Quick Reads

‘हजार हातांचा आक्टोपस’ समजून घेतांना

कालवश सुधीर बेडेकर यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीनिमित्त.

Credit : शुभम पाटील

माणसाच्या मूलभूत गरजांची यादी आजच्या काळात वाढलेली आहे. अनेक बाबी त्यात धरल्या जातात. पण खरे पाहता अन्न आणि वस्त्र या गरजांनंतर माणसाची सर्वात प्रथम आणि सगळ्यात प्रमुख गरज असते विचार. विचार हा माणसाच्या दृष्टीने अन्नाइतकाच महत्वाचा असतो. विचार करतो म्हणूनच तो माणूस असतो. तो माणूस असतो म्हणून त्याच्या गरजा अन्न आणि वस्त्र इथपर्यंतच न थांबता पुढे जातात. त्याला घर हवे, चांगले शिक्षण हवे, उत्तम आरोग्य हवे, मनोरंजनाची सकस साधने हवीत. आजच्या काळात या सुद्धा त्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. तो प्रत्येक मानवाचा अधिकारच आहे. माणूस म्हणून त्याला सन्माननीय जीवन जगता यायलाच हवे. पण बहुसंख्य जनतेच्या बाबतीत आज ते साध्य होत नाही. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे प्रचंड उत्पादन आणि संपत्तीचा ओघ वाहत आहे. पण असे असूनही बहुसंख्य समाज वंचित आहे.  

हे असे का? समाजात भूक, महागाई, बेरोजगारी, विषमता, अन्याय, अत्याचार का? हे प्रश्न स्वाभाविकपणे प्रत्येक तरुण पिढीला पडत असतात. समजा एकवेळ त्याला हे प्रश्न नाही पडले. आजूबाजूला चालणार्‍या सगळ्या गोष्टींकडे त्याने दुर्लक्ष केले. फक्त स्वतःपुरताच विचार केला. तरीसुद्धा शिक्षण, रोजगार, लग्न, कुटुंब या ऐहिक चक्रातून जात असतांना, एक प्रश्न त्याला पडतोच. या अवाढव्य जगाचा अर्थ काय? हे सगळं आलं कुठून? हे सगळं जाणार कुठे? मी कोण? या जगात माझे स्थान काय? असे प्रश्न प्रत्येक तरुणाला पडतातच, हे अगदी खात्रीने म्हणता येईल.

 

विषमता, अन्याय, अत्याचार का? हे प्रश्न स्वाभाविकपणे प्रत्येक तरुण पिढीला पडत असतात.

 

अर्थात, त्याच्या मनात निर्माण झालेल्या या प्रश्नांना उत्तरे देखील मिळतात. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे समाजात तयार असतात. पिढ्यांपिढ्या ती चालत आलेली असतात. प्रारब्ध, नशीब, मागच्या जन्माचे पाप त्यामुळे माणसे वंचित राहतात असे उत्तर सगळ्या प्रकारची धार्मिक तत्वज्ञाने देतात. माणसाने पुण्य कर्म करावे. निस्वार्थपणे सेवा करावी. पुढच्या जन्मी त्याला नक्की चांगले जीवन मिळेल. असा उतारा ही धार्मिक तत्वज्ञाने देतात. तर भांडवली मूल्य जोपासणारे आधुनिक तत्वज्ञान म्हणते की क्षमता आणि लायकीप्रमाणे सगळ्यांना मिळेल. सगळ्यांनी मन लावून कष्ट करा. विकास आधी व्हायला हवा. विकास झाला की तो आपोआप खाली झिरपत येईल. खालची माणसे सुखी होतील. 

अशाप्रकारे धार्मिक तत्वज्ञान आणि भांडवली तत्वज्ञान उत्तरे देतात आणि उपाय देखील सुचवतात. पण या उत्तराने समाधानी होईल ती तरुणाई कसली. तरुणाई म्हणजे आवेग, तरुणाई म्हणजे अस्वस्थता, तरुणाई म्हणजे शोधक वृत्ती. काही जण वरील उत्तरांना योग्य समजून गप्प बसतीलही कदाचित. पण तरुणाईचा मोठा भाग नेहमी डोक्यात विचारांची प्रयोगशाळा घेऊन फिरत असतो. 

 

 

अशीच पिढी साठ आणि सत्तरच्या दशकात महाराष्ट्राने पाहिली आहे. त्या पिढीच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे पुस्तक म्हणजे ‘हजार हातांचा आक्टोपस’. सुधीर बेडेकर लिखित या पुस्तकाची हरिती प्रकाशनने दुसरी आवृत्ती काढली आहे. यात सामाजिक सांस्कृतिक विषयावर सुधीर बेडेकर यांचे १९७०-७४ या काळात लिहिलेले वीस लेख आहेत. १९७६ साली हे पुस्तक सर्वप्रथम पाप्युलर प्रकाशनने प्रकाशित केले होते. आज जवळपास पन्नास वर्षांनंतर हरिती प्रकाशनाने नव्या रूपात पुन्हा ते आणले आहे. 

खूप मोठा काळ लोटला आहे. सुमारे अर्धे शतक उलटून गेले आहे. परिस्थिती पूर्णतः बदलून गेलेली आहे. त्या काळाशी आजच्या काळाची तुलनाच होऊ शकत नाही. पण प्रश्न आजही तेच आहेत. त्या काळाची तरुण पिढी आणि आजची तरुण पिढी यात एक महत्त्वाचा फरक जाणवतोय. त्या काळाची पिढी मनात संताप आणि डोळ्यात स्वप्न घेऊन प्रस्थपितांना जाब विचारात होती. आजची पिढी मात्र काहीशी गोंधळलेली, योग्य दिशेच्या शोधात असलेली जाणवते. आपला नेमका शत्रू कोण? आपल्याला नेमके कोणाशी लढायचे आहे? नवीन काय निर्माण करायचे आहे? हे प्रश्न आज अधांतरी आहेत. जगण्याचे, आयुष्य घडविण्याचे मूलभूत प्रश्न सोडून ती जातीय, धार्मिक अस्मितांचे राजकारण करणार्‍या कुटिल शक्तींच्या नादी लागतांना दिसतेय.  

 

आज शोषित-पीडित जनतेला मार्गदर्शन करणारी वैचारिक केंद्रे उरलेली नाहीत.

 

आज शोषित-पीडित जनतेला मार्गदर्शन करणारी वैचारिक केंद्रे उरलेली नाहीत. घुसमट सहन करणार्‍या तरुणाईला दिशा देणारी सामाजिक शक्ती निर्माण झालेली नाही. अशा परिस्थितीत या घटकांना स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागणार आहे. अशा काळात ‘हजार हातांचा आक्टोपस’ सारखी पुस्तके एक दृष्टी देण्याचा प्रयत्न करतात. जगाकडे कसं पाहावं, त्यातील व्यवहारांना कसं समजून घ्यावं, या साठी ती उपयोगी ठरू शकतात. 

जग हे कधीच स्थिर नसतं. ते सतत बदलत असतं. पुढे जात असतं. आजची पिढी मिलेनियम पिढी म्हणविली जाते. एकविसाव्या शतकात किंवा त्यापूर्वी बदलत्या सहस्त्राकाच्या सांध्यावर ती जन्माला आली आहे. प्रत्येक पिढीसमोर त्या त्या काळाची आव्हाने असतात. मागची अस्सल, पुढची कम अस्सल असे काही नसते. प्रत्येक नवी पिढी सक्षम असते. तिचा मार्ग ती स्वतः शोधतेच. अशा वाट शोधणार्‍या तरुणांना हे पुस्तक मागच्या पिढीचे काही संचित देऊ पाहते. व्यवस्था नावाची यंत्रणा कशाप्रकारे आपल्या मनांना जखडून ठेवत असते, याचा उलगडा हे पुस्तक वाचतांना होतो. ज्या काळात हे लेख लिहिले गेले आहेत, तो काळ देशात प्रचंड उलथापालथीचा होता. जागतिक पातळीवर सुद्धा खूप घडामोडी घडत होत्या. अशा काळात जी तरुणाई नवी स्वप्नं घेऊन उभी राहिली तिच्या विचारांचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटलेले दिसते. आज पुन्हा हरिती प्रकाशनाने हे पुस्तक तरुणांच्या हाती दिले आहे. ज्यांना जीवन बदलायचे आहे, नवा समाज घडवायचा आहे, नवनिर्मिती करायची आहे, अशा सृजनशील तरुण-तरुणींना दृष्टी देण्याचे काम हे पुस्तक करेल.         

दोन महिन्यांपूर्वी सुधीर बेडेकर यांचे निधन झाले. पुस्तकाच्या मनोगतात ते असं मांडतात की, ‘हे पुस्तक लिहिलं गेलं तेव्हाचं जग फारच वेगळं होतं. तेव्हा कॉम्प्युटर नव्हता, टी.व्ही. चॅनल्स नव्हते. मोबाइल, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया तर सोडाच. म्हणजे माध्यमं फारच कमी उपलब्ध होती. पण तेव्हाही प्रस्थापित व्यवस्था तिच्या हाताला लागतील त्या अनेक साधनांनी, अनेक मार्गांनी, अनेक माध्यमांचा वापर करून जनतेवर आपला वैचारिक-सांस्कृतिक प्रभाव टाकणं आणि मग आर्थिक-राजकीय प्रभुत्व गाजवणं हे करत होती. लोकांच्या दैनंदिन जीवनावर, मनांवर, विचारांवर, भाव-भावनांवर, स्वप्नांवर. आज तो एक हजार साधनांचा, एक हजार वळवळत्या हातांचा ऑक्टोपस दहा हजार हातांचा झाला आहे. पण या नव्या संदर्भात पुन्हा हे लेख मी वाचले तेव्हा मला असं वाटलं की हा सगळा बदल जगात झालेला आहे तरीसुद्धा हे पुस्तक आज लागू पडणारे आहे. प्रस्तुत आहे.’

पुस्तकातील लेख विविधांगी आहेत. सुधीर बेडेकरांनी केवळ राजकीय अंगाने हे लेखन केलेले नाही. जात, धर्म, संस्कृती, साहित्य, काव्य अशा अनेक  'सुपरस्ट्रक्चर' म्हणविल्या जाणार्‍या गोष्टींबद्दल त्यांनी प्रवाही विवेचन केले आहे. त्या काळात अशा प्रकारचे लिखाण ही  अगदी विशेष गोष्ट होती. बेडेकर तेव्हा उभ्या राहिलेल्या तरुणांच्या ‘मागोवा’ गटाशी संबंधित होते. या गटाने धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आदिवासींचे संघटन उभारले होते. पोथीनिष्ठ मार्क्सवाद्यांबद्दल या गटातील तरुणांनी प्रश्न उपस्थित केले होते. हे आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांमधून शिकलेले उच्चशिक्षित तरुण होते. करियर सोडून प्रत्यक्ष जनतेत जाऊन झोकून देऊन काम करत होते. त्यांना जगात घडणार्‍या घडामोडींचे भान होते. ‘मार्क्सवादाची सुद्धा चिकित्सा व्हायला हवी’ असा परखड पवित्रा घेऊन ही पिढी नवी वाट शोधत होती.     

 

 

त्या पिढीला दिसलेला, जाणवलेला व्यवस्थेचा ‘आक्टोपस’ हजार हातांचा होता. अनेक हातांनी तो जनतेला जखडून ठेवत होता, जायबंदी करत होता. आज हाच आक्टोपस दहा हजार हातांचा झालेला आहे. पण माणसाला पिडणारी व्यवस्था कितीही प्रबळ असली तरी जनतेशिवाय ती चालूच शकत नाही. जो पर्यंत जनता तिचे नेतृत्व, प्रभुत्व, धुरिणत्व स्वीकारते तोपर्यंत ती पोलादी भासते. ज्या दिवशी जनता व्यवस्थेने टाकलेली झापडे झुगारून देते त्या दिवशी जनतेपुढे कोणतीही शक्ती टिकू शकत नाही. ‘व्यवस्था जनतेसाठी असते, जनता व्यवस्थेसाठी नाही’, हे ठणकावून सांगण्याची ऐतिहासिक वेळ तेव्हा येऊन ठेपलेली असते.   

ती वेळ एक दिवस येईल. सर्वंकष बदलासाठी जनता सज्ज होईल. तिच्या अग्रभागी तरुण असतील, असा विश्वास सुधीर बेडेकर यांना होता. म्हणूनच पुस्तकात एके ठिकाणी ते असं मांडतात की, 'जे जे जागे आहेत, तरुण आहेत, अन् जन्माने, पैशाने वा सांस्कृतिक कारणांमुळे खालच्या वर्गातले आहेत, त्या सगळ्यांमध्ये प्रचंड असंतोष व असमाधान आहे. त्यांना कोणत्याही पक्ष वा प्रणालीविषयी भक्ती नाही. त्यांची फार फसवणूक झाली आहे. चालली आहे. ते आता सगळेच तपासून घेतील. आपले मार्ग आपण घडवतील. त्यांना आपल्यात ओढण्याचे प्रयत्न सगळीकडून होतील. पण या माराच्या यक्षसैन्याला ते भीक घालणार नाहीत. ते स्वतः स्वतःच्या क्रांतीच्या वाटा धुंडाळतील.

लेखकाचा संपर्क: amarlok2011@gmail.com 

या लिंकवर आगावू नोंदणी करून पुस्तक सवलतीच्या दरात प्राप्त करता येईल.