India

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा 'गोरखपूर' गड काय म्हणतोय?

यावेळी योगी अयोध्येतून, मथुरेतून की गोरखपूरमधून लढणार याची उत्सुकताही अनेकांना होती.

Credit : Indie Journal

योगेश जगताप | गोरखपूर । पूर्व उत्तर प्रदेश दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाशी सातत्यानं जोडला जाणारा जिल्हा किंवा मतदार संघ म्हणून गोरखपूरचं नाव कानावर पडत होतं. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत योगी अयोध्येतून, मथुरेतून की गोरखपूरमधून लढणार याची उत्सुकताही अनेकांना होती. गोरखपूर शहरात प्रवेश केल्यानंतर याच योगींच्या म्हणजेच बाबा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत माहिती घ्यायला सुरुवात केली.

पहिल्यांदा भेटले अनिल रॉय हे रिक्षाचालक दादा. ते मूळचे नेपाळचे. वय साधारण पंचेचाळीस. गोरखपूरहून नेपाळ शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावर असल्याचं त्यांनी सांगितलं. गोरखपूर मध्ये दहा पैकी दोन माणसे नेपाळची भेटतील, ही पुष्टीही त्यांनी जोडली. योगींबद्दल काय वाटतं असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "जोगीजी तो संत आदमी है। उनके सिवाय यहां कौन हैं? चलती गाडी से गोरखपूर का विकास तो आप देख रहे हो। बाकी बिजली का काम भी हुआ है और गुंडागर्दी कम करने का सबसे महत्वपूर्ण काम जोगी ने किया है।"

अनिल यांनी गोरक्षनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर आम्हाला सोडलं आणि आमचा निरोप घेतला. एखाद्या मोठ्या जत्रेत प्रवेश करावा असं मठातील वातावरण होतं. संक्रांतीच्या काळात सुरू झालेली इथली जत्रा फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार होती. मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. जवळच्या माहीतगार माणसाकडून ‘रेन बसेरा’ या उत्तर प्रदेश सरकारनं निराश्रीतांसाठी सुरू केलेल्या निवारा केंद्राची माहिती घेतली आणि तिकडेच रवाना झालो. त्या ठिकाणी विनामूल्य राहण्याची सोय झाली. स्त्री आणि पुरुषांसाठी या ठिकाणी वेगवेगळी निवारागृहे असून एका वेळी दोनशे लोक या ठिकाणी राहू शकतात. मठाजवळच रेन बसेरा असल्याने सामान ठेवून बाकी आवराआवर करून लगेचच आम्ही मठाकडे रवाना झालो.

यात्रेनिमित्त बाहेरून आलेल्या काही लोकांशी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना हातात पायपुसणी घेऊन ती ओरडत ओरडत विकणारा अरविंद कश्यप म्हणाला, "आयेंगे तो मोदी और योगी जी। वो हमारे भगवान है।" 

त्याच्याच बाजूला भेटवस्तू विकणारा हिमांशू तिवारी बोलला, "वो राम को लाए हैं, हम उनको लायेंगे।" हे दोन्ही पंचविशीचे तरुण मागील सात-आठ वर्षांपासून आपला व्यवसाय करतात.

 

Credit: Yogesh Jagtap

त्यांच्याच पुढे शोभेच्या कुंड्यांची, फुलांची विक्री करणाऱ्या शबनम हुसेनी बसल्या होत्या. त्यांचं मत या दोघांपेक्षा वेगळं होतं. बाराबंकीच्या राहणाऱ्या शबनमताईंची 'कोविड काळात रेशन मिळालं नाही' अशी तक्रार होती. मी कार्ड बनवलं तरी खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, असं त्या अजीजीनं सांगत होत्या. बाकी, आम्ही मतदान अखिलेश यादव यांना करतो आणि आताही त्यांनाच करणार हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. 

मठातील स्थानिक दुकानदारांचं योगी आणि गोरखपूर विषयी मत विचारले असता, मिळालेली उत्तरे योगींचा प्रभाव दर्शविणारी होती. लालूकुमार मौर्य हे मिठाई विक्रेते म्हणाले, "यहां योगी-मोदी को कोई चॅलेंज नही है। दोनो की जोडी ने कितना काम किया है। रस्ते बनाये, फर्टीलायझर और चीनी की कंपनी शुरु की, अस्पताल बनवाये। इतना काम करेंगे तो हम बंद कर भी वोट देंगे।"

योगी-मोदी प्रेमाने भारावलेल्या जनतेला भेटल्यानंतर मठात प्रवेश केला. इथला एकुण माहोल हिंदू मंदिरात असल्याची अनुभूती देतो. याच ठिकाणी योगी आदित्यनाथ यांच्याही राहण्याची सोय आहे. 

"हमारे बाबा चादर पर सोते हैं। कुत्ते, बंदर, गाय पालते है। राज्य के मुख्यमंत्री होने के बावजूद भी उनको कोई घमंड नही है। अपने मठ के लोगों के साथ उनकी हमेशा बात होती है। मुख्यमंत्री होने से पहले और उसके बाद भी यहा के लोगों की समस्या पर हल निकालने के लिये योगीजी यहा जनता दरबार का आयोजन करते हैं। प्रशासन के पास जाने से पहले लोग यहा आते है, इतना विश्वास हैं लोगों का योगी जी पर।" असं मठातील सुरक्षा व्यवस्थापक पदमेश पांडे सांगत होता.

याशिवाय 'परिसरात योगींचे एक लाखांहून अधिक अनुयायी राहतात. यातील काही स्थानिक निवासी आहेत तर काही जण भ्रमंती करत असतात' अशी माहितीही पांडे यांनी दिली.

 

विकासाचा प्रश्न 

गोरखपूरचा दर्शनी विकास हा डोळे दिपवणारा आहे. तिथले पक्के रस्ते, मोठी रेल्वे स्थानके, पथदिवे, एम्स सारखी सुसज्ज रुग्णालयं, दर्जेदार विद्यापीठं यामुळे गोरखपुर हे प्रगत शहर असल्याचं जाणवतं. या शहरात किमान दोनशे मीटर अंतरात एका तरी महापुरुषाचा पुतळा पाहायला मिळतो. इथल्या बाजारपेठा दिवसाही गजबजलेल्या असतात. 

हे शहर भौतिक सोई-सुविधांनी युक्त असलं तरी लोकांच्या राहणीमानात मात्र त्याचं प्रतिबिंब पडल्याचं दिसत नाही. इथले लोक जगण्याच्या दैनंदिन समस्यांनी भेडसावलेले दिसतात. वरवर पाहता पाहणाऱ्याला भुरळ घालणाऱ्या या शहरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाही हे वास्तव आहे. मुख्यमंत्र्यांचं गाव असलं तरी म्हणावा तसा रोजगार इथल्या लोकांना उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती काही तरुणांशी, महिलांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आली. योगी आदित्यनाथ यांच्या काही वक्तव्यांचा, भडकाऊ विधानांचा खोलवर परिणाम तिथल्या समाज घटकांवर झाल्याचे निदर्शनास आलं.

अझर हुसेन हे स्थानिक रहिवासी सांगत होते, "हम मुस्लिम हैं इसलिए हमारा काम नही किया जाता। आयुष्यमान कार्ड बनवाने दिया था, दो साल सें उसका काम नही हुआ। 

दुसरा इसम नाव न सांगण्याच्या अटीवर बोलला, "योगी जी हमारे बाप है। अब इधर रहते है तो उनका ही राज है। लेकीन सच मानो तो ये बाप नालायक हैं। और ऐसा खुद बाप को नहीं बोल सकते हैं ना। घर का आदमी हैं। महंगाई बढ गई, रोजगार का सवाल है और भी ढेर सारी परेशानीया हैं। बजाय इसके समस्याओ पर काम करे मंदिर, मस्जिद, हिंदू-मुस्लिम भेद बढाते हैं।"

मठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या रसूलपुरा भागात फेरफटका मारत तेथील नागरिकांशी संवाद साधला. या भागातील नागरिकांनीही आपल्या समस्यांचा पाढा वाचला.

सुतार काम करणारे सैफुद्दीन चाचा आपली व्यथा सांगत म्हणाले, "इथले पारंपारिक व्यवसाय पूर्णपणे कोलमडले आहेत. गोरखपूरी चादरी भारतभरात प्रसिद्ध होत्या. इथं घरोघरी त्या चादरींचं काम चालायचं. मात्र कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि कोरोनामुळे सगळं ठप्प झालंय. काम करणाऱ्या ८० टक्के लोकांनी आपलं काम बंद केलं आणि दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात नोकरीसाठी हातपाय पसरले. मुख्यमंत्री योगींकडे याबाबत तीन-चार वेळा अडचणी मांडल्या. हा प्रश्न सोडवणं तर दूरच, त्यांनी साधी दखलही घेतली नाही."

 

 

स्थानिक दुकानदार अमिरुद्दिन या बोलण्याचं समर्थन करत म्हणाले, "२०१६ पासून आमच्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळं आमचं कंबरडं मोडलंय. योगी आणि मोदी सरकारच्या काळातच व्यापाऱ्यांना सर्वाधिक त्रास झालाय."

वयाची सत्तरी पार केलेले जमीर उल हसन चाचा राजकीय भाष्य करायला उत्सुक होते. "योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गोरखपूरमधून निवडणूक लढवणाऱ्या भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझादला मी मतदान करणार आहे," त्यांनी ठणकावून सांगितले. "आझादसारखी पोरं जात-धर्म सोडून लोकांच्या जगण्याचा दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठवतात. सीएए, एनआरसी आंदोलन असू दे किंवा महिलांवर, दलितांवर होणारे अत्याचार असुदे, चंद्रशेखरनं नेहमीच संघर्षाची भूमिका घेतली म्हणून त्याचं कौतुक वाटतं, हसन चाचा म्हणाले.

जवळच असणाऱ्या अधियारी बाग परिसरात दलित लोक मोठ्या संख्येनं राहतात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बरीच नवीन घरं या भागात बांधून दिल्याचंही निदर्शनास आलं. इथल्या नागरिकांची राजकीय मतप्रणाली संमिश्र असल्याचं आढळून आलं. काहीजण मायावती तर काहीजण अखिलेश यादव यांच्या कामावर खुश होते. जवळच उभारलेल्या समाज मंदिरामुळे योगींविषयी आदर असणारा एक वर्गही याठिकाणी होता. 

 

भाजपचा बालेकिल्ला 

वेगवेगळ्या समाजातील लोक गोरखपूरमध्ये राहत असले तरी एकूण वर्चस्वाच्या बाबतीत गोरखपूर शहरावर योगी आदित्यनाथ यांचा पगडा असल्याचं दिसून आलं. उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद, वाराणसी, मिर्जापुर, भदोही या जिल्ह्यांच्या तुलनेत गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांचं वर्चस्व अधिक आहे. इथल्या लोकांच्या साथीनं त्यांना मतदान काळात एक लाखांहून अधिकचं लीड मिळतं हा इतिहास आहे. याचं महत्त्वाचं कारण गोरक्षनाथ मंदिर आणि मठ आहे. या मठाशी योगी मागील पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून जोडलेले आहेत. योगींच्या आधी महंत दिग्विजयनाथ यांनी गोरखपूर मध्ये शिक्षण संस्था, दवाखाने, शिक्षण संस्था, गोशाळा यांची उभारणी करून मठाचे महत्त्व वाढवलं. परिसरात २,५०० लोक निवाऱ्यासाठी राहू शकतात. मठाशी संलग्न असलेल्या सर्व गोष्टींचा फायदा योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय कारकीर्दीला झाला आहे. 

हा मठच योगींचा बालेकिल्ला आहे. या भागातून योगी पाच वेळा खासदार झाले आहेत तिथल्या मुस्लिमांमध्ये योगींविषयी संमिश्र भावना आहेत. अनेक मुस्लिमांना योगी जवळचे वाटतात कारण ते त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवतात तर अनेक मुस्लिमांना योगींची भीती वाटते. गोरखपूर हे आपलं घर आहे. योगी कसेही असले तरी आमचे पालक आहेत, या भूमिकेत जगणाऱ्या मुस्लीम कुटुंबांचं हातचं राखून बोलणं, योगींविषयी असणारी त्यांची नाराजी किंवा भीती दाखवत होती.

गोरखपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या ९ पैकी ५ जागांवर भाजप विजय मिळवेल असा प्राथमिक अंदाज आहे. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आझाद समाज पार्टीच्या चंद्रशेखर आझाद रावण यानं उमेदवारी अर्ज भरला असला तरी स्थानिक लोकांच्या मनातील योगीप्रेम या निवडणुकीत वरचढ ठरेल असं चित्र स्पष्ट दिसतंय. निवडणूक काळात अर्ज भरण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी आलेल्या योगींनी त्यानंतर गोरखपूरमध्ये विशेष प्रचार केला नाही. समाजवादी पार्टीविषयी बोलणारी मंडळीही या भागात तुलनेनं कमी आढळली. एकूणात गोरखपूरचा गड टिकवण्यात योगी यशस्वी होतील असंच चित्र इथं दिसून आलं.