Quick Reads

दीनबंधूचं हे कात्रण शिवजयंतीच्या सुरुवातीबाबत खूप काही सांगतं...

'दीनबंधू' या सत्यशोधक वर्तमानपत्राचं छायाचित्र आपल्याला शिवजयंतीची सुरुवात स्पष्ट करण्यास मदत करतं.

Credit : Indie Journal

नुकतंच औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात 'टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली', असं विधान केल्यानंतर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यातील बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या योगदानावरून चर्चा सुरु झाली आहे. 

काहींचं म्हणणं असं आहे, की शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि बांधकाम व शिवजयंतीची सुरुवात या लोकमान्य टिळकांच्याच पुढाकारातून झालेल्या गोष्टी आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शिवाजी महाराजांची प्रेरणा पुन्हा रुजवून जनतेत चेतना निर्माण व्हावी या हेतूनं टिळकांनी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व साजरं करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात केली, असंदेखील या पक्षाचं म्हणणं आहे. 

त्याचवेळी दुसऱ्या बाजूचं असं मत आहे, की खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा फुलेंनीच लावला. असं म्हटलं जातं की महात्मा फुले रायगडावर गेले आणि तिथं त्यांना शिवाजी महाराजांची समाधी जीर्ण आणि काट्या-बाभळींनी घेरलेल्या अवस्थेत सापडली. त्यानंतर त्यांनी तिथली साफसफाई करवून घेतली आणि तिचा रखरखाव केला. त्याचसोबत या गटाचं असंही मत आहे की महाराष्ट्राच्या जनमानसावर चेतनानिर्मितीच्या उद्देशानं शिवाजी महाराजांकडं पाहण्याची दृष्टी सर्वप्रथम महात्मा फुलेंची होती आणि त्यांनीच सार्वजनिक शिवजयंतीची सुरुवात केली.      

याबाबत पुरावे काय सांगतात?

महात्मा फुलेंचा जन्म १८२७ चा, तर लोकमान्य टिळकांचा जन्म १८५६ चा. त्या अर्थानं ज्योतिबा टिळकांपेक्षा जवळपास ३० वर्ष मोठे आणि त्याचअर्थी त्यांच्या कारकिर्दीचा कालखंडही टिळकांच्या आधीचा. टिळकांच्या शिवजयंती सुरु करण्याबाबतच्या दाव्यानुसार टिळकांनी देशात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३/९४ ला तर शिवजयंती उत्सव १८९४/९५ ला सुरुवात केली. मात्र अनेक संशोधकांच्या आणि इतिहास अभ्यासकांच्या शोधामधून असं समजतं की शिवजयंती साजरी करण्याची मोहीम महात्मा फुलेंच्या पुढाकारानं आधीच सुरु होती. 

१८६९ मध्ये (काही ठिकाणी हा उल्लेख १८७० चा आहे) महत्तम फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि तिची साफसफाई केली. त्यानंतर लवकरच शिवजयंतीची देखील त्यांनी सुरुवात केल्याचं म्हटलं जाऊ शकतं. काही ठिकाणी शिवजयंतीची सुरुवात होण्याचं वर्ष १८७० असं नोंदवलं गेलं आहे. याबाबत अनेक मतमतांतरं आहेत कारण याबाबत थेट तारखांचा उल्लेख असलेले पुरावे किंवा दस्तऐवज सहजासहजी दर्शनास येत नाहीत. मात्र इंडी जर्नलच्या हाती लागलेल्या एका कात्रणातून याबाबत काहीसा ठोस दावा करता येऊ शकतो. 

 

 

'दीनबंधू' या वर्तमानपत्राची सुरुवात १८७७ मध्ये कृष्णराव भालेकर यांनी केली. हे वर्तमानपत्र महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचं एका अर्थानं मुखपत्रच होतं. त्यातून सत्यशोधक समाजाचे कार्यक्रम, लोकशिक्षण आणि लोकसंवाद होत असे. त्याचा खप १८८० पर्यंत १६५० प्रतींचा होता, ज्यामुळं टिळकांच्या 'केसरी' नंतरचं मराठी प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचा खप दीनबंधूचा होता. इंडी जर्नलच्या हाती लागलेलं कात्रण याच वर्तमानपत्रातील आहे.        

१९ मे १८९५ रोजी प्रकाशित झालेल्या दीनबंधूच्या अंकात ४ मे १८९५ रोजी लिहिलेलं एका वाचकाचं पत्र प्रकाशित करण्यात आलं आहे. बेळगांव मधून हे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव मात्र अस्पष्ट आहे. या पत्रातील वर्णनातून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. ते लिहितात:

 

 

बेळगांव ४/५/९५

रा. रा. दीनबंधू कर्ते यांस:-

वि. वि. आपल्या जनमान्य व सत्यदर्शक पत्रांत खालीं लिहिलेल्या चार ओळीस जागा द्याल अशी पूर्ण आशा आहे. 

आमच्या बेळगांव शहरी कपलनाथाचे देवालयांत तारीख २६ माहे एप्रिल सन १८९५ इ. दिवशीं श्रीछत्रपती शिवाजी महाराज भोंसले मराठ्यांचे नांव गाजवणारे पुरुष यांच्या जयंतीचा उत्सव दरसाला प्रमाणे मोठ्या थाटाने झाला. समारंभास सुमारे ३००/४०० मंडळी जमली होती. रोषणाई ही चांगली केली होती. या कामी रा. रा. आबाजी रामचंद सावंत रामतत्व प्रकाश छापखान्याचे मालक व अण्णा साहेब पोलीस पाटील यांनी बरीच मेहनत घेतली, व हे काम त्यांच्या वरच अवलंबून आहे. आज ५ वर्षांपासून जसे काम निर्विघ्न शेवटास नेले.... 

पत्रातील हा मजकूर पहिला तर सहजपणे काही गोष्टी आपल्या निदर्शनात येऊ शकतात. 

१. १८९५ च्या आधीच शिवजयंती साजरी होण्यास सुरुवात झालेली होती.

२. पुणे, मुंबई अशा शहरी केंद्रांमधून सुरु झालेली एखादी परंपरा बेळगांव सारख्या निम शहरी भागात पसरण्यासाठी काहीसा वेळ गेला असणार, त्याअर्थी शिवजयंती १८९५ च्या बऱ्याच आधीपासून साजरी करण्याची प्रथा असणार.

३. या बेळगांव मध्येच पात्रात म्हटल्याप्रमाणं जयंती साजरी करण्याचं ते ५वं वर्ष होतं, ज्याचा अर्थ तिथली सुरुवात १८९० मध्ये झाली.

४. या कार्यक्रमाला ३००-४०० मंडळी उपस्थित होती, या अर्थी हा कार्यक्रम बऱ्यापैकी प्रसिद्धीस आलेला होता, लोकमान्यता मिळालेला होता. 

पुढं जाऊन या पत्रात कार्यक्रमात कशाप्रकारे निबंध वाचले गेले आणि शिवाजी महाराजांवर लिहिलेली गीतं म्हटली गेली, कुस्त्या आयोजित करूनमल्लांना पुरस्कार देण्यात आले याचं वर्णन आहे. त्याचसोबत गुलाल आणि फुले उधळल्याचं आणि पानसुपारी, अत्तर आणि सुंठवडी वाटली गेल्याचंही वर्णन आहे. यातून हे स्पष्ट होतं की या कार्यक्रमाची रूपरेषा, किंवा स्वरूपही बऱ्यापैकी सविस्तर आणि मोठं आहे. त्या अर्थानं हा उत्सव एव्हाना प्रस्थापित झालेला आहे. 

थोडक्यात सांगायचं झाल्यास, लोकमान्य टिळकांनी कथितपणे सार्वजनिक पातळीवर शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या बराच काळ आधीपासून मराठी प्रदेशांमध्ये शिवाजी महाराजांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात होता हे स्पष्ट आहे. टिळकांचं कार्य आणि त्यांच्या कर्तृत्वाचा हा लेखा जोखा नाही. त्यांनी केलेलं कार्य या देशाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची घडामोड आहे, मात्र वरील पत्रातून हे स्पष्ट होतं की टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात केली हा दावा अनैतिहासिक आणि चुकीचा आहे.