India

उसतोड कामगारांच्या खोप्यात चोरी, कामगारांवर उपासमारीची वेळ

चोरीचा गुन्हा दाखल करण्याची संघटनेची मागणी.

Credit : Indie Journal

 

कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातल्या अब्दुललाठ गावात उसतोडीसाठी आलेल्या कामगारांच्या खोप्यागेल्या आठवड्यात लुटल्या गेल्या. पोटापाण्यासाठी स्थलांतर करून आलेल्या या उसतोड कामगारांकडे पोटापुरती जेमतेम शिदोरी अन जेमतेम रक्कम असते. पण फडावर कसलीच सुरक्षा नसल्याने चोरांनी मिळेल ती वस्तू, धान्य, रक्कम अन किरकोळ सोनं चोरून नेलं. फडावर मुलभूत सोयी आणि सुरक्षा मिळाव्यात या मागणीला साखर कारखाने आणि शासन केराची टोपली दाखवत आलेत. पण किमान अशा घटनांनंतर तरी सरकारचं काळीज हलेल का असा प्रश्न फडावरच्या महिला कामगार करत आहेत.

या घटनेची माहिती ३६ वर्षीय सविता गव्हाणे यांनी दिली. सविताताई यांचं मुळगाव बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातलं पिंपळगाव. मागच्या तेरा चौदा वर्षांपासून त्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ऊसतोडीचं काम करताहेत.

 

 

सविताताई सांगतात, "आमच्या टोळीत लहानथोर मिळून तीस बत्तीस जण आहेत. आम्ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातल्या अब्दुललाठ गावात पोचलो. बीडवरून निघतानाच आम्ही पदरमोड करून फडावर दोन महिने पुरेल इतके गहू, बाजरी, डाळीं असं धान्यसामान घेऊन आलो. पण इथंश्री. गुरुदत्त कारखाना सुरूच झाला नव्हता. भाववाढीच्या कारणामुळे कारखाना किती दिवस बंद असणार होता, हे काहीच माहिती नव्हती. त्यामुळं त्या फडावर आमचे २० दिवसअसेच बिनकामाचे गेले. गावाकडून आणलेल्या सामानावर जगत राहिलो. त्यानंतर बोरगाव गावात टोळी हलवली. त्या गावात २५-३० दिवस ऊसतोडीचे काम केले आणि पुन्हा अब्दूललाठ या गावात परतलो.

 

  याविषयी महिला उसतोड कामगार संघटनेच्या बीड जिल्हा समन्वयक मनीषा तोकले म्हणाल्या, चोरी किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार झाल्यावर मुकादमाने कारखान्याला कळवले पाहिजे. मुकादमाच्या भरोश्यावर टोळी गेलेली असते. मुकादम आणि कारखान्याने मिळून कार्यवाही केली पाहिजे. बऱ्याचदा मुकादम कारखान्याला काही कळवत नाहीत. कारखाने ही हात झटकतात. पण उसतोड कामगार कारखान्यासाठी स्थलांतरीत झालेला असतो त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी कारखान्यांनी घेतली पाहिजे. या प्रकरणात, कारखान्याने चोरीचा गुन्हा दाखल करून टोळीला धान्यसामान आणि नुकसानभरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. घटनेला काही दिवस उलटले असले तरी टोळीतल्या लोकांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करता येईल.

 

साधारण तीन आठवड्यापूर्वी टोळीतील सर्वजण फडावर असताना आमच्या खोप्या उचकटून चोरी झाली. दोन-तीन खोप्यातील गॅस चोरीला गेले. माझ्या पेटीतील एक हजार रुपये गेले. चोरांनी गहू तांदूळ मिक्स करून ठेवले. धान्यात दडवून ठेवलेले पैसे, किरकोळ सोन्याच्या वस्तू चोरल्या. मुकादमाच्या खोपीतही चोरी झाली. अन्नधान्य लुटल्यामुळे टोळीवर सगळ्यांनाच त्रास होतोय. उपासमार होत आहे. सर्वांनी पुन्हा आपल्या घरून किराणा मागवला. डबल नुकसान झाले. बागायतदाराने थोडी मदत केली. पण या तात्पुरत्या उपायांनी आमच्या सुरक्षेच्या आणि सोयीचे प्रश्न तसेच राहतात. सरकारने नुकसानभरपाई द्यावी. आमची तक्रार कुणी ऐकत नाही," सविताताई हतबलतेनं सांगतात.

 

 

सविताताई आणि त्यांच्या टोळीने आता ते गाव सोडले आहे मात्र त्यांच्या डोक्यावर असुरक्षिततेची टांगती तलवार आहेच. सविताताईंनी आपली हकीकत महिला उसतोड कामगार संघटनेला कळवली. त्यावर संघटनेनं संबंधित कारखान्याच्या मालकाने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करावं आणि कृषी अधिकारी/कामगार अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.