Americas

स्टॅन ली नावाचं युनिव्हर्स

स्टॅन ली: १९२२-२०१८

Credit : Penbay pilot

वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी माझ्या हातात रद्दीच्या दुकानातून किलोवर घेतलेल्या रद्दीतून सापडलं ते म्हणजे गोष्टी सांगण्याची अतिशय वेगळी पद्धत आणि मांडणी असलेली कॉमिक बुक्स. एका कथेला दृश्यात्मकता देताना, तिच्या छपाईचा विचार करत पॅनल मध्ये वितरित करून त्यातून वेग, हालचाल, आघात आणि उत्साह निर्माण करू शकणारं एकमेव छापील माध्यम म्हणजे कॉमिक्स. सुपरमॅनचं हवेत उडणं, बॅटमॅनचं रात्रीच्या काळोखात संचार करणं किंवा स्पायडरमॅनचं इमारतींना लटकून शहरातल्या गुन्हेगारांच्या मागे धावणं, या दृश्यांच्या एखाद्या लहानग्याच्याच काय तर थोरामोठ्यांच्याही मनाचा एक वेगळाच कोपरा काबीज होतो आणि एक वेगळं जग जिवंत होतं, ज्यात कल्पनांना एक तर्काधिष्टित, किंवा किमान आधुनिक विज्ञानाच्या चमत्कारांची किनार आहे, आणि या जगावर अर्ध्या शतकाहून अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे, स्टॅन ली. 

स्टॅन ली चा जन्म १९२२ साली न्यू यॉर्कच्या एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचा काका, 'मिस्टिक कॉमिक्स' या कॉमिक पुस्तकांचा प्रकाशक होता. १७ व्या वर्षी स्टॅन काकाच्या प्रकाशनात काम करू लागला. कॉमिक हा कला आणि कथन यांची सांगड घालणारा प्रकाशनाचा प्रकार. यात स्टोरीबोर्ड, पॅनल डिझाईन, ड्रॉईंग, इंकिंग, लेटरिंग, एडिटिंग, प्रिंटिंग असा भला मोठा पसारा आहे. स्टॅनच्या काकाकडे जॅक कर्बी नावाचा अवलिया कलाकार काम करत होता. कर्बी आणि तेव्हाच त्यांचा संपादक, काही वादावरून ती कंपनी सोडून गेले, आणि अवघ्या १९ व्या वर्षी, स्टॅन ली, मिस्टिक कॉमिक्सचा संपादक झाला. 

stanlee2

 

स्टॅन ली ज्या काळात कॉमिक इंडस्ट्रीत आला, त्या काळातला अमेरिकन समाज आणि मीडिया हे वेगळंच समीकरण होतं. कम्युनिस्ट सोवियत संघाच्या भीतीचं सावट अमेरिका आणि इतर भांडवली देशांवर पसरलं होतं. दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटत होतं आणि नाझी भस्मासुर जगाचा ताबा घेऊ पाहत होता. भांडवली मुक्ततेचा अत्युच्च टोकाचा आदर्श आपल्या मनात घर करून असलेल्या अमेरिकेत, प्रत्येक जण माध्यमांनी उभ्या केलेल्या या स्वातंत्र्य हरवून बसण्याच्या भीतीला प्रतिसाद देत होते आणि कुठलाही समाज आपल्या सामूहिक भीतीला आपल्या कथांमध्ये रूपांतरित करतो. 

अमेरिकेला तसं पाहिलं तर प्राचीन म्हणावा असा सांस्कृतिक वारसा नाही. तिथल्या मूळ समाजांना नष्ट करून युरोपीय वसाहतवाद्यानी अमेरिकेच्या खंडांना 'द न्यू वर्ल्ड' अर्थात 'नवं जग' असं नामकरण केलं आणि लवकरच उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्यांमधून मायभू युरोपशी आपला संबंध तोडला. आता आधुनिक काळात नव्यानेच जन्म घेतलेल्या या संस्कृतीला स्वतःची मिथकं आणि कथनं निर्माण करायची होती. सुरुवातीच्या काळात ती गरज जरी 'वेस्टर्न' शैलीतल्या काऊबॉयने भरून काढली असली, तरी २०व्या शतकापर्यंत वयात आलेल्या अमेरिकेला आपल्या सामर्थ्य आणि आदर्शांना दर्शवणारा म्हणून खरा हिरो मिळाला, तो १९३५ला सुपरमॅन मध्ये. तिथून पुढे सुपरहिरो आणि कॉमिक्स यांनी अमेरिकन समाजमनाच्या कथनात मिथकांची भूमिका पार पाडली.      

१९४० नंतरच्या अमेरिकेत, या सलग निर्माण होत जाणाऱ्या मिथकांमध्ये नाझी जर्मनी आणि लाल सोव्हियत शक्ती, यांची छटा उमटू लागली. व्हिलन म्हणून हिटलर, सोव्हियत केजीबी एजंट आणि 'असभ्य' 'रानटी' आशियाई किंवा आफ्रिकन व्हिलन दिसू लागले. स्टॅन ली त्या अर्थाने अमेरिकन मूल्य उराशी ठाम असतानाही वेगळा विचार करणारा होता. त्याने निर्माण केलेली कॉमिक पात्रं ही बहुतांश अमेरिकेच्या अंतर्मनाला, अमेरिकेच्या अंतर्गत परिस्थितीला भिडणारी होती. त्याचा स्पायडरमॅन अमेरिकन तरुणाईत वाढणारा एक अभ्यासू, शांत, एकाकी  तरुण होता, ज्याच्यावर एका अपघाताने अचाट शक्ती सोपवली जाते आणि ती शक्ती स्वार्थासाठी वापरायची की तिच्यातून मोठा काही अर्थ आणि उद्दिष्ट शोधायचं, या द्वंद्वात त्याचं पात्र घुसमटत राहतं. 

spiderman1

त्याच्या एक्स-मेन मधून तेव्हाच्या अमेरिकेत असलेल्या वांशिक हिंसा आणि वर्णभेदाला रूपक मिळतं. एखाद्या समाजात मुख्य प्रवाहात जे 'साधारण', 'सर्वमान्य' असतं, त्याहून वेगळं असणाऱ्यांना कशाप्रकारची हिंसा, परात्मभाव आणि अपमानास्पद वागणूक भोगावी लागते, हे एक्स-मेन मधून वारंवार दिसत राहतं. जनुकीय बदल झाल्यामुळे काहीतरी अलौकिक शक्ती किंवा क्षमता मिळालेले म्युटंट्स हे कृष्णवर्णीय, समलैंगिक, मनोरुग्ण, परदेशी निर्वासित, या सर्वांचं प्रतिबिंब होतं. स्टॅन लीच्या कॉमिक्स पात्रांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर वेळोवेळी भाष्य केलं. मात्र त्याचा कॅप्टन अमेरिका पुन्हा अमेरिकन साम्राज्यवादाचं बोधचिन्ह बनला. एका अर्थानं हे अमेरिकन उदारमतवादी चळवळीचं द्योतकंच आहे कि अंतर्गत विषयात त्यांचं असलेलं सामंजस्य त्यांच्या देशाच्या साम्राज्यवादाला समजून घेण्यास कमी पडतं. 

प्रतिस्पर्धी डीसी कॉमिक्स समोर, स्टॅन ली ने मार्व्हलचं मोठं साम्राज्य उभं केलं. जगातले सर्वात मोठे सुपरहिरो डीसीचे होते. सुपरमॅन, बॅटमॅन, फ्लॅश, वंडर वुमन आणि शेकडो इतर. मात्र डीसीच्या कथा एका काल्पनिक पृथ्वीवर, काल्पनिक शहरात घडायच्या. मार्व्हलच्या सर्व कथा मात्र अमेरिकेतल्या खऱ्या खुऱ्या शहरांमध्ये घडायच्या. मार्व्हलचे हिरो हे सामान्य अमेरिकन व्यक्तीच्या भावविश्वाला ओळखीचा वाटणारा चेहरा होते आणि आहेत. अमेरिकन इथॉस कोळून प्यायल्यामुळे मार्व्हलचे हिरो आजही डीसीच्या हिरोंपेक्षा अमेरिकन वाचकांना जवळचे वाटत राहिले आणि याचं सर्व श्रेय स्टॅन ली चं आहे. त्यानं आपण निर्माण केलेल्या कथांमध्ये स्वतःचं खरंखुरं पात्रही आणलं आणि अनामिक कलाकारांपेक्षा वेगळा म्हणून कॉमिक्स इंडस्ट्रीचा चेहरा म्हणून स्टॅन ली ने घरोघरी स्थान मिळवलं.   

 

xmen

 

मात्र स्टॅन ली इतका मोठा होता, की मोठ्या वृक्षाखाली छोट्या रोपाचं होतं, तसं काहीस त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांचं झालं. त्याच्या काकाची कंपनी सोडून गेलेला जॅक कर्बी, हा खरंतर स्पायडरमॅन पासून ते मार्व्हलच्या सर्व मोठ्या हिरोझचा निर्माता किंवा सहनिर्माता. मात्र त्याला त्याच कलाकार म्हणूनचं वेतन सोडून क्वचितच काही मिळालं. ना स्टॅन ली इतकी संपत्ती, ना त्याच्याइतकी प्रसिद्धी. कर्बीच्या नशिबी इतकं दुर्लक्ष आलं, की शेवटी त्याने कोर्टात फिर्याद मागितल्यावर नुकतंच २०१४ साली त्याचं नाव स्टॅन ली सोबत या पात्रांचा निर्माता म्हणून जोडलं जाऊ लागलं आणि त्याला एक विशिष्ट रक्कम देऊन मार्व्हलने तो विषय निकाली काढला. 

स्टॅन ली, इतर कॉमिक कलाकारांप्रमाणे नव्हता. त्यानं कल्पनांचं एक महाकाय विश्व निर्माण केलं ज्यात अणू इतका छोटा होऊ शकणार अँट मॅनही होता आणि अख्खी पृथ्वी गिळू शकणारा गॅलॅक्टसही. या पात्रांना त्याने चमत्कारी शक्तीच नाही तर मातीचे पायही दिले. त्याची पात्रं अद्भुत होती, चमत्कारी शक्ती असलेली होती, मात्र ती मानवी मर्यादांनी सीमित आयुष्य जगात होती. स्टॅन ली त्याच्या पत्रांतून वेगळा नव्हताच. तो अचाट आयुष्य जगला, एखाद्या सुपरहिरोला लाजवेल अशा ऊर्जेने आणि चौकस वृत्तीने. मात्र मानवी शरीराच्या मर्यादेने त्याच्या शरीराला दमवलं, आणि १२ नोव्हेंबरला त्याच्या राहत्या घरी स्टॅन जगाला आपल्या पात्रांच्या भरवशावर सोडून पॅरलल युनिव्हर्समध्ये पुढच्या साहसकथेच्या शोधात निघून गेला. अल विदा, स्टॅन!  


एक्सेलसीयर!