Americas

जॉर्ज फ्लॉयडच्या पोलिसी हत्येनं अमेरिकेतला वर्णभेद ऐरणीवर, देशभर निदर्शनं, जग भरातून निंदा

जॉर्ज फ्लॉयड हा आफ्रिकन-अमेरिकन नागरिक मागील पाच वर्षांपासून एका रेस्टॉरंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

Credit : John Minchillo/AP

(विस्तृत वार्तांकन सहाय्य-प्रियांका तुपे)

अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातल्या मिनियापोलीसमध्ये एका काळ्या सुरक्षारक्षकाचा पोलीस अधिकाऱ्यानेच खून केला. २५ मे ला घडलेल्या या घटनेनंतर लगेचच अमेरिकेत ठिकठिकाणी निदर्शनं सुरु झाली. ही निदर्शनं इतकी तीव्र झाली की काही ठिकाणी त्याला हिंसक वळणही लागलं आहे. 

जॉर्ज फ्लॉयड हा आफ्रिकन-अमेरिकन नागरिक मागील पाच वर्षांपासून एका रेस्टॉरंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. अलीकडे कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नोकरीही हातून गेल्यामुळे त्याच्या अडचणीत भरच पडली होती. २५ मेला मिनियापोलिसचे पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांनी फ्लॉइडला ताब्यात घेतलं. बनावट चलनाचा वापर करण्याच्या संशयातून फ्लॉयडला ताब्यात घेत असताना अत्यंत अमानुष रीतीने त्याचा खून करण्यात आला, तेही दिवसाढवळ्या नागरिकांच्या गराड्यात. 

पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांनी फ्लॉयडला खाली पाडून त्याच्या मानेवर स्वत:चा गुडघा रोवून धरला होता. वेदना आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने फ्लॉयडने त्याची मान मोकळी करण्यासाठी खूप गयावया केली, परंतू चौविन या अधिकाऱ्याने तब्बल सात मिनिटं फ्लाॅयडच्या मानेवर आपला गुडघा तसाच दाबून ठेवला. फ्लॉयड ‘मला सोडा, श्वास घ्यायला त्रास होतोय’ असं म्हणत, आजूबाजूच्या पोलिसांनाही जीव वाचवण्याची विनंती करत होता. पण चौविन आणि त्याच्यासोबतच्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तिथं जमा झालेल्या गर्दीतील अनेकांनी घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं, दरम्यान फ्लॉयडचा मृत्यू झाला. या हत्येचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर अमेरिकेतल्या विविध प्रांतात मोठा जनक्षोभ निर्माण झाला.

 

 

हत्या करणारा पोलीस अधिकारी डेरेक चौविनसह, टो थाव, थॉमस लेन आणि जे.अलेक्झांडर कुएंग या अधिकाऱ्यांना घटनेच्या दुसर्‍याच दिवशी बडतर्फ करण्यात आलं होतं.

जॉर्ज फ्लॉयड हा ४६ वर्षीय आफ्रिकन-अमेरिकन नागारिक मूळचा टेक्सास इथल्या ह्युस्टनमधला रहिवासी होता, तिथेच त्याने मल्टीस्पोर्टस एथलिट म्हणून येट्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि  १९९३ मध्ये तो पदवीधर झाला. माजी व्यावसायिक बास्केटबॉलपटू स्टीफन जॅक्सनसोबत फ्लॉयडची चांगली मैत्री होती. फ्लॉयड मिनेसोटामधल्या सेंट लुईस पार्कमध्ये राहत होता आणि मिनियापोलिसमध्ये पाच वर्षांपासून एका रेस्टॉरंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. 

फ्लॉयडच्या हत्येनंतर, मिनियापोलिसमधील पोलिसांच्या या वांशिक हिंसेला उत्तर देत स्थानिक समुदायाने, शिकागो अव्हेन्यूवरील फ्लॉयडच्या मृत्यूच्या ठिकाणाजवळच्या एका बसस्थानकाच्या भागात २६ मे रोजी फ्लॉयडचं एक तात्पुरतं स्मारक उभारलं. शेकडो नागरिकांनी फ्लॉयडला श्रद्धांजली वाहिली. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ असा आशय लिहिलेले फलक घेऊन अधिकाधिक लोक निदर्शनांसाठी जमू लागले. 'जस्टिस फॉर जॉर्ज' आणि 'ब्लॅक लाइव्हज मॅटर' सारख्या घोषवाक्यांनी अनेक शहरं दुमदमू लागली. 

परंतु या शांततामय आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांवर स्प्रे पेंट आणि दगड फेकले. निदर्शकांच्या एका छोट्या गटाने एका पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराला आग लावली. बघता बघता या निदर्शनाला दंगलींचं स्वरुप आलं. २७ मे ला हे आंदोलन शिकागोसह इतर अनेक शहरांतही पसरलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी, रबर बुलेट्सचा वापर केला. कुठे जाळपोळ, कुठे लुटालूट... एकूणच आंदोलनाला उग्र स्वरुप आलं. 

लॉस एंजेलिसमध्येही २७ मेला एकाच वेळी निदर्शनं झाली. २७ मे रोजी संध्याकाळी मिनियापोलिसमध्ये निदर्शनं सुरु होती, मात्र काही जणांच्या हिंसक कृतींमुळे शहरभर दंगल, लूटमार आणि हिंसाचाराचं लोण पसरलं. गुरुवारी पहाटेपर्यंत अपटाउन, मिनियापोलिसमधील तीसहून अधिक उद्योगव्यवसायांचं नुकसान झालं. २८ मेला सेंट पॉलमध्येही दंगल पसरली.

फ्लॉयडच्या हत्येनंतर त्याच्या चुलत भावाने सीएनएनशी बोलताना प्रतिक्रिया दिली, "पोलिस सेवा करतात, मदत करतात, सरंक्षण करतात. माझा भाऊ मदतीची भीक मागत होता, त्याला श्वासही घेता येत नव्हता, तरीही एकानेही पुढे येऊन त्याला वाचवण्यासाठी मदत केली नाही. ते त्याला अटक करू शकत होते, शिक्षा देऊ शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्याच्या मानेवर गुडघा दाबून त्याचा जीव घेतला. जनावरांनाही अशी वागणूक कोणी देत नाही, अशी वागणूक माझ्या भावाला दिली."

 

 

सध्या या प्रकरणात एफबीआयसह दोन स्वतंत्र एजन्सींना तपासासाठी पाचारण करण्यात आलं आहे. परंतु गुन्ह्यातील सहभागी चार अधिकाऱ्यांना केवळ नोकरीतून काढून टाकण्याव्यतिरिक्त मिनेसोटा  आणि देशभरातील जनक्षोभ शांत करण्यासाठी सरकारकडून काही ठोस उपाययोजना केलेली नाही. राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी, एथलिट्स यांच्यासह सामान्य नागरिकही या घटनेने हेलावून गेले आहेत, आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात उडी घेतली. अमेरिकेतल्या अनेक प्रांतात या आंदोलनांमुळे जवळपास आणीबाणीची परिस्थितीच निर्माण झाली आहे.

या घटनेबाबत डेमोक्रॅटिक पक्षाचे २०२० चे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी ट्विटरवर मत व्यक्त केलं आहे, "जॉर्ज फ्लॉयड आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. त्यांचे आयुष्य महत्त्वाचे होते. एफबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास केला पाहिजे."

 

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेबदद्ल शोक व्यक्त केला. ‘’मी एफबीआयला सखोल चौकशी करण्याची विनंती करत आहे, मनाने मी जॉर्जच्या कुटूंबाच्या आणि त्याच्या मित्रांच्या सोबत आहे. या घटनेत जॉर्जला न्याय मिळेल!" असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे मात्र दुसरीकडे ट्रम्प यांनी जॉर्जच्या वर्णभेदी हत्येविरोधात आंदोलनं करणाऱ्या निदर्शकांना ‘ठग’ म्हणत त्यांची हेटाळणी करत त्यांच्यावर सैनिकी कारवाईने गोळ्या घालण्याची धमकीदेखील दिली. अशाप्रकारे एखाद्या राष्ट्राध्यक्षाने जाहीरपणे नागरिकांना गोळ्या घालण्याची भाषा किमान २१व्या शतकात ऐकण्यात नाही.   

 

 

या घटनेवर मिनियापोलिसचे महापौर, जेकब फ्रे यांनी मत व्यक्त केलं, ते म्हणाले: "अमेरिकेत काळं असणं हा मृत्यूदंड ठरू नये. पाच मिनिटं आम्ही एका गोऱ्या अधिकाऱ्याला काळ्या माणसाच्या मानेवर गुडघा दाबून त्याला मारताना पाहिलं. जेव्हा एखादी व्यक्ती मदतीसाठी याचना करत असताना आपण ते ऐकतो तेव्हा आपण तिला मदत करायला हवी. हा अधिकारी सर्वात मूलभूत असा मानवीय दृष्टीकोन बाळगण्यातच अपयशी ठरला." फ्लॉइडच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर महापौर फ्रे यांनी फ्लॉइडच्या मृत्यूचे वांशिक स्वरुप अधोरेखित केले आणि पोलीस अधिकारी चौविनवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

"आम्ही जे पाहिलं ते माॅब लिचिंग होतं. बास, आमचं मरणं पुरे झालं. आता! आम्हाला आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची ईच्छा आहे,’’ असं मत मीनीयापोलीसमधील नॅशनल असोसिएशन फॉर एडवान्समेंट ऑफ कलर्ड पीपल (NAACP) या संस्थेचे अध्यक्ष लेस्ली रेडमंड यांनी व्यक्त केलं. दरम्यान मीनाीयापोलिससह डेनेवर, न्यूयॉर्क, ऑकलंड, कोलोरॅडो अशा अनेक शहरांत हजारो आंदोलक रस्त्यावर आले असून पोलीस अश्रूधुरांची नळकांडी, रबर बुलेट्सचा वापर करून आंदोलनावर नियंत्रण मिळवू पाहत आहेत, तर न्यूयॉर्कमध्ये पोलिसांनी चाळीस आंदोलकांना अटक केलेली आहे.

 

 

हे वृत्त प्रकाशित करताना आलेली ताजी बातमी म्हणजे जॉर्ज फ्लॉयडची हत्या करणाऱ्या डेरेक मायकल चौविन या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली असून हेनेपिन काऊंटीच्या अधिवक्ता कार्यालयानं जिल्हा न्यायालयात एक फौजदारी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या डॉक्यूमेंटनुसार खून, थर्ड डिग्री टॉर्चर, सदोष मनुष्यवध अशा अनेक गुन्ह्यांची नोंद केलेली आहे. 

या डॉक्यूमेंटनुसार २५ मे या दिवशी ९११ या हेल्पलाईन क्रमांकावर एक फोनकॉल आला होता. शिकागो अव्हेन्यू इथल्या कप फुड्स ३७५९ या मिनियापोलिसमधल्या दुकानातून एका व्यक्तीनं वीस डॉलर्सचं बनावट चलन वापरुन खरेदी केलेली होती. त्यानंतर थॉमस लेन आणि जे.ए.कुएंग हे मिनियापोलीस विभागाचे दोन पोलीस अधिकारी रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. ज्या व्यक्तीन बनावट चलन वापरलं आहे, तो दुकानाजवळच्याच रस्ता क्रमांक ३८ वर पार्किंमधल्या कारमध्ये असल्याचं संबंधित दुकानातून पोलिसांना सांगण्यात आलं. 

त्यानंतर हे दोन अधिकारी कारजवळ गेले. कारमध्ये तीन लोक होते. थॉमस लेन या अधिकाऱ्याने ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या जॉर्ज फ्लॉयडच्या दिशेनं आपली बंदूक रोखली. जॉर्जच्या बाजूच्या सीटवर एक प्रौढ पुरुष आणि गाडीतल्या मागच्या सीटवर एक प्रौढ महिला बसलेली होती. फ्लॉयडच्या बाजूची खिडकी उघडी होती, त्याच्याशी बोलता बोलताच लेननं त्याच्या दिशेनं बंदूक रोखून त्याला बाहेर येण्याची सूचना केली. फ्लॉयडच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी अधिकारी कुएंग बोलत असतानाच लेनने फ्लॉयडला कारच्या बाहेर काढलं. 

लेननं फ्लॉयडला बेड्या घालण्याचा प्रयत्न केला, फ्लॉयडनं त्याला प्रतिरोध केला. बेड्या घातल्यानंतर मात्र फ्लॉयड पोलीस अधिकारी लेनचा प्रतिकार करू लागला. लेनसोबत चालताना मध्येच फ्लॉयड जमिनीवर बसला. त्यानंतर ऑफिसर लेनने फ्लॉयडला स्वत:ची ओळख सांगण्यास फर्मावलं आणि बनावट चलन वापरल्याप्रकरणी अटक करत असल्याचं त्याला सांगितलं. कुएंग आणि लेन हे दोघे पोलीस अधिकारी त्याला जमिनीवरून उठवत पोलिसांच्या गाडीकडे नेण्याचा प्रयत्न करू लागले. परंतू फ्लॉयड तिथेच अडून बसला आणि उभं राहून चालण्यास नकार देऊ लागला. 

एव्हाना ८ वाजून १४ मिनिटं झाली होती. फ्लॉयड पोलिसांना सांगू लागला की, ‘मला बंदीवासाची खूप भीती वाटते.’ आणि तो जागचा हलत नव्हता. एवढ्यात डेरेक चौविन आणि टो थाऊ हे पोलीस अधिकारी तिथे पोहोचले. चौविननं फ्लॉयडला खेचतच पोलिसांच्या गाडीपर्यंत नेलं. फ्लॉयड जमिनीकडे पाहत होता आणि त्याचे हात बांधलेलेच होते. कुएंगनं फ्लॉयडला त्याच्या पाठीकडच्या बाजूने पकडून ठेवलं आणि लेननं त्याचे पाय पकडून ठेवले. त्यानंतर चौविननं फ्लॉयडच्या डोकं आणि मानेच्या मधल्या भागावर आपला गुडघा दाबून ठेवला. ८ वाजून एकोणीस मिनिटं झाली होती, तेव्हा हा प्रकार सुरु झाला होता आणि फ्लॉयड वारंवार, ‘मला श्वास घेता येत नाहीये, कृपया सोडा’ अशी विनवणी वारंवार करत होता, तरीही तिन्ही पोलीस अधिकारी त्याच स्थितीत राहिले. ‘तू तर चांगलं बोलू शकतोयस’ असं अधिकारी फ्लॉयडलाच म्हणाले. 

 

 

‘आपण याला आता दुसऱ्या बाजूला वळवायचं का?’ असं लेननं विचारलं. ‘नको, असंच ठेऊया’ असं उत्तर डेरेक चौविननं दिलं. ‘त्याच्या मेंदूत काही तरी बिघाड होईल, याची काळजी वाटते.’ लेन चौविनला म्हणाला. ‘त्यामुळेच त्याला आपण पोटावर भार येईल असं ठेवलंय.’ चौविन उत्तरला. तिन्ही ऑफिसर्स त्याच शारिरीक स्थितीत काही वेळ होते. बीडब्लूसी (पोलिसांच्या युनिफॉर्मला जोडलेले कॅमेरे) रेकॉर्डिंगनुसार असं आढळलं की, ८.२४ ला फ्लॉयडची हालचाल थांबली. कुएंग या अधिकाऱ्यानं फ्लॉयडच्या मनगटाला हात लावून नाडी तपासली, आणि नाडी सापडत नाहीये, असं त्याच्या सहकाऱ्यांना त्यानं सांगितलं. त्वरित रुग्णवाहिका बोलावली गेली. मेनियापोलिसच्या सरकारी दवाखान्यात फ्लॉयडला दाखल करताच, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अटॉप्सी रिपोर्टमध्ये फ्लॉयडला कोणताही मेंदूशी संबंधित आजार नव्हता व त्याने स्वत: फास लावून घेतलेला नाही, हे निष्पन्न झालं. त्याचबरोबर त्याला र्हदयरोगाचा त्रास, हायपरटेंशन होतं आणि श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे, सविस्तर वैद्यकीय अहवाल मिळणं अद्याप बाकी आहे. 

या एकूण घटनेनंतर आता जेव्हा बीडब्लूसी (पोलिसांच्या युनिफॉर्मला असलेल्या कॅमेऱ्यातील) रेकॉर्डिंग समोर आलं आहे, तेव्हा तीन अधिकाऱ्यांनी जॉर्ज फ्लॉयडची हत्या केली असल्याचं म्हंटलं जात आहे. सीएनएननं याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे.