Quick Reads

विज्ञाननायिका: नोबेल समितीने न्याय नाकारलेली लिझ मिटनर

कोण आहे ही लिझ? नोबेल समितीने दुर्लक्षित केलेल्या महिला वैज्ञानिक कामगिरीचे सर्वात आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे आजची नायिका, लिझ.

Credit : Lotte Meitner-Graph Archive

आज महिला दिन. कशासाठी आणि का साजरा करतात? विज्ञाननायिका सिरीज लिहायला सुरुवात केली आणि जरा प्रखरपणेच कळायला लागलं महिला दिनाचं महत्त्व. विज्ञानासाठी हुतात्मा झालेली हायपेशिया असो नाही तर सगळ्यांची लाडकी मरी. प्रत्येकजण दबली गेली. ती बियाणं होती म्हणून तरारुन बहरली, पण अशी असंख्य बियाणं मातीआड गेली असतील. आजचं बियाण तर कुणाला माहित असण्याची तिळमात्र खात्री नाही. मी कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवते. Nuclear physics हा माझा आवडता विषय. पहिला अणुबाँब तयार करुन हिरोशिमा-नागासकीला मृत्युचं गाव बनवुन स्वतः मृत्युचा बाप बनलेला ओपेनहायमर. त्याची मी चाहती. पण त्याच क्षेत्रात अविरत काम करणारी लिझ मिटनर (Lise Meitner), तिला मी एक स्त्री असुनही इग्नोर करते. तो गिल्ट मला कुरडत गेला खुप दिवस. आज तो गिल्ट उतरवायचाच ठरवलंय. लिझला सगळ्यांसमोर आणायला हवं. एक स्त्री म्हणुन, फिजिक्सची शिक्षक म्हणून माझं ते आद्य कर्तव्य आहे. तिचा सन्मान तिला मिळवुन द्यायला हवाय.

कोण आहे ही लिझ? नोबेल समितीने दुर्लक्षित केलेल्या महिला वैज्ञानिक कामगिरीचे सर्वात आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे आजची नायिका, लिझ. लिझचा जन्म ज्यू कुटुंबात, व्हिन्नामध्ये आठ मुलांपैकी तिसरी मुलगी म्हणून झाला. तिचे वडील फिलिप मीटनर हे ऑस्ट्रियामधील पहिल्या ज्यू वकीलांपैकी एक होते. ते एक सपोर्टिव्ह पॅरेंट होते. जागरुक पालक म्हणलं तरी चालेल. ज्या काळात महिलांना उच्च शिक्षणासाठी सार्वजनिक संस्थांमध्ये प्रवेश नव्हता, त्या काळात आपल्या मुलीच्या फिजिक्स-वेडासाठी एका खासगी संस्थेत शिक्षण फिलिप यांनी लिझला दिलं. आणि त्याचमुळं भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळविणारी ती दुसरी महिला ठरली!

एवढंच नव्हे तर १९२६ मध्ये, बर्लिन विद्यापीठात भौतिकशास्त्रातील पूर्ण प्राध्यापक म्हणून पदभार स्वीकारणारी जर्मनीतील लिझ ही पहिली महिला ठरली.  तेथे तिने nuclear physics मधल्या संशोधनाचा कार्यक्रम हाती घेतला ज्यामुळे तिला बर्लिन सोडल्यानंतर nuclear fission चा शोध लागला. माझा अल्बर्ट तर तिला 'जर्मन मरी क्युरी' म्हणायचा. खोटं तर नव्हतंच ते. लिझची हुशारी खरोखरच वाखाण्याजोगी होती. नेमकंच त्या काळात न्युट्रॉनच्या शोधासह प्रयोगशाळेत युरेनियम (अणु क्रमांक) २) पेक्षा जड घटक तयार करणे शक्य होईल असृ वैज्ञानिक समाजात अंदाज वर्तवले जात होते. ब्रिटनमधील अर्नेस्ट रदरफोर्ड, फ्रान्समधील इरेन जूलियट-क्युरी, इटलीमधील एनरिको फर्मी आणि बर्लिनमधील लीझ-हान्न टीम यांच्यात वैज्ञानिक शर्यत सुरू झाली.  त्यावेळी, सर्व संबंधित लोकांचा असा विश्वास होता की नोबेल पारितोषिकांच्या संभाव्य सन्मानासाठी हे अमूर्त संशोधन आहे.

मुळातच याची सुरुवात कुठून झाली हे बघणं फार गरजेचं आहे. ११ फेब्रुवारी १९३९ रोजी याची सुरुवात झाली. लिझ आणि तिचा पूतण्या ओट्टो हान्न यांनी सुरुवात केली. पण त्यासाठी तिला डॉक्टरेट पदवी घेतल्यानंतर बर्लिनला जावं लागलं होतं तिथं मॅक्स प्लँकने तिला आपल्या व्याख्यानात उपस्थित राहण्याची परवानगी दिली. एका वर्षा नंतर, मीटनर प्लँकचा सहाय्यक म्हणुन काम करु लागली. तिथंच पहिल्या वर्षांत तिने केमिस्ट ऑट्टो हॅनबरोबर एकत्र काम केले आणि त्याच्याबरोबर अनेक नवीन समस्थानिक शोधले. तिने बीटा-रेडिएशनवर दोन पेपर्स सादर केले. दोघांनी मिळुन बर्लिनच्या दक्षिण पश्चिमेकडील बर्लिन-डहलेम येथे नव्याने स्थापन झालेल्या कैझर-विल्हेल्म-इंस्टीट्यूट (केडब्ल्यूआय) येथे जाऊन काम केले.

तिने हानच्या रेडिओकेमिस्ट्री विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून पगाराविना काम केले. एवढंच नव्हे तर पहिल्या महायुद्धाच्या पहिल्या भागात तिने एक नर्स म्हणून काम केलं, जे एक्स-रे उपकरणं हाताळत होते. नंतर लगेच ती बर्लिन आणि तिच्या संशोधनात परत आली. आल्यानंतरही तिला युद्धाचे प्रसंग आठवुन रडायला यायचं. पण कामासमोर भावनेला कुठं सांभाळणार ती. तिने तिथंच काम करायला सुरुवात केली.  विभक्त विखंडन म्हणजेच nuclear fission, यात भौतिक प्रक्रियेद्वारे युरेनियमसारखे मोठे अणू लहान अणूंच्या जोडीमध्ये विभागले जातात आणि यामुळेच अणुबॉम्ब आणि अणुऊर्जा प्रकल्प शक्य होतात.

परंतु बर्‍याच वर्षांपासून भौतिकशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की युरेनियम (अणु द्रव्यमान = २३५ किंवा २३८) इतक्या मोठ्या प्रमाणात अणूचे दोन भाग होणे अशक्य आहे. लिझला मात्र हे शक्य वाटत होतंं. यासाठी लिझने सर्वात प्रसिद्ध अश्या 'लिक्विड ड्रॉपलेट मॉडेल' वर तिच्या विच्छेदन युक्तिवादावर काम केलं. यानंतर तिने नमूद केले की न्यूक्लियसचे प्रभार वाढल्यामुळे अणू न्यूक्लियसचे पृष्ठभाग ताण कमकुवत होतो आणि अणूचा आकार खूप जास्त असल्यास शून्य तणावात जाऊ शकतो. तिच्या वैज्ञानिक सहकाऱ्यांना ते चूक  वाटत होते. मात्र जेव्हा वैज्ञानिकांनी न्यूट्रॉनने युरेनियमवर मारा केला, तेव्हा त्यांचा विश्वास बसला की युरेनियम केंद्रक फुटण्याऐवजी काही न्यूट्रॉन तयार होतात.

यानंतर मिळालेले न्यूट्रॉन सकारात्मक चार्ज केलेल्या प्रोटॉनमध्ये रूपांतरित झाले आणि अशा प्रकारे युरेनियमचे घटकांच्या आवर्त सारणीवरील वाढत्या मोठ्या घटकांमध्ये रूपांतरित झाले काही लोकांना शंका होती की न्यूट्रॉन माऱ्यामुळे ट्रान्सॅरॅनियम घटक तयार होऊ शकतात, ज्यात आयरीन जियोलॉट-क्युरी - मेरी क्यूरीची मुलगी आणि लिझचा समावेश होता. क्युरीला असे आढळले आहे की या नवीन आलेले ट्रान्सरुनियम घटकांपैकी एक मूलतः रेडियमप्रमाणेच तिच्या आईने शोधून काढलेल्या घटकाप्रमाणे वागतंय म्हणजेच त्याच्या केमिकल properties तशाच आहेत. ज्युलियट-क्यूरीने सुचवले की ते फक्त रेडियम असू शकते. ते युरेनियमपेक्षा काहीसे लहान आहे आणि ते न्यूट्रॉन-बॉम्बधारी युरेनियममधून येत आहेत. लिझला मात्र तसं वाटत नव्हतं आता. तिला असे वाटायचे की रेडियमऐवजी तो घटक बेरियम असू शकतो - रेडियमसारखा रसायनिक गुणधर्म असलेला एक घटक. मीटनेरसाठी रेडियम विरूद्ध बेरियमचा मुद्दा खूप महत्वाचा होता कारण तिच्या विभाजित युरेनियम सिद्धांतानुसार बेरियम हे संभाव्य विखंडन उत्पादन होते, परंतु रेडियम नव्हते-ते खूप मोठे होते.

या कामात लिझने तिचे केमिस्ट सहकारी ओट्टो हॅन यांना युरेनियम माऱ्याचे नमुने आणखी सटीक करण्यात मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ते खरं तर रेडियम किंवा त्यातील केमिकल कजिन बेरियमचे बनलेले आहेत की नाही याचा शोध घेण्याचे आवाहन केले. हॅनने ते शोधण्यचा प्रयत्न केले आणि त्याला आढळले की मीटनर बरोबर आहे: नमुन्यामधील घटक खरंच बेरियम होता, रेडियमचा नव्हता. हॅनच्या शोधानुसार युरेनियमचे केंद्रक तुकड्यांमध्ये विभाजित झाले आहे - मिटनरला जसा संशय आला होता त्याप्रमाणे - लहान न्यूक्लीसह दोन भिन्न घटक बनले.

आणि लिझ ही त्या दिवसाची नायिका ठरली. खरंतर भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांनी एकत्रितपणे त्यांचे निष्कर्ष प्रकाशित करुन nuclear fission या  शोधासाठी तिची प्रशंसा करणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने, हे घडले नाही. कारण यात लिझला दोन अडचणी होत्या. ती नाझी जर्मनीत चालू असलेल्या यहुदी अत्याचारामुळे स्वीडनमध्ये विस्थापित म्हणून राहत असलेली एक यहूदी होती आणि ती एक स्त्री होती. वैज्ञानिक यशाच्या या अडथळ्यांपैकी एखादी तरी अडचण तिने पार केली असती पण तो काळ तसा नव्हताच आणि आजही तोच काळ परत आलाय.

बर्न्समधील कैझर विल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये असताना हॅनच्या सोबत काम करत होती. ते बर्‍याच वर्षांपासून जवळचे सहकारी आणि मित्र होते. जेव्हा नाझींनी कार्यभार स्वीकारला, तेव्हा लिझला जर्मनी सोडण्यास भाग पाडले गेले. ती स्टॉकहोमला गेली आणि नियमित पत्राद्वारे तिने हैन आणि त्याचे कनिष्ठ सहकारी फ्रिट्ज स्ट्रॅस्मन यांच्याबरोबर अणुप्रश्नावर काम सुरू ठेवले. बेरियम शोध हे त्या सहकार्याचे नवीनतम फळ होते. तरीही जेव्हा हे प्रकाशित करण्याची वेळ आली तेव्हा हॅनला हे ठाऊक होते की कागदावर ज्यू स्त्रीचा समावेश केल्यामुळे त्याच्या कारकिर्दीची त्याला जर्मनीमध्ये किंमत मोजावी लागेल.  

म्हणून त्याने तिच्या नावाविनाच प्रकाशित केले आणि हा शोध केवळ त्याच्या स्वतःच्या रासायनिक शुध्दीकरणाच्या कामातून मिळवलेल्या अंतर्दृष्टीवर आधारित असल्याचे चुकीचे म्हणणे प्रकाशित केले आणि लिझचे योगदान संपुर्णपणे खोडुन टाकले. सत्य फार काळ लपत नाही म्हणतात. हॅनला स्वतःचे निष्कर्ष स्पष्ट करताच आले नाहीत. युरेनियमचे अणू बेरियम अणूंमध्ये कसे विभाजित झाले आहेत याबद्दल त्यांनी आपल्या पेपरमध्ये कोणतीही तर्कशुद्ध यंत्रणा मांडणी केली नाही. करताच आली नाही. पण लिझ खुप दिलदार होती म्हणायला हरकत नाही. काही आठवड्यांनंतर, लिझने संपादकांना आपले प्रसिद्ध विखंडन पत्र लिहिले, 'हॅनच्या शोधाची' यंत्रणा स्पष्टपणे स्पष्ट केली. आणि नोबेल समितीने रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 'हेवी न्यूक्लीयसच्या विखुरणाच्या शोधासाठी' केवळ एकट्या हॅन यांना दिला.  विरोधाभास म्हणजे हॅनच्या मूळ प्रकाशनात 'फिशन' हा शब्द कधीच दिसला नाही, आणि त्यानंतर प्रकाशित झालेल्या पत्रात लिझने पहिल्यांदा हा शब्द होता वापरला.

तेव्हापासून nuclear fission शोधण्यावरूनच्या वादाला तोंड फुटले आहे, नोबेल समितीच्या निर्लज्ज वर्णद्वेषाचे आणि लैंगिकतेचे सर्वात वाईट उदाहरण म्हणजे हे असं समीक्षकांचे म्हणणे आहे.  अणू भौतिकशास्त्रातील लिझचे योगदान नोबेल समितीने कधीही मान्य केले नाही. तिला पूर्णपणे दुर्लक्षित ठेवण्या आले आहे आणि बहुतेक लोकांना हे माहित नाही.

युद्धानंतर लिझ स्टॉकहोममध्ये राहिली आणि ती स्वीडिश नागरिक झाली.  नंतरच्या आयुष्यात तिने हॅनशी पुन्हा मैत्री केली. नोबेल समितीने मात्र आपली चूक कधीच मान्य केली नाही, परंतु अमेरिकन department of energy ने संयुक्तपणे तिला, हॅन आणि स्ट्रॅस्मन यांना 'नॅच्युरल रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीज आणि अग्रगण्य अभ्यासपूर्ण अभ्यासासाठी, अग्रगण्य संशोधनासाठी' सन्मानित एनरिको फर्मी पुरस्कार देऊन सन्मानित केले. फिशनच्या शोधासाठी.  दोन दशक उशिरा ओळख मिटनरला मिळाली. याआधी तिला आणि हान यांना प्रोटेक्टिनियम या घटकाचा पहिला दीर्घकाळ जगणारा समस्थानिक सापडला, ज्यासाठी तिला बर्लिन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने लेबनिझ पदक दिले.

 

तिची जर्मनी सोडण्याची कथा फारच त्रासदायक आहे.  अ‍ॅडॉल्फ हिटलर सत्तेवर आला तेव्हा लिझ रसायनशास्त्र संस्थेची कार्यवाहक संचालक होती.  तिचे ऑस्ट्रियाचे नागरिकत्व असूनही, तिचे पुतणे ऑट्टो फ्रेश, फ्रिट्ज हॅबर, लेझ सिझलार्ड आणि इतर अनेक नामवंत व्यक्तींसह इतर सर्व ज्यू शास्त्रज्ञांना बरखास्त करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले.  त्यापैकी बहुतेकजण जर्मनीमधून स्थलांतरित झाले. तिला काम सोडुन जाता येईना. वेळ तर अशी होती कि जीव कधीही जाऊ शकत होता. शेवटी लिझ हॉलंडमध्ये पळून गेली आणि शेवटी स्वीडनला आली. 

१ जुलै १९३८ रोजी, ऑट्टो हॅन यांच्या मदतीने आणि डच भौतिकशास्त्रज्ञ डर्क कोस्टर आणि फॉकर यांच्या मदतीने लीझने नेदरलँड्समध्ये पलायन केले. डच सीमेवर आश्रयाने तिला प्रवास करण्यास भाग पाडले गेले, जेथे कोस्टरने जर्मन इमिग्रेशन अधिकाऱ्यांना राजी केले की तिला नेदरलँड्सला जाण्याची परवानगी द्यावी.  आपल्या मालमत्तेविना ती सुरक्षितस्थळी पोचली. तेव्हा तिच्या पर्समध्ये १० शिल्लिंग होते जेव्हा तिने जर्मनी कायमचे सोडले. ती निघण्यापूर्वी ऑट्टो हॅनने तिला आपल्या आईकडून वारसा मिळालेली हिराची अंगठी दिली होती: आवश्यक असल्यास सीमा रक्षकांना लाच देण्यासाठी हे वापरले जायचे. त्याची गरजच नाही पडली.  

जर्मनी सोडुन स्टॉकहोमध्ये आल्यावरची गोष्ट तुम्हाला माहितच आहे. हॅन्न सोबत काम करताना तिने निल्स बोरबरोबर काम केलं होतं. न्युक्लिअर फिशनमध्ये अल्बुचं म्हणजे आईनस्टाईनच  E=MC2 सुत्र फार उपयोगी पढल्याचं ती खुल्या मनानं कबुल करते. फ्रिसच ​​आणि रुडॉल्फ पियर्स यांनी फ्रिसच-पियर्स संकल्पना मांडली. ज्यामध्ये प्रथम अणूचा स्फोट कसा होतो हे स्पष्ट केले गेले आणि यामुळेच मॅनहॅटन प्रकल्पाची १९४२ मध्ये स्थापना झाली.  लॉटर अ‍ॅलामोस येथील प्रकल्पात काम करण्याची ऑफर मीटनर यांनी नाकारली आणि “मला बॉम्बबरोबर काही देणेघेणे नाही!” असे घोषित केले. हा खरा मानवतावादी स्टैंड म्हणता येईल. हा स्टैंड घेणारी ती एकटी नव्हतीच. आईनस्टाईनही सोबत होता. हिरोशिमा तिच्यासाठी धक्कादायक गोष्ट होती. बॉम्बचा शोध लागल्याबद्दल तिला वाईट वाटले. अर्थातच ती घटनाच जग हादरवणारी होती. स्वीडनमध्ये लिझ प्रथम सिगबहॅनच्या नोबेल इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्समध्ये सक्रिय झाली आणि स्वीडिश डिफेन्स रिसर्च आस्थापना (एफओए) आणि स्टॉकहोममधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे, जिथे तिची प्रयोगशाळा होती आणि स्विडनच्या पहिल्या अणुभट्ट्यावर संशोधन करण्यात भाग घेतला.  १९४७ मध्ये, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ स्टॉकहोम येथे प्रोफेसर म्हणुन काम केलं.

१९६८ मध्ये  वयाच्या ८९व्या वर्षी तिचा आणि हॅनचा मृत्यू काही महिन्यांतच झाला. दोघांची मैत्री (?) शेवटपर्यंत टिकली. पण एक गोष्ट इतिहासात कायमची ठळक झाली. ती म्हणजे जगात धार्मिक अल्पसंख्यांक आणि स्त्री असणं खुप महागड्या गोष्टी आहेत. त्यातला धर्म जीव घेऊन मारुन टाकतो, पण त्यातुन पळता तरी आलं तिला. पण बाई असणं खुप महागात पडलं लिझला. सख्या (?) मित्राकडुनच दगा मिळाला. असंच तर होत आलंय, सतत श्रेय लाटुन घेण्यात आलं बाईचं. फार कमी लोकांना ते देणं जमतं. अल्बर्ट आईनस्टाईन ने प्रयत्न केला मिलिव्हाला न्याय देण्याचा. नोबल समितिला मात्र ते जमलं नाही लिझला न्याय देणं. अडगळीतली नायिका अडगळीत फेकण्यात नोबल समितीनं फार मोठ्ठ योगदान दिलंय. आजच्या काळात लिझ असती तरी लाखो हॅशटॅग चालवुनही लिझला न्याय मिळाला असता की नाही, माहित नाही. 

लिझ, तुला महिला दिनाच्या शुभेच्छा. तुझ्यासाठी एवढंच करु शकते ही आजची महिला, तुला जगासमोर आणू शकते.