Quick Reads

पुस्तक परिचय: ते पन्नास दिवस

पवन भगत यांची ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी एका महाप्रवासाची कथा मांडते.

Credit : Indie Journal

प्रवास आपण सगळेच करत असतो. त्यावर अनेक कथा-कादंबर्‍या लिहिल्या गेल्या आहेत. चित्रपट आणि दूरदर्शन मालिका सुद्धा बनविल्या गेलेल्या आहेत. प्रवास माणसाला सुखावतो. ती त्याची आदीम अभिलाषा असते. त्यासाठी माणसं कधीही उत्सुक आणि उत्साही असतात. पण जर प्रवास लादला गेलेला असेल. अनिच्छेने करावा लागत असेल. कोणत्याही साधनाशिवाय करावा लागत असेल. अन्न, पाणी या मूलभूत गरजांपासून वंचित राहून करावा लागत असेल, तर काय घडते? मैत्री प्रकाशनाने प्रकाशित केलेली पवन भगत यांची ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अशाच एका महाप्रवासाची कथा मांडते. अचानक लादलेल्या टाळेबंदीमुळे लाखो कामगारांवर कोसळलेल्या स्थलांतराची ही दाहक गोष्ट आहे. कोरोनाच्या भयाण काळात जगलेल्या, तगलेल्या, एकमेकांना सावरत विखुरलेले आयुष्य पुन्हा उभारणाऱ्या अनोख्या माणसांची ही कथा.  

या लिखाणात चमकदार वाक्ये नाहीत, रंजक वर्णने नाहीत, शाब्दिक सौष्ठवातून आलेली साहित्यिक कलाकुसार नाही. जे आहे ते सरळ, साधे, नितळ जीवनदर्शन आहे. हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. कादंबरीचे रूढार्थाने जे निकष आहेत त्याला वळसा देऊन हे लिखाण काही वेगळं मांडते. अभिजनवादी सौंदर्यशास्त्राच्या मर्यादा ओलांडते. लेखकाने कोणतेही आडाखे बांधून हे लिखाण केलेले नाही. आकृतीबंध आधी ठरवून त्यानुसार आशय उभा केलेला नाही. ते प्रत्यक्ष लोकांमध्ये गेले. निरीक्षणे नोंदविली. मनात येणारं कागदावर उतरवू लागले. त्या आशयाला स्वतःची एक शैली आपोआपच सापडत गेली असावी. त्यामुळे अभूतपूर्व अशा मानवी विस्थापनावरचा हा एक प्रामाणिक दस्तावेज आहे, असे नक्कीच म्हणता येईल. चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारशा या गावचे कवी, लेखक, नाटककार आणि सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांनी ही कामगिरी मोठ्या कौशल्याने पार पाडली आहे. त्यांनी या कादंबरीच्या रूपात कष्टकर्‍यांच्या जीवनसंघर्षाची गाथा मांडली आहे.

 

 

आज ते संकट सरलंय, वातावरण निवळलंय. आता कोणालाही त्या काळाच्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतील. पण ज्यांच्या आयुष्याचा तळ ढवळून निघाला. महानगरीय अजस्त्र दाढा ज्यांना कुरतडत असतात रात अन दिन. रक्त-मांस शोषून फोलपाटासारखं  ज्यांना फेकून दिलं जातं परिघावर. ती माणसं कसं विसरतील, काल परवाचा तो 'भूतकाळ'! म्हणून त्या गोष्टी पुन्हा सांगायलाच हव्यात. कारण, दुःख निर्माणच का होतं? या प्रश्नाच्या मुळाशी अनेक प्रकारे गेल्याशिवाय ही अमानवीय व्यवस्था बदलणार नाही. माणसाला माणूसपण मिळणार नाही. लेखकाला ही दृष्टी आहे. अत्यंत जबाबदारीने त्यांनी हे लिखाण पार पाडलेले आहे. त्यांना केवळ किस्से सांगायचे नाहीयेत. त्यांना माणसाच्या मनोविज्ञानाचा शोध घ्यायचा आहे. त्यात दडलेल्या सत्याचा शोध घ्यायचा आहे. 

या कादंबरीचे कथानक केवळ दुःख आणि वेदनेभोवती घुटमळत नाही. मग यात नेमके आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जरा याच्या अंतरंगात शिरावे लागेल. सर्वात महत्वाचे, या कादंबरीचा कोणी एक नायक नाही. ही एका काळाची कथा आहे. त्या काळाच्या पटलावर चार प्रमुख व्यक्तिरेखा आपल्या पुढे येतात. त्यांची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी अगदी भिन्न आहे. केवळ भिन्नच नाही तर परस्पर विरोधी आणि एकमेकांना छेदणारी पण आहे. अशा वृत्ती-प्रवृत्ती जर एकत्र आल्या तर स्वाभाविकपणे ठिणगी उडणार, संघर्ष घडणार. तो या कथानकात घडतांना दिसतो. हा संघर्ष पुढे कोणते वळण घेतो हे मुळात वाचणे उद्बोधक ठरेल. 

 

रातोरात लॉकडाऊन लादण्यात आले. एका झटक्यात रोजगार बंद पडले.

 

दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीने सामान्य माणसाच्या जगण्याचा पायाच उखडून टाकला होता. रातोरात लॉकडाऊन लादण्यात आले. एका झटक्यात रोजगार बंद पडले. हातावर पोट असलेली लाखो माणसे नाईलाजाने रस्त्यावर आली. रोजगाराच्या शोधात शहरात आलेल्या या लोकांचा पुन्हा आपापल्या गावांकडे उलटा प्रवास सुरू झाला. ही कष्टकरी माणसे मृत्यूचे थैमान अनुभवत अनवाणी, उपाशी, लेकराबाळांसह फरपटत पायी निघाली होती. त्या बिकट प्रवासाची ही कहाणी आहे. पण ही करुण कहाणी नाही. वेदनेच्या वाटेवरून मानवी सत्याकडे जाणारा तो प्रवास आहे. यात एकीकडे स्वार्थ, कौर्य आणि दुष्टता या अपप्रवृत्ती दिसतात तर दुसरीकडे परोपकार, प्रेम आणि सहकार्य हा शाश्वत मानवी भावनांचे दर्शन पण घडते. 

या कादंबरीतील चार व्यक्तींरेखांचे धर्म वेगळे, जात वेगळी त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता आणि दृष्टिकोन वेगवेगळे. लेखकाने या व्यक्तिरेखांना काळ्या पांढर्‍या रंगात रंगविलेले नाही. त्यांना एका साच्यात बंदिस्त केलेले नाही. विशिष्ट धारणा, विचार, दृष्टिकोन 

या पात्रांच्या डोक्यात घट्ट आहेत. सक्तीच्या पायी प्रवासामुळे ते अनपेक्षितपणे एकत्र आले आहेत. पण असं एकत्र येणं आणि एकत्र प्रवास करण्यातून त्यांना वेगळ्या जगाचे, जीवनाच्या वेगळ्या बाजूचे दर्शन घडू लागते. त्यांच्यात बदल सुरू होतात.  धर्म, जात, प्रांत, भाषेचे अहंकार गळून पडायला लागतात. परंपरेच्या जोखडाने, जात-धर्मीय बंदिस्त चौकटीने त्यांचे माणूसपण हिरावून घेतल्याचे त्यांच्या लक्षात येते. भूक आणि भाकरी, सहयोग आणि सहकार्य, प्रेम आणि परोपकार हेच मानवी जीवनाला आधार देणारे मूलभूत तत्व आहे. भेदभाव, विषमता, वर्चस्ववाद हे माणसाचे मूळ तत्व नाही. याची जाणीव त्यांना होते आणि त्यांचा माणूसपणाकडे प्रवास सुरू होतो.

 

मुंबई ते बनारस या १५०० किलोमीटरच्या पायी प्रवासात मानवी अंतरंगात घडणार्‍या एका वेगळ्या महाप्रवासाचे दर्शन लेखक घडवतो.

 

मुंबई ते बनारस या १५०० किलोमीटरच्या पायी प्रवासात मानवी अंतरंगात घडणार्‍या एका वेगळ्या महाप्रवासाचे दर्शन लेखक घडवतो. मुंबई या आर्थिक राजधानी कडून बनारस या एका पारंपरिक शहराकडे हे सगळे चालले आहेत. जणू आधुनिकतेकडून पुरातन काळाकडे ते चालले असावेत. दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण असलेल्या या पात्रांचा भौतिक प्रवास असा घडत असला तरी त्यांचा मानसिक प्रवास मात्र एका वेगळ्याच अदभूत दिशेला होतो. ती दिशा कोणती? शेवटी ते त्यांच्या गावी पोहोचू शकतात का? दरम्यान त्यांच्यात कोणते आंतरबाह्य बदल होतात, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्कीच वाचावी. वेगळे काहीतरी गवसेल.   

या चार व्यक्तिरेखांमधील एक व्यक्तिरेखा रामस्वरूप मौर्यची. हा अंगमेहनती कष्टकरी माणूस. मागास मानल्या गेलेल्या शूद्र समूहाचा प्रतिनिधी. हातावर पोट असलेला मजूर. उत्तरप्रदेशातून थेट मुंबईत आलेला. तिकडे शेतात मोलमजुरी करणारी त्याची आई. तिचा हा एकुलता एक मुलगा. तो बनारस हिंदू विद्यापीठात इतिहासात एमए करत असतो. पण आर्थिक गरज म्हणून गाव सोडावे लागलेला. मुंबईत अगदी खुराड्यासारख्या खोलीत तो राहतो. या महानगरात क्षुद्र ठरविला गेलेला हा जीव. एक दिवस सकाळी तो कामावर निघतो, पण मुंबई अचानक बदलेली असते. रस्त्यावर शुकशुकाट, दुकानं बंद, वाहनं जागच्या जागी थांबलेली, माणसं लपत-छपत चाललेली. चौकशी केल्यावर त्याला कळतं, काल रात्री अचानक प्रधानमंत्र्यांनी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केलाय. आज सगळा भारत बंद आहे. तो कसाबसा वडापाव विकत घेतो. परत खोलीकडे येतांना पोलिस त्याला घेरतात. पायावर, पाठीवर लाठ्या खाऊन लंगडत तो परत येतो.

मग दोन दिवसांनी प्रधानमंत्री एकवीस दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करतात. निर्विकार शांतपणे केलेली ही घोषणा लोकांच्या मनात धडकी भरवते. कायम उत्पन्नाचे साधन, नोकरी-धंदा असलेली माणसं तग धरतात. पण रामस्वरूप मौर्यसारख्या लाखो श्रमिकांचा जगण्याचा पायाच उखडून जातो.  एकवीस दिवसांनंतर प्रधानमंत्री पुन्हा थंड शब्दात ‘लॉकडाऊन’ वाढविल्याची घोषणा अगदी स्थितप्रज्ञतेने करतात. तेव्हा मात्र हल्लकल्लोळ माजतो. रामस्वरूपला त्याचा मालक खोली खाली करायला सांगतो. रामस्वरूप गावाकडे जाण्यासाठी निघतो. ट्रेन पकडायची तर सीएसटीच्या दिशेने पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. 

 

त्यांच्या घामा-श्रमातून हे महानगर फुलत होतं.

 

दोन वेळच्या अन्नाची सोय करण्यासाठी हे मजूर आपलं गाव, घर सोडून या महानगरात आले होते. त्यांना इथल्या आलीशान इमारतींमध्ये राहायचं नव्हतं, त्यांना इथे बंगले बांधायचे नव्हते की आलीशान गाड्या घ्यायच्या नव्हत्या. या महानगराच्या निरंतर चाललेल्या विकासक्रमाचा ते महत्वाचे वाटेकरी होते. त्यांच्या घामा-श्रमातून हे महानगर फुलत होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घातली जात होती. पण ज्यांच्या जिवावर या महानगराचा डोलारा उभा राहिला तेच आज इथे उपरे ठरले होते. आता त्यांच्यासाठी हा देश फार मोठी छळछावणी ठरू पाहत होता. व्यवस्था क्रूर वागत होती, राज्यकर्ते निगरगट्ट बनले होते, सरकारी यंत्रणा बेमुर्वतखोर झाल्या होत्या. संपूर्ण देश पोलिसी खाक्याच्या तावडीत सापडून जणू जागच्या जागी थिजल्यासारखा झाला होता. 

काही कळायच्या आत रामस्वरूपसारखी असंख्य माणसे निराधार होऊन रस्त्यावर आली. त्याच्यासारखे अनेक जण लेकराबाळांना घेऊन सैरावैरा निघाले. पोलिसांचा मार आणि शिव्या खाणारा हा लक्षावधीचा जमाव आपापल्या गावात पोहोचण्यासाठी आतुर झाला. या गर्दीत रामस्वरूपला भेटतात बनारसजवळ गाव असलेले पंडित ब्रिजमोहन मिश्रा आणि आरिफ शेख. हे तिघं एकाच राज्यातले, एकाच जिल्ह्यातले. परिस्थितीनं त्यांना इथे असं एकत्र आणलेलं असतं. अनपेक्षित संकटाने ग्रासलेले, अनामिक भीतीने भेदरलेले अन पुढच्या क्षणी काय होईल याची खात्री नसलेले ते भारतीय नागरिक. संकटात असले तरी स्वतःपुरता विचार करणारे, एकमेकांकडे संशयाने बघणारे, इतरांबद्दल अविश्वास बाळगणारे ते भारतवासी, आता एकत्र चालण्यास मजबूर झालेले असतात.

पंडित ब्रिजमोहन मिश्रा हा पुजापाठाच्या धंद्यातला एक कष्टकरी. होय कष्टकरीच. एका गब्बर पंडित दलालाच्या बोलावण्यावरून तो मुंबईत आलेला असतो. मुंबईत बनारसी पंडितांचे अनेक गट सक्रिय आहेत. श्राद्ध, पूजापाठ, सत्यनारायण, वास्तुशांत, अभिषेक, कालसर्पयोग असले ‘समस्या निवारण’ उपाय करून देणे हा त्यांचा व्यवसाय. इथे येऊन प्रस्थापित झालेले महापंडित लोक या गटांचे प्रमुख बनलेले असतात. पंडित मिश्रासारख्या नंतर आलेल्या पुजाऱ्यांकडून हे म्होरके रोजंदारीवर कामं करून घेतात. पंडीत मिश्रा पूजा-पाठ करणारा एक मजूर असला तरी जातीय दंभाने ग्रस्त आहे. दुसरीकडे शेख आरिफ. ‘सेल्फ इम्पलॉयड’ कष्टकरी. प्लंबिंग पासून ते मोटर रीपेरिंग पर्यंत, हातगाडीपासून केटरिंगपर्यंत कोणतंही कौशल्याचं काम करण्यास सक्षम असलेला. मुंबईत सहज रोजीरोटी कमवू शकेल असा हरहुन्नरी इसम. 

रामस्वरूपसह हे दोघं त्या अलोट गर्दीचा अनाम भाग होतात. गर्दीसोबत ढकलले जातात, पडतात, धडपडतात, हेलपाटतात. कोणतीच ट्रेन नाही म्हणून सगळे दादरच्या दिशेने चालू लागतात. दादरला पोचतात अन तिथे अनाऊन्समेंट होते, “अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी रेल्वे स्टेशन त्वरित रिकामे करावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.” कोणत्याही क्षणी लाठीमार होईल अशी धास्ती. तिथून बाहेर पडण्यावाचून पर्याय नसतो. पण जाणार कसे हा प्रश्न आता लोकांसमोर नसतो. कारण त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. हजारो किलोमीटर असले तरी जायचेच या निर्धाराने हजारोंचा समूह चालू लागतो. सुरू होतो एक खडतर प्रवास. 

अन्न, पाणी, औषध, आराम अशा सगळ्या मूलभूत गोष्टींच्या अभावी ही माणसं रात्रंदिवस चालत राहतात. जागोजागी पोलिसांच्या शिव्या आणि काठ्यांचा मार बसत असतो. जखमी शरीर अन सुजलेले पाय घेऊन चालण्याशिवाय पर्याय नसतो. वाटेत कुठल्याही गावात प्रवेश मिळत नाही. अपमानाचे घोट पचवत, रिकामे पोट आणि पाण्यावाचून आक्रसलेले देह घेऊन हे मानवी समूह मजल दर मजल प्रवास करतात. रस्त्याकडेच्या जंगलात काही मिळालं तर खातात. ओढ्या, नद्या, नाल्यांचे पाणी पितात. काही मारतात. जे जगतात ते तिथेच त्या मृतदेहाला मूठमाती देऊन पुढचा रस्ता चालू लागतात.  

 

 

पन्नास दिवस हा अखंड प्रवास सुरू राहतो. या कथानकात केंद्रस्थानी आहेत रामस्वरूप, मिश्रा आणि आरिफ. प्रत्येक दिवस त्यांना काहीतरी शिकवून जातो. चांगले वाईट अनुभव नवी दृष्टी देतात. जानवं जपणारा धर्माभिमानी मिश्रा रामस्वरूपच्या पोटलीतले मांस आणि रोटी खातो. कारण खाण्यासाठी दुसरे काहीच नसते. मिळण्याची शक्यताही नसते. पोटाची भूक मिश्राचे मोठे प्रबोधन घडवते. केवळ त्याच्यातच नाही तर रामस्वरूप आणि आरिफच्या व्यक्तिमत्वात देखील मूलभूत बदल सुरू होतात. चोवीस तास एकत्र राहताना त्यांच्या मनातले अहंगंड गळून पडतात. माणूस म्हणून परस्परांना समजून घेण्याचा त्यांचा प्रवास सुरू होतो. धार्मिक मान्यतेच्या भिंती ढासळतात. जात-धर्माच्या बंदिस्त चौकटीत घडलेली मानसिकता लयाला जाते आणि सुरू होतो माणूसपणाकडे प्रवास. 

या क्रमात त्यांना दीपाली भेटते. ते या कादंबरीतले आणखी एक महत्वाचे पात्र. आकर्षक व्यक्तिमत्त्वाची दीपाली कापड गिरणीमध्ये वरच्या पदावर काम करत असते. ही आर्थिकदृष्ट्या सक्षम, धीट आणि प्रेमळ मुलगी. तिलाही पायी प्रवास करणं भाग पडलेलं असतं. ती या तिघांची सहप्रवासी बनते. तिची संवेदनशीलता, आत्मविश्वास आणि व्यापक दृष्टी या तिघांच्या जाणिवांच्या विकासाला गती देते. मात्र दीपालीचे पात्र सक्षमपणे उभे राहत नाही. कादंबरीत जात-वर्गीय अंतरर्विरोध जसे प्रकर्षाने पुढे येतात, तशी स्त्रीप्रश्नाची चर्चा मात्र वरवरची राहते. पुढच्या आवृत्तीत लेखकाने याचा जरूर विचार करावा. 

 

एका छोट्या कालखंडाची ही कथा आहे.

 

एका छोट्या कालखंडाची ही कथा आहे. कादंबरीचा पट लहान आहे. पण त्यातून निघणारे अन्वयार्थ मात्र खूप विशाल आहेत. यात ज्या चर्चा येतात, लेखक अधून मधून जे भाष्य करतो त्यामुळे या लिखाणाला तत्त्वज्ञानात्मक ऊंची प्राप्त होते. त्याशिवाय मानवी स्वभावाचे विविधांगी दर्शन या कादंबरीत घडते. आशा, निराशा, अहं, ईर्ष्या, अपमान आणि अवहेलना या सोबतच प्रेम, सहकार्य, विश्वास आणि मानवी मूल्यांवरील निष्ठा या सगळ्या भावभावनांचे प्रतिबिंब या कादंबरीत उमटले आहे. कथानक एका टप्प्यावर जाऊन थांबते पण वाचकाचा मात्र नवा प्रवास सुरू झालेला असतो.  

सत्ताधारी वर्गाने लादलेल्या अमानुष काळात, माणसं कशी जगली, तगली. कशी सावरली, अन एकमेकांना आधार देत कशी त्या संकटांना भिडली याचं वेधक वर्णन या कादंबरीत येतं.  ही एक रचलेली कथा असली तरी हे पूर्ण काल्पनिक कथानक आहे असे नव्हे. केवळ वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया इत्यादी स्त्रोतांचा वापर करून लेखकाने माहिती जमविलेली नाही. बंदिस्त खोलीत बसून कल्पनेच्या भरार्‍या मारलेल्या नाहीत. हे अनुभव लेखकाने स्वतः प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून घेतले आहेत. लॉकडाऊनच्या त्या सुन्न काळात लेखक पवन भगत स्वतः रस्त्यावर होते. तीन मित्रांसोबत चारचाकी वाहन घेऊन अनेक दिवस ते फिरले.  पायी जाणार्‍या अनेक लोकांशी बोलले. पत्रकारितेच्या पासमुळे त्यांना अनेक ठिकाणी जाता आले. दुर्मिळ माहिती जमा करता आली. ते जीवन प्रत्यक्ष जवळून पाहता आले. त्यामुळे या लिखाणाला वेगळी धार आली आहे. 

ही कादंबरी केवळ स्थलांतराची प्रक्रिया आणि तिचे भयाण परिणाम मांडत नाही. ती या ब्राह्मो-भांडवली व्यवस्थेचे पदर उलगडून दाखवते. अर्थ-राजकीय सत्ता ताब्यात  ठेवणाऱ्या जातवर्गीय हितसंबंधांची चिरफाड करते. महत्त्वाचं म्हणजे या समाजाचा तथाकथित विकास आणि झगमगाट ज्यांच्या श्रमातून निर्माण होतो, ज्यांची हाडं या महानगरांच्या पायात चिणली जातात, तो नाकारलेला, हिणावलेला माणूस स्वतःचं माणूसपण सोडत नाही, हे सिद्धा करते. सामान्य माणूस चुकतो, बहकतो पण रक्तपिपासू कधीच बनत नाही. वेळ प्रसंगी या सामान्य म्हणविणाऱ्या माणसात उच्च मानवीय मूल्यांचं दर्शन घडतं. ही कादंबरी त्या माणसाची गोष्ट आहे. व्यवस्था कितीही क्रूर असली तरी माणसाचे माणूसपण ती हिरावून घेऊ शकणार नाही हा महत्वाचा संदेश ही कादंबरी देते.

ते ५० दिवस

लेखक: पवन भगत

प्रकाशक: मैत्री प्रकाशन

किंमत: ३०० रुपय

पुस्तक मागविण्यासाठी संपर्क +91 96572 40824