Quick Reads

‘सुपर डिलक्स’ : एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव

स्पॉटलाईट सदर

Credit : Tyler Durden and Kino Fist

प्रत्येक चित्रपटाचं स्वतःचं असं कथाविश्व असतं, आणि अनेकदा त्या कथाविश्वाचं स्वतःचं असं तर्कशास्त्र असतं. हे विश्व कधी आपलंच वास्तव असू शकतं; कधी आपल्या वास्तवाची हुबेहूब नक्कल असू शकतं, तर काही वेळा पूर्णतः काल्पनिक असू शकतं. त्यामुळे आपण प्रत्येक चित्रपटाकडे एकाच विशिष्ट दृष्टिकोनातून पाहू शकत नाही. म्हणजे सलमान खानच्या सिनेमाकडे आपण इंगमर बर्गमन किंवा गेला बाजार सत्यजित रेंच्या चित्रपटाकडे ज्या नजरेनं पाहतो, त्या नजरेतून पाहणं योग्य ठरत नाही. या चित्रपटांची कथाविश्वं कितीही भिन्न असली तरी त्यांच्यातील वास्तव आणि मानवी भावना मात्र सारख्या असूच शकतात. पण त्यावरूनही अशी तुलना न्याय्य ठरत नाही. दुसरं म्हणजे, बहुतांशी वेळा व्यावसायिक चित्रपट हे पलायनवादी (एस्केपिस्ट) भूमिकेतून बनवलेले असतात. त्यामुळे त्यात समांतर किंवा तत्सम चित्रपटांतून दिसणाऱ्या वास्तववादाची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसतो. अशावेळी व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवलेला किंवा तशा घटकांचा समावेश असलेला एखादा चित्रपट त्याच्या अंतर्गत तर्कशास्त्राशी प्रामाणिक असेल, आणि प्रभावीपणे हाताळलेला असेल तर तो नक्कीच परिणामकारक ठरू शकतो. उदाहरणार्थ, काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला वासन बाला दिग्दर्शित ‘मर्द को दर्द नहीं होता’ अशाच काही स्टायलिस्टिक चित्रपटांमध्ये मोडतो. 

सांगायचा मुद्दा असा की, जर चांगल्या रीतीने हाताळले गेलेले, आणि किमान स्वतः निर्माण केलेल्या विश्वाशी सुसंगत अशा तार्किकतेला थारा देणारे व्यावसायिक चित्रपटही फॅसिनेटिंग असूच शकतात. ‘मर्द को दर्द नहीं होता’ प्रदर्शित झाला, त्याच्याच पुढच्या आठवड्यात आलेला ‘सुपर डिलक्स’ अशाच काही फॅसिनेटिंग आणि प्रभावी चित्रपटांमध्ये मोडतो. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो उपलब्ध झाला तोवर त्याचं बरंच कौतुक आणि - ‘इंडियन पल्प फिक्शन’ असं वर्णन ऐकून तो पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. अँड आय मस्ट अॅडमिट, ‘सुपर डिलक्स’ त्याच्या दिग्दर्शकाची विशिष्ट अशी शैली, त्यातील तितक्याच विशिष्ट आणि रंजक अशा संकल्पना यांमुळे केवळ पहावासाच ठरत नाही, तर या वर्षीच्या काही सर्वोत्तम भारतीय (आणि अधिक विस्तृतपणे बोलायचं झाल्यास अगदी जागतिक चित्रपटांच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या) चित्रपटांमध्ये मोडतो. 

‘सुपर डिलक्स’च्या प्रभावामध्ये त्याच्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या, नॉन-लिनीअर कथानकाचा जितका वाटा आहे, तितकाच दिग्दर्शक त्यागराजन कुमारराजा (ज्याचा ‘आरण्य कांडम’ (२०१०) हा चित्रपटही प्रसिद्ध आहे.) दृश्य आणि संकल्पनात्मक पातळीवर या कथानकाची हाताळणी ज्या तऱ्हेने करतो, त्या शैलीचाही आहे. सदर चित्रपटाचं कथानक म्हणजे साधारण इतर चार उपकथानकांची केलेली गुंफण आहे. यातील पहिलं प्रकरण म्हणजे वेम्बु (समॅन्था अक्किनेनी) आणि तिचा पती मुगिल (फहाद फाझिल) यांची कथा. - वेम्बु कधीकाळीच्या तिच्या प्रियकराला आपल्या पतीच्या गैरहजेरीत स्वतःच्या घरी बोलावते - हे एकोळी कथानक म्हणजे या प्रकरणाची मध्यवर्ती संकल्पना. तर दुसरं प्रकरण - बालाजी (विजय राम), मोहन (जयंत), सूरी (नवीन), वसंत (नोबल के. जेम्स) आणि थुयवन (अब्दुल जब्बार) - या पाच मित्रांभोवती फिरणारं आहे. शाळा बुडवून पॉर्न फिल्म पाहण्याच्या त्यांच्या तयारीपासून सुरु झालेल्या प्रकरणाला काही कारणाने काहीसं गडदरीत्या हास्यास्पद वळण प्राप्त होतं, आणि हाच ट्विस्ट या प्रकरणातील (आणि एकूणच चित्रपटातील) एक महत्त्वाचं उत्प्रेरक ठरतो. 

तिसऱ्या प्रकरणाची सुरुवात होते ती रासकुट्टी (अश्वांत अशोककुमार) हा सात/आठ वर्षांचा मुलगा आपल्या पित्याच्या, माणिकमच्या (विजय सेतुपती) घरी येण्याची वाट पाहत असल्यापासून. कथा पुढे सरकत असताना माणिकम बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या पत्नीला, ज्योतीला (गायत्री शंकर) सोडून गेलेला असल्याचं कळतं. तो परत येतो, मात्र एक ट्विस्ट सोबत घेऊनच. 

तर, चौथं आणि शेवटचं कथानक लीला (रम्या कृष्णन) आणि तिचा पती धनशेखरन (मैस्कन) यांच्याभोवती फिरतं. यातील ट्विस्ट म्हणजे दुसऱ्या प्रकरणातील सूरी या दोघांचा मुलगा असतो. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे ही सारी कथानकं एकमेकांवर ओव्हरलॅप व्हायला सुरुवात होते, आणि लेखक-दिग्दर्शकाने निर्माण केलेल्या नियंत्रित स्वरूपाच्या गोंधळाला (कंट्रोल्ड केऑस) सुरुवात होते. हा गोंधळ नियंत्रित असूनही तो अनियंत्रित आहे असा यशस्वी आभास निर्माण करण्यात लेखक-दिग्दर्शकाचं खरं यश आहे. श्रीराम राघवननेही ‘अंधाधुन’मध्ये (२०१८) असंच काहीसं यशस्वीपणे साध्य केलं होतं. 

यापलीकडे जाऊन चित्रपटाला नितांतसुंदर बनवण्यात पी. एस. विनोद-नीरव शाह यांचं छायाचित्रण आणि विजय आदिनाथनच्या कला दिग्दर्शनाचा महत्त्वाचा वाटा आहे. किंबहुना या पलीकडे जाऊन संगीत, ध्वनी आरेखन, दृश्यचौकटीला साजेशी पात्रांची वेशभूषा, इत्यादी सिनेमाची इतर अंगंही इथे तितक्याच परिणामकारक स्वरूपात समोर येतात. मुख्य म्हणजे ती दिग्दर्शकाला अपेक्षित असलेल्या चित्रपटाच्या निर्मितीस पूरक ठरतात. 

अर्थातच त्यागराजन कुमारराजाचं थक्क करणारं दिग्दर्शन ‘सुपर डिलक्स’ला फॅसिनेटिंग बनवण्यामागील महत्त्वाचं कारण आहे. कारण हा वेडा माणूस ज्या पद्धतीने सुरेख अशा दृश्यचौकटींची निर्मिती करतो; किंवा एवढी उपकथानकं असलेल्या चित्रपटात त्यांची ज्या तऱ्हेनं गुंफण करतो; किंवा त्यामध्ये देशी-विदेशी चित्रपटांचे संदर्भ ज्या अफलातूनपणे समाविष्ट करतो ते मुळातच नको तितकं परिपूर्ण आणि निखालस असं आहे. उदाहरणार्थ, एका दृश्यात तो व्हिडीओ लायब्ररीमध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘बदलापूर’, ‘स्टॉकर’, ‘किल बिल’, ‘शोले’, ‘सिम्पथी फॉर मि. व्हेंजिअन्स’ अशा चित्रपटांची पोस्टर्स एकत्र आणतो. अनुराग कश्यप, श्रीराम राघवनपासून ते क्वेंटिन टॅरंटिनो, डेव्हिड लिंच आणि आंद्रे तार्कोव्ह्सकी सगळे एकाच दृश्यचौकटीत! किंवा नंतर एका दृश्याच्या पार्श्वभूमीवर ‘स्टार वॉर्स’च्या थीमचं भारतीय वाद्यं वापरून तयार केलेलं कव्हर आपल्याला ऐकवतो. ज्यातून त्याच्या तीक्ष्ण विनोदबुद्धीची कल्पना येते. (खुद्द त्याच्या प्रॉडक्शन कंपनीच्या नावावरूनही, ‘टायलर डर्डन अँड किनो फिस्ट’, त्याच्या चित्रपटप्रेमाची कल्पना येऊ शकते.)

हेच त्याच्या लिखाणात दिसतं. त्याच्या लिखाणाला एक गडद अशी छटा आहे. ते विनोदी तर आहेच, पण सोबतच तीक्ष्ण अशी निरीक्षणं मांडणारं आहेत. काहीवेळा पूर्ण दृश्य अशा तऱ्हेच्या विनोदी एकोळीतून उभं राहतं, तर काहीवेळा गंभीर दृश्यांतील संवादांमधून त्याचा तिरकस विनोद डोकावतो. त्याची विनोदबुद्धी कधी तिरकस आहे, तर कधी वैचित्र्यपूर्ण. तरीही बहुतांशी सगळ्याच वेळी तितक्याच परिणामकारक ठरण्यात त्याचं यश आहे. चित्रपटाचा शेवट त्याच्या परिपूर्ण अशा चित्रात काहीसा खटकणारा आणि तितक्या उत्तमरीत्या जमून आलेला नाही, हाच काय तो एकमेव दोष या तीन तास लांबीच्या चित्रपटात आढळेल. मात्र, या शेवटातही अशाच तिरकस विनोदाची गुंफण करत चित्रपटभर पसरलेल्या देव, धर्म, नैतिकता-अनैतिकतेच्या संकल्पनांवर तो जी टिप्पणी करतो, ती समर्पक वाटते. 

बाकी ‘सुपर डिलक्स’ किती परिपूर्ण आणि रंजक आहे यासाठी तो थेट पाहणं आणि अनुभवणं गरजेचं आहे. तर आणि तरच तो या वर्षीच्या काही सर्वोत्तम भारतीय चित्रपटांमध्ये मोडतो, असं मी का म्हणतोय हे लक्षात येऊ शकेल.