Mid West

आपदेत एकटा पडलेला सिरीया

पहिल्या १०० तासांत बंडखोर लष्कराच्या ताब्यातील सिरीयाच्या वायव्य भागात कोणतीही मदत पोहोचली नव्हती.

Credit : इंडी जर्नल

तुर्कीये आणि सिरीया सीमाप्रदेशात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण भूकंपानंतर तब्बल ४ दिवसांनी पहिल्यांदा, म्हणजे गुरुवारी, सिरीयामधील भूकंपबाधित भागात संयुक्त राष्ट्रसंघाकडून मदत घेऊन जाणारे ट्र्क पोहचू शकले. सिरीयामध्ये आपत्तीग्रस्तांना मदत करणारी संस्था ‘व्हाईट हेल्मेट्स’च्या सदस्यांच्या सांगण्यानुसार मोठ्या प्रमाणात हानी आणि मृत्यू झालेल्या सिरीयाच्या वायव्य भागात, भूकंप झाल्यानंतरच्या पहिल्या १०० तासांत कोणतीही मदत पोहोचली नव्हती.

जिथं एका बाजूला तुर्कीयेमधील भूकंपबाधितांच्या बातम्या आणि त्यांना पोहोचणारी मदत आपदेच्या पहिल्या दिवसापासूनच सुरु झाली होती, तिथं दुसरीकडे सिरीयाला पोहोचणाऱ्या मदतीबाबत मात्र जवळपास शुकशुकाटच होता. गुरुवारपासून जगातल्या वेगवेगळ्या भागांमधील लोकांनी #Syrians असा हॅशटॅग चालवत सिरीयामधील परिस्थितीकडे जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

तुर्कीये आणि सिरीयाच्या सीमाभागात सोमवारी सकाळी ७.८ रिश्टर तीव्रत्त्येचा भूकंप झाला. १९३९ पासूनचा हा सर्वात तीव्र भूकंप होता. या भागातील अनेक शहरांमध्ये यामुळं मोठी हानी झाली, तसंच दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या २२,००० च्या वर गेली आहे. यामधील ३,३७७ जण सिरीयामधले असल्याचं समजतं. मात्र ही संख्या मुख्यत्वे सरकारच्या ताब्यातील प्रदेशातली असून, सिरीयामध्ये झालेल्या हानीची तीव्रता पाहता हा आकडा खऱ्या आकड्याच्या आसपासही नाही, असा अंदाज आहे.

कडाक्याची थंडी, हिमवर्षाव आणि पावसामुळं बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. तरीदेखील तुर्कीयेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांमधून मदत आणि मनुष्यबळ पोहोचलेलं आहे. मात्र सिरीयामध्ये आंतरराष्ट्रीय मदतीचाही मोठा अभाव आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या तुर्कीये आणि सिरीयावरील उड्डाणक्षेत्राच्या फ्लाईट ट्रॅफिकच्या नकाशात तुर्कीयेवर विमानांची गर्दी, तर तितक्याच प्रभावित सिरीयाच्या उड्डाणक्षेत्रात एकही विमान दिसत नाही.

 

 

आंतरराष्ट्रीय असंवेदनशीलतेवर टीका

सिरीयामध्ये २००० सालापासून बशर अल असद यांची एकचालकीय सत्ता होती. त्यांच्या राजवटीविरोधात असलेला जनप्रवाह आणि अमेरिकाप्रणित नेटो राष्ट्रांनी बंडखोरांना केलेल्या साहाय्यातून २०११ साली सिरीयामध्ये गृहयुद्ध पेटलं. यामध्ये सिरीयाचं सरकार विरुद्ध बंडखोर इस्लामी मूलतत्त्वादी अशा बाजू पडल्या. असद यांनाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचं सहाय्य लाभलं.

या संघर्षातून सिरीयाची अर्थव्यवस्था आणि प्रशासन कोलमडून पडले. गेलं दशकभर सिरीया हे गृहयुद्ध तर झेलत आहेच, मात्र त्याचसोबत पाश्चिमात्य देशांनी सिरीयावर अनेक प्रकारचे व्यापार निर्बंध लावले. या निर्बंधांनी सिरीयाला एकटं पाडलं आणि आधीच संघर्षग्रस्त असलेलं सीरियन नागरिकांचं जीवन आणखी खडतर झालं.

 

 

सिरीयाच्या उत्तरेला तुर्कीये सीमेवरील प्रदेश हा बंडखोर लष्कराच्या नियंत्रणात आहे. यामुळं सीरियन सरकारनं गेली अनेक वर्ष, कोणतीही आंतरराष्ट्रीय मदत ही दमास्कस या राजधानीच्या शहरातूनच पुढं नेणं अनिवार्य केलं होतं. मात्र पाश्चिमात्य देशांना अशी भीती आहे की दमास्कस मार्फत नेलेली मदत सीरियन सरकार स्वतःच्या हितसंबंधांची वापरेल किंवा ती भ्रष्टाचारात हरवून जाईल.

त्यामुळं पाश्चिमात्य देश आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याकडून होणारी आजवरची मदत ही तुर्कीये सीमेवर असलेल्या एका मार्गावरून केली जात होती. मात्र हा मार्ग या भूकंपामध्ये उध्वस्त झाला आहे. त्यामुळं भूकंप प्रभावित वायव्य सिरीया भागात मदत पोहोचवणं आणखी कठीण जात आहे आणि जी रशिया, इराण इत्यादी देशांनी आत्तापर्यंत पाठवलेली मदत फक्त सरकार नियंत्रित प्रदेशांपर्यंत पोहोचल्याचं समजतं.

अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी सिरीयावर लादलेल्या विविध निर्बंधांमुळं बचावकार्य आणि मदत पोहोचवण्यात अडथळे येत असल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर यावरून जोरदार टीका सुरु झाली. त्यानंतर गुरुवारी अमेरिकेनं अनेक निर्बंध शिथिल केल्याचं जाहीर केलं. मात्र तरीदेखील अनेक वृत्तांनुसार संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या कडक प्रोटोकॉल्समुळं बंडखोर लष्कराच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात मदत पोहोचवणं कठीण आहे.

 

बिकट परिस्थिती

भूकंपाच्या धक्क्यांना आता काही दिवस उलटून गेले आहेत आणि अनेक वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे लोक भूकंपपीडित क्षेत्रांमध्ये शक्य तितकी मदत घेऊन पोहचू लागले आहेत. इथं पोहोचणार्यांनी नोंदवलेल्या प्रत्यक्षदर्शी अनुभवांनुसार इथली परिस्थिती ‘अत्यंत बिकट’ आहे.

या भागातील लोक आधीच गेला महिनाभर हिमवर्षावाशी झुंज देत होते. तिथलं तापमान गेले अनेक दिवस नेहमीच्या २ ते ३ अंशांहुन खाली जात -२ ते -३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. हा संघर्ष संपत नव्हता, त्यातच हे प्रचंड भूकंप इथं घडून आले.

आधीचा साचलेला बर्फ, निर्बंध, अवजारांची कमतरता, मनुष्यबळाची कमतरता असे एक ना अनेक अडथळे एकत्रितपणे उभे राहिले आणि इथल्या प्रभावित क्षेत्रांमध्ये मदतकार्य अशक्यप्राय होऊन बसलं. गेल्या सहा महिन्यात या भागात कोलेराची साथही येऊन गेली आहे. त्यामुळं भूकंपानंतर आता आरोग्याचंही संकट आ वासून उभं आहे.

सीमेच्या दोन्ही बाजूंच्या शहरांमध्ये राहणारे बहुतांश लोक युध्दामुळं निर्वासित झालेले नागरिक आहेत. इथं राहणाऱ्या हजारो नागरिकांची घरं आधी युद्धानं व आत्ता भूकंपानं उध्वस्थ झाली आहेत. त्याचवेळी हे प्रदेश बंडखोर लष्कराच्या ताब्यात असल्यानं इथं विशेष साधनसुविधाही नाहीत, त्यामुळं आपत्कालीन निवारेही उपलब्ध नाहीत. अशात इथल्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीत उघड्यावर किंवा तोकड्या निवाऱ्यांच्या आधारे जगण्याची वेळ आली आहे.

 

 

सीरियाच्या भूकंपबाधित प्रदेशातील वैद्यकीय तज्ञ आणि डॉक्टरांनी असं म्हटलं आहे की इथल्या नागरिकांना उपचार देण्यासाठी आवश्यक संख्येच्या २० टक्केही आरोग्य सुविधा इथं उपलब्ध नाहीत. जागतिक अन्न उपक्रमानं म्हटलं आहे की वायव्य सिरीयामध्ये उपलब्ध अन्नाचा साठादेखील संपत आलेला आहे. व्हाईट हेल्मेट्सच्या माहितीनुसार दमास्कसला  मदतीतून या प्रांतांपर्यंत अजून तरी विशेष मदत पोहोचू शकलेली नाही.

 

तुर्कीयेमध्येही सिरियन्सचा संघर्ष

तुर्कीयेच्या दक्षिण भागात सिरीया सीमेलगत गेल्या दशकभरात अनेक सिरीयन नागरिक पलायन करून आश्रित म्हणून राहत आहेत. इथले अनेक कसबे या सिरीयन आश्रितांच्या वस्त्या आहेत. याच क्षेत्रात भूकंपाचे धक्के तीव्र असल्यामुळं या वस्त्याही उध्वस्त झाल्या आहेत.

तुर्कीयेतील एक महत्त्वाचं शहर म्हणजे अंताक्या. या शहरातही आश्रयास असलेले सीरियन नागरिक मदतीविना बेहाल आहेत. आलेल्या अनेक वृत्तांच्या मते या सिरीयन आश्रितांना बचावकार्य करणारे, डॉक्टर, पोलीस असं कोणीच सापडत नसल्याचं सांगितलं जात आहे. सोमवार सकाळपासून त्यांना उघड्यावर दिवस काढावे लागत आहेत. हातेय प्रदेशात ५ लाख सीरियन आश्रित आहेत. या आश्रितांनी अनेक वर्ष आपल्या मेहनतीनं पै-पै जमवत आपले संसार पुन्हा उभे केले. आता हा संपूर्ण प्रदेश भूकंपप्रभावित झाला आहे. इथं असलेले सीरियन आश्रित म्हणत आहेत, ‘तिकडं बॉम्बवर्षावातून वाचलो, इथं भूकंपात मेलो!”