India

आदिवासी दिग्दर्शकाच्या मराठी फिल्मची निर्मात्या स्टुडियोकडूनच मुस्कटदाबी

दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Credit : शुभम पाटील

आदिवासी समूहातून अत्यंत कष्टानं सिनेमानिर्मिती केलेल्या छत्रपाल निनावे यांना चित्रपटनिर्मितीच्या पहिल्याच प्रयत्नात सिनेमा जगतातील दडपशाहीचा त्रास सहन करावा लागत आहे. एनएफडीसी सारखी राष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळवलेला त्यांचा पहिलाच चित्रपट रिलायन्स जिओ स्टुडियोज या कंपनीनं हक्क विकत घेतल्यानंतर त्याच्या प्रदर्शनापासून रोखून धरला आहे, असा आरोप निनावे यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर बर्लिन येथे भरवण्यात येणाऱ्या 'बर्लिनाल' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जानेवारी २०२१ मध्ये निवड होऊनही या निर्मात्या कंपनीनं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

'घात' हा छत्रपाल निनावे यांचा पहिलाच सिनेमा. त्याचं कथानक महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात घडतं. हा सिनेमा एक थरारपट असल्याचं छत्रपाल सांगतात. मात्र चित्रपटातील आशय राजकीय किंवा सामाजिक पातळीवर कोणत्याही समूहांना किंवा हितसंबंधांना चेतावणारा नाही, असंही ते स्पष्ट करतात. "या सर्व गोष्टी मी आधीपासूनच निर्मात्यांशी बोलून स्पष्ट केल्या होत्या. सिनेमा निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर मी सिनेमा निर्मात्यांच्या सहमतीनंच पुढची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांना चित्रपटाची संकल्पना आवडलीही होती. तरीही त्यांनी चित्रपट का अडकवला आहे, हे अनाकलनीय आहे."

२०१८ पासून अथक परिश्रमातून छत्रपाल यांनी सिनेमाची निर्मिती सुरु केली. सिनेमाची संकल्पना आणि काही प्राथमिक चित्रीकरण घेऊन ते 'दृश्यम फिल्म्स' या प्रसिद्ध सिनेमा निर्मिती कंपनीकडे गेले. "त्यांना चित्रपटाची कथा आवडली होती. मी त्यांना चित्रपटाच्या व्यायवसायिक निर्मिती आणि प्रदर्शनाचे अधिकार दिले. दृश्यम फिल्म्सनं चित्रपट पुढं जिओ स्टुडियोज कडे नेला आणि मी मराठीसह इंग्रजीतही सिनेमाची संहिता त्यांना प्रस्तुत केली होती, त्यानंतर जिओ स्टुडियोज या प्रक्रियेत सहभागी झालं. आता चित्रपटाचे सर्व व्यावसायिक अधिकार जिओ कडे आहेत," छत्रपाल सांगतात. 

 

"आमची फिल्म बर्लिनाल महोत्सवात निवड झालेली एकमेव भारतीय फिल्म ठरली होती."

 

"२०२० ला एनएफडीसी च्या फिल्म लॅब्स कार्यक्रमात निवड झालेल्या ५ फिल्म्स पैकी माझी फिल्म एक होती. त्यादरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमा अभ्यासकांकडून काही सल्ले आणि सूचना मिळाल्या, त्या सुधारणाही आम्ही स्वीकारल्या आणि सिनेमा अधिकाधिक चांगला करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले," म्हणत चित्रपटाच्या सक्षमतेबाबत सांगत निनावे पुढं सांगतात, "हा कार्यक्रम संपायच्या १ दिवस आधीच आम्हाला आनंदाची बातमी मिळाली. आमची फिल्म बर्लिनाल महोत्सवात निवड झालेली एकमेव भारतीय फिल्म ठरली होती. माझ्यासारख्या नवख्या चित्रपटकर्त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर लवकरच चित्रपटाला एनएफडीसी कडूनही सन्मानित करण्यात आलं."

"मात्र इतक्यात आम्हाला असं कळवलं गेलं की आमचा निर्माता स्टुडिओ असणाऱ्या जिओ स्टुडियोजनं रातोरात बर्लिनाल महोत्सवाला चित्रपटाचं प्रदर्शन करण्यास मनाई करणारी नोटीस पाठवली होती," छत्रपाल सांगतात. ही धक्कादायक बाब कळल्यावर आम्ही तातडीनं स्टुडियोच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु केले, ज्याबाबत ते म्हणतात, "मी त्यांना अनेक ईमेल केले. मी त्यांना म्हणालो चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मला सांगा काय अडचण आहे. मात्र त्यांनी एकाही प्रयत्नाला दाद दिली नाही आणि प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. मी कोव्हीड पॅनडेमिकच्या सुरुवातीपासून आजवर त्यांनी कोणताही संवाद साधलेला नाही. त्यांनी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्याचा अर्जही केलेला नाही."

निनावे यांच्या माहितीनुसार दृश्यम फिल्म्सला जिओ स्टुडियोजनं काही आक्षेप कळवले आहेत, ज्यामध्ये त्यांच्यामते सिनेमात पोलिसांचं दारू पितानाचं दृश्य, जातीवाचक शिव्या, देवीदेवतांची अवमान करणारे प्रसंग आहेत. "मी खात्रीनं सांगतो की या चित्रपटात असं काहीही नाही. ज्या शिव्या आहेत त्याही जातीवाचक नाहीत, मात्र त्यांना म्यूटही करायला मी तयारी दर्शवली. अशी उगाच काहीही कारणं त्यांनी दृश्यम फिल्म्सला कळवली आहेत. मला असं वाटतं आक्षेप घेणारी नोटीस काढणाऱ्यानं सिनेमा न पाहताच ही नोटीस तयार केली आहे. आम्हाला इतकीच अपेक्षा आहे की जिओ स्टुडियोजनं एकतर या सर्व गोष्टी स्पष्ट कराव्यात आणि सिनेमा प्रदर्शित करावा, किंवा त्याचे अधिकार दृश्यम कडे हस्तांतरित करावेत."

या सर्व प्रश्नांबाबत दृश्यम फिल्म्स आणि जिओ स्टुडियोजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इंडी जर्नलनं केला. दृश्यमच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारणांमुळं आपण माध्यमांशी बोलू शकत नसल्याचं सांगितलं, तर जिओ स्टुडियोजचे निखिल साने यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी संबंधित अधिकारी व्यक्तीला संपर्क करण्यास सांगू असं आश्वासन दिलं मात्र त्यानंतर बातमी प्रकाशित होईपर्यंतही त्यांचा कोणताही प्रतिसाद इंडी जर्नलला प्राप्त झाला नाही. 

छत्रपाल आपली व्यथा मांडत सांगतात, "अनेक निष्णात तंत्रज्ञांनी आणि निपुण कलाकारांनी या सिनेमाच्या स्क्रिप्टवर विश्वास ठेऊन अगदी कमी खर्चात ही फिल्म केली.सिनेमा खराब असल्यानं थांबवला किंवा अडकवला जात असेल, तर इतके पुरस्कार कसे मिळाले? बर्लिनाल सारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली फिल्म वाईट असेल असं त्यांचं म्हणणं आहे का? या महोत्सवाच्या आयोजकांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं की जिथं प्रदर्शन व्हावं म्हणून अनेक निर्माते प्रयत्न करतात तिथं एखादा निर्माता सिनेमा प्रदर्शित होऊ नये यासाठी नोटीस पाठवतो. कदाचित कमी बजेटची फिल्म आहे, मराठी फिल्म आहे, आदिवासी फिल्म आहे, म्हणून असेल की त्यांनी ही फिल्म बाजूला टाकून दिली आहे. हे चुकीचं आहे ना?" 

 

गेले तब्ब्ल १५ महिने छत्रपाल निनावे स्वतःच्या निर्मितीबाबत स्पष्टीकरणाच्या अपेक्षेत आहेत. समोरून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं शेवटी निनावे यांनी समाजमाध्यमांचा आधार घेतला. त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये निनावे म्हणतात, "ही फिल्म बनवण्यात मी ४ वर्ष घालवली आहेत. कोणताही चित्रपट हा एखाद्या दिग्दर्शकाचं बाळच असतं. अशात आपल्या या निर्मितीची कत्तल होत असताना मला संयम बाळगणं अवघड झालं आहे. मी या सगळ्या प्रकारानं नैराश्यात गेलो आहे. 'घात'ला मराठी आणि भारतीय सिनेमासृष्टीनं साजरं करायला हवं होतं मात्र त्याची माझ्या डोळ्यांसमोर कत्तल केली गेली." 

छत्रपाल म्हणतात की याबाबत काही कायदेशीर पावलं उचलावीत तर तितकी त्यांची आर्थिक क्षमता नाही. चित्रपटाचं ९५ टक्के काम पूर्ण झालेलं आहे, मात्र उरलेलं कामही पूर्ण होणं शक्य नाही कारण जिओ स्टुडियोज याबाबत काहीच स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. दृश्यम फिल्म्सकडून निनावे यांना यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. "मात्र माझा आता सर्वांवरून विश्वास उडाला आहे. सिनेमा जगतात असे अनेक सिनेमे बाजूला टाकले जातात आणि ते कधीच प्रदर्शित होत नाहीत. माझ्या सिनेमासोबत असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे," छत्रपाल निराशपणे म्हणतात.