Quick Reads

टेक्नॉलॉजीच्या विश्वातलं २०२१ साल

२०२१ चा मागोवा घेणारी मालिका

Credit : Shubham Patil

शुभम पाटील । विज्ञान आणि तंत्रज्ञान हे स्वभावतःच कालानुरूप अधिकाधिक प्रगत आणि प्रसिद्ध होत जातं. मात्र कोव्हीड-१९ पँडेमिकमुळं तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि बाजारपेठेला विशिष्ट असं वळण मिळालं. संगणक, स्मार्टफोन्स यांची मागणी तर वाढलीच, सोबतच झोमॅटो, स्विगी, ओला या कंपन्यांनी त्यांच्या ऍप्सद्वारे अधिक सुविधा निर्माण करत पँडेमिकमधील या मध्यमवर्गीय जीवनशैलीला अनुकूल केलं.

 

सेमीकंडक्टर शॉर्टेज

मागच्या वर्षी संगणकांच्या मागणीत वाढ होत असताना त्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सेमीकंडक्टर्सच्या तुटवड्यामुळे पुरवठाव्यवस्थेवर मोठा ताण आला. जवळपास सर्वच वैयक्तिक आणि व्यावसायिक संगणकांच्या प्रोसेसर, मेमरी, ग्राफिक्स चिप्स या सेमीकंडक्टर्सवर आधारित असतात. टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव्ह, वैद्यकीय व सुरक्षा उपकरणं अशा इतरही अनेक छोट्या-मोठ्या विद्युत उपकरणांमध्ये हे मायक्रोकंट्रोलर्स आणि मायक्रोप्रोसेसर चिप्स वापरल्या जातात. त्यामुळं संगणक उद्योगासोबतच इतर इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग, वेगवेगळ्या देशांच्या सरकारी व्यवस्था यांच्यावरही या तुटवड्याचा परिणाम झाला, जो २०२१ मध्ये कायम राहिला. सेमीकंडक्टर्स चिप फॅब्रिकेशन हे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या क्लिष्ट असल्यानं या उद्योगाचं केंद्रीकरण दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांमध्ये झाल्यामुळंही हा तुटवडा जास्त गंभीर झाला. मागणी कमी असूनसुद्धा याचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसला.

 

'फ्रॉम होम' जीवनशैलीसाठी नवी उपकरणं

कोव्हीड-१९ पँडेमिकमध्ये प्रचलित झालेल्या वर्क अँड स्टडी फ्रॉम होम (म्हणजे घरूनच काम आणि शिक्षण) या पद्धतींमुळं डेस्कटॉप आणि लॅपटॉप संगणक, टॅब्लेट्स, मोबाईल फोन्स या उपकरणांची मागणी प्रचंड वाढली. बऱ्याच घरांमधील विविध गॅजेट्स् अपग्रेड झाले. बाजाराची गरज ओळखून शाओमी, रिअलमी, नोकिया अशा ब्रॅंड्सनी पहिल्यांदाच भारतात आपले अद्यायावत लॅपटॉप्स आणि टॅब्लेट्स अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून बाजारपेठेत आपलं स्थान तयार केलं. फक्त फ्लिपकार्ट-ऍमेझॉन सारख्या ईकॉमर्स वेबसाइट्स द्वारेच त्यांनी हे संगणक वितरित केल्यानं त्यांना प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोचता आलं. एचडी स्क्रीन्स, कमी वजन, आणि आकर्षक किंमत ही या नव्या उत्पादनाची ठळक वैशिष्ट्यं ठरली. अनेक वर्षांनंतर संगणक आणि टॅबलेट विक्रीचे उच्चांक या वर्षी गाठले गेले.

 

विंडोज ११: मायक्रोसॉफ्टचं पुढचं पाऊल

ऑक्टोबर महिन्यात मायक्रोसॉफ्टनं त्यांची कंप्युटर ऑपरेटिंग सिस्टिम 'विंडोज' याची पुढची आवृत्ती - 'विंडोज ११' - बाजारात आणली. विंडोज १० आणि विंडोज ११ यांच्यात बऱ्याच प्रमाणात साम्य असलं तरी काही महत्वाचे बदल या नव्या आवृत्तीत आलेत. यांत नवीन टास्कबार आणि स्टार्ट मेन्यूचं नवं डिझाईन, येऊ घातलेलं अँड्रॉइड ऍप्प सपोर्ट, नवी अपडेट साखळी यांचा समावेश आहे. मात्र या व्हर्जनसाठी लागणाऱ्या हार्डवेअरच्या आवश्यकतांमधील TPM २.० नावाच्या सेक्युरिटी मोड्युलची अट वादग्रस्त ठरली. गेल्या ५-६ वर्षांत विकसित झालेले संगणकच ही अट पूर्ण करू शकत असल्यानं अनेक लेगसी, म्हणजेच जुने संगणक, विशेषतः लॅपटॉप्स, हे विंडोजमधील नवीन फीचर्स आणि सुरक्षिततेच्या अपडेट्स ना मुकतील अशी भीती व्यक्त केली गेली.

 

 

ऍप्पलची संगणक तंत्रज्ञानात घोडदौड

ऍप्पलनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवे आयफोन, आयपॅड लाँच केले. मागच्या वर्षी सादर केलेल्या M1 चिपवर आधारित बनवलेले मॅक कॉम्प्युटर्स हे याही वर्षी खास चर्चेचा विषय ठरले. मॅक संगणकांच्या प्रोसेसरसाठी इंटेलसोबत असलेली भागीदारी मोडत काढून स्वतः विकसित केलेली ही सिस्टिम-ऑन-अ-चिप (SoC) लोकप्रिय ठरली. स्पर्धेतील इतर प्रोसेसर्सपेक्षा अधिक शक्तिशाली ठरलेल्या या चिपच्या पुढच्या पिढीची, M2 ची वाट तंत्रज्ञानप्रेमी बघत होते. मात्र ऍप्पलनं नवे मॅकबुक प्रो लॅपटॉप्स लाँच करत असताना M1 Max आणि M1 Pro या नव्या SoC सादर केल्या, ज्यांच्या परफॉर्मन्सनं अनेक विक्रम मोडत काढले. शिवाय पोर्ट्सच्या कमतरतेवरून सतत टीका होत असणाऱ्या मॅकबुक्स मध्ये यावर्षी अनेक जुन्या पोर्ट्सची घरवापसी सुद्धा झाली, ज्याचं सगळीकडूनच स्वागत झालं.

 

व्हॉट्सअँपची नवी प्रायव्हसी पॉलिसी

२०२१ च्या सुरुवातीला व्हॉट्सअँपनं आपल्या युझर्सना आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलीसीबद्दल सूचित केलं. ती मान्य न केल्यास मे महिन्यात त्या युझर्सचे अकाऊंट्स बंद होतील अशी ताकीदसुद्धा दिली गेली. या नव्या गोपनीयतेच्या धोरणांमधले बरेच मुद्दे वादग्रस्त ठरले, व्हॉट्सअँपवरील संवाद एनक्रिप्टेड असला तरी युझर्सबद्दलची इतर माहिती फेसबुकसोबत सामायिक करण्याची तरतूद भुवया उंचावणारी होती. भारताच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयानंदेखील या धोरणांची दाखल घेत व्हॉट्सअँपला नोटीस पाठवली. अखेर व्हॉट्सअँपनं ही नवी पॉलिसी काही काळासाठी तरी मागे घेतली.

 

फेसबुक: इंटू द मेटाव्हर्स

फेसबुक, व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम, ओक्युलस या कंपन्यांची पॅरेन्ट कंपनी असलेल्या फेसबुकनं गेल्या काही महिन्यांत गोपनीयतेवरून, खोट्या बातम्यांच्या अटकाव धोरणावरून तसंच कारभाराच्या पद्धतीबद्दल होत असणारी टीका आणि डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी तसंच भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपली ओळख बदलत कंपनीचं नामकरण 'मेटा' असं केलं. फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम या आपल्या सर्व्हिसेस सोबतच व्हर्चुअल आणि ऑग्युमेंटेड रिऍलिटी तंत्रज्ञान वापरून एका वेगळ्या आभासी जगाची, मेटाव्हर्सची निर्मिती करणं हे या नव्या कंपनीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या जगात प्रत्येक व्यक्तीचा एक आभासी 'अवतार' इतर लोकांशी त्यांच्या अवतारांमार्फत आणि आभासी वस्तूंद्वारे संवाद साधेल. ही संकल्पना जितकी फ्युचरिस्टिक आणि रोमांचक वाटते, तितकीच ती सामाजिकदृष्ट्या नव्या अडचणी उभ्या करणारी आहे, हे 'मॅट्रिक्स'सारख्या डिस्टोपिअन, सायन्स-फिक्शन फिल्म्समधून आपण पाहिलंच आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्ट नुसार फेसबुक-मेटाच्या या आभासी जगातही स्त्रियांची छेड काढली जातेय. त्यामुळं या मेटाव्हर्सची रचना करताना मार्क झकरबर्गच्या या जुन्या-नव्या कंपनीनं सुरक्षितता, गोपनीयता या बाबतींत आपले पहिले पाढेच पुन्हा गिरवल्याचं दिसलं.

 

 

इलेक्ट्रिक वाहनांना गती

COP26 या जागतिक पर्यावरणीय परिषदेत पंतप्रधान मोदींनी २०७० सालापर्यंत भारत नेट झिरो कार्बन उत्सर्जित करेल अशी घोषणा केली. या उद्दिष्टाचाच एक भाग म्हणून भारतातील केंद्र तसंच राज्य सरकारांनी आपापल्या इलेक्ट्रिक वाहनांबद्दलची धोरणं जाहीर केली. यात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या उत्पादकांना जाहीर झालेला प्रोडक्शन लिंक्ड इंसेन्टीव्ह (PLI), आणि FAME-II अंतर्गत प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर मिळणारी सवलत यांचा समावेश आहे. या योजनांमुळे काही काळ का होईना, बॅटरी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनाच्या किंमतीतील फरक बराच कमी झालाय. याच दरम्यान अनेक नव्या इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी भारतीय बाजारपेठेत सादर केल्या गेल्या. कॅब सर्विस ओलानेसुद्धा आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली. तर टाटा आणि एम.जी. या कंपन्यांनी नव्या इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या. या वाहनांमधल्या प्रगत सुविधा, कमी देखभाल खर्च आणि खरेदीवरील सवलती या मुद्द्यांवरून ग्राहकांनीही या वाहनांना चांगला प्रतिसाद दिला. सरकारच्या वाहन डॅशबोर्ड नुसार २०२१ मध्ये एकूण ३ लाख २ हजार ९७१ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झालीय. 

 

नव्या आयटी रुल्सची टांगती तलवार

भारत सरकारनं २०११ मधील IT रुल्समध्ये मोठे बदल करत ड्राफ्ट Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021 समोर आणले आणि मे महिन्यात ते एका अध्यादेशाद्वारे लागू केले. ह्या नव्या तांत्रिक मध्यस्थीबाबतच्या तरतुदी गंभीर वादाचा विषय ठरल्या. यातील तरतुदींप्रमाणं  नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरसुद्धा सरकारची नजर असणार आहे. शिवाय सोशल मीडियावरही सरकारनं आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ५०,००० पेक्षा जास्त युझर्स असलेल्या अँप्ससाठी सरकारनं नवी नियमावली यात नमूद केलीय. जर सरकारला या माध्यमांकडून काही माहिती हवी असेल तयार त्याची २४ तासांच्या आत त्याची दखल घेणं आणि १५ दिवसांच्या आत ती माहिती पुरवणं बंधनकारक केलंय. त्यातही व्हाट्सऍपसारख्या इन्स्टंट मेसेजिंग ऍप्सना कुठल्याही संदेशाची पूर्ण माहिती तसंच तो संदेश पाठवणारी व प्राप्त करणारी व्यक्ती यांची माहिती जवळ ठेवणं आणि ती सरकारला पुरवणं हेसुद्द्धा बंधनकारक केलं, जे यासारख्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन असलेल्या ऍप्स साठी अशक्य आहे.

 

नासाच्या नव्या अवकाशदुर्बीणीचं प्रक्षेपण

 

 

अंतरिक्ष संशोधनात मोलाची भूमिका बजावलेल्या 'हबल' टेलिस्कोपनंतर जवळपास दोन दशकं विकसित होत असलेल्या जेम्स वेब दुर्बीणीचं प्रक्षेपण २५ डिसेंबर रोजी झालं. ही दुर्बीण पृथ्वीपासून सुमारे दहा लाख किलोमीटरवर स्थित होणार आहे, ज्यानंतर आपण यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवकाशाचा वेध घेऊ शकणार आहोत. या दुर्बीणीची अनोखी रचना ओरिगामी कलाप्रकारावरून प्रभावित झालीय.

२०२१ हे वर्ष अनेक रोमांचक आणि आकर्षक नव्या तांत्रिक उत्पादनांनी तर तितक्याच गंभीर समस्यांनी भरलेलं होतं. मात्र या सर्वात इंटरनेट हा फारच महत्त्वाचा सामायिक दुवा होता. त्यामुळे २०२२ या वर्षी इंटरनेट आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात, प्रशासनात कशा स्वरूपाची भर पाडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.