Quick Reads

व्हॉट मेक्स अस इंडियन्स?

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

परवा ६ डिसेंबर रोजी बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपींच्या झालेल्या एन्काउंटरच्या घटनेमुळे न्याय, न्यायव्यवस्था आणि संविधान या संकल्पना आणि काही मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या तिन्ही बाबींशी निगडीत अशी दोन निरनिराळ्या चित्रपटांतील दृश्यं अशावेळी आठवतात. ज्यातून न्याय, न्यायव्यवस्था आणि संविधान या संकल्पना कायद्याच्या राज्याचा विचार करता का महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येतं. 

 

‘व्हॉट मेक्स अस अमेरिकन्स?’ 

‘ब्रिज ऑफ स्पाइज’ (२०१५) या स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित चित्रपटाचं मध्यवर्ती कथानक साधारण असं: १९५७ मध्ये शीतयुद्धाच्या काळात रुडॉल्फ अबेल (मार्क रायलन्स) या सोव्हिएत रशियाच्या एका गुप्तहेराला अमेरिकेत अटक करण्यात येते. अमेरिकन जनतेतील संताप पाहता त्याला शिक्षेपासून वाचवण्यात कुणालाच रस नसतो. त्यामुळे त्याच्या खटल्यात त्याच्या बाजूने लढण्यासाठी जेम्स डॉनाव्हन (टॉम हँक्स) या अमेरिकन वकिलाची नियुक्ती करण्यात येते. डॉनाव्हनकडे ही केस मुळातच हरण्याच्या दृष्टीने देण्यात आलेली असते. पण, रुडॉल्फला वाचवण्याचे किमान प्रयत्न करणं, त्याला चांगली वागणूक मिळेल हे पाहणं तो आपलं काम समजतो. रुडॉल्फने सांगितलेली सगळी माहिती गुप्त ठेवणं हे एक वकील म्हणून आपलं कर्तव्य समजतो. 

मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्थांना या रशियन हेराकडून काही माहिती मिळत असल्यास, किंवा तशी किमान शक्यताही असल्यास ती हवी असते. त्यामुळेच डॉनाव्हनवर पाळत ठेवण्यासाठी किंबहुना त्याच्याशी संपर्क साधून तो आपलं कर्तव्य बाजूला ठेवत देशप्रेमापोटी त्याच्या अशीलासोबत झालेली काही माहिती आपल्याला देतो का यासाठी सीआयएचे प्रयत्न सुरू असतात. इथेच एका दृश्यात डॉनाव्हन त्याच्या मागावर असलेल्या एजंट हॉफमनला (स्कॉट शेफर्ड) हटकतो, नि तेव्हाच हॉफमन त्याला ‘ऑफ द रेकॉर्ड’ काही माहिती हवी असल्याचं सांगतो. जोएल आणि इथन कोएन बंधूंनी मॅट शर्मनसोबत सहलेखन केलेला हा संबंध चित्रपटच पटकथा आणि संवाद लेखनाचा आदर्श नमुना असला तरी हे विशिष्ट दृश्य काही औरच आहे. 

डॉनाव्हनचं म्हणणं स्पष्ट असतं, ते म्हणजे “मी अॅटर्नी-क्लायंट प्रिव्हिलेजचा मान राखेन आणि तुम्हाला, सीआयएला काहीच सांगणार नाही”. त्याला पुन्हापुन्हा डिवचू पाहणारा हॉफमन तू हे देशासाठी करायला हवंस, इथे (नैतिक-अनैतिकतेचे) कुठलेच नियम लागू होत नाहीत, कुठलीच नियमावली लागू पडत नाही अशा अर्थाचं वाक्य बोलतो. त्यावर हॉफमन मुळचा जर्मन आहे याची खात्री केल्यावर, स्वैर भाषांतर करायचं झाल्यास, डॉनाव्हन पुढे म्हणतो, “बघ, तू जर्मन आहेस, मी आयरिश आहे. पण, अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्या दोघांना अमेरिकन बनवते? -  फक्त एक गोष्ट. - द रूल बुक. - आपण तिला आपलं संविधान म्हणतो आणि त्यातील नियम (वाचा : कायदे) मान्य करतो, आणि हीच गोष्ट आपल्याला अमेरिकन बनवते.” (“I’m Irish, you’re german, but what makes us both Americans? - Just one thing. - The Rule-book. - We call it the constituition and we agree to the rules, and that’s what makes us Americans.”) 

डॉनाव्हन हे वाक्य म्हणतो ते दोन संदर्भांत, एक म्हणजे रुडॉल्फ रशियन आहे म्हणून त्याला न्यायापासून वंचित ठेवू पाहण्याची अमेरिकन लोकांची, पोलीस आणि न्यायव्यवस्थेची मानसिकता. आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडून मिळवलेली माहिती देशहिताच्या नावाखाली गुप्तचर संस्थांना देत अशील आणि वकील यांच्यातील गुप्त असणं अपेक्षित असलेली माहिती उघड करणं. हे म्हणजे एका अर्थी कायद्याचा आणि नैतिकतेचाही भंग करणं झालं. संविधान आणि कायद्याचं राज्य या दोन संकल्पना म्हणजे डॉनाव्हन मांडू पाहत असलेल्या याच मुद्द्याशी निगडीत आहेत. 

 

‘जस्टिस अँड फ्रंटियर जस्टिस’ 

क्वेंटिन टॅरंटिनो दिग्दर्शित ‘द हेटफुल एट’चं (२०१५) कथानक तसं बरंच गुंतागुंतीचं असलं तरी त्याची संकल्पना साधारण अशी : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील पश्चिमेकडील एका राज्यात तुफान बर्फवृष्टी होत असताना काही लोक एका हर्बर्डॅशरीमध्ये एकत्र येतात. ज्यात काही बाऊंटी हंटर्स, एक गुन्हेगार, एक हँगमॅन, निवृत्त लष्करी अधिकारी अशा लोकांचा समावेश असतो. यातच एका दृश्यात ऑस्वाल्डो मोब्रे (टिम रॉथ) हा हँगमॅन डेझी डोमर्ग्यू (जेनिफर जेसन ली) या कुख्यात गुन्हेगाराला न्यायाची संकल्पना आणि हँगमॅन अर्थात फाशी देण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीचं महत्त्व समजावून सांगतो. 

या दृश्यात ऑस्वाल्डो न्याय आणि भावनेच्या भरात उचललेलं पाऊल, नि तडकाफडकी कृती करत केलेला तथाकथित न्याय यांच्यातील फरक स्पष्ट करतो. तो म्हणतो, “समजा, समजा की तुम्ही कुणा व्यक्तीचा खून केला. तुम्ही पकडला गेलात, व्यवस्थेने तुम्हाला दोषी ठरवून मी तुम्हाला फाशीला लटकवावं असा आदेश दिला आणि मी ही कृती पार पाडली तर हा झाला न्याय - जस्टिस. मात्र, जर तुम्ही खून केलेल्या व्यक्तीचे नातेवाईक आताचं समोरच्या दारातून आत आले, नि तुम्हाला जबरदस्तीने ओढून नेत फासावर लटकवलं, तर जे होईल ते व्यवस्थेच्या चक्रातून मिळालेल्या न्यायाहून निराळं असेल - फ्रंटियर जस्टिस. मी दिलेली फाशी ही निःपक्षपाती, निःस्वार्थी भावनेने केलेली कृती असल्याने ती न्याय्य ठरते, पण भावनाविवश होऊन केलेली कृती न्याय्य ठरू शकत नाही.” इथे न्याय ही संकल्पना अधिक स्पष्ट होते. 

जेव्हा या दोन्ही दृश्यांचा आणि त्यांत मांडलेल्या संकल्पनांचा एकत्रित विचार केला जातो, तेव्हा संविधान अस्तित्त्वात असलेलं ‘कायद्याचं राज्य’, न्यायव्यवस्था आणि न्याय या संकल्पना स्पष्ट होतात. आता हैदराबादमध्ये घडलेली चकमक बनावट की खरी हा एक वेगळा मुद्दा असेल. पण, प्रश्नांची सुरुवात मुळातच ते संशयित गुन्हेगार होते का इथपासून होते. जर ते गुन्हेगार असतील तरीही या कृतीचं समर्थन होऊ शकत नाही, हाही एक महत्त्वाचा भाग झाला. त्यातही पुन्हा चकमक बनावट असेल तर ती भावनेच्या भरात केलेली न्याय म्हणून खपवली जाऊ पाहणारी कृती असेल. 

‘द हेटफुल एट’मध्ये ऑस्वाल्डो न्यायव्यवस्थेच्या सगळ्या चक्रातून झालेल्या शिक्षेला नि न्यायला स्पष्ट करताना एक महत्त्वाची संज्ञा वापरतो, ती म्हणजे ‘सुसंस्कृत समाज’. कारण, न्याय, कायदा, न्यायव्यवस्था, संविधान या सर्व गोष्टी म्हणजे सुसंस्कृत समाजाचा पाया आहेत. या मुलभूत नियमांशिवाय आपण शब्दशः रानटी आहोत. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने न्यायाची कुठली व्याख्या आपल्याला स्वीकारायची आहे, हे चाचपडून पाहणं गरजेचं आहे. शिवाय, इथे डॉनाव्हन म्हणाला त्यात जरा बदल करत आपण स्वतःला ‘व्हॉट मेक्स अस इंडियन्स?’ असा प्रश्न विचारण्याची खरी गरज आहे.