Africa

सामिया सुलुहु हसन बनल्या तांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

माजी राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफुली यांच्या अकस्मात मृत्यूनंतर बुधवारी त्यांची निवड करण्यात आली.

Credit : Reuters

तांझानियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफुली यांच्या अकस्मात मृत्यूनंतर सामिया सुलुहु हसन यांची देशाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून बुधवारी निवड करण्यात आली. सुलुहु या तांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. तांझानियाची आर्थिक राजधानी दार-एस-सलाम इथल्या सरकारी मुख्यालयात हा शपथविधी पार पडला, त्यानंतर नव्या राष्ट्राध्यक्षांना सैन्याकडून २१ तोफांची सलामी देऊन सन्मानित करण्यात आलं.  

सामिया सुलुहु या राष्ट्रपती बनण्याआधी २०१५ साली निवडणूक जिंकून तांझानियाच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या होत्या, त्यानंतर २०२० च्या निवडणुकीतही त्यांनी व मागुफुली यांनी सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं होतं. २०१० ते २०१५ या वर्षात त्या माकुदूची मतदारसंघाच्या खासदार होत्या आणि त्याचसोबत गृहराज्यमंत्री देखील राहिल्या आहेत. त्यांच्या जन्म तांझानियाच्या झांझिबारमध्ये २७ जानेवारी १९६० रोजी झाला. 

तांझानियाच्या संविधानानुसार, सुलुहु या २०२५ पर्यंतचा मागुफुली यांचा कार्यकाळ राष्ट्राध्यक्ष म्हणून पूर्ण करतील आणि सत्तेत असलेल्या चमा चा मापिंडूझी पक्षाशी सल्लामसलत करून त्या आपला उपराष्ट्राध्यक्ष निवडतील. या निवडीनंतर आलेल्या नावावर संसदेत मतदान होईल आणि ५० टक्क्यांहून अधिक मतांनी विजय झाला तरच त्यांना उप्राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडता येईल. 

 

 

त्यांच्या शपथविधीला झांझिबारचे राष्ट्राध्यक्ष हुसेन मिंव्यि, प्रधानमंत्री कासीम मजलीवा, तांझानियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि इतर अधिकारी व राजकीय नेते उपस्थित होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमाला हॅरिस यांनीदेखील ट्वीट करून सुलुहु हसन यांचं अभिनंदन केलं आहे. हॅरिस या स्वतःदेखील अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आहेत.