Americas

सेरेनाचा उद्रेक

लिंगभेद की अखिलाडू वृत्ती?

Credit : Sporting News

टेनिस! आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मोठा चाहता वर्ग असणारा खेळ. त्यामुळे टेनिसचे सामने, जय-पराजय, खेळाडू, खेळाडूंचं खासगी आयुष्य या सगळ्याच गोष्टी कायम चर्चेचा विषय असतात. नुकताच पार पडलेला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना चांगलाच गाजला. जपानच्या नेओमी ओसाका हिने जपानच्या इतिहासातलं पाहिलं 'ग्रँडस्लॅम' पदरात पाडून आपलं नाव सोनेरी अक्षरांनी कोरलं. पण या ऐतिहासिक प्रसंगी ओसकाच्या विजयापेक्षा जास्त चर्चा झाली ती अमेरिकेची  दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या नाट्यमय नाराजीची. भर कोर्टवर सेरेनानं पंचांना खोटारडे आणि 'चोर' संबोधलं. इतकंच नाही तर रॅकेट जोरात टेनिस कोर्टवर आपटलं आणि पराभवानंतर काहीशा नाराजीतच तिनं मनोगत व्यक्त केलं. सेरेनाच्या या कृत्यामुळे महिला एकेरीचा अंतिम सामना चर्चेत राहिला. जपानच्या नेओमी ओसाकाने अमेरिकेच्या या दिग्गज खेळाडूला पराभूत करून पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर केले. महिला टेनिसविश्‍वात जिचं नाव आदरानं घेतलं जातं त्या सेरेनानं भर कोर्टवर दाखवलेल्या अखिलाडू वृत्तीमुळे, हा सामना होऊन काही दिवस उलटले असले तरी चर्चा मात्र सुरूच आहे.

सेरेनाचे प्रशिक्षक मुरातोग्लू ‘बॉक्‍स’मधून खुनवून तिला ‘नेटजवळ येऊन खेळ’ असा सल्ला देत होते. त्याकडे सेरेनाचं लक्ष नव्हतं असं म्हटलं गेलं. तरीसुद्धा हा प्रकार लक्षात आल्यावर सामन्याचे पंच कार्लोस रामॉस यांनी सेरेनाला नियमभंगाच्या आरोपाखाली दंड ठोठावला. त्यावर भडकलेल्या सेरेनानं "मी चीटिंग करत नाही, त्यापेक्षा मी हरणं पसंत करेन" असं म्हणत हुज्जत तर घातलीच पण  "तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस, तू खोटारडा आहेस आणि इथुन पुढे तू माझ्या एकाही मॅचला पंच म्हणून राहायचं नाहीस" अशा कटू शब्दात आपला राग सुदधा व्यक्त केला. तिच्या अशा वागण्याची शिक्षा म्हणून पंचांनी ओसाकाला एक पॉईंट दिला. एव्हाना आपण मॅच आणि अर्थातच विजेतेपद देखील हरणार आहोत हे तिच्या लक्षात आल्यावर, दुसऱ्या सेट मध्ये सेरेना प्रचंड संतापली आणि तिनं पंचांना थेट "तुम्ही चोर आणि खोटारडे आहात, इतकंच नाही तर तुम्ही लिंगभेद मानणारे आहात. तुम्ही माझी माफी मागायला हवी" असे बोल ऐकवले. मध्ये तिनं आपलं रॅकेट कोर्टवर आपटून तोडलं. इतकंच काय तर सामना संपल्यानंतर तिनं मुख्य पंच कार्लोस रामॉस यांच्याशी हस्तांदोलन करणं सुद्धा टाळलं. एकाच सामन्यात तिला नियमभंचा दंड, एका गुणाची कपात आणि सामन्यातील मानधनाचा दंड अशा तीन दंडांना सामोरं जावं लागलं. तिच्या वर्तणुकीसाठी टेनिस संघाकडून सेरेनाला जवळपास १७ हजार डॉलर इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मुलगी 'ऑलम्पिया'च्या जन्मानंतर सेरेना दुसऱ्यांदा  ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. अमेरिकन ओपन स्पर्धेत जर सेरेनानं जेतेपद मिळवलं असतं तर, ऑस्ट्रेलियाचे महान टेनिसपटू मार्गरेट कोर्ट यांच्या २४ ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदाशी बरोबरी करण्याची सुवर्ण संधी सेरेनाला होती. सेरेना विल्यम्सला जगभरात एका आदर्शवत व्यक्‍तीचा मान दिला जातो. तिनं मुल झाल्यानंतर वयाच्या पस्तिशीत सुद्धा जिद्दीनं टेनिस कोर्ट मध्ये उतरून आपली खेळाची छाप कायम ठेवली आहे. या गोष्टीसाठी तिच्यावर अनेकदा कौतुकाचा वर्षाव होतो. लिंगभेद, वर्णभेद अशा सर्व अडथळ्यांवर मात करत तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण केलीये. अशा व्यक्तीकडून अशी वागणुक नक्कीच आक्षेपार्ह वाटते. या टेनिस स्पर्धेदरम्यान झालेल्या सर्व प्रकारावर संमिश्र प्रतिक्रीया बघायला मिळत आहेत. काही ठिकाणी सेरेनाच्या अशा अखिलाडू वृत्तीवर टीका केली जातेय तर काही ठिकाणी तिचं हे वागणं नाहक नव्हतं अस म्हटलं जातंय.  

खेळांमध्ये पंचांशी होणाऱ्या खेळाडूंच्या हुज्जती नवीन नाहीत. म्हणूनच सेरेनानं केलेली 'चूक' एखाद्या पुरुष खेळाडूनं केली असती, तर त्यांला सुद्धा अशीच वागणूक मिळाली असती का? असा सवाल देखील केला जातोय. तसंच कोर्टाच्या बाहेर बसून खेळाडूंना सूचना करणारे प्रशिक्षक जवळपास सर्वच लहान-मोठ्या लढतींच्या वेळी दिसून येतात. सेरेनाच्या वेळीच इतकी शिस्त दाखविण्यात अली हे देखील काहींना पचलेलं नाही. सेरेनाच्या प्रशिक्षक पॅट्रिक, संघाला झालेल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की,''मी तिला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत होतो मात्र तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. ओसाकाचे प्रशिक्षकही तिला मार्गदर्शन करत होते. सगळेच प्रशिक्षक हे करतात" त्यांचा हा मुद्दा कितपत स्विकारहार्य आहे ते संघच ठरवेल.

पंच कार्लोस रॅमोस कडक शिस्तीचे पंच म्हणून ख्यातनाम आहेत. पण बऱ्याच सामन्यांमध्ये प्रशिक्षकांचा हस्तक्षेप हा नियमांचा भंग असला तरी याकडे बहुतेक पंचमंडळी दुर्लक्ष करतात. माजी टेनिस जगज्जेत्या बिली जीन किंग सुद्धा यावेळी सेरेनाच्या समर्थनार्थ धावून आल्या. ‘महिला खेळाडू वाद घालतात, तेव्हा त्या उर्मट आणि उद्दाम असतात, पुरुष खेळाडू मात्र नेहमीच स्पष्टवक्‍ते किंवा परखड असतात!’ अशा आशयाचं एक उपरोधक ट्विट त्यांनी सामन्यानंतर केलेलं पाहायला मिळालं.

 

 

इतरही अनेक आजी-माजी खेळाडूंनी सेरेनाचा संताप अकारण नसल्याचं मत व्यक्‍त केलं. सेरेनानं कायम तिची योग्यता सिद्ध केली आहे. प्रचंड ताकद, स्टॅमिना आणि जबरदस्त लढाऊ वृत्ती ही तिची ओळख समजली जाते. खेळात सर्वोत्तम असल्याचा सन्मान मिळवण्यासाठी जे लागतं ते सर्व करून ती इथपर्यंत पोहचली. सातत्यानं मिळणाऱ्या या सगळ्या  विजयाची साथ लाभल्यानं कायम तिच्या आजूबाजूला एक प्रकारच वलय राहिलंय. असं असलं तरीही भक्कम शरीरयष्टी, चेंडू आला की विचार न करता कसाही धोपटणं, शॉट मारताना जोरात ओरडणं आणि राग या गोष्टी सुदधा सेरेनाला इतरांपेक्षा वेगळं करतात. कोर्टवर संताप दाखवण्याची ही तिची पहिली वेळ नव्हती मात्र नेहमी मिळणाऱ्या यशामुळे बहुतेक तिचं असं वागणं दुर्लक्षित होत गेलं. मागे एकदा सेरेनानं पाय रेषेबाहेर पडल्यावर बॉलगर्लनं हिची चूक निदर्शनास आणून दिल्यावर त्या मुलीसोबत वाद घातला होता. आकांडतांडव करत "तो चेंडू तुझ्या घशात कोंबेन" अशी धमकी सेरेनानं त्या मुलीला दिली होती.

चार दिवसांपासून चालू असलेल्या या चर्चेत एका नव्या मुद्द्यानं मान वर काढलीये आणि तो म्हणजे, व्यंगचित्रकार मार्क नाईट यांनी काढलेलं सेरेनाच्या वर्तनावर भाष्य करणारं खोचक व्यंगचित्र. त्यावर सेरेनाचे चाहते प्रचंड संतापले आहेत. अनेकांनी व्यंगचित्रकार नाईट यांना सोशल मीडियावर जाब विचारला. ऑस्ट्रेलियातील 'हेराल्ड सन' या वृत्तपत्रात सोमवारी नाईट यांनी काढलेलं हे व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं. या व्यंगचित्रात रागात असलेल्या सेरेनाला तुटलेल्या रॅकेटवर उडी मारताना दाखवण्यात आलं होतं. यावेळी सेरेनाच्या चेहऱ्यावर भावना दाखवताना अतिशयोक्ती केल्याचा आणि वंशभेद केल्याचा आरोप तिच्या चाहत्यांनी केला.