Opinion

पत्रकारितेपुढचे प्रश्न फक्त पत्रकारांचे नाहीत

ही समस्या फक्त पत्रकारितेची नाही तर संपूर्ण राष्ट्र-राज्य संकल्पनेची आहे.

Credit : Prathmesh Patil

पत्रकारिता मुळातच आधुनिक काळाची, राष्ट्र-राज्याची उपज आहे. प्रिंटिंग प्रेसचा शोध लागण्याआधी सामाजिक पातळीवर प्रभाव पडून एकात्मभावनेतून ‘मास’ अर्थात समूहापर्यंत पोहोचू शकतील अशी माध्यमं नव्हती. त्यामुळं माध्यम म्हणून असलेला पत्रकारितेचा पाया हा मुळातच राष्ट्र-राज्यांच्या संदर्भानेच बघता येतो. गेल्या काही दशकांमध्ये, विशेषतः भांडवल आणि माहिती या दोघांच्या मुक्त संचारामुळे, राष्ट्र-राज्यच विस्कळीत आणि कमकुवत होत असताना, पत्रकारितेचं पारंपरिक स्वरूप प्रभावित होणार नाही तर नवलच आणि आज ज्या अर्थाने पत्रकारिता लयास जात असल्याचं बोललं जात आहे, तो याच पारंपरिक प्रारूपाचा विलयाचा संकेत आहे.

पारंपारिक पत्रकारितेत माहिती संकलन आणि त्या माहितीवर संस्कार करून, संपादन करून त्याचं प्रकाशन, हा एकूण ढोबळ ढाचा असतो. यामध्ये सूत्रबद्धता केंद्रस्थानी आहे. पारंपारिक माध्यम मोठं, अवाढव्य पसारा असलेलं, केंद्रीय पद्धतीनं काम करणारं अशी त्याची व्यवस्था. माहिती अनेक ठिकाणांवरून एका ठिकाणी येते आणि तिथून पुन्हा संपादकीय संस्कार झाल्यावर ती एका ठिकाणावरून अनेक ठिकाणी जाते. त्या अर्थाने माध्यम म्हणजे एका प्रकारची खिंड किंवा धारण असं रूपक आपण समोर ठेऊ शकतो.

अशा प्रकारच्या सुसूत्रतेमुळं, माध्यमातून प्रक्रियाकृत होणाऱ्या माहितीला प्रचंड तीक्ष्णता बहाल व्हायची. माहिती विस्तृत आहे, तिचे संदर्भ तपासण्यात आले आहेत आणि तिच्यातली माहिती विश्वासार्ह आहे, ही हमी संपादकीय व्यवस्था देत होती. त्यामुळं अशाप्रकारे प्रकाशित होणारी बातमी, थेट प्रभाव करायची कारण वाचक, दर्शक यांच्यासाठीदेखील माहितीचे स्रोत निवडक आणि केंद्रीकृत होते. त्यामुळं एखाद्या मोठ्या माध्यमाची बातमी ही प्रचंड सामाजिक किंवा राजकीय उलथापालथ घालू शकायची आणि यातूनच, प्रेस अर्थात माध्यम, हे लोकशाही प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आलं.


नवं जग: माध्यमांचं विकेंद्रीकरण

नव्या जगात, विषेशतः इंटरनेटच्या शोधानंतर, माध्यमांचं केंद्रीकृत स्वरूप तडकायला सुरु झालं. संपादकीय गाळणीतून गळालेले अनेक प्रकारचे प्रवाह, विविध वाटेनं आपला वाचक-दर्शक शोधू लागले. यातून झालं असं, की एक मोठ्या माहितीच्या धारणाऐवजी, छोटे-छोटे बंधारे किंवा ओढे निर्माण झाले. त्यातल्या काहींनाच या माहितीप्रवाहांना संपादकीय चाळणी लावता आली. बाकीचे सर्व प्रवाह, अव्याहत वाहत आपल्या अपेक्षित वाचकापर्यंत पोहोचू लागले.

केंद्रित माध्यमात पेपरची जागा टीव्हीनं घेतली. वृत्तपत्राची संपादकीय व्यवस्था हळूहळू कालबाह्य ठरू लागली कारण माहिती पोहोचवण्याचा वृत्तपत्राचा काळ आणि टीव्हीचा काळ यात प्रचंड फरक येऊ लागला. वृत्तपत्राची भूमिका आता माहिती संकलक यापेक्षा माहिती पृतथाकरण करणारं माध्यम म्हणून बदलली. टीव्हीच्या केंद्रित स्वरूपालाही लवकरच इंटरनेटच्या मल्टी-मीडिया क्षमतेमुळं तडे गेले.  

यातून झालेलं विकेंद्रीकरण, हे काही अंशी दबलेल्या, माध्यमातील वर्चस्ववादी समूहांच्या चाळणीतून दाबल्या गेलेल्या आवाजाना मुक्त करण्याच्या कामी आलं. मात्र माहितीची मुक्त प्रवाहित ही संपादकीय प्रक्रियेपासूनचीही मुक्तता बनली आणि आपापल्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक स्थानातून दिसणारं सत्य हेच अंतिम आणि अभेद्य सत्य म्हणून प्रस्तुत आणि प्रसारित केलं जाऊ लागलं. यातून तथ्य आधारित ‘सत्य’ याचे तुकडे होऊन ‘दृष्टिकोन’ आधारित अनेकविध सत्य निर्माण झाली. प्रत्येक घटना, तिच्याकडं बघण्याचे दृष्टिकोन कोणते, यावर आधारित दिसू लागली.

यातून जे झालं, त्यालाच आपण ‘पोस्ट-ट्रुथ’ किंवा सत्याचा मृत्यू असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ, उत्क्रांतीमुळं, वानरसदृश प्राण्यातून माणूस निर्माण झाला, हे वैज्ञानिक तथ्य आहे. जेव्हा संपादकीय माध्यम केंद्रस्थानी होतं, तेव्हा हे सत्य स्थापित करणं शक्य होतं आणि कारण माध्यम केंद्रस्थानी होतं, या तथ्यावर विश्वास ठेवता येण्याचं प्रमाण आणि शक्यतादेखील जास्त होती. आता माध्यमांचं विकेंद्रीकरण झाल्यामुळं, एक माध्यम उत्क्रांती सिद्धांत मांडत असेल तर दुसरं एखादं माध्यम हे मनुष्य आदम आणि हव्वा यांच्यापासून निर्माण झाला असं म्हणू शकतं आणि दुसरं एखादं माध्यम मनुष्याला ब्रम्हदेवानं निर्माण केलं असंही म्हणू शकतं.


पुढच्या अडचणी

अडचण अशी आहे, की या विकेंद्रीकृत माध्यमांचा विकेंद्रीकृत वाचक आहे आणि त्याच्यासाठी तेच तथ्य आहे. त्यामुळं वाचकही दृष्टिकोन किंवा श्रद्धा आधारित समूहांमध्ये वाटला गेला आहे. याचा परिणाम माध्यमांच्या अर्थकारणावरही पडला आहे कारण प्रत्येक माध्यम आता आपल्या सुट्ट्या आणि विभाजित टार्गेट वाचकाला खुश करण्यात मश्गुल आहे. या सुट्या समूहाप्रमाणेच या माध्यमांना त्या त्या विचारांच्या उद्योगांची किंवा उत्पादनांची जाहिरात मिळू लागते आणि हे सर्व मिळून सत्य नामक कल्पनेच्या चिंधड्या करतात. नव्या जगातल्या पत्रकारितेसमोर, माहितीची आणि आपल्या व्यावसायिक व्यवस्थेची सुसूत्रता टिकवणं किंवा सुधारित करणं हे एक मोठं आव्हान आहे.  

दुसरं मोठं आव्हान म्हणजे पत्रकारिता जेव्हा सामाजिक माहितीच्या केंद्रबिंदूपासून हलते, तेव्हा पत्रकारांची मुस्कटदाबी करणंदेखील सोपं होऊन जातं. एखाद्या पत्रकाराने उदारहरणार्थ एका बड्या कंपनीच्या तेल खाणींच्या व्यवसायातला घोटाळा समोर आणला, तर ती कंपनी आपली आर्थिक ताकद वापरून हजारो माध्यमातून ती माहिती कशी खोटी आहे, किंवा तो पत्रकार कसा वैयक्तिक अजेंडा राबवत आहे, अशी कांडी पिकवू शकते. यातून पत्रकारितेतून निर्माण होऊ शकणार दबाव पंक्चर होतो आणि अर्थात तिची प्रभाविता संपते.

ही समस्या फक्त पत्रकारितेची नाही तर संपूर्ण राष्ट्र-राज्य संकल्पनेची आहे. राष्ट्र-राज्याचं केंद्रीय स्वरूप आता डळमळीत होत आहे. सूक्ष्म आणि अवाढव्य अशा दोन्ही प्रकारच्या बदलांनी या संकल्पनेला तडा जात आहे. एकीकडे मोठमोठ्या कंपन्या एखाद्या राष्ट्राच्या सकल उत्पन्नाएवढी रक्कम खिशात ठेवत आहेत तर दुसरीकडे स्थानिक अस्मिता आणि ओळख सुदृढ होत आहे. अशा काळात, पत्रकारितेची यंत्रणा देखील या दोन टोकांकडे आकृष्ट होणार आहे. अशा काळात, पारंपरिक माध्यमातील पत्रकार हा काळ, प्रभाविता आणि संदर्भहीनता अशा अनेक समस्यांना सामोरा जाणार आहे. तुम्हाला वाचक म्हणून अपेक्षित असलेली पत्रकारिता बदलत जाणं हा तुम्ही दोष देत असलेल्या पत्रकारांचा दोष नाही. तुमचा पत्रकार फक्त एका मोठ्या सामाजिक स्थित्यंतराचा बळी ठरणार आहे. त्यातून उद्याची पत्रकारिता कशाप्रकारे आकार घेईल, हे परिस्थितीच सांगेल.