Europe

शार्ली हेब्दो, मुस्लिम कट्टरतावाद आणि फ्रेंच अभिव्यक्तीची दांभिकता

सॅम्युअल पेटी या शिक्षकाच्या हत्येनंतर मॅक्रॉन सरकारनं इस्लामविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळं फ्रान्स आणि मुस्लिम जगतातील तणाव वरचेवर वाढतच चालला आहे.

Credit : Euronews

सॅम्युअल पेटी या शिक्षकाच्या हत्येनंतर मॅक्रॉन सरकारनं इस्लामविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळं फ्रान्स आणि मुस्लिम जगतातील तणाव वरचेवर वाढतच चालला आहे. फ्रान्सने दहशतवादाविरोधात सुरू केलेल्या या कारवायांवर मुस्लीमद्वेषी म्हणून टीका करण्यात आघाडीवर असलेले तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसिप एर्दोगन यांचंच व्यंगचित्र आता फ्रेंच व्यंगात्मक मासिक शार्ली हेब्दोनं प्रसिद्ध केल्यानं या आगीत आता तेल ओतलं गेल्याचं पाहायला मिळतंय. एर्दोगन यांची खिल्ली उडवणारं हे व्यंगचित्र प्रसिद्ध करून शार्ली हेब्दो सांस्कृतिक वर्चस्ववाद आणि वर्णद्वेष पसरवत असल्याची टीका तुर्कीनं केली आहे.

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शार्ली हेब्दोनं आपला नवीन अंक प्रसिद्ध केला. या अंकाच्या मुखपृष्ठावर रेखाटलेले एर्दोगन टी-शर्ट आणि अंडरपॅन्टवर बसलेले असून दारू पिताना दिसतात. खुर्चीवर बसलेले एर्दोगन त्यांच्या समोरील हिजाब घातलेल्या महिलेचा स्कर्ट वर करून तिला न्याहाळताना दिसतात. 'खासगीत एर्दोगन हे प्रचंड विनोदी आणि चेष्टा मस्करी करणारे आहेत' अशी मिश्कील हेडलाइन या व्यंगचित्राला देण्यात आलेली आहे.

मागच्या महिन्यात फ्रान्समधील सॅम्युअल पेटी या शालेय शिक्षकाची १८ वर्षीय मुलानं हत्या केल्यानंतर फ्रान्समधलं वातावरण तापलेलं आहे. या हत्येचा जगभरातून निषेध करण्यात आलेला असला तरी यानंतरची कारवाई म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांच्या नेतृत्वाखालील फ्रान्स सरकारनं इस्लाम आणि फ्रान्समधील समस्त मुस्लिमांना सरसकट लक्ष्य करणं अनेकांना पचलेलं नाही. या हत्येच्या निमित्तानं राजकीय फायद्यापोटी मॅक्रोन देशात आधीच अस्तित्वात असलेल्या मुस्लिमद्वेषावर स्वार होत कारवाया करत असल्याचे आरोप बऱ्याच घटकांनी केले आहेत.

फ्रान्समधील विभाजनवादी शक्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक नवीन विधेयक मॅक्रोन यांनी काही दिवसांपूर्वीच संसदेत आणलं होतं. फ्रान्समधील धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सारखी मूल्यं अबाधित ठेवण्यासाठीच धार्मिक अतिरेकी गटांवर कारवाई करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक विद्यमान सरकारकडून आणलं गेलं होतं. पण धर्मनिरपेक्षतेच्या आड मॅक्रोन हे फ्रान्समधील जनमाणसात आधीच अस्तित्वात असलेल्या मुस्लीमद्वेषाला अजून बळकटी देत असल्याची शंका यावेळी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सॅम्युअल पेटी यांच्यावर हा हल्ला झाला आणि हे विधेयक पुढे रेटण्यासाठी मॅक्रोन यांना आयतं कारण मिळालं.

फ्रान्समध्ये आधीच बुरखा, मदरसे आणि इस्लाममधील इतर धार्मिक रीतिरिवाजांवर धर्मनिरपेक्षतेच्या नावावर बंदी घालण्यात आलेली आहे. मागच्या महिन्यातील या हल्ल्याचं निमित्त होऊन मॅक्रोन यांनी फ्रान्समधील इस्लामोफोबियापासून तिथल्या मुस्लीम नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या Collective Against Islamophobia In France (CCIF) सारख्या स्वयंसेवी संघटनांवरही बंदी घालण्यास सुरुवात केली. 

आपल्या इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मॅक्रोन हे राजकीयदृष्ट्या पुरोगामी समजले जातात. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या प्रमुख विरोधक मेरिन ली पेन आणि त्यांचा अतिउजवा नॅशनल रॅली पोलिटिकल पार्टी हा पक्ष उघडच इस्लामोफोबिक असून या पक्षांच्या नेत्यांकडून सातत्यानं मुस्लिमद्वेषी विधानं करण्यात येतात. फ्रान्समधील जनमाणसात अस्तित्वात असलेल्या मुस्लिम आणि वर्णद्वेषामुळं अशा पक्षांना तिथं बऱ्यापैकी मान्यता आणि मतंही मिळालेली आहेत. फ्रान्समधील याच वर्णद्वेष आणि मुस्लिमद्वेषाचा चेहरा असलेल्या मेरिन ली पेन याच पुन्हा पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीत मॅक्रोन यांना आव्हान देणार आहेत. या हल्ल्याच्या निमित्तानं आपल्या देशातील मुस्लिमद्वेष पुन्हा उफाळून वर येऊ नये ,अशी रास्त काळजी घेण्यापेक्षा मॅक्रॉन यांनी तुलनेनं सोप्पा मार्ग निवडलाय.

पेटी यांच्या हत्येनंतर संसदेत बोलताना मॅक्रोन यांनी मुस्लिमधर्मातील जिहादी कट्टरतेवर बोट न ठेवता समस्त मुस्लिम धर्मालाच टार्गेट केलं. मेरिन ली पेन यांचं आव्हान वाढू नये, या हेतूनं मुस्लीमद्वेषाच्या राजकारणाचा आधार घेत मॅक्रोन यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवत सरसकट मुस्लिमद्वेषाचा मार्ग चोखाळला आहे. यातून मेरिन ली समर्थकांची आणि मुस्लिमद्वेषाला बळी पडलेल्या सर्व जनतेची आपल्याला आयती सहानुभूती मिळेल, तसेच कोरोनामुळे घसरत चाललेली अर्थव्यवस्था या प्रश्नांना बगल देत दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल, असं मॅक्रॉन यांचं साधं राजकीय गणित आहे.

२०१५ साली मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र काढल्याबद्दल शार्ली हेब्दोच्या पॅरिसमधील कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या देशाचा मूलभूत गाभा आहे, असं म्हणत मॅक्रोन यांनी आधीपासूनच शार्ली हेब्दोच्या समर्थनार्थ आक्रमकरित्या उघड भूमिका घेतलेली आहे. फ्रान्समधील माध्यमांना धर्मावर टीका करण्याचंही तितकंच स्वातंत्र्य आहे, असं म्हणत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची टिमकी वाजवणारे मॅक्रोन हे त्यांच्याच देशातील उघड वर्णद्वेष आणि मुस्लिमद्वेष पसरवणाऱ्या माध्यमांविषयी मात्र चकार शब्द काढत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची इतकीच चाड असणाऱ्या फ्रान्स या देशानं फ्रेंच साम्राज्यवाद आणि पाश्चात्य मुस्लिमद्वेषातून अल्जेरियावर लादलेल्या रक्तरंजित युद्धाचं चित्रण करणाऱ्या The Battle Of Algiers या फ्रेंच सिनेमावरंच कित्येक वर्ष बंदी घातली होती! 

त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मॅक्रोन व फ्रान्सला आलेला सध्याचा पुळका म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या आत लपलेल्या मुस्लिमद्वेषाला घातलेलं पांघरूण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं शार्ली हेब्दोच्या खांद्यावरून मॅक्रॉन हे आपली मुस्लिमद्वेषाची गोळी झाडत राजकीय गोळाबेरीज करत आहेत. कारण मॅक्रोन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्समध्ये वाढलेली बेरोजगारी, आर्थिक विषमता, कोरानाचं सावट, येलो वेस्ट प्रोटेस्ट अशी संकट आ वासून उभी राहिली असून त्यांचा सामना करावा लागू नये म्हणून मॅक्रॉन मुस्लिमांमधील धार्मिक कट्टरतेतून होणाऱ्या अशा एखाद-दुसऱ्या हल्ल्याचं राजकीय भांडवल करत असल्याचं मत फ्रान्समधीलच अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेलं आहे. 

मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रावरून पाकिस्तान, तुर्कीसारख्या मुस्लिम एकाधिकारशाही असलेल्या देशांना डिवचण्याचं काम मॅक्रोनप्रणित फ्रान्समधलं अभिव्यक्तिस्वातंत्र्य करत असलं तरी हाच फ्रान्स पत्रकारांची हत्या आणि मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमधील अत्याचारांवर आपले चांगले आर्थिक संबंध राखण्यासाठी मूग गिळून गप्प असल्याचं जगानं पाहिलेलं आहे.