Quick Reads

बाईच्या ‘पुरुषी’ असण्याचा खेळखंडोबा

छद्म-विज्ञानाच्या आधारावर सुरू असलेल्या या भेदभावातील अंतर्विरोध समजून घ्यायला हवा

Credit : Reuters

जेंडर स्टडीज (लैंगिकता) या विषयावर गेल्या पन्नास वर्षांत जेवढा अभ्यास झालाय तेवढा खचितच दुसऱ्या कोणत्या कालखंडात झाला असेल. या अभ्यासातून जे जे निष्कर्ष समोर येत गेले तसे तसे लैंगिकतेविषयी आपल्या असलेल्या पूर्वग्रहांना धक्का बसत गेला. लैंगिकता ही फक्त स्त्री आणि पुरुष या बायनरीपुरती सीमित नाही, हे कळून आता एक काळ लोटला आहे. स्त्री आणि पुरुष या पासून सुरू झालेला हा जेंडरचा गुंता वरचेवर क्लिष्टच होत गेला. तो इतका की साधारण जेंडरच्या इतक्या इतक्या शक्यता आहेत, असा दावा जगातील कोणतीही व्यक्ती ठामपणे करू शकत नाही.

यालाच पाठबळ देणारं एक रंजक उदाहरण म्हणून आपल्याला फेसबुककडे बघता येईल. फेसबुकर जर तुम्ही नवीन अकाउंट उघडायला गेलात तर फेसबुक तुम्हाला जेंडर च्या कॉलम मध्ये पुरुष आणि स्त्री याशिवाय एकूण ५० पर्याय देतं आणि त्यातला ५१ वा पर्याय आहे इतर! यातून जेंडरला (लिंगभावाला) कॅटेगरीमध्ये कैद करण्याचा आपला अट्टाहास किती तोकडा आणि निष्फळ आहे हे प्रकर्षानं समोर येतं.

जेंडरच्या रोज नवनवीन शक्यता जन्म घेण्याच्या काळातच त्याकडे पुन्हा बायनरीतूनच बघण्याच्या विचित्र अनिवार्यतेनं आपण सगळेच वेढले गेलेले आहोत. सगळ्या खेळांकडे त्याचे एक ठळक उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येईल. याच अनिवार्यतेतून जवळपास प्रत्येक खेळामध्ये पुरुष आणि स्त्रियांचे वेगवेगळे संघ पाडले जातात. यातून समोर येणारे अंतर्विरोध आणि प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी क्रीडारसिक म्हणून आपण बांधील नसलो तरी या जेंडर स्टरियोटाइपचा सामना आजपर्यंत कित्येक खेळाडूंना करावा लागला आहे. कल्पना करा की एक व्यक्ती स्त्री म्हणून जन्माला आलीये आणि वयाच्या विसाव्या वर्षी पर्यंत स्त्री म्हणून वाढवली गेलीये. अचानक एके दिवशी त्या व्यक्तिला ती स्त्रीच असल्याचं सिद्ध करावं लागतं. तेही अशा कसोटीवर जी तिला अगदीच नवीन आहे.

प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असलेल्या ऑलम्पिकमध्ये महिला खेळाडूंना त्या स्त्री असल्याच्या कसोटीवर उतरावं लागतं. जेंडर स्टडीजच्या अभ्यासातून समाज म्हणून आपण या निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की कुठलीही व्यक्ती पूर्ण पुरुष अथवा पूर्ण स्त्री नसते. तरीही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना IAAF (International Association of Athletics)ने आखलेल्या स्त्रीत्वाच्या कसोटीवर खरं उतरावं लागतं. डोपिंग टेस्ट विषयी क्रीडारसिक म्हणून आपण सगळेच जागरूक असतो. पण खेळाडूंची (महिला खेळाडूंची) जेंडर टेस्ट असाही काहीतरी झांगडगुत्ता असतो, हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. एवढंच काय स्वतः ऑलम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंनाही तिथे जाईपर्यंत जेंडर टेस्ट असा प्रकार असतो, हे माहीत नसतं. बऱ्याचदा तर डोपिंग टेस्टच्या नावाखाली त्यांची जेंडर टेस्ट घेतली जाते.

या जेंडर टेस्टनं रूढार्थानं स्त्री नसणाऱ्या, स्त्री-पुरुष या जेंडर बायनरीत न बसणाऱ्या इतकंच नव्हे तर पूर्ण स्त्री असणाऱ्या खेळाडूंचं देखील करिअरच नव्हे तर आयुष्य बरबाद झाल्याच्या अनेक कथा आहेत. याची पुन्हा आत्ता चर्चा होण्याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेची स्टार अॅथलिट कास्टर सेमेन्या.

२०१६ रिओ ऑलिम्पिकमधील ८०० मीटर शर्यतीची सुवर्णपदक विजेती ही महिला अॅथलीट तिच्या पुरुषीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जेंडर टेस्टची ही भानगड, त्यामुळे पणाला लागलेली अनेक खेळाडूंची कारकीर्द याकडे नजर टाकण्यापूर्वी खेळ, त्यातली स्पर्धात्मकता आणि त्यातून होणारा जेंडर रिलेशन्स शिरकाव या निमित्तानं समजावून घेऊ.

खेळ, खरंतर ऑलम्पिक मधलेही क्रीडाप्रकार, हे प्रामुख्यानं पुरुषांसाठीच बनले होते. त्यामुळे सर्व खेळांची रुपरेषा ही पुरुषांना समोर ठेवूनच आखण्यात आली होती. पुरुषांचीच सद्दी असल्याकारणानं सहाजिकच जेंडर चाचणी वगैरे काही भानगड नव्हती. सुमारे शंभर वर्षांपूर्वी महिलासुद्धा क्रीडाप्रकारात भाग घेऊ लागल्या. स्त्री पुरुष समानता, महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी या तत्त्वांमुळे स्त्रियांनाही क्रीडा क्षेत्रात वाव मिळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड मत-मतांतरे झाली. क्रीडा क्षेत्रात महिलांच्या प्रवेशाला विरोध करणार्‍यांचं लॉजिक असं होतं की, पुरुषांचे खेळ आणि अति व्यायामामुळे स्त्रियासुद्धा पुरुषांसारख्या दिसू लागतील. पुरुषांना त्यांच्या विषयी आकर्षण वाटणार नाही. पर्यायानं त्यांची उपयुक्तता कमी होईल. दुसऱ्या बाजूला स्त्रियांनाही खेळण्याचा अधिकार असावा. या निमित्ताने स्त्रीमुक्तीची नवीन मार्ग खुले होतील, असे म्हणणारे होते. अखेर या वादातून मार्ग काढत सर्व क्रीडा प्रकारांमध्ये महिलांनाही प्रवेश मिळाला. मात्र इथे समस्या संपली नाही तर सुरू झाली.

शारीरिक दृष्ट्या स्त्रियांच्या शरीराची रचना पुरुषांपेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. त्यामुळे अॅथलेटिक्ससारख्या शारीरिक श्रमाच्या खेळांमध्ये स्त्रिया तशाच तरबेज पुरुष  खेळाडूंशी स्पर्धा करू शकत नाहीत. उदाहरणार्थ १०० मीटर धावण्याची शर्यत हा अॅथलेटिक्‍समधील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. तर याचा पुरुषांच्या गटातील जागतिक विक्रम आहे ९.५८ सेकंद (जमैकाचा उसेन बोल्ट) आणि स्त्रियांच्या गटातील आहे १०.४९ (अमेरिकेची फ्लॉरेन्स ग्रिफिथ). दोन्हींमध्ये जवळपास एक सेकंद म्हणजे तुलनेने मोठे अंतर आहे. त्यामुळे अॅथलेटिक्समध्ये पुरुष स्त्रियांपेक्षा वरचढ ठरतात. यामुळे जवळपास सर्व खेळांमध्ये स्त्री आणि पुरुषांची स्पर्धा वेगळी भरवली जाते. आता यात स्त्री पुरुष असं विभाजन सरळ सोपं असताना जेंडर टेस्टची आवश्यकता वाटू लागली याचं कारण मोठं रंजक आहे.

१९५०-६० च्या दशकात भरवल्या गेलेल्या ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या महिला अॅथलिट्सनी भरभरून पदकं मिळवली. यानंतर रशिया आणि इतर कम्युनिस्ट देश त्यांच्या पुरुष खेळाडूंना महिला खेळाडू म्हणून मैदानात उतरवत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली. अर्थात हे काय सिद्ध होऊ शकलं नाही. पण अशा शंका-कुशंकांमुळे महिलांसाठी जेंडर चाचणी वरचेवर अनिवार्य आणि कडक करण्यात आली. ऑलिम्पिकच्या इतिहासात जेंडर फ्रॉड म्हणता येईल असं फक्त एकच उदाहरण समोर आलंय. १९३८ साली जर्मनीची हाय जंपर डोरा राजटेन जी युरोपियन चॅम्पियन होती नंतर ऑलम्पिक मध्ये चौथ्या क्रमांकावर आली. ती मुळात पुरुष असल्याचं समोर आल्याने त्यावेळी खळबळ उडाली होती. त्यावेळच्या नाझी राजवटीनं मला स्त्री म्हणून स्पर्धेत भाग घेण्यास सांगितल्याचा खुलासा तिने काही वर्षानंतर केला. या प्रकरणामुळे जर्मनीची नाचक्की झाली आणि त्यात त्यांना पदक परत करावं लागलं.

या एका प्रकरणामुळे क्रीडा क्षेत्रात देखील स्त्रीच्या लैंगिकतेवर कडा पहारा सुरू झाला तो कायमचाच. यानंतर स्त्री असूनही सरस कामगिरी करणाऱ्या, विक्रमाच्या पातळीवर पुरुषांशी बरोबरी करायला निघालेल्या प्रत्येक महिला खेळाडूकडे शंकेनं पाहिलं जाऊ लागलं. यातून लैंगिकतेच्या चाचण्या वरचेवर जाचक होऊ लागल्या. ६० च्या दशकात तर ऑलिम्पिक समितीनं महिला खेळाडूंची नग्न परेड करायला लावून चाचणी घेतली. त्यानंतर या चाचण्या थोड्या वैज्ञानिक आणि सौम्य पद्धतीने होऊ लागल्या. मात्र तरीही बाईला तिचं बाईपण सिद्ध करावं लागण्याची कुचंबणा ही सुरूच राहिली.

जशी जशी ही जेंडर चाचणी विज्ञानाच्या परिघात आणण्याचा प्रयत्न होऊ लागला तशा तशा नवीन समस्यांनी तोंड वर काढायला सुरुवात केली. मुळात जेंडरला (लैंगिकतेला) विज्ञानाच्या परिघात आणण्याचा IAAF चा प्रयत्न किती तोकडा आहे आणि होता हे आणखी एक स्पॅनिश महिला ॲथलिट मारिया जांसे मार्टिनेझ पॅटॉओच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येईल.

१९८५ च्या जपानमधील वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सच्या आदल्या रात्री मारियाच्या टेस्टचे रिझल्ट अॅबनॉर्मल आले. त्यावेळी जेंटर टेस्टसाठी IAAF क्रोमोझोम चाचणी घ्यायचं. बहुतांश वेळा पुरुषांमध्ये XY आणि महिलांमध्ये XX क्रोमोझोम्स असतात. पण तसं काही गरजेचं नाही. मात्र लिंग चाचणीसाठी क्रोमोझोम एके क्रोमोझोम करणाऱ्या IAAF नं मार्टिनाला तू स्त्रीच नसल्याचं सांगितलं. त्याचं झालं असं की, मार्टिनामध्ये इतर महिलांप्रमाणं XX ऐवजी XY क्रोमोझोम होते. शरीरानं, मनानं पूर्णपणे स्त्री असलेली मार्टिना एका क्रोमोझोम रिपोर्टनं आचानक पुरुष ठरली. तिला मग इन्जुरीचं कारण देऊन स्पर्धेतून माघार घ्या, असं सांगण्यात आलं. पण मार्टिनने फेडरेशनचं म्हणणं जुमानलं नाही. ती दुसऱ्या दिवशी ट्रॅकवर धावली आणि जिंकलीसुद्धा! तिच्या जेंडर टेस्टचा रिपोर्ट सार्वजनिक झाला आणि एकच वादळ उठलं. मार्टिनाची राष्ट्रीय टीममधून हकालपट्टी करण्यात आली. क्रीडाक्षेत्रात सगळीकडून नाचक्की आणि कुचंबनेसोबतच तिच्या मित्रांनी एवढंच काय बॉयफ्रेंडनेसुद्धा तिच्यावर बहिष्कार टाकला.

१९८३ ला जेंडर टेस्ट मध्ये पास ठरले तर दोन वर्षांनी अचानक पुरुष कसंकाय ठरवता, असा सवाल करत मार्टिनांने या बंदीविरुद्ध आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीत धाव घेतली. चौकशीनंतर मार्टिनामध्ये जेनेटिक म्युटेशन झाल्याचं समोर आलं. पुरुषांसारखे XY क्रोमोझोम सेट असूनही त्यातून तयार होणाऱ्या टेस्टेस्टेरॉन या मेल हार्मोनचा मार्टिनाच्या शरीरावर काहीएक परिणाम होत नसल्याचं सिद्ध झालं. त्यातून मग IAAF ची जेंडर टेस्ट आणि त्याभोवती असलेल्या विज्ञानाच्या विळख्याचा फोलपणा सर्वांसमोर आला. मार्टिनावरील बंदी उठवण्यात आली. तिची सर्व पदकं तिला सन्मानाने परत देण्यात आली.

पण स्वत:च्या अस्तित्तावरच शंका उठवल्यानं मानसिक आणि शारिरीकरित्या खचलेली मार्टिना १९९२ च्या स्पर्धेत तिच्या आवडत्या ६० मीटर हर्डल्स शर्यतीच्या पात्रता फेरीतच गारद झाली. IAAF च्या लिंगभेदी विज्ञानावर आधारलेल्या चाचणीविरुद्ध लढा देऊन जिंकणारी मार्टिना ही पहिली अॅथलिट ठरली. पण दुर्दैवानं या लढाईत ती तिची ऑलम्पिकसारख्या स्पर्धेत जिंकण्याचीच काय पात्र ठरण्याची क्षमता गमावून बसली होती.

मार्टिनाच्या अगोदर आणि नंतरही कित्येक जेनेटिकली अॅबनॉर्मल महिला खेळाडूंना हा अन्याय सहन करावा लागला. पण बदनामीच्या भीतीने दुखापतीचं कारण देत अथलेटिक्सलाच रामराम ठोकणाऱ्या महिलांची संख्या किती आहे, हे कोणीही सांगू शकणार नाही. मार्टिनाच्या वेळी IAAF ची क्रोमोझोन वर आधारित ते सध्याची टेस्टेस्टेरॉनच्या पातळीवरून लिंग ठरवण्याची जेंडर टेस्ट मुळातच स्त्री आणि पुरुषांबाबत विज्ञान आणि गोऱ्या लोकांच्या पुर्वग्रहावर आधारित आहे. ते कसं हे समजून घेण्यासाठी IAAF सध्या राबवत असलेल्या टेस्टेस्टेरॉन चाचणीवर नजर टाकुयात.

मानवी शरीरात टेस्टेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोन्ही हार्मोन्स कमीअधिक प्रमाणात असतात. आता यातील टेस्टेस्टेरॉन हा हार्मोन साधारणतः पुरुषांमध्ये जास्त तर इस्ट्रोजन हे हार्मोन स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतं. यावरून टेस्टेस्टेरॉनला मेल हार्मोन आणि इस्ट्रोजेनला फिमेल हार्मोन समजण्याची गल्लत विज्ञानातही केली जाते. IAAF ची सध्याची जेंडर टेस्ट याच विज्ञानावर आधारलेली आहे. साधारण महिलांच्या शरीरातील रक्तातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण पर लिटर ०.५२-२.४३ नॅनोमोल्स एवढं असतं तर हेच प्रमाण पुरुषांमध्ये १०.४१- ३४.७ नॅनोमोल्स दरम्यान असतं, असं विज्ञान सांगतं. पण या विज्ञानाची विशेषत: जेंडरच्या विज्ञानाची गोची अशी की ते जिथे जन्म घेतं त्याच भागातल्या चष्म्यातून जगातील प्रत्येकाच्या लैंगिकतेकडे पाहतं.

उदाहरणादाखल विज्ञानाच्या पर्यायाने जेंडरच्या विज्ञानाच्या अभ्यासाची सुरुवात ग्लोबल नॉर्थ म्हणवल्या जाणाऱ्या युरोप-अमेरिकेतील विकसित देशांमधून झाली. आता या विकसित देशांमधील स्त्रिया आणि त्यांचं शरीर हेच प्रमाण मानून लैंगिकतेचं पर्यायानं स्त्रीयांचं प्रमाणीकरण होत गेलं. ग्लोबल नॉर्थ मधील विकसित देशांमधील थंड हवामानाच्या प्रदेशातील स्त्रीचं शरीर आणि त्याची वाढ ही विशिष्ट प्रकारची असते. आता याच ग्लोबल नॉर्थमधल्या स्त्रीला प्रमाण मानून जगातील प्रत्येक स्त्रीचं स्त्रीपण जोखलं जाऊ लागलं. त्यातून ग्लोबल साऊथ म्हणवल्या जाणाऱ्या विकसनशील आणि अविकसित देशांच्या डोंगराळ भागातील स्त्रीचं शरीर आणि तिच्या शरीराची होणारी वाढ याकडे शंकेनं पाहिलं जाऊ लागलं.

जनुकीय विविधता ही काही प्रमाणात भौगोलिक परिस्थितीतील बदलांमुळे जन्म घेऊ शकते. त्याला जेंडरशी जोडणं म्हणजे तद्दन फालतूपणा आहे. विज्ञान आणि जेंडरचं एका ठराविक हेतूनं केलं जाणारं प्रमाणीकरण याला वसाहतवादाचं आणखी एक प्रारूप म्हणता येईल. याचा पुरावा म्हणून एक गमतीशीर गोष्ट सांगतो. आत्तापर्यंत IAAF च्या जेंडर टेस्ट मध्ये नापास झालेल्या बहुतांश महिला खेळाडू या ग्लोबल साऊथमधील डोंगराळ भागातून येतात. खरं तर विज्ञान आणि जेंडर स्टडीच्या या वर्णद्वेषी आणि लिंगभेदी दाव्याला आपण सगळेच अलगद बळी पडलो आहोत. यातूनच आफ्रिकेतील व्यायाम, आहार आणि इतर घटकांमुळे मजबूत शरीर कमावलेल्या बायकांना पुरुषी म्हणून हिणवण्याची प्रवृत्ती जन्माला येते.

मुळात लैंगिकतेचं बायनरीत विभाजन करणं मूर्खपणाचं आहे. IAAF च्या याच दोषयुक्त विज्ञानानं आणि बायनरीनं अनेक महिला खेळाडूंनाच काय तर खेळालाच खड्ड्यात घातलं आहे. ८०० मीटर शर्यतीत दोन वेळा ऑलम्पिक, तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कास्टर सेमेन्याचं प्रकरण हे अॅथलेटिक्‍समधील वसाहतवादावर बोट ठेवण्यास पुरेसं आहे.

२०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेती कास्टर सेमेन्या IAAF च्या कारवाईविरोधात पुकारलेल्या बंडामुळे चर्चेत आली आहे. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असल्याचं कारण देत IAAF न तिच्यावर बंदी घातलीय. याविरोधात तिने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आवाज उठवलाय. तिच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी होणं अद्याप बाकी असून यानिमित्तानं ॲथलेटिक्समधलं जेंडर टेस्टचं खूळ पुन्हा एकदा चर्चेत आलंय. २००८ साली वयाच्या अठराव्या वर्षी पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे कास्टर सेमेन्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली. इतर स्पर्धकांच्या तुलनेत आरामात जिंकलेली सेमेन्या तिच्या सहकाऱ्यांपेक्षा वेगळी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली.

महिला अॅथलिट्सप्रमाणं बिकणी सूट न घालता सेमेन्याचं पुरुषांप्रमाणं शॉर्ट्स घालून ट्रॅकवर उतरणं, स्त्रीसुलभ नाजूक आवाजात न बोलता पुरुषी बोलणं, एवढंच काय तिची स्त्रीसुलभ आकर्षक घेराव नसलेली दणकट शरीरयष्टीसुद्धा अनेकांच्या डोळ्यात खुपू लागली. जेंडर स्टिरीओटाईपचा मागामूस नसलेल्या मुक्त आफ्रिकन वातावरणात वाढलेल्या कास्टरला हे सगळं नवीन होतं. तिला फक्त माहित होतं की आपल्याला धावायचंय आणि वेगात धावायचंय. मात्र, वेगात धावण्याचा आपला हा ध्यास आपल्या स्त्री असण्यावरच सवाल उभा करेल, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.

तिच्या सहकारी स्पर्धकांनी ही स्त्री असू शकत नाही ही पुरुष असल्याचं म्हणत बहिष्कार टाकला. वाढत्या दबावामुळे तिची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्यात तिच्या शरीरात इतर महिलांच्या तुलनेत टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलं. डोपिंग चाचणीनंतर तिच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन हार्मोन नैसर्गिकरित्याच अतिरिक्त प्रमाणात तयार होत असल्याचं सिद्ध झालं.  IAAF नं नंतर सेमेन्यासमोर दोन पर्याय ठेवले. एक तर औषधं घेऊन किंवा शस्त्रक्रियेने शरीरातील टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण कृत्रिमरीत्या कमी करणं किंवा मग धावणंच सोडून देणं.

हे दोन्ही पर्याय नाकारत सेमेन्यानं बंड पुकारलं. कृत्रिमरित्या टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण प्रमाण कमी केल्याने माझ्या शरीरावर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात आणि असं करायला लावणं माझ्या मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हणत तिने अंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. हा खटला अजून सुरू असून या खटल्याच्या निकालानं केवळ सेमेन्याचं नशीबच नव्हे तर अॅथलेटिक्‍समधील जेंडर रिलेशन्शच्या राजकारणालाच वेगळं वळण लागलं लागू शकतं.

विशेष म्हणजे टेस्टेस्टेरॉन कमी करायला लावणाऱ्या IAAF ला टेस्टेस्टेरॉनचं अतिरिक्त प्रमाण वेगानं धावण्यासाठी खेळाडूंना मदत करू शकतं, हे आजतागायत सिद्ध करता आलेलं नाही. तरीही शस्त्रक्रिया करून स्त्रियांच्या शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा IAAF चा अट्टाहास म्हणजे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धा करू शकत नाहीत आणि स्स्त्रियांनी तो प्रयत्नही करू नये हा मी मघाशी सांगितलेल्या गृहीतकाचं द्योतक आहे. कास्टर सेमेन्याच्या संघर्षाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी Too fast to be a woman - The story of caster semenya अशा नावाची डॉक्युमेंटरी जरूर पहा. यु ट्यूब वरती फुकट उपलब्ध आहे.

कास्टर सेमेन्या सारख्या खेळाडूंवर आम्ही लादलेली बंधनं हे त्यांच्या लैंगिकतेवरील आक्रमण नसून सर्व खेळाडूंसाठी लेव्हल प्लेइंग फील्ड (समान संधी) तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा IAAF चा दावा भयानक विनोदी म्हणता येईल, असा आहे. मुळात ॲथलेटिक्स, ऑलिम्पिकमध्ये समान संधी तयार करण्याचा प्रयत्नच मूर्खपणाचा आहे. अथलेटिक्सच्या सर्व प्रकारातील ऑलम्पिक विजेते हे जेवढे सर्वसामान्यांच्या तुलनेत मेहनती असतात तेवढेच जेनेटिकली, शारीरिकदृष्ट्या निसर्गदत्त उजवेसुद्धा. ‘जगातील सर्वात वेगवान मनुष्य’ अशी बिरुदावली मिळवण्यामागे उसेन बोल्टचे जेवढे कष्ट आहेत त्याहीपेक्षा मोठा रोल त्याला नैसर्गिकरित्या मिळालेल्या शरीररचनेचा आहे.

आतापर्यंतच्या इतिहासात उसेन बोल्टला किंबहुना कोणत्याच पुरुष खेळाडूला तुझ्यातलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण इतरांच्या तुलनेत जास्त आहे म्हणून अडवण्यात आलेलं नाही. इथं उसेन बोल्टचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. उसेन बोल्टला एकदा एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारला की तू ८०० मीटर शर्यतीतही का भाग घेत नाहीस? त्यावर बोल्ट उत्तरला की, लांब पल्ल्याच्या शर्यतीसाठी माझं शरीर अनुकूल नाही. ८०० मीटर मध्ये मी भाग घेतला तर मला पुरुषच काय महिला खेळाडू देखील आरामात हरवतील! यावरती ती पत्रकार म्हणाली की या उत्तराने तू अडचणीत येऊ शकतोस याची तुला कल्पना आहे का? बोल्ड शांतपणे पण हसत म्हणाला की पण हे खरं आहे यात वाद नाही.

अमेरिकेचा विश्‍वविक्रमी जलतरणपटू मायकल फेल्प्सचं शरीर माणसासारखं कमी पाण्यात पोहणार्‍या माशासारखं जास्त आहे, ही गोष्ट उलट अमेरिका पर्यायाने जगच आक्षेप घेण्याऐवजी सेलिब्रेट करतं.  सचिन तेंडुलकरला बॅटिंगसाठी आवश्यक असणाऱ्या Hand-eye coordination ची दैवी देणगी आहे याचं आपल्याला भारी कौतुक असतं. या खेळाडूंचं आपल्याला कौतुक असण्यात काहीएक गैर नाही. कारण अनुकूल शरीररचना आणि इतर गुणधर्म लाभणं यात या खेळाडूंचा काही दोष नाही आणि त्यांनी कृत्रिम पद्धतीने औषध अथवाा शस्त्रक्रियेनं ते मिळवलेलं नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत आणि प्रत्येक खेळात आहेत. जगातील प्रत्येक श्रेष्ठ बास्केटबॉलपटू हा उंचीने इतरांपेक्षा अधिक आहे. मॅरेथॉन स्पर्धा गाजवणाऱ्या केनिया आणि इथिओपियन खेळाडूंच्या यशाचं रहस्य त्यांचं कमी ऑक्सिजन असलेल्या उंचावरील प्रदेशात वाढणं हे आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचं अंतर ते इतरांच्या तुलनेत न थकता आरामात कापू शकतात तसेच त्यांचे पायही इतरांच्या तुलनेत लांब आणि सडपातळ असतात.

ईरो मांट्रायन्स या युरोपियन क्रॉस कंट्री स्कायरनं १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये सात पदकं मिळवली ज्यात तीन सुवर्ण पदकांचा समावेश होता. नंतर त्याच्यात जेनेटिक म्युटेशन झालेलं असून त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सर्वसामान्य पातळीपेक्षा तब्बल ५० टक्क्यांनी अधिक असल्याचं सिद्ध झालं. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अधिक असल्यानं धावण्यास मदत होत नाही, झालीच तर ती फक्त एक ते तीन टक्क्यानं होते, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. याउलट अतिरिक्त हिमोग्लोबिनचा इरोला प्रचंड फायदा झाला हे उघड आहे. मात्र त्यावर त्यावेळेसही कोणी आक्षेप घेतला नव्हता आणि आजही कोणी आक्षेप घेणार नाही. आक्षेप फक्त तिसऱ्या जगातील कास्टर सेमेन्यावरच. गोऱ्या लोकांच्या साच्यात न बसणाऱ्या तिच्या शरीरावर किंबहुना तिच्या अस्तित्वावरच का घेतला जातोय? हा प्रश्न विचारणं हे आपलं क्रीडारसिक म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून नैतिक कर्तव्य आहे.

स्वत:च विकसीत केलेल्या विज्ञानाच्या आड लपून पहिलं जग तिसऱ्या जगावर मानवी भावनांचं मुक्त एक्स्प्रेशन म्हणवल्या जाणाऱ्या खेळांमधूनही नव्यानं वसाहतवाद लागतंय का? आपण सर्वांनीच पाश्चिमात्य नव्हे तर स्वतःच्या वैयक्तिक नैतिकतेच्या कसोटीवर हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. हा प्रश्न फक्त सेमेन्या अथवा तिच्यासारख्या खेळाडूंचा नाही तर खेळाकडे खेळ म्हणून पाहण्याचा आहे आणि त्यामध्ये जर ग्लोबल नॉर्थचं लैंगिकतेचं विज्ञान आड येत असेल तर आपण त्या विज्ञानालाही धुडकावून लावलं पाहिजे.

छद्म-विज्ञानाच्या आधारावर सुरू असलेल्या या भेदभावातील अंतर्विरोध समजून घ्यायला हवा. मुळात जेंडर (लैंगिकता) ही हार्मोन्स, क्रोमोझोम, इंटरनल ऑर्गन्स, एक्स्टर्नल ऑर्गन्स, समाज, त्या व्यक्तीला स्वतःची अशी वाटणारी भावना अशा कित्येक घटनांनी आकार घेत असते. यातील कोणते घटक एका ठराविक पद्धतीने जुळले तरच ती व्यक्ती रूढार्थाने स्त्री अथवा पुरुष या बायनरीत मोडते. यातील एक घटक मिसमॅच झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या लैंगिकतेवर किंबहुना त्या व्यक्तीवरच प्रश्नचिन्ह उभारणं ही अतिशय बुरसटलेली वृत्ती आहे.

या विज्ञानाच्या पलीकडे जाऊन जेंडर हे बायोलॉजिकल तथ्य नाही तर आत्मसात करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे ती गोष्ट स्त्री अथवा पुरुष या दोनच पद्धतीने आत्मसात करण्याचा अट्टहास अगदीच चुकीचा आहे. खेळासारख्या प्रकारात आपण सोयीसाठी ही बायनरी स्वीकारलेली आहे. गैरसोय होत असेल तेव्हा ही बायनरी सोडणंच हिताचं आहे. कास्टर सेमेन्याला तिचं बाईपण विचारण्याऐवजी तिच्या टेस्टेस्टेरॉनवर तिचं बाईपण ठरवण्यातला इलिटिसिझ्म आपण ओळखायला हवा. शर्यत जिंकल्यावर जल्लोष करण्याआधी खेळभावनेनं आपल्या हरलेल्या सहकाऱ्यांना स्वत:हून अभिवादन करायला गेलेल्या सेमेन्याचं हस्तांदोलन धुडकावून लावून ट्रॅकवरच तिच्यावर वर्णद्वेषी शेरेबाजी करण्याचा युरोपीयन अमेरिकन खेळाडूंचा माज येतो कुठून, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास IAAF सेमेन्या विरुद्ध वापरत असलेलं विज्ञान आपोआप गळून पडेल.

विज्ञानाचा बडेजाव करणारी हीच लोक जेव्हा तिचे कपडे, तिचा आवाज, तिचं मुक्त आफ्रिकन वागणं-बोलणं, एका महिलेशी लग्न करणं यावर बोलू लागतात तेव्हा या सगळ्यामधली खरी मेख लक्षात येते.

बाकी सर्व जीवशास्त्रीय नैसर्गिक अनुकूलतेकडे डोळेझाक करत IAAF फक्त टेस्टेस्टेरॉनच्या नावानं सेमेन्याला खेळण्यापासून रोखतं तेव्हा त्यांचा युक्तिवाद सेमेन्याविरुद्ध नाही तर युरोपियन अमेरिकन जीवनशैलीशी जोड न खाणाऱ्या अफ्रिकन जीवनशैलीविरुद्ध म्हणजेच वर्णद्वेषी आणि लिंगभेदी असल्याचं स्पष्ट होतं. ESPN ची प्रसिद्ध महिला क्रीडा पत्रकार कॅट फॅगन म्हणते की, ‘सेमेन्या स्त्रीच आहे याची मला पूर्ण खात्री आहे. कारण जग तिच्या शरीरावर नियंत्रण ठेवायला बघतंय!’  गोऱ्या पुरुषांच्या नजरेतून काळ्या महिला खेळाडूंना पुरुषी म्हणून हिणवण्याचा इतिहास मोठा आहे. यापायी कित्येक महिला खेळाडूंना खेळच सोडून द्यायची वेळ आली आहे, हा इतिहास आपण विसरता कामा नये. या सर्व प्रकरणात फक्त सेमेन्यालाच नव्हे तर अफ्रिकन जीनलाच वेगळं पाडण्याचा प्रयत्न होतोय, असं म्हणण्यास वाव आहे.


आपला काय संबंध म्हणणाऱ्यांसाठी खास

Dutee

दूती चंद. सौ- द हिंदू 

एवढं सगळं असूनपण भारतीयांचा याच्याशी काय संबंध म्हणून उतारा करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की खेळातील या जेंडरगुत्त्याची झळ भारतातील महिला खेळाडूंनाही बसलेली आहे. भारताची आघाडीची धावपटू दुती चंद हिच्यावरही ती स्त्री नसून पुरुष असल्याचा आरोप झाला होता ओडिशातील अत्यंत दुर्गम भागातून दरिद्री परिस्थितीवर मात करून भारताची आघाडीची धावपटू बनत यश मिळवलेल्या खेडवळ दुती चंदला जेव्हा तू पुरेशी स्त्री नाही असं सांगण्यात येतं, तेव्हा तिला काय वाटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी.

जेंडर टेस्टमध्ये दुतीला जेव्हा तिच्या शरीरातील टेस्टोस्टोरॉनचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात आलं तेव्हा तिला कळलं की जेंडर टेस्ट अशी काही गोष्ट असते आणि महिला खेळाडूंना त्या महिला असल्याचं सिद्ध करावं लागतं.  हायपरअॅड्रोजेनिझ्म (शरीरात नैसर्गिकरित्या अतिरिक्त प्रमाणात टेस्टेस्टेरॉन तयार होणं) याने काही तिच्या कामगिरीवर परिणाम होत नाही, हे तिच्या वकिलांनी न्यायालयात सिद्ध करून दाखवलं आणि तिच्या वरील बंदी उठवण्यात आली. पण तिची उमेदीची चार वर्ष तिने मी स्त्री असल्याचं सिद्ध करण्यात घालवली.

या सर्व प्रकरणावर तिचं मत फार बोलकं आहे. IAAF जे म्हणतं की, माझ्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त आहे ते कसं आहे हे मला माहीत नाही. पण मी खात्रीने सांगू शकते की यात माझा काही दोष नाही आणि मी स्त्रीच आहे. IAAF ज्या समान संधीबद्दल बोलतंय तो युटोपिया आहे. माझ्यासारखे दारिद्र्यातून आलेली पोरं डॉक्टर, इंजिनिअर होणं परवडत नाही म्हणून गरिबीतून सुटकेचा एकमेव मार्ग म्हणून खेळाकडे पाहतात. त्यामुळे पोषक आहार, महागड्या प्रशिक्षण सुविधा अशा गोष्टी ज्या दुसऱ्या देशातील खेळाडूंना आयत्याच मिळतात त्याचा मी विचारही करू शकत नाही. त्यामुळे IAAF ला अपेक्षित असणाऱ्या समान संधीचा प्रश्नच उद्भवत नाही. टेस्टेस्टेरॉनं जर मला फायदा होत असेल तर श्रीमंत देशातील खेळाडूंना सुरुवातीच्या काळात मिळणारं न्यूट्रिशन, अद्यावत कोचिंग हा फायदा नाहीये का? अॅथलीट कोट्यातून मिळणारे पैसे घरी पाठवता येतील या उद्देशाने धावणारी मी आणि आधुनिक प्रशिक्षणाने ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये IAAF कसा फरक करेल?.

आतापर्यंत शास्त्रज्ञांना खेळाडूंमध्ये २०० प्रकारच्या जैविक वर्चस्वाची लक्षण (Biological advantages) आढळून आलेले आहेत. मात्र, विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत नैसर्गिकरित्या होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे वाढलेल्या टेस्टेस्टेरॉनवरतीच आक्षेप घेणं, याला दुटप्पीपणा नाहीतर दुसरं काय म्हणणार. कास्टर सेमेन्याच्या पाठीमागे किमान तिचा देश तरी खंबीरपणे उभा राहिला. मात्र, फक्त क्रिकेटलाच खेळ समजणाऱ्या भारताकडून तो आधार मिळणं दुतीच्या नशीबात नव्हतं. सुदैवानं कोण्या वकिलांनी तिची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून धरली आणि ती पुन्हा ट्रॅकवर परतू शकली. पण तुमच्या अस्तित्वावरच घाला घालणारी मानहानी आणि कुचंबणा सहन करण्याची ताकद प्रत्येकामध्ये असेलच असं नाही.  

२००६ मध्ये कतार येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावणाऱ्या संथी सौंदराजनच्या संघर्षाची कहाणी मोठी विदारक आहे. तमिळनाडूतील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातून आलेल्या संथीला तिची उभार नसलेली छाती आणि घोगर्‍या  आवाजामुळे लिंगभेदी आणि वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. जेंडर चाचणीत ती नापास झाल्याचे कारण देत तिच्याकडून तिनं कष्टानं मिळवलेली पदकं हिरावून घेण्यात आली. २५ वर्षीय संथीला हा धक्का सहन न झाल्याने तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. सुदैवानं तो तिचा प्रयत्न फसला. पण संथीने या अन्यायाला वैतागून ट्रॅकवर धावणंच सोडून दिलं. असं असलं तरी तिने स्वतःची एक कोचींग अॅकडमी उघडलीय जिथे ती तिच्यासारख्याच नाही रे वर्गातून आलेल्या खेळाडूंना खेळणंच नव्हे तर अशा रेसिस्ट, सेक्सीट वागणुकीलाला तोंड देणं शिकवतेय. भारतीय क्रीडापत्रकारिता आणि क्रीडारसिकांनी खरंच ‘विराटने अनुष्काला केलं फ्लाईंग किस’ या बातमीतून बाहेर येण्याची गरज आहे.