India

थिरुवअनंतपुरम महापालिकेला मिळणार सर्वात तरुण महापौर

२१ वर्षीय आर्या राजेंद्रन करणार पालिकेचं नेतृत्व.

Credit : Facebook

केरळमधील २१ वर्षीय तरुणी आर्या राजेंद्रन थिरुवअनंतपुरम महानगरपालिकेची निवडणूक जिंकून आता महापौर बनण्याच्या मार्गावर आहे. मुदवनमुगल या वॉर्डमधून ती नगरसेवक म्हणून निवडून आली आहे. बी.एस.सी. (गणित) च्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेली आर्या आता महापौर म्हणून थिरुवअनंतपुरम महापालिकेचं नेतृत्व करेल.

 

 

आर्या ही केवळ केरळमधलीच नाही तर भारतातली सगळ्यात तरुण महापौर ठरणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेत काम करणाऱ्या आर्यानं मागील आठवड्यात केरळमध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकांत भाग घेतला होता. माकपच्या जिल्हा कमिटीनंच उमेदवारीसाठी तिच्या नावाची शिफारस केली होती. आर्या सध्या थिरुवअनंतपुरमच्या ऑल सेंट्स महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात तर आई एलआयसी प्रतिनिधी आहे.

थिरुवअनंतपुरमच्या महापालिका निवडणुकांत डाव्या आघाडीला शंभरपैकी ५२ जागा मिळाल्या आहेत. नेहमीपेक्षा हा निकाल वेगळा आहे, कारण एसएफआय या विद्यार्थीसंघटनेत काम करणाऱ्या आर्याला वयाच्या एकविसाव्या वर्षीच पालिकेचं नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. याआधी मेकला काव्या या २६ वर्षीय तरुणीला तेलंगणामध्ये जवाहरनगर महापालिकेत महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. मेकला तेव्हा देशातली सगळ्यात तरुण महापौर ठरली होती, आता तिचा विक्रम आर्यानं मोडला आहे.