India

तुरुंगात असणार्‍या मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांची प्रकृती बिघडली

एल्गार परिषद व भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या प्रोफेसर सुधा भारद्वाज यांची प्रकृती बिघडत आहे.

Credit : इंडी जर्नल

एल्गार परिषद व भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी म्हणून सध्या तुरुंगात असलेल्या प्रोफेसर सुधा भारद्वाज यांची प्रकृती बिघडत आहे. इंडियन एक्स्प्रेस  वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार दोन आठवड्यांपूर्वीच भारद्वाज यांनी प्रकृती ठीक नसल्याचं जेल प्रमुखांना कळवलं होतं. तसंच गेल्या २-३ आठवड्यापासून त्यांना अतिसार आणि भूक न लागण्याचा त्रास होत आहे. कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे त्रास झाला असेल असं समजून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण नंतर त्रास होतंच राहिल्यामुळे त्यांनी वैद्यकीय तपासणीची मागणी केली. जेल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून आवश्यक असणार्‍या वैद्यकीत सेवा त्यांना पुरवल्या  जात आहेत.

देशातील महत्त्वाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि मान्यवर वकील श्रीमती सुधा भारद्वाज यांच्यावर तातडीने योग्य वैद्यकीय औषधोपचार करावे अशी मागणी  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील खरे आरोपी मोकाट फिरत असून साठीच्या वर वय असणार्‍या सुधा भारद्वाज ह्या बराच काळ तुरुंगात आहेत. तुरुंगात असताना त्यांना काही व्याधी झाल्याचंही निकोले यांनी नमूद केलंय. त्यांनी जे. जे. रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी अर्ज केला होता, परंतु त्याला प्रशासनानं काहीच प्रतिसाद दिलेला नाही तरी सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यामध्ये लक्ष घालण्याची मागणी निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

याआधी सुद्धा तुरुंग अधिकारी आणि न्यायालयाकडून अटकेत असणार्‍या आदोलाकांच्या बाबतीत गैरसोय झाल्याचं तसंच आरोग्यविषयक आवश्यक मागण्यांकडे सुद्धा दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. वरवरा राव यांना तुरुंगात असताना कोरोनाची लागण झाली होती. नाजूक असणार्‍या त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष तसंच आवश्यक असणाऱ्या मागण्या पूर्ण न केल्याची तक्रारही त्यांनी केली होती. सुधा भारद्वाज यांना कैद करण्यात आलेल्या भायखळा कारागृहातील डॉक्टर आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. मधुमेह, हायपरटेन्शन तसंच उच्च रक्तदाब असे आजार असताना इथे तुरुंगात राहून जीव धोक्यात घालण्यासारखं आहे, आणि त्यामुळं अंतरिम जामिनावर आपली सुटका व्हावी अशी विनंती त्यांनी न्यायालयामध्ये केली होती पण २८ ऑगस्ट २०२० रोजी एनआयए न्यायालयानं त्यांचा हा जामीन अर्ज फेटाळला होता.