Quick Reads

विज्ञानायिका: 'उत्सर्जन'शील मरी क्युरी

मरी क्युरी नावाच्या विज्ञानायिकेचा प्रवास

Credit : अर्काइव्ह

परवाच वर्गात शिकवताना radioactivityचा, अर्थात उत्सर्जनाचा संदर्भ आला. त्यानंतर एका शाळेत गेले असताना, तिथल्या एका वर्गाला नाव दिलेलं होतं, मरी क्युरी. म्हणलं हिला कसं विसरु शकतो आपण? कारण महिला शास्त्रज्ञ म्हणलं की जगभरात आधी मरीचंच नाव घेतलं जातं. मला वाटतं सगळ्यात जास्त लोकांना माहित असलेली महिला शास्त्रज्ञ मरीच असावी. ७ नोव्हेंबर १८६७ रोजी वॉरसॉ, पोलंडमध्ये जन्मलेली मरी. ही पाच भावंडांमधली सर्वात लहान होती. तसंच ती एका गरीब पण सुशिक्षित कुटुंबात वाढली होती. 

अगदी लहानपणापासुच मरी अगदी हुश्शार म्हणावी अशी विद्यार्थीनी होती. पोलंड रशियाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा. मरी १० वर्षांची असतानाच तिची आई क्षयरोगाने मरण पावली. मरीने स्वतःला अभ्यासात पुरतं बुडवुन घेतलं. अर्थातच यात तिच्या वडिलांचा मोलाचा वाटा होता. त्याकाळी फिजिक्स आणि इतिहास हे विषय अभ्यासासाठी घेणं पाप होतं म्हणायला हरकत नाही कारण घरोघरी जाऊन रशियन सैनिक तपासणी करायचे लोकांच्या घराची. या सगळ्या प्रकारामुळं खरंतर आपल्यासारख्यांची हिंमतच झाली नसती शिकायची, मात्र मरी थोडीच सामान्य होती. ही विचित्र तपासणी टाळण्यासाठी किशोरवयीन मरीने 'फ्लोटिंग युनिव्हर्सिटी' नावाच्या एका गुप्त शाळेत शिकत असताना साहित्य, गणित या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला.

यात खरं श्रेय द्यायचं तर तिच्या वडिलांना. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या कुतूहलास उत्तेजन दिलं. आता शालेय शिक्षण झाल्यावर तिला महाविद्यालयात पाठवणं तिच्या वडिलांना परवडणारं नव्हतं. आपल्या शिक्षणाची सोय स्वतःच करावी म्हणून मरीने २४ वर्षापर्यंत काही कारकुनी काम केलं, २४ वयापर्यंत तिनं पुरेसे पैसे वाचवले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी पॅरिसला निघुन गेली. तिथंच तिने लॅटिन क्वार्टर येथे गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला. यानंतर तिच्या आयुष्याला वेगच आला. तिने स्वत:ला फ्रेंच भाषा आणि गणितामध्ये अक्षरशः वाहुन घेतले. १८८३मध्ये भौतिकशास्त्र आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी गणितामध्ये पदवी मिळविली.पदवीच्या शिक्षणानंतर तिनं फ्रान्सच्या तांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. या कॉलेजनं मात्र तिचं आयुष्य पुरतं बहरुन गेलं. कारण अगदीच सोप्पं आहे. प्रेमरोगाची लागण व्हायला सुरुवात झाली होती.

तिथं तिला ३५ वर्षीय भौतिकशास्त्रज्ञ पिएर क्युरी नावाचा अवलिया भेटला. त्यावेळी पिएर, क्रिस्टल्स आणि मॅग्नेटिझमचा अभ्यास करत होता. जवळपास दहा वर्षांपुर्वीच तो आणि त्याचा भाऊ जॅक यांना पायझोइलेक्ट्रिसिटी सापडली होती. पायझोइलेक्ट्रिसिटी म्हणजे प्रचंड प्रेशर असलेल्या घन पदार्थांमधला विद्युत चार्ज. पिएरला मरीच्या असामान्य बुद्धीनं वेडावलं नसतं तरच नवल. त्यानं एक पत्र लिहिलं, “(आपल्या नात्याची) ही एक सुंदर गोष्ट असेल, ती म्हणजे  आपल्या स्वप्नांमध्ये अगदी संमोहित जीवनातून एकत्र जाणं: आपल्या देशासाठी आपले स्वप्न, आपले मानवतेचे स्वप्न, आपले विज्ञानाचे स्वप्न एकत्रित पुर्ण करणे. ” आणि या पात्रातून तिला प्रपोज केलं. लवकरच त्यांचे कुटुंब आणि काही मित्र यांच्या उपस्थितीत लग्न झाले. लग्नानंतर दोन्ही नवराबायकोने पत्र्यातल्या वचनाप्रमाणं एकत्रित काम करण्यास सुरुवात केली. तिची पहिली मुलगी, आयरीन गर्भात असताना मरीचा Ph.D चा प्रबंध लिहिणं सुरु होतं. बाळंतपणामुळं तिला तसा कमीच वेळ मिळत होता. तशाही अवस्थेत ती काम करत होती. तशातच ती परत एकदा गरोदर राहिली. इव्हचा जन्म होईपर्यंत तिच्या सहकाऱ्यांमधली तिच्याबद्दलच्या तिरस्काराची भावना जास्तीच वाढीस लागली होती. त्यांना असे वाटत होते की तिनं लॅबमध्ये जास्त वेळ घालवला आहे आणि एक आई म्हणून नर्सरीमध्ये पुरेसा नाही. तिनं सगळ्या टोमण्यांकडे साफ दुर्लक्ष केलं. 

 

मरी, पिएर हे दोघंही आता बेकरलच्या युरेनियम घटकाच्या निरिक्षणांवरती काम करत होते. प्रथम, ती आणि इतर शास्त्रज्ञ उच्च-ऊर्जा उत्सर्जनाच्या स्त्रोताबद्दल चकित झाले. “युरेनियममध्ये कोणताही उल्लेखनीय बदल दिसून येत नाही, कोणतेही दृश्यमान रासायनिक परिवर्तन दिसून येत नाही, ते कमीतकमी पूर्वीसारखेच आहे, त्यामुळे त्यातून कोणती प्रारणे निघत असतील असे वाटत असतानाच तिचं मत बदललं. जरी ती प्रारणे थर्मोडायनामिक्सच्या मूलभूत कायद्याचं उल्लंघन करत होती, तरीही ती उत्सर्जित होणारी प्रारणे युरेनियम अणुंमधूनच निघत होती. अणूंचे क्षय म्हणून मिळणारे ते अणुंचे सब-ऍटॉमिक कण असल्याचं समजलं. तिच्या या सिद्धांतावर लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीचे ज्येष्ठ केमिस्ट, त्रिश बायस्डेन यांनी त्यास धक्कादायक प्रस्ताव म्हणून वर्णन केलं: “त्या वेळी ते खरोखरच आश्चर्यकारक आणि ठळक विधान होतं, कारण अणू हाच सर्वात प्राथमिक कण होता अशी समजूत होती, ज्याचं विभाजन करता येत नाही. याचा अर्थ असा होतो की सर्वच अणू स्थिर नसतात. क्यूरीच्या गृहीतकांमुळे पदार्थांच्या रचनेबाबतची वैज्ञानिक समज आणखी वृद्धिंगत होईल."

तेवढ्यातच पिएरनं आपल्या भावासोबत शोध लावलेल्या इलेक्ट्रोमीटरच्या मदतीनं युरेनियमच्या किरणांची तीव्रता मोजण्यासाठी यंत्र तयार केले.  या यंत्रानं तिला युरेनियम असलेल्या खनिज नमुन्यांजवळ हवेतील अत्यंत कमी विद्युत प्रवाह मोजण्याची क्षमता दिली. तिनं लवकरच थोरियमच्या प्रयोगाची पुनरावृत्ती केली, जे अशाच प्रकारचं वर्तन करताना दिसून आलं. परंतु असं दिसून आलं की युरेनियम आणि थोरियममधून उत्सर्जित होणार्‍या रेडिएशनची तीव्रता तिला तिच्या नमुन्यांमधील घटकांच्या प्रमाणावर आधारित अपेक्षेपेक्षा जास्त होती.  "मी असा विचार केला की या खनिजांमध्ये काही अज्ञात पदार्थ अतिशय सक्रिय असावा, माझे पती माझ्याशी सहमत झाले आणि मी आग्रह केला की आम्ही सामील झालेल्या प्रयत्नांनी परिणाम लवकर मिळू शकेल असा विचार करून आम्ही या काल्पनिक पदार्थाचा एकाच वेळी शोध घ्यावा." १९०८मध्ये तिने खरंच एक पदार्थ ओळखला आणि त्याचे नाव तिच्या जन्मभूमीवरून 'पोलोनियम' ठेवले.

पाच महिन्यांनंतर, तिनं एक दुसरा पदार्थ ओळखला, जो जगात 'रेडियम' म्हणून ओळखला गेला.  क्यूरी यांनी “रेडिओ-ऍक्टिव्ह” म्हणून अभ्यास केलेल्या घटकांचे वर्णन केले. पिएरनं आपल्या बायकोला हे किरणोत्सर्गी घटक वेगळे करण्यात आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी मदत करण्यासाठी त्याचं मूळ संशोधन बाजूला ठेवलं. मरीनं पिचब्लेंड मधून शुद्ध रेडियम क्षार काढलं, बोहेमियातील खाणींमधून मिळविलेले अत्यंत किरणोत्सर्गी धातू. ते शोधून काढण्यासाठी बेरीयम सल्फेट आणि इतर अल्कधर्मी पदार्थ मिळवण्यापूर्वी ते आम्लच्या कढईत विरघळत जाणाऱ्या पदार्थांची आवश्यकता होती, ज्यानंतर तिनं शुद्ध केले आणि क्लोराईडमध्ये रूपांतरित केले. चार वर्षांनंतर, मरीने एक डोंगर तयार होईल एवढं शुद्ध रेडियम गोळा केलं होतं. मोडलेल्या खिडक्या आणि कोंदट असलेल्या जीर्ण शेडमध्ये काम करुनही ती सटीक मोजमाप करण्यात सक्षम झाली. बायस्डन म्हणतो की, "इतक्या खराब संशोधनाच्या साधनांनीसुद्धा रेडियमच्या आण्विक वजनाची मोजणी मरीनं इतक्या अचूकपणे केली. तापमान आणि आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्यानं निःसंशयपणे इलेक्ट्रोमीटरवर परिणाम झाला परंतु मरीचा संयम व कठोरपणा त्यातून मार्ग काढत गेला."

या संयमाचं फळ तिला लवकरच मिळालं. १९०३ मध्ये मरी फ्रान्समधील भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळविणारी पहिली महिला ठरली.  रेडिएशन विषयी असलेल्या तिच्या डॉक्टरेट प्रबंधाचा आढावा घेणाऱ्या प्राध्यापकांनी घोषित केलं की आतापर्यंत लिहिलेल्या विज्ञानानातलं हे सर्वात मोठं योगदान आहे. एकतर बाई शिकणं कठीण, त्यात शिकली तरी तिला काम करु देणं याहुन कठिण. आणि समजा काम केलंच, तर तिला त्या कामाचं श्रेय देणं अधिकच कठिण. अशात नोबेल पुरस्काराच्या अफवा पसरण्यास सुरवात झाली नसती तर आश्चर्य. फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या काही सदस्यांनी या कामाचं श्रेय मरीला नव्हे तर तिच्या सहकाऱ्यांना दिलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्या नोबलचं बेकरेल आणि यांच्यात विभाजन व्हावं म्हणून शांतपणे लॉबींग करण्यास सुरवात केली.

यात तिच्या नवऱ्याला मानावं लागेल. त्यानं नोबेल समितीतील प्रभावशाली लोकांना आग्रह धरला की मरीने त्यांच्या संशोधनाची मूळ मांडणी केली, प्रयोगांची कल्पना केली आणि किरणोत्सर्गाचा स्वरूपाबद्दल सिद्धांत निर्माण केले. त्यामुळं तिचा पूरस्कार तिलाच मिळावा. पण तसं झालं नाही. बेकरेल यांच्याबरोबर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिके दोघांनाही मिळाली. एखाद्या महिलेला देण्यात आलेला हा पहिला नोबेल पुरस्कार होता. एवढ्यावरच आपण समाधान मानायचं. हे सुख आणि यश मात्र फार काळ टिकलं नाही. विज्ञानाच्या इतिहासातील एका पती-पत्नीमधील सर्वात यशस्वी हे सहकार्य अचानक संपलं. ट्रॅफिकमध्ये एका जोरदार गाडीने धडक दिल्यानं पिएर क्षणातच मरीवर संशोधनाची कामगीरी टाकुन निघुन गेला. या घटनेनं मरी पुरती कोसळली पण तरीही लवकर बाहेर आली. कारण पिएरचं ते पत्र तिच्या चांगलंच लक्षात होतं.

विधवेची पेन्शन स्वीकारण्याऐवजी मरीने सॉरबॉन इथं पिएरच्याऐवजी प्राध्यापक पद स्वीकारलं आणि तिथं शिकवणारी पहिली महिला ठरली. ५ नोव्हेंबर १९०६ रोजी शेकडो लोक-विद्यार्थी, कलाकार, छायाचित्रकार, सेलिब्रेटी-विद्यापीठाच्या बाहेर उभे होते. पण तिने शोक व्यक्त करण्याऐवजी भौतिकशास्त्राच्या संशोधनात नुकत्याच झालेल्या यशांचा सारांश देऊन प्रारंभ केला. ती म्हणाली, “जेव्हा जेव्हा गेल्या दशकात भौतिकशास्त्रातील प्रगतीचा विचार केला जाईल, तेव्हा वीज आणि पदार्थाबद्दलच्या आपल्या कल्पनांमध्ये या बदलांमुळे आश्चर्य वाटेल.” तिनं असं केलं कारण पिएरलाही दुःखाचा हा खेळ आवडला नसता. मरी आपलं दुःख जगभर दाखवुन सहानुभुती गोळा करणाऱ्यातली बिलकुल नव्हती. तिनं या काळात एक डायरी लिहिली, संशोधन चालू ठेवण्याविषयी त्यात बोलली. ती सतत पिएरशी डायरीमधुन बोलत राहिली.१९१० मध्ये, तिने किरणोत्सर्गीतेवरील ९७१ पानांचा एक ग्रंथ प्रकाशित केला.

शेवटी देश कोणताही असो, स्त्रीला सन्मान देणं हे फारच लाजिरवाणं वाटतं काही लोकांना. ती एवढी यशस्वी होऊनही वैज्ञानिक समूहातील काही पुरुषांनी तिला एक समान मानलं नाही. १९१० मध्ये तिनं फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यतेसाठी अर्ज केला आणि दोन मतांनी तिला नाकारण्यात आलं. भौतिकशास्त्रज्ञ एमिल अमागत या अकादमीच्या सदस्याने असा दावा केला की “महिला फ्रान्सच्या या प्रतिष्ठित संस्थेचा भाग होऊ शकत नाहीत.”  अनेक वार करुनही जर स्त्री यश मिळवतच असेल तर एक असा वार केला जातो जिथं कोणतीही स्त्री खचतेच, असा एकंदरित विचार घेऊन काही लोक जगत असतात. तो वार म्हणजे चारित्र्यावरचा संशय. मरी थांबत नव्हती. मग अफवा पसरली(?) की पिएरचा विद्यार्थी असलेल्या आणि पाच वर्षांनी ज्युनियर असलेल्या, प्रसिद्ध पेर्रेस्टियन पॉल लॅन्गेविन याच्याशी मरीचे प्रेमसंबंध होते.

 

 

लेंगेविनच्या पत्नीलाही संशयाने पछाडले. तिनं मरीकडून तिच्या पतीकडे आलेली प्रेमाची पत्रं शोधली आणि त्यांना एका टॅबलोइड वृत्तपत्राला दिली. या आणि इतर माध्यमांनी "लॅबोरेटरी मधील रोमांस" या सारख्या मथळ्यासह कथा सुरसपणे पोहवण्याचं काम अगदी चोख केलं. यावर काही बोलण्याऐवजी मरीनं तिच्या टीकाकारांना लिहिले, "माझे वैज्ञानिक कार्य आणि खाजगी जीवन यात काही संबंध नाही."या चर्चेचा अंत होतच नव्हता. एखादी मोठी घटनाच याला संपवेल असं वाटत असताना झालंही तसंच. मरीनं तिचं काम सोडलं नव्हतं. तिला दुसरं नोबल मिळालं. हा नोबल हा रसायनशास्त्राचा, पोलोनियम आणि रेडियमच्या शोधासाठी होता.  स्टॉकहोम येथील तिच्या स्वीकारलेल्या भाषणात तिनं आपल्या पतीला श्रद्धांजली वाहिली पण त्यांचे कार्य स्वतंत्र आहे, असं स्पष्ट केलं आणि त्यांचे स्वतंत्र योगदान दिले आणि त्यांच्या मृत्यूनंतरही तिने पिएरला त्याचे श्रेय दिले.

सतत धावपळ आणि  सततचा किरणोत्सारी पदार्थांचा सहवास यामुळं १९११ च्या शेवटी मेरी खूप आजारी पडली. तिच्या गर्भाशय आणि मूत्रपिंडातील जखम काढून टाकण्यासाठी तिच्यावर ऑपरेशन झालं आणि त्यानंतर बराच काळ तिला बरं वाटत होतं. १९१३ मध्ये, ती पुन्हा प्रवासाला निघाली आणि विज्ञानाकडे परत जाऊ लागली.  त्या वर्षाच्या मार्च महिन्यात आइन्स्टाईन यांनी तिला भेट दिली आणि नंतर तिने वॉर्सा येथे नवीन संशोधन सुविधा उघडली व त्याचं नेतृत्व केलं. पॅरिसमध्ये जेव्हा ती दुसरी इन्स्टिट्यूट स्थापन करीत होती तेव्हा प्रथम महायुद्ध सुरू झालं. तिनं युद्धात जखमी सैनिकांवर उपचार करणारी १८ पोर्टेबल एक्स-रे स्थानकं तयार केली.  तिनं कधीकधी स्वत: मशीन्स चालवल्या आणि दुरुस्त केल्या आणि युद्धाच्या वेळी आणखी २०० कायम एक्स-रे पोस्टची स्थापना केली.इव्ह पत्रकार झाली होती आणि तिनं १९३७ मध्ये मादाम क्युरी हे चरित्र लिहिलं.

आयरीननं पॅरिसमधल्या तिच्या आईच्या संस्थेत शिक्षण घेतलं आणि तिच्या आईच्या सहाय्यकाशीच लग्न केलं, त्यांना दोन मुले झाली. आयरिननं प्रयोगशाळेत काम करायला सुरुवात केली आणि १९३५ मध्ये आयरीन आणि फ्रेडरिक ज्युलियट-क्यूरी यांना नवीन किरणोत्सर्गी घटक संश्लेषित करण्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आता मात्र हा विक्रमच झाला. प्रथमच पालक आणि मुलांना स्वतंत्रपणे नोबेल पारितोषिक जिंकले होते. एकाच घरात चार जणांना नोबल मिळालं होतं.ज्या कामांसाठी तिला दोन नोबेल आहेत त्याच किरणोत्सारी प्रारणांच्या सहवासानं मरीचं शरिर पुरतं अशक्त झालं आणि ४ जुलैला तिचा त्रास कायमचा संपला. मरी जवळपास १०० वर्षांपूर्वी गेली मात्र ती आजही प्रत्येक महिलेसमोर तिची विज्ञानायिका म्हणून उभी आहे.