मते तसेच स्पर्धेत एकमेव मवाळ नेते असणारे अब्दोल नासेर हेम्मती यांना ८ टक्के म्हणजेच २४ लाख मते मिळाली आहेत. 

हसन रुहानी, जे याआधीचे राष्ट्रपती होते, त्यांनी कौल मान्य करत जनतेच्या पसंतीला शुभेच्छा दिल्या. तसेच इराणच्या केंद्रीय बँकेचे प्रमुख आणि मवाळ नेते हेम्मती यांनीदेखील रैसी यांना शुभेच्छा देताना म्हटले की, "मला आशा आहे इब्राहिम रैसी आणि अली खोमेनी यांचे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, तसेच इराणला पुन्हा समृद्ध करतील. इब्राहिम रैसी हे ऑगस्ट महिन्यात पदग्रहण करतील.  

काल पार पडलेल्या निवडणुकीत १९७९च्या इराणी क्रांती नंतरची सर्वात कमी असे ४८ टक्के मतदान झाले आहे. एकूण ६ कोटी मतदार असणाऱ्या इराण मध्ये फक्त्त २ कोटी ७० लाख मतदान झालेले आहे. इराणी जनतेने निवडणुकीकडे फिरवलेली पाठही अपेक्षितच होती. इराणी सामान्य जनतेला या निवडणुकीने कोणताही आमूलाग्र बदल घडेल असे वाटत नव्हते.    

इराण सध्या विविध समस्यांना तोंड देत आहे, इराणची अर्थव्यवस्था सतत घसरतच आहे. बेरोजगारी आणि महागाई मुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्याचसोबत अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी वैमन्यस्य, इतर भांडवली देशांशी वाद व त्यामुळे एकूण अर्थव्यवस्था- बाजारपेठांची झालेली अडचण, इतर सुन्नी देशांशी वाद, देशांतर्गत वाद अश्या अनेक मोर्चांवर इब्राहिम रैसी यांना आव्हान पेलावं लागणार आहे. 

रैसी यांना देशांतर्गत असणाऱ्या धार्मिक संघटनांचे, पुराणामतवाद्यांचे समर्थन आहे, ते इराणचे सर्वेसर्वा अली खोमेनी यांच्याही जवळचे मानले जातात. त्याचसोबत ते काळी पगडी घालतात, ज्याचा अर्थ ते सय्यद असून ते पैगंबर मोहम्मद यांच्या वंशावळीतील आहेत असे मानले जाते. त्यांना इराणच्या सन्मानीय लोकांमध्ये गणलं जाते.