India

रिपोर्ताज: आपला आपला उन्हाळा...

उष्माघातावरील उपाय, साधनं सर्वांना सारखीच उपलब्ध असतात का?

Credit : इंडी जर्नल

प्राजक्ता जोशी, अनुष्का वाणी । दररोज दुपारी पुण्यातील पाटील इस्टेटमधील त्यांच्या छोट्याशा घराबाहेर बसणं हा आशा रमेश नेटकेंचा दिनक्रमच झालाय. त्यांचं लग्न झाल्यापासून, साधारण ५०-६० वर्षं, पाटील इस्टेटच्या रहिवासी असलेल्या नेटकेंनी असा उन्हाळा आधी कधी अनुभवला नसल्याचं त्या सांगतात. वाढतं तापमान, त्यांच्या पत्र्याचं छत असलेल्या घरातली सात माणसांची दाटीवाटी आणि सारखी जाणारी वीज, यामुळं उन्हाळ्याचे दिवस अवघड झाल्याचं त्या सांगतात.

भारताच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट आलेली आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसच्याही वर गेलेलं आहे. यावर्षीचा एप्रिल महिना वायव्य आणि मध्य भारतासाठी १२२ वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल ठरला. उष्णतेची लाट ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, यावर मात करण्याची अनेक साधनं आहेत, अनेक उपाय आहेत? मात्र हे उपाय, ही साधनं सर्वांना सारखीच उपलब्ध असतात का? काम करण्यासाठी, रात्री पूर्ण झोप मिळवण्यासाठी वातानुकूलित हवा, कामावर जाण्या-येण्यासाठी वैयक्तिक दुचाक्या, किंवा बसनं प्रवास करण्याची सुविधा तरी सर्वांना उपलब्ध असते का? तर नाही.

 

 

"मी दारोदारी फिरून हातगाडीवर भाजीपाला विकतो. सकाळी ५ च्या दरम्यान बाहेर पडल्यानंतर मी संध्याकाळी ६च्या आसपास घरी परत येतो. भर उकाड्यात, ऊन डोक्यावर आलं तरी काम चालू ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्यासमोर नाही. पोट भरायचं असेल तर काम चालू ठेवावंच लागेल. त्यामुळे उष्णतेची लाट येउदेत नाहीतर तापमान ४०च्या वर जाऊदेत, माझं हातगाडी घेऊन फिरणं काही बंद होऊ शकत नाही," सिंहगड रस्त्यावरील जनता वसाहतीत राहणारे चेतन बनसोडे सांगतात.

ते आजन्म जनता वसाहतीतील त्यांच्या घरातच राहतात. पण यावर्षीचा उन्हाळा जरा जास्तच तीव्र असल्याचं ते सांगतात. "एवढं काम करून आल्यानंतर घरी येऊनही आराम मिळेल याची काही शाश्वती नसते. बऱ्याचदा वीज जाते, भारनियमन होतं. त्यामुळं कामावरून आल्यानंतर घरात बसायचीही इच्छा होत नाही. रात्री झोप लागत नाही. सगळीच कठीण परिस्थिती आहे," ते पुढं सांगतात.

पुण्यातल्या जवळपास सगळ्याच झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सध्या हेच हाल आहेत. वस्त्यांमधली गच्च, जोडलेली घरं आणि घरांमधील सदस्यांची गर्दी उष्णतेचा चटका इथल्या नागरिकांसाठी जास्तच तीव्र करते. त्यात इथं राहणारे बरेच लोकं शारीरिक श्रमाची कामं करत असल्यामुळं ना कामाच्या ठिकाणी ना घरी, कुठंच उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठीच्या सोयी त्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.

पाटील इस्टेटमध्ये राहणारे भीमराव बाळू झेंडे ट्रकचालक आहेत. गेली तीन दशकं तरी ते ट्रक चालवायचं काम करतायत. मात्र आता वयापरत्वे आणि गेल्या काही वर्षांत उन्हाळ्याच्या झळा वाढल्यामुळं त्यांचं काम करणं अधिकच त्रासदायक झाल्याचं ते सांगतात. "रस्त्यावर असताना कितीही पाणी प्यायलं तरी पुरत नाही. पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात, त्याचा खर्चही भरपूर वाढतो," झेंडे म्हणाले.

शहर प्रशासनानं, निवडून दिलेल्या नेत्यांनी निदान रस्त्यावर काम करणाऱ्यांसाठी पाण्याची तरी सोया केली पाहिजे असं रिक्षाचालक वैभव वाडेकर सांगतात. “दिवसभर उन्हात रिक्षा चालवणं काही सोपं काम नाहीये. पण शहरात दूर-दूरपर्यंत एकही पाणपोई उपलब्ध नसते. नगरसेवक निवडणुकांच्या वेळी फक्त आश्वासनं देतात, प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही,” वाडेकर म्हणाले.  

वाढत्या उन्हाळ्यामुळं गरिबांच्या खिशातला खर्च वाढलाय. "घरातला पंखा दिवसभर चालू ठेवावा लागतो. काही जणांनी कूलर घ्यावा लागतो. त्यानं विजेचं बिल वाढतं. महिन्याच्या खर्च चालवणं कठीण होऊन जातं," जनता वसाहतीत राहणाऱ्या मंगेश पाबळेंनी सांगितलं.

उन्हाळा सुरु झाल्यापासून देशभरातच विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळं देशात वीजटंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळं अनेक ठिकाणी लोकांना भारनियमनाचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यात पंखा जास्त चालल्यामुळं आलेलं जास्तीचं विजेचं बिल न परवडणाऱ्या कुटुंबांना इन्व्हर्टरसारखी सुविधा परवडणं शक्य आहे का?

“वीज कधी जाईल आणि कधी परत येईल हे कोणी सांगू शकत नाही. कधीकधी सकाळी गेलेली वीज संध्याकाळीच परत येते. अशावेळी घरात बसायचं तरी कसं? मग उष्णतेपासून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून आम्ही घराच्या दारात पाईपनं पाणी शिंपडत बसतो,” पाटील इस्टेटच्या रहिवासी अश्विनी भोसले म्हणाल्या.

अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम अनेकांच्या व्यवसायांवरही झालाय. पाटील इस्टेटच्या बाहेर सलून चालवणारे यशवंत ११ वर्षांपासून तिथं राहतात. 

"आजकाल पुण्याचा उन्हाळा उत्तर प्रदेशमधल्या उन्हाळ्याएवढा तीव्र झालाय आणि माझ्या गावी (उत्तर प्रदेश मध्ये) तर उष्णता अजूनच वाढली आहे. कष्टाचं काम करूनदेखील रात्री लोकांना घरात उष्णतेमुळं झोप लागत नाही. दिवसभर तापलेल्या पत्र्याच्या छतामुळं रात्रीदेखील घरात उष्णता बंदिस्त राहते. रात्री झोपायला उशीर झाल्यामुळं सकाळी उठायला आणि कामाला जायला लोकांना उशीर होतो. या सगळ्यात सलूनमध्ये यायला कोणाला वेळ मिळेल? यामुळं उन्हाळा सुरु झाल्यापासून व्यवसाय तोट्यातच चाललंय," ते म्हणाले.

 

 

पाटील इस्टेट बाहेरच्या रस्त्याकडेला दुकान चालवणाऱ्या शफिकून पठाण यांचाही अनुभव फारसा वेगळा नाही. "रोजे चालू असतानाही भर दुपारी आम्ही दुकानावर बसतो. सध्या रमजानचं सामान दुकानात विकत असल्यामुळं आम्ही दुकान बंद ठेऊ शकत नाही. मात्र इतक्या उन्हाच्या वेळी फारसं कोणी बाहेर पडत नसल्यामुळं पुरेशी विक्री मात्र होत नाही," त्या म्हणाल्या.

वाढत्या उष्णतेचा त्रास वस्तीतील लहान मुलांना आणि वृद्धांनाही होत असल्याचं त्या सांगतात. "काही दिवसांपूर्वी वस्तीतील काही लहान मुलांना उष्णतेचा त्रास होऊन उलट्या झाल्या. त्याशिवाय गार पाणी प्यायलं जात असल्यामुळं सर्दी खोकल्याचाही त्रास सुरु झाला आहे," पठाण पुढं सांगतात.

पुण्यातील दांडेकर पुलाजवळील भागात दवाखाना चालवणारे डॉ. जितेंद्र शिंदे यांच्यामते यावर्षी उष्माघाताच्या लक्षणांमुळं दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढली आहे. “गेल्या १५-२० दिवसात उष्माघातामुळं उलट्या, जुलाब, डिहायड्रेशनसारख्या लक्षणांसाठी अनेक जण दवाखान्यात येऊन गेलेत. यातले काहीजण औषधांनी बरे होतायत, तर काहींना रुग्णालयातही दाखल करावं लागतं. लहान मुलं, वयस्कर लोकं तसंच गरोदर बायकांना उष्णतेच्या लाटेमुळं जास्त शारीरिक त्रास होत असल्याचं आढळून आलंय,” शिंदे सांगतात. 

“वस्त्यांमधील घरांमध्ये खेळत्या हवेची नीट व्यवस्था नसते, त्यामुळं हवा नियंत्रित राहत नाही. अनेक घरांचं बांधकाम कच्चं असतं, घरं पत्र्याची असतात. काहींच्या घरी एसी किंवा कूलर सोडा, पंखाही नसतो. या सगळ्यामुळं इथं राहणाऱ्या लोकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते,” शिंदे पुढं म्हणाले.

दरवर्षी उन्हाळा तर वाढत चाललाय मात्र लोकप्रतिनिधींचं या विषयाकडे आणि या लोकांकडे लक्ष आहे का? “निवडणुका संपल्यानंतर कोणीही इथं फिरकत नाही. आम्ही कशा परिस्थितीत जगतोय, याकडे कोणाचंही लक्ष नाही,” अश्विनी भोसले सांगतात. 

 

 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं उष्णतेच्या लाटेसंदर्भात जाहीर केलेल्या एका अहवालानुसार समाजातील गरीब आणि दुर्बल घटक वाढत्या उष्णतेचे बळी ठरण्याची शक्यता जास्त असते. पण जिथं पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातदेखील प्राण्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सोय करण्यात आली आहे, जे गरजेचंच आहे, मात्र त्याचवेळी पुण्यातील गरीब, कष्टकऱ्यांच्या वस्त्यांकडे मात्र तितकंसं लक्ष दिलं जात असलेलं दिसत नाहीये.

अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं उष्णतेवर मात कशी कराची, याचं निदाण समुपदेशन करणं गरजेचं असल्याचं डॉ. शिंदे सांगतात. “आमच्याकडे येणाऱ्या काही जणांकडे पंखाही नसतो. मग घरात खिडक्यांना ओली पोती लावून, वाळ्याचे पडदे लावून त्यातल्या घर गार कसं ठेवता येईल, हे आम्ही त्यांना सुचवतो तसंच खूप पाणी प्यायलादेखील सांगतो. पण अशा प्रकारच्या समुपदेशनाची या वस्त्यांमध्ये खूप गरज आहे,” ते म्हणाले.