India

पाणीकपातीमुळं नागरिक त्रस्त तर टँकर माफियांची चांदी

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या आसपास असून शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत.

Credit : शंकर नारायण (हिंदुस्तान टाइम्स)

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण शंभर टक्के भरलेले आहे. चोवीस तास पाणी पुरवठा, बंद पाईप लाईन योजना आणि अमृत योजने सारख्या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च झाले तरी देखील यापुढे पिंपरी शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला पवना तर दुसऱ्या बाजूला इंद्रायणी नदी अशा दोन्ही बाजूनी नद्या असतानाहि फक्त  ढिसाळ कारभारामुळे आवाज नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.

शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या आसपास असून शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत. महापालिका पवना धरणातून (ता.मावळ) ५०० एलएमडी दिवसाला पाणी उचलते. त्यापैकी ३८ ते ४० तूट आहे. तूट कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज मितीला सरासरी ६०० एलएमडी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज पाणीपुरवठा केल्यास शहराच्या काही भागात कमी दाबाने तर काही भागात नगण्य पाणी जाते त्यामुळे सगळ्या भागाला समन्यायी पाणीपुरवठा आवश्यक आहे. ही पाणी कपात नसून दिवसाआड पाणी पुरवठा होणार असला तरी दोन दिवस पुरेल एव्हड पाणी दिल जाईल, ज्यामुळे शहरातील सर्व भागात समसमान पाणी वाटप होईल असं सांगत, पाणी चोरी, अनधिकृत नळ जोड आणि पाणी गळती रोखण्यासाठी दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची योजना आमलात आणत असल्याच स्पष्टीकरण आयुक्त हर्डीकर ह्यांनी दिलं आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २७ लाखाच्या वर पोचली आहे आणि उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्यावर शहरवासीयांची तहान वर्षभर भागवणे शक्य नसल्याने पाणी बचतीसाठी अशा उपाय योजना करण्याची वेळ माहपालिका प्रशासनावर आल्याची बाब लक्षात घेत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केलं आहे.

टँकर लॉबी होणार सक्रिय

ऐन हिवाळ्यात शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या दहा हजार लिटरच्या टँकरसाठी दीड ते दोन हजार रुपये, पाच हजार लिटरसाठी सहाशे ते एक हजार रुपये आणि तीन हजार लिटरची पाचशे ते सातशे रुपये मोजावे लागतात. "पाण्याची मागणी वाढल्यास सध्याच्या दारात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकर लॉबी सक्रिय होत असून याचा परिणाम सोसायट्या व नागरिकांच्या आर्थिक धोरणांवर होत आहे. या पाणीकपातीला टँकर लॉबी मध्ये असणारे राजकीय नेते व काही लॉबीधारकांनी पाणिकपात करण्यासाठी दबाव आणला आहे त्यामुळे पाणी कपात केली आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला. त्याच बरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल आंदोलन करत महापालिकेच्या समोरच माठ फोडून पाणीकपातीला विरोध दर्शविला आहे.

सध्या महिन्याकाठी दोन लाख, तर उन्हाळ्यात दुप्पट खर्च

शहरात निर्माण होणार्‍या सोसायट्यांची माहिती उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाकडे झालेल्या नोंदणीनुसार होत असते. त्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहरात ३ हजार ८६९ सोसायटी नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये वाढ झाली असण्याची शक्यता आहे. तर सुमारे ५०० सोसायट्यांचे काम सुरू असून त्यांची नोंदणी झाली नसल्याची माहिती हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने दिली. सोसायटी बांधण्यात आल्यानंतर संबंधीत बिल्डरकडून पाण्याची सुविधा देणं गरजेचं होतं. मात्र, ती देण्यात आली नाही. महापालिका व स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या सोसायट्यांची पाण्याची अडचणी सोडवू शकलेले नाहीत.सध्या एका सोसायटीला ८ ते १० पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासत आहे. एका टँकर मागे १ हजार रुपये सोसायटीला मोजावे लागत आहे. महिन्याकाठी टँकरच्या पाण्यासाठी एका सोसायटीला दोन लाख रुपये मोजावे लागत आहे. तर उन्हाळ्यात दुप्पट पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे एका सोसायटीमागे त्यासाठीचा खर्च ४ ते ६ लाखांवर जात आहे.पिंपळे सौदागर, वाकड आदी परिसरातील सुमारे ४०० सोसायट्यांना पावसाळ्यातही टँकर घ्यावे लागत आहे. सोसायटी मेंटनन्सचा खर्च प्रत्येक घराला १ हजार ५०० रुपये द्यावे लागत आहे. त्यामध्येच टँकरसाठी महिन्याकाठी अधिकचे दोन हजार रुपये द्यावे लागत आहेत. सोसायट्यांना एका टँकरला ८०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाण्याची समस्या मिटणार तरी कधी? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

सोसायट्यांची धाव बोअरवेलकडे

बोअरवेलममधून पाणी उपलब्ध झाल्यांनतर एक दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा त्रास जाणवणार नसल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. शहरात  उंचावर असणाऱ्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोचण्यात अडचण येते. तेथे पालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे सोसायट्यांचे रोज टँकरवर अवलंबून राहावे लागते. दरम्यान मोरवाडी, पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागातील अनेक सोसायट्या बोअरवेल घेण्यास प्राध्यान्य देत आहेत. रोज टँकरने गरज भागविणाऱ्यांसाठी होणाऱ्या खर्चांपेक्षा बोअरवेल घेण्यास पैसे खर्च करण्याकडे अनेकजणांचा कल असतो.

काँग्रेस, मनसे व इतर पक्षांनी मिळून मोर्चा काढून पाणीकपातीला निषेध केला

 

सोसायट्या आक्रमक : कोर्टात दाखल करणार जनयाचिका

महापालिकेने प्रति व्यक्ती १३५ लिटर इतके पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेकडे सक्षम पाणीपुरवठा यंत्रणेचा अभाव असल्याने त्याची पूर्तता होताना दिसत नाही. पिंपरी- चिंचवड सरकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या वतीने पाणी प्रश्नासह अन्य विविध मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी यांनी सांगितले. याविषयीची माहिती राजे पुढे म्हणाले कि, सोसायटीधारकाना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी जनहित याचिका दाखल करणार आहोत. जनहित याचिकेसोबत गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये सोसायट्यांची भरलेली टँकरची बिले जोडण्यात येणार आहेत. महापालिका करीत असलेल्या पाणी पुरवठ्याची आकडेवारी आम्ही गोळा केली आहे. तीही त्यासोबत जोडणार आहोत.