Europe

इतिहासकारांनी लपवलेला क्रूरकर्मा चर्चिल

हिटलर आणि चर्चिल यांच्या कृत्याची तीव्रता कमी अधिक असली तरी त्यात मूल्यात्मक फरक करणे अशक्य आहे

Credit : डेली स्टोर्मर

इतिहास हा प्रत्येकासाठी व्यक्तीसापेक्ष बदलत जात असला तरी त्यात किमान एकजिनसीपणा असतोच. या एकजिनसीपणाचं एक कारण म्हणजे इतिहासात डोकावून बघणाऱ्या व्यक्ती जरी वेगळ्या असल्या तरी त्यांच्या समोर येणाऱ्या घटना या काही बदलत नाहीत. त्यावरून पुन्हा यातील मोजक्या ऐतिहासिक घटना इतिहासाच्या साधनांद्वारे वारंवार आक्रमकरीत्या आपल्यासमोर येत राहतात. यातूनच इतिहासातले हिरोज आणि व्हिलन बनत जातात. अर्थात याला तथ्यांची तर जोड असते. मात्र, अशा शेकडो तथ्यांपैकी नेमकी कोणती तथ्यं कशाप्रकारे चित्रपट, साहित्य इत्यादी साधनांद्वारे आपल्यासमोर मांडली जातात यावर ऐतिहासिक घटनांचे मूल्यमापन प्रत्येकजण स्वतःच्या क्षमतेनुसार करत असतो. इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रतिमाही यातूनच आपल्या मनात साकारल्या जातात.

दुसरे महायुद्ध ही विसाव्या शतकातली सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक घटना होती. या महायुद्धाच्या अनेक सुरस कथा आजही कथा कादंबऱ्या आणि चित्रपटातून चघळल्या जातात उद्याही सांगितल्या जातीलच. यातून मग अशा कथांच्या कलात्मकतेला पूरक अशी ऐतिहासिक पात्र हिरो आणि व्हिलन बनवून आपल्यासमोर येतात. क्रूरकर्मा हिटलर हा मग दुसऱ्या महायुद्धाच्या कथानकातील खलनायक तर इंग्लंडचे त्यावेळेसचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे महायुद्धाचे हिरो ठरतात. जे सहाजिकच समोर आलेल्या तथ्यांना धरून आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पृथ्वीवरील चार टक्के जिवंत माणसं मेली. प्रत्यक्ष युद्धात लढताना मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांपेक्षा इतर कारणांमुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या मोठी होती. युद्धामुळे झालेली नैसर्गिक हानी, दुष्काळ महागाई, उपासमार, आजारपण यांच्यात जीव गमावलेल्यांची संख्या सैनिकांपेक्षा जास्त होती.

१९४३ चा बंगालचा दुष्काळ हा युद्धाच्या जीवघेणेपणांच आदर्श उदाहरण आहे. या दुष्काळामुळे जवळपास बंगालमध्ये ३० लाख लोकांना जीव गमवावा लागला. हा दुष्काळ नैसर्गिक नव्हे तर राजकीय होता, अशी चर्चा दबक्या आवाजात गेल्या कित्येक दशकांपासून इतिहासकारांमध्ये सुरू आहे. या दुष्काळात झालेल्या जीवितहानीला त्यावेळंचं इंग्रज सरकार आणि पंतप्रधान विन्स्टन चर्चिल प्रत्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप इतिहासकारांकडून गेली कित्येक वर्ष केला जातोय. मात्र, चर्चिल भोवतीच्या नायकत्वाच्या वलयामुळे या आरोपांना म्हणावी अशी अधिमान्यता मिळाली नाही. नुकत्याच समोर आलेल्या संशोधनामुळे मात्र दुसऱ्या महायुद्धाचा हिरो चर्चिल यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. या संशोधनातील निष्कर्षामुळे बंगालमध्ये दुष्काळात झालेल्या ३० लाख मृत्यूंमागे चर्चिल यांचा हात होता, या दाव्याला शास्त्रीय आधार मिळाला आहे. भारतीय आणि अमेरिकन शास्त्रज्ञांच्या गटाने जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या नावाजलेल्या वैज्ञानिक जर्नलमध्ये शोधनिबंध छापून आणला आहे. यातून १९४३ चा बंगालमधील दुष्काळ निसर्गामुळे नाही तर चर्चिल यांच्या धोरणांमुळे आला होता हे स्पष्ट होते.

कोणताही दुष्काळ मोजण्याचं स्टॅंडर्ड प्रमाण असतं ते म्हणजे मातीची आद्रता (Soil Moisture). १९४३ च्या अगोदर १८७३-१८७४, १८७६, १८७७, १८९६-९७, १८९९ या पाच वर्षी भीषण दुष्काळ आला होता. या पाच वर्षांच्या तुलनेत १९४३ च्या दुष्काळातील मातीतील आर्द्रता तुलनेने जास्त होती. मात्र तरीही या साली मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या या पाचही वर्षांपेक्षा अधिक होती. त्यामुळे हा दुष्काळ मानव निर्मित होता यावर शिक्कामोर्तब झालंय.

१९४३ च्या उत्तरार्धातच जेव्हा दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. अर्थात इंग्लंडतर्फे मित्रराष्ट्रांकडून भारतीय सैनिकही या युद्धात लढत होते. ब्रिटन, अमेरिकेचा राष्ट्रवाद चेकाळून सांगणाऱ्या दुसऱ्या महायुद्धावरील वॉर फिल्म्समध्ये दुर्दैवानं हे भारतीय सैनिक दिसत नाहीत.  डंकर्क, इंन्ग्लोरिअस बास्टर्ड यांसारख्या नावाजलेल्या युद्धपटात चुकूनही भारतीय सैनिक दाखवले गेले नाहीत. प्रत्यक्षात डंकर्क येथे अडकलेल्या आणि लढताना मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय सैनिकांचाही समावेश होताच. पण नोलान आपल्याला ते दाखवत नाही. वसाहतवादातून अजूनही आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकलेलो नाही याचं एक हे चित्रमय उदाहरण ठरावं.

तर १९४२ च्या दरम्यान बंगालला वादळाचा (Cyclone) चा तडाखा बसला. त्यात पिकांची प्रचंड नासाडी झाली. त्यात पुन्हा दुष्काळ पडल्यामुळे उत्पादन जवळपास थांबलंच. युद्धाची धग वाढल्यामुळे युरोपलाही अन्नटंचाई जाणवत होतीच. त्यामुळे चर्चिल यांनी निर्यातधोरण आणखी मजबूत बनवलं. युद्धाचं कारण देत चर्चिल यांनी बंगाल उपासमारीनं मरत असताना युरोपमध्ये भारतातून धान्य आयात करत अतिरिक्त साठा जमा करून ठेवण्यावर भर दिला.  तिकडे भारताच्या बाजूला लागून असलेल्या बर्मा (आजचा म्यानमार) वर जपानने हल्ला चढवला. आपल्या साम्राज्याला असलेला धोका ओळखून जपानी सैनिकांची कोंडी करण्यासाठी चर्चिलने तिथली वाहतुकीची साधनं जहाजं बोटी बुडवल्या. त्यांचा वापर बंगालला भात आयात करण्यासाठी झाला असता. जपानी सैनिकांना उपाशी ठेवण्यासाठी धान्याची कोठारे उध्वस्त करण्यात आली. भारत बर्मामधून दरवर्षी भात मोठ्या प्रमाणावर आयात करत असे. युद्धाचं कारण देत चर्चिलनं तेही थांबवलं. भारतातील व्हॉईसरॉय, शिष्टमंडळ चर्चिल आणि वॉर कमिशनला सांगून थकलं की निर्यात कमी करा, आयातीवर निर्बंध लावू नका. हिंदी महासागरातील धान्य वाहून नेणारी थोडीतरी जहाजं भारताकडे पाठवा, नाहीतर दंगे पेटतील ,हाहाकार होईल, लोक उपासमारीने मरतील. पण चर्चिल काही बधले नाहीत. उलट त्यांनी अमेरिका, रशिया सारख्या देशांनी भारताला धान्य आणि इतर स्वरूपात केलेली मदतही नाकारली.

बंगालमध्ये उपासमार एवढी वाढली होती की तिथले विदारक मृत्यू युद्धभूमीवरील मरणापपेक्षाही भयानक होते. असलेल्या किमतीत धान्य विकत घेणं हे बहुतांश लोकांच्या आवाक्याबाहेरील होतं. स्वत:ला जिवंत  ठेवणं आता शहरातील काही सरकारी बाबूं साठीच शक्य राहिलं होतं. आई-बापांनी हतबल होऊन आपली लेकरं विहिरीत फेकून दिली आणि स्वतःही जीव देणे पसंत केलं. बहुतांश बायका कुटुंबाला दोन वेळचं जेवण देता यावं यासाठी वेश्या व्यवसाय करू लागल्या. उपासमारीनं हाल हाल करून मेलेल्या आपल्या आप्तस्वकीयांचे मुडदे उचलण्याचं त्राणही अजून जिवंत असलेल्या लोकांमध्ये राहिलं नव्हतं. काही दिवसांनी ही जिवंत माणसंच रस्त्यावरची मुडदे बनून गेली. युद्धासाठी गरजेचे असलेलं लष्कर आणि प्रशासकीय बाबू जगावेत म्हणून इंग्रज सरकारने आणखी नोटा छापण्यास सुरुवात केली. त्यांच्या दलालांना या पैशातून अतिरिक्त धान्यसाठा लष्करासाठी जमा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.  त्यामुळे महागाई आणखीनच वाढली आणि असलेलं धान्य कोठारांमध्ये पडून राहू लागलं. बंगालमधील या दलालांनी साठेबाजीतून वारेमाप पैसा कमवत लोकांचं मरण आणखी सहज करुन टाकलं. भारताचा समुद्र ओलांडून जाणारी धान्याची जहाजं उपासमारीनं मरणारी लोक पाहूनही थांबली नाहीत. इतर वर्षांच्या तुलनेत नेमकं याच वर्षी चर्चिल यांनी इंग्लंडसाठी अतिरिक्त धान्यसाठा भरवला होता. विन्स्टन चर्चिलनं स्वत:चा युद्धज्वर भागवण्यासाठी भारताबरोबरच केनिया, टांझानिया यांसारख्या आपल्या इतर वसाहतींनाही उपासमार घडवून आणला. उपाशी मरणाऱ्या देशाला विक्रमी धान्य निर्यात करायला लावणारा चर्चिल हा आपला महायुद्धातील हीरो आहे.

लॉर्ड चेरविल नावाचा चर्चिलचा जवळचा मित्र आणि सहकारी. चर्चिलची जवळपास सगळी धोरणं याच्याच सल्ल्यावर ठरायची. १९४३ च्या बंगालमधील मरणाचा सोहळा या दोघांनीच आखला होता. या दोघांची भारतीय आणि इतर वंशांच्या लोकांबद्दलची मतं मोठी उद्बोधक आहेत. भारतीय वंशांच्या लोकांमध्ये गुलामीचं तत्व नीटपणे मुरावं आणि समानता, स्वाभिमान वगैरे तत्वांची लागण त्यांना होऊ नये यासाठी जेनेटिक मॉडिफिकेशन करू, अशी कल्पना वैज्ञानिक असलेल्या चेरविलनं मांडली होती. त्यामुळे मग या वंशाच्या लोकांना बंड वगैरे करणं सुचणार नाही आणि हिंसा टळेल, असं म्हणत चर्चिलनं त्याला दुजोरा दिला होता. दुर्दैवानं युद्धाच्या धामधूमीत त्यांना यावर पुढे काम करणं जमलं नाही.  त्यांनं चर्चिलला भारताला धान्य देण्याविरोधात वारंवार बजावलं होतं. भारतातील रानटी लोकं आधासासारखी लेकरं जन्माला घालतात त्यांना जगवणं आपलं काम नाही. याउलट तेथील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना मरू देणंच कसं योग्य आहे, हे त्यांनं चर्चिलला पटवून दिलं. यातूनच भारतीय लोक सशासारखी खातात. एवढी जर उपासमार असेल तर तो गांधी अजून जिवंत कसा काय? असा प्रश्न चर्चिल विचारू शकला. स्वतःच्या देशातील लोकांना खाऊ घालणं ही त्या देशाची जबाबदारी आहे. भिकाऱ्यासारखं धान्य आयात करणं चुकीच आहे, हे तत्व चर्चिलने स्वतःच्या देशाला लागू केलं असतं तर उपासमारीची नामुष्की ओढवणारा ब्रिटन जगातला पहिला देश असता! १९४३ आली धान्य आयात करण्यात ब्रिटन जगात आघाडीवर होता.  

नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी दुष्काळ आणि गरिबीवर मूलभूत काम केलं आहे. या विषयावर काम करणारी जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांची आजही गणना केली जाते. दुष्काळ आणि गरिबीचा अभ्यास करताना आपण १९४३ चा बंगालच्या दुष्काळाच केंद्रस्थानी ठेवला होता, हे अमर्त्य सेन मान्य करतात. भारताच्या इतिहासात होऊन गेलेले दुष्काळ आणि उपासमार यांचा अभ्यास केला तर साधारण एक निष्कर्ष काढता येतो. दुष्काळामुळे होणारी उपासमार ही अन्नधान्य उपलब्ध नसल्यामुळे होते असं नाही. तर उपलब्ध अन्नाचा साठा गरिबांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे दुष्काळ आणि उपासमार होते, अशी शास्त्रीय मांडणी अमर्त्य सेन यांनी केली आहे. उदाहरणादाखल ब्रिटिश सरकारच्या काळात दुष्काळामध्ये उपासमारीनं जीव गमावलेल्यांची संख्या ही जास्त होती. स्वातंत्र्योत्तर काळात तुलनेने त्याहून तीव्र दुष्काळाचा सामना करूनही उपासमारीने जीव गमवावा लागलेल्या लोकांची संख्या मर्यादितच राहिली. याचं मुख्य कारण ब्रिटिश काळाच्या तुलनेत गरिबांच्या हिताच्या कल्याणकारी योजना आणि उपलब्ध अन्नधान्याचा साठा गरिबांपर्यंत पोहोचणे हा आहे.

या सगळ्याची इतिहासात नोंद आहे. मात्र हा इतिहास कथा बनून आपल्या समोर येऊ इच्छित नाही. कथेला नायक आणि खलनायक लागतो. दुसऱ्या महायुद्धाचा खलनायक हिटलरच्या रूपात आपल्याला आयताच मिळालेला. त्यात दुसरा खलनायक उभा करणं कथेच्या मांडणीला त्रासदायक ठरलं असतं. मधुश्री मुखर्जी या वैज्ञानिकीनं बंगालच्या दुष्काळाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी २०११ साली Churchills's Secret War नावाचं पुस्तक लिहिलं होतं. यात बंगालच्या दुष्काळाच्या अनुषंगाने चर्चिल यांच्या सहभागाची नोंद आहे. त्यासाठी तिने त्यावेळच्या ब्रिटनच्या संसदेतील चर्चा, वॉर कमिशनच्या सभेतील नोंदी, कॅबिनेट मीटिंग, ब्रिटिश पार्लमेंटची लायब्ररी अशा अधिकृत संदर्भांचा आधार घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धाकडे क्रूरकर्मा हिटलर आणि शांतताप्रिय चर्चिल यांच्यातील लढाई म्हणून पाहत कथानकाला बळी पडलेल्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवं.

बंगाल

बंगालचा दुष्काळ. सौ. बीबीसी 

हिटलर आणि चर्चिल यांच्या कृत्याची तीव्रता कमी अधिक असली तरी त्यात मूल्यात्मक फरक करणे अशक्य आहे. मात्र इतिहासाच्या कथानकांनी ते शक्‍य करून दाखवलं आहे. हिटलरचं ज्यूंना हाल हाल करून मारणं वर्णद्वेषी होतं तर बंगालच्या ३० लाख लोकांना उपाशी ठेवून मारणंही वर्णद्वेषंच आहे. बंगालच्या लोकांचा जीव वाचवणं चर्चिलला शक्य होतं पण त्यानं त्याला प्राधान्य दिलं नाही, ही गोष्ट चर्चिलचे कडवे समर्थकही नाकारू शकत नाहीत. ब्रिटिश साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचा प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या चर्चिलचे हट्टीपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. १९४० साली दोस्त राष्ट्र गटातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी चर्चिलला गळ घातली की भारताची वसाहत सोडा. वसाहतवादी अन्याय्य राजवटीमुळे दोस्त राष्ट्रांबद्दल जगासमोर चांगलं उदाहरण जात नाही. यावर चर्चिल यांचा एवढा तिळपापड झाला की त्यांनी युद्धाच्या आघाडीतूनही प्रसंगी माघार घेऊ, पण भारत सोडणार नाही, अशी धमकी दिली. शेवटी वैतागून फ्रेंक्लिन यांनी तो नाद सोडला.

चर्चिल आणि हिटलरमध्ये गुणात्मक फरक नाहीत. खरंतर इंग्लंडचा साम्राज्यवाद, चर्चिलची धोरणं हे हिटलरचं प्रेरणास्थान होतं. हिटलर ब्रिटिश साम्राज्यवादाच्या एवढ्या प्रेमात होतात की त्याच धर्तीवर त्याला जर्मन साम्राज्यवाद आणायचा होता.  नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानं चर्चिलची कृष्णकृत्य शास्त्रीयरीत्या सिद्ध केली एवढंच. अन्न अन्न करत जीव सोडलेल्या बंगाली लोकांना ते तेव्हाही माहीत होतंच. पण नववसाहतवादाने अजूनही ग्रासले गेल्याने आपल्याला आपल्याच माणसांचं हे सत्य स्वीकारणं जड जातं.  या शोधाने दुसऱ्या महायुद्धाच्या कथानकात फारसा फरक पडेल, अशी आशा करणं वसाहतवाद असेपर्यंत तरी शक्य नाही.

वसाहतवाद, साम्राज्यवाद एका बेसिक लॉजिक वरती उभा राहिलेला असतो. तो म्हणजे साधनसंपत्तीचे शोषण. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारताचं आणि इंग्लंडचं पर दरडोई उत्पन्न जवळपास सारखंच होतं. ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा त्यांचं दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा २० पटीने जास्त होतं. साधन संपत्तीचं शोषण हेच वसाहतवादाचं मूळ होतं आणि राहील. आम्ही तुम्हाला चांगले प्रशासन आणि उत्तम प्रशासकीय अधिकारी देतोय. त्या बदल्यात तुम्ही कर भरा, या तर्कापासून सुरू झालेला ईस्ट इंडिया कंपनीचा शिरकाव याचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण इतिहासाच्या रम्य कथानकातून मार्ग काढत त्यातून बोध घेणं, हे आपल्यासाठी जेवढं अवघड आहे तेवढंच आवश्यकही.  आज वसाहतवाद लादण्यासाठी कोणाला ईस्ट इंडिया कंपनीची गरज उरली नाही. पहिल्या जगाकडून तिसऱ्या जगावर नव्याने साम्राज्यवाद लागण्यासाठी आज हिटलर आणि चर्चिलची गरज पडत नाही.

नववसाहतवाद आणि त्यातून डोकं वर काढणारा साम्राज्यवाद यातील मेख अशी की त्यावर आपण बोट ठेवू शकत नाही. आपण त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला की तो स्वतःचा चेहरा बदलतो. आज श्रीमंत देश गरीब देशांना कोंडीत पकडून विकासाच्या नावानं भलीमोठी कर्ज वाटतात आणि त्यांना हवी ती धोरणे त्यांच्याकडून राबवून घेतात.  याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक यांसारखं संस्थात्मक अधिष्ठान तर आहेत याशिवाय लोकशाही, जागतिकीकरण, उदारमतवाद यांसारख्या आधुनिक मूल्यांचाही तात्विक आधार आहे. आफ्रिकेतील नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा ठेवून जगातील विकसित देश मोठ्या प्रमाणात तिथे गुंतवणूक करतायेत. आफ्रिकेचा विकास या उदात्त हेतूने केली जाणारी गुंतवणूक, लादली जाणारी कर्ज आफ्रिकेतील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा का सुधारू शकली नाहीत? याचं उत्तर विकास नावाच्या षडयंत्रामध्ये दडलं आहे. जागतिकीकरण, उदारमतवाद यांसारख्या गोंडस तत्त्वांमधल्या  विरोधकांभासांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणं, ही आपली गरज बनून गेली आहे.

आपला देश वसाहतवाद सहन करण्यापासून तो आता इतरांवर लादण्याकडे सरकत चालला आहे का, हे तपासून पाहणं गरजेचं आहे. आफ्रिकेतील मागास देशात महाकाय गुंतवणूक करून भारतीय कंपन्यांना खरंच अफ्रिकेचं  भलं करायचं आहे काय, याचे उत्तर वाटतं तेवढं सोप्पही नाही आणि अवघडही. नव्वदीच्या दशकात भारतातील आर्थिक बदलांना विरोध करणाऱ्या काही मोजक्या लोकांचा त्यावेळी असा आक्षेप होता की जग IMF च्या मदतीनं भारतावर नव्यानं वसाहतवाद लादण्याचा प्रयत्न करतंय. तो आक्षेप खरा करून दाखवण्याच्या मार्गाला आपण आज निघालो आहोत. स्वतंत्र भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या भागातीलच लोकांचं पर दरडोई उत्पन्न देशातील इतरांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. ही या नववसाहतवादाचीच देण असते. विशेष म्हणजे ब्रिटिश वसाहतवाद, साम्राज्यवादाविरोधात १५० वर्ष लढलेल्या लढाईचे गोडवे गाणाऱ्या आपल्याला यात काही वावगं वाटत नाही. कारण चर्चिल तो आखिर बहना है, वसाहतवाद तो हमको बार-बार लाना है. ही आपल्याला सवयीच्या झालेल्या आधुनिक जीवनशैलीची गरज आहे. या आधुनिक जीवनशैलीला सोडणं आता आपल्या हातात राहिलेलं नाही. विकासाची भाषा करत आता निवांत सुखी जगत असलेल्या आदिवासींनाही मुख्य प्रवाहात आणण्याची आपली धडपड म्हणजे वसाहतवादच असतो. आपला विकास कमालीचा गंडलेला आहे आणि आपण आता स्वतंत्र आहोत, हे कोण तरी आपल्या लक्षात आणून देणं खरचं गरजेचं आहे.