Quick Reads

‘युटोपिया’ : डिस्टोपियन कॉन्स्पिरसी थ्रिलर

स्पॉटलाईट सदर

Credit : Channel 4

अनेकदा एखाद्या प्रचलित घटनेबाबत (बहुतांशी वेळा दुर्घटना), तिच्या सत्य/असत्य असण्याबाबत आणि ती का व कुणी घडवून आणली याबाबत लोकांचे काही सिद्धांत असतात. इंग्रजीत ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ म्हणून ओळखला जाणारा हा एक चित्तवेधक आणि रंजक प्रकार असतो. उदाहरणार्थ, ‘अमेरिकेचं ‘अपोलो ११’ हे चांद्रयान आणि त्यातील अंतराळवीर कधी चंद्रावर गेलेच नाहीत. आणि मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याची चित्रफीत मुळात स्टॅन्ली क्युब्रिक या प्रसिद्ध दिग्दर्शकाने (पृथ्वीवरच) बनवली आहे’, हा सिद्धांत जगातील सर्वाधिक प्रसिद्ध अशा कॉन्स्पिरसी थिअरीजपैकी एक आहे. किंवा मग - ‘पृथ्वी लंबगोलाकार नसून सपाट आहे’, हा असाच आणखी एक सिद्धांत. 

आता या मुद्द्यांचं विचित्र तर्क, आणि त्यांची सत्यासत्यता बाजूला ठेवली, तर प्रकरण रंजक (आणि काही प्रमाणात हास्यास्पद) आहे, ही गोष्ट तर्कशीररीत्या विचार करणारं कुणीही सहज मान्य करेल. मात्र, असे सगळेच सिद्धांत हास्यास्पद असतात असं नाही. काही सिद्धांत एखाद्या घटनेचा, तिच्या वास्तवाचा पुरेपूर आणि तर्कशुद्ध विचार करणारेही असतात. शिवाय, असे काही हास्यास्पद सिद्धांत काही प्रमाणात खरे ठरल्याच्याही घटना आहेत. ज्यानिमित्ताने भूतकाळात अनेक राजकीय-अराजकीय खलबतं, कट-कारस्थानं, खाजगी-सरकारी संस्थांनी केलेली कृत्यं उघडकीस आलेली आहेत. उदाहरणार्थ, एडवर्ड स्नोडेन प्रकरणातून जगभरातील विविध सरकारांनी आपल्या किंवा परराष्ट्रातील नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या सिद्धांताला एक प्रकारे दुजोरा मिळाला आहे. 

मग अशा रंजक सिद्धान्तांनी किंवा त्यांच्या खऱ्या-खोट्या असण्याच्या नुसत्या कल्पनेनं कलाजगताला भुरळ घातली नसती तरच नवल! त्यातूनच वेळोवेळी अशा काल्पनिक-अकाल्पनिक सिद्धांतांवर आधारित पुस्तकं, चित्रपट, मालिका, माहितीपट अशा अनेकविध प्रकारांमध्ये साहित्य-कलाकृतींची निर्मिती झाली आहे. ‘युटोपिया’ ही ब्रिटिश मालिका याच संकल्पनेभोवती फिरणारी (काही एक प्रमाणात सत्याचा अंश असणारी) कलाकृती आहे. 

‘द युटोपिया एक्स्पेरिमेंट्स’ नामक एक ग्राफिक नॉव्हेल सदर मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. आता ‘ग्राफिक नॉव्हेल’ म्हणजे काय, तर या प्रकारात कथानकाचा विचार करता एखाद्या पारंपरिक कादंबरीएवढा विस्तार असलेलं पुस्तक त्याच्या मांडणीबाबत कॉमिक बुक्सची रचना स्वीकारतं. ज्यात ग्राफिक नॉव्हेलचा निर्माणकर्ता लेखनासोबतच पात्रं आणि दृश्यांचं रेखाटनदेखील करतो किंवा काही वेळा रेखाटनाकरिता एखाद्या इतर व्यक्तीची मदतही घेतो. 

तर, फिलीप कार्व्हेल निर्मित ‘द युटोपिया एक्स्पेरिमेंट्स’ हे इथलं (काल्पनिक) पुस्तक म्हणजे अशाच एका पुस्तकांपैकी एक आहे. या पुस्तकामध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक हाहाकार माजविणाऱ्या ‘बीएसई’ ऊर्फ ‘मॅड काऊ डिसीज’सारख्या भयावह (आणि मालिकेच्या विश्वापलीकडे जात प्रत्यक्षात घडलेल्या) घटनांचं भाकीत केलं असल्याचं दिसून येतं. (इथे सत्य आणि कल्पना यांचं विलक्षण असं मिश्रण तयार केलं जातं.) ज्यामुळे त्यात उल्लेखलेल्या इतरही अनेक घटनांमागे कुणातरी संघटनेचा हात असल्याचं या पुस्तकाच्या चाहत्यांचं मत असतं. 

मालिकेतील घटनाक्रमाला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा बऱ्याच वर्षांनंतर या नॉव्हेलच्या पुढच्या भागाचं हस्तलिखित अस्तित्त्वात असल्याचं कळतं. परिणामी या हस्तलिखिताच्या अस्तित्त्वाची माहिती असणारा प्रत्येक जण ते हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यादरम्यान कथानक आलटून पालटून मालिकेतील प्रमुख पात्रं, आणि त्यांच्याविरुद्ध कारवाया करणारी खल पात्रं अशा दोन्ही गटांचं एक सविस्तर चित्र आपल्यापुढे उभं करतं. ज्यात एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भेटलेले बेकी (अलेक्झांड्रा रोश), इयान (नेदन स्टुअर्ट-जॅरेट), विल्सन विल्सन (आदिल अख्तर) आणि ग्रॅण्ट लीथम (ऑलिव्हर वुलफॉर्ड) हे लोक पहिल्यांदाच एकत्र येत भेटायचं ठरवतात. हे लोक या पुस्तकाचे कट्टर चाहते आहेत, नि ‘द युटोपिया एक्स्पेरिमेंट्स’तील सिद्धांत खरे असल्याचा पुरावा या नवीन भागात सापडतील असं त्यातील काहींना वाटतं. थोडक्यात, हे लोक या हस्तलिखिताच्या आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या ज्ञात-अज्ञात लोकांच्या माध्यमातून गुप्त कारस्थानं उघडण्याच्या प्रयत्नांत आहेत. 

तर दुसरीकडे, या पुस्तकाद्वारे सत्यं उलगडली जाऊन अनेक लोक गुंतण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर बरेच लोक ही सत्यं कधीच उघडकीस येऊ नये या हेतूने जमेल त्या सगळ्या गोष्टी करताना दिसतात. ज्यात समोर येईल त्याचा खून करणारे दोन हिटमेन - आर्बी (नील मॅस्केल) आणि ली (पॉल रेडी); या हत्याऱ्यांची सूत्रं हलवणाऱ्या कारस्थानी संस्थेत म्हणजेच ‘कॉर्वॅट’मध्ये कार्यरत असणारा लेट्स (स्टीव्हन ऱ्ही) आणि त्याचा सहकारी (जेम्स फॉक्स); तसेच सरकारी यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकारी यात समाविष्ट आहेत. ज्यातून हे लोक जास्त खोलात जाऊ पाहणाऱ्या पत्रकारांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्या किंवा मग त्यांना ब्लॅकमेल करताना दिसतात. मग या निरनिराळ्या स्तरांवर चालणाऱ्या, निरनिराळ्या लोकांच्या उपकथानकांच्या माध्यमातून कथा अधिक विस्तारत जाते. 

‘युटोपिया’ ब्रिटिश मालिकांच्या वैशिष्ट्यांनी नटलेली आहे. मालिकेला एक तीव्र गडद, निराशावादी सूर लावलेला आहे. तिच्यातील पात्रं, तिच्यातील वैचित्र्यपूर्ण घटना अशाच काळ्या विनोदांतून उभ्या राहणाऱ्या आहेत. कॉन्स्पिरसी थिअरीजच्या निमित्ताने तो वरवर पाहता काहीशा अतिशोयोक्तीपूर्ण म्हणाव्याशा संकल्पना हाताळत असला, तरी  त्याच्या मुळाशी असलेले - जगाची वाढती लोकसंख्या, जागतिक तापमानवाढ, बदलतं हवामान आणि झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी असलेले नैसर्गिक गरजांचे स्रोत - असे विचार मालिकेला अधिक वैश्विक बनवतात. याखेरीज आपल्याच राष्ट्रातील नागरिकांवर पाळत ठेवणारी सरकारं, जणू कुणीतरी जाणूनबुजून निर्माण केलेत अशा रीतीने अकस्मातपणे उद्भवणारे रोग अशा ज्ञात-अज्ञात, खऱ्या-खोट्या कॉन्स्पिरसी थिअरीजशी निगडित संकल्पना ‘युटोपिया’ हाताळते. 

तिच्यातील तिरकस विनोद कसा आहे याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे खुद्द मालिकेचं नाव. आता ‘युटोपिया’ म्हणजे स्वप्नवत, आदर्शवत असा समाज/राष्ट्; नंदनवन. मात्र, मालिकेतील संकल्पना आणि तिच्यातील घटना प्रत्यक्षात या संकल्पनेच्या अगदी उलट, ‘डिस्टोपियन’ स्वरूपाच्या आहेत. हे जग म्हणजे नंदनवन नसून कायमच वाईट कृत्यं घडणारं, मानवजातीने जणू उद्ध्वस्त केलेलं एक पृथ्वीवरील नरक आहे, असा ‘डिस्टोपिया’चा अर्थ. या विरोधाभासावरून मालिकेच्या तिरकस सुराची कल्पना येऊ शकते. 

२०१३-१४ दरम्यान तिच्या दोन्ही सीझनमधील प्रत्येकी सहा भाग प्रदर्शित झाल्यानंतर दोन परिपूर्ण अशा सीझननंतर ही मालिका संपली असली, तरी तिने मांडलेले मुद्दे अजूनही कालसुसंगत आहेत. माझ्या मते २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजसाठीचा ‘इंटरनॅशनल एमी पुरस्कार’ मिळवलेली ही पाहण्याकरिता इतकी कारणं पुरेशी असावीत. ‘युटोपिया’ : डिस्टोपियन कॉन्स्पिरसी थ्रिलर 

२०१३-१४ दरम्यान तिच्या दोन्ही सीझनमधील प्रत्येकी सहा भाग प्रदर्शित झाल्यानंतर दोन परिपूर्ण अशा सीझननंतर ही मालिका संपली असली, तरी तिने मांडलेले मुद्दे अजूनही कालसुसंगत आहेत. माझ्या मते २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजसाठीचा ‘इंटरनॅशनल एमी पुरस्कार’ मिळवलेली ही पाहण्याकरिता इतकी कारणं पुरेशी असावीत.