Quick Reads

द प्लॅटफॉर्म: आजच्या व्यवस्थेत मानवतेवर कटाक्ष टाकणारा चित्रपट

स्पॉटलाईट सदर

Credit : नेटफ्लिक्स

स्पॉइलर्स अहेड. 

‘द प्लॅटफॉर्म’मध्ये ऐकू येणारं पहिलं वाक्य म्हणजे, “देअर आर थ्री टाइप्स ऑफ पर्सन: दोज अॅट द टॉप, दोज अॅट द बॉटम, अँड दोज हू फॉल”. ‘व्हर्टिकल सेल्फ मॅनेजमेंट सिस्टीम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका उभी मांडणी असणाऱ्या तुरुंगामधील परिस्थितीचं अचूक वर्णन या एका वाक्यात केलं जातं. एकतर शिक्षा झालेले कैदी किंवा मग एखाद्या गोष्टीच्या मोबदल्यात तिथे स्वेच्छेने यायला तयार झालेले लोक असे दोन प्रकारचे लोक या तुरुंगात राहतात. इमारतीची मांडणी अशी की, एकच खोली असलेल्या प्रत्येक मजल्यावर दोन कैदी राहू शकतात. प्रत्येक खोलीच्या मध्यभागी एक आयताकृती पोकळी आहे. ज्यामधून जाणारा एक प्लॅटफॉर्म प्रत्येक मजल्यावर काही विशिष्ट काळासाठी थांबतो. या प्लॅटफॉर्मवर सर्व कैद्यांच्या जेवणाची व्यवस्था होईल इतपत खाद्य मांडलं जातं. 

मात्र, इथेच खरी गोम आहे. ही व्यवस्था म्हणजे एक सामाजिक प्रयोग आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला जीवनावश्यक संसाधनं समान प्रमाणात उपलब्ध करून दिल्यास उत्स्फूर्त आणि दृढ सामाजिक ऐक्याचं (स्पॉंटॅनिअस सॉलिडॅरिटी) दर्शन होतं की नाही, याबाबतचा हा प्रयोग आहे. या व्यवस्थेच्या व्यवस्थापनाचा भाग असलेल्या इमोगिरीच्या (अँटोनिया सॅन युआन) मते प्लॅटफॉर्मद्वारे पुरवलं जाणारं अन्न इथल्या (अंदाजे) दोनशे मजल्यांवरील प्रत्येक व्यक्तीला पुरेसं इतकं असतं. फक्त प्रत्येकाने स्वतःला पुरेल इतकंच अन्न घेण्याची तेवढी गरज आहे. गोरेंग (इवान मजाग) हे चित्रपटातील मध्यवर्ती पात्र मात्र याबाबतही एक शंका व्यक्त करतं. तो म्हणतो, “कदाचित ही व्यवस्था तू म्हणतेस त्याच्या अगदी उलट उद्देशापायी अस्तित्त्वात आहे. ते म्हणजे, जर यदाकदाचित इथे तू म्हणतेस तशी स्पॉंटॅनिअस सॉलिडॅरिटी प्रस्थापित झाली, तर तिचं समूळ उच्चाटन करण्यासाठीच ही व्यवस्था उभारली गेलीय. जेणेकरून बाहेरच्या जगापासून असं काही घडणं रोखता येईल’. गोरेंगने व्यक्त केलेली ही शंका काहीशी अतिशयोक्तीपूर्ण वाटत असली तरीही ती पूर्णतः टाकाऊ नाहीच. 

‘द प्लॅटफॉर्म’ ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाल्याझाल्याच त्यातील कालसुसंगत राजकारण हा चर्चेचा विषय बनण्यामागे चित्रपटातील हेच घटक कारणीभूत आहेत. इथली पात्रं, ती ज्या व्यवस्थेचा भाग आहेत ती व्यवस्था, या पात्रांची आणि व्यवस्थापनाची कृत्यं आणि त्यांच्या नैतिकतेवर उभी राहणारी प्रश्नचिन्हं अशी अनेक अंगं इथे आहेत. या तुरुंगाचं व्यवस्थापन हे स्पॉंटॅनिअस सॉलिडॅरिटीच्या नावाखाली भांडवलशाही शोषणव्यवस्थेचंच प्रतिनिधित्व करतं. समाजाचा भाग असलेल्या लोकांना संसाधनांचं समान वाटप करण्याची संधी देऊनही ते त्यासाठी गरजेच्या एकतेचं प्रदर्शन करू शकत नाहीत - अशा एका अर्थी साम्यवादाला खिजवणाऱ्या तत्त्वाच्या आड लपणारी ही व्यवस्था आहे. 

या व्यवस्थेत प्रत्येक मजल्यावर राहणारे दोनही लोक महिन्याच्या शेवटी बेशुद्ध केले जातात, आणि रँडमरीत्या कुठल्याही मजल्यावर त्यांची रवानगी केली जाते. पुन्हा एकदा पारदर्शकता आणि समान संधीचा आव आणत हे घडतं. प्रत्यक्षात मात्र ही व्यवस्था शोषण करणारीच आहे. जिला पारंपारिक वर्ग-वर्णव्यवस्थेतील शोषकवर्ग आणि शोषित या विभाजनातच अधिक रस आहे. चित्रपटात सर्वप्रथम दिसणाऱ्या दृश्यचौकटी सर्वात वरच्या मजल्यावर, तुरुंगाच्या किचनमध्ये सुरु असलेली जेवण तयार होत असतानाची प्रक्रिया दाखवतात. पुढेही चित्रपटभर विखुरलेल्या या दृश्यचौकटी अगदी नाजूकपणे बनवलं जाणारं अन्न, त्यात एखादा केसही पडल्याचं सहन न होणारा मुख्य आचारी, प्रत्येक कैद्याचा आवडता असा एक खाद्यपदार्थ बनवला जाणं असं बरंच काही दिसतं. पण, एकदा प्लॅटफॉर्मवर ठेवल्यानंतर या सगळ्याचं नक्की काय घडतं याबाबत कुणालाच काही इतिकर्तव्य उरत नाही. 

 

 

आता इथलं सेल्फ मॅनेजमेंट कसं घडतं, तर वरच्या मजल्यांवरील लोक पाहिजे तितकं अन्न खातात, आणि प्लॅटफॉर्म जसजसा खाली सरकतो तसं अन्न कमी होत जातं. वरच्या मजल्यांवर असणारे लोक हवं तितकं अन्नभक्षण करीत राहतात, ज्यामुळे खालच्यांना एकतर अत्यल्प अन्न मिळतं किंवा मग मिळतच नाही. एका विशिष्ट टप्प्यानंतर फक्त रिकामी भांडीच खाली जातात. त्यातही पुन्हा वरच्या मजल्यावरील लोकांनी प्लॅटफॉर्मवरील अन्नात मलमुत्रविसर्जन करणंही घडतं. मग डार्विनच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या उक्तीनुसार तग धरून जिवंत राहणं घडत राहतं. इथे नरमांसभक्षण ही बाब कायद्याच्या कचाट्यात येऊ शकत नाही, आणि ती अंमलात आणण्यावाचून काही पर्याय उरत नाही. ‘देअर आर थ्री टाइप्स ऑफ पर्सन: दोज अॅट द टॉप, दोज अॅट द बॉटम, अँड दोज हू फॉल’ या वाक्याचा अर्थ उमगू लागतो. ज्या मजल्यांवर अन्न पोचत नाही तिथल्या कैद्यांना सहकारी कैद्याला मारत मांसभक्षण करायचं नसल्यास मधल्या पोकळीतून खाली उडी मारत आत्महत्या करण्यावाचून काही पर्याय उरत नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, शेवटी ही व्यवस्थाही शोषण करण्यातच धन्यता मानणारी ठरण्यामागे अनेक कारणं आहेत. 

गोरेंग जेव्हा सर्वांनी एकत्र येऊन अन्नाची समान वाटणी करण्याचं बोलून दाखवतो, तेव्हा त्रिमागासी (झोरियन एगिलेअर) हा त्याचा सहकारी कैदी विचारतो की, तू साम्यवादी आहेस का? पुढे जाऊन हेही म्हणतो की, आपल्या वरच्या मजल्यावरील लोक कधीही एका साम्यवाद्याचं म्हणणं मनावर घेणार नाहीत. वर्गव्यवस्थेत वरच्या स्तरावर असणाऱ्या लोकांनी साम्यवादाची खिल्ली उडवत तो नाकारणं ही बाब इथे अधोरेखित केली जाते. या व्यवस्थेत राहून प्रत्येक महिन्यानंतर अधिक खालावत जाणारी परिस्थिती आणि मानवतावादी तत्त्वांचा होणारा ऱ्हास पाहून सगळ्या व्यवस्थेचा फोलपणा गोरेंगच्या लक्षात येतो. त्यामुळेच इमोगिरी जेव्हा समान वाटपाचा मुद्दा काढते, आणि खालच्या मजल्यावरील लोकांना तो समजावू पाहते तेव्हा तिला मिळणारं अपयश पाहून त्याला त्यात काहीच विशेष वाटत नाही. एव्हाना मूल्यव्यवस्थेचा होणारा ऱ्हास हे एक सामान्य दृश्य बनून गेलेलं असतं. 

तरीही बाहरात (एमिलिओ बुआले कॉका) या कैद्याचा आशावाद पाहून त्याच्यातही प्राण फुंकले जाऊन तो एक शेवटचा प्रयत्न म्हणून अन्नाचं समान वाटप होईल असं पाहण्याचा निर्णय घेतो. त्यांच्या साम्यवादी, समाजवादी विचारांना सशस्त्र लढ्याचं रूप प्राप्त होतं. इतकं सगळं करून त्यांना यश मिळेल की नाही किंवा मिळतं की नाही हा मुद्दा तसा गौण ठरतो. कारण, ‘द प्लॅटफॉर्म’ला सगळ्या गोष्टींची ठोस उत्तरं देण्यात रस नाही. जे तसं योग्यही आहे. ‘द प्लॅटफॉर्म’ उत्तरं शोधण्यापेक्षा सगळे प्रश्न व्यवस्थितपणे मांडतो. तर, गॅल्डेर गॅझ्तेलू-उरुशियाचं दिग्दर्शन आणि इथलं मर्मभेदक पार्श्वसंगीत, ध्वनी संरचनेमुळे ‘द प्लॅटफॉर्म’ अंगावर येणारा ठरतो. 

चित्रपटातील लोकांचं एका विशिष्ट परिस्थितीत अडकलेलं असणं, वर्गव्यवस्थेवरील भाष्य यांच्यामुळे चित्रपटाची तुलना बॉन्ग जून-हू या साऊथ कोरियन दिग्दर्शकाच्या ‘स्नोपिअर्सर’शी (२०१४) होणं साहजिक होतं. असं असलं तरी दोन्ही चित्रपटांतील संकल्पनांचा विस्तार आणि मांडणीत तांत्रिकदृष्ट्या बराच फरक आहे. ‘स्नोपिअर्सर’मध्ये नायक आणि त्याला सहकार्य करणारे लोक विरुद्ध खलनायक आणि त्याचे साथीदार अशी सरळ मांडणी होती. शिवाय, चित्रपटाची मांडणीदेखील नाही म्हटली तरी मुख्य प्रवाहातील थरारपटासारखी होती. याउलट, ‘द प्लॅटफॉर्म’मध्ये नायक विरुद्ध खलनायक अशी सरळसोट मांडणी नाही. मुळात इथे खलप्रवृत्ती अस्तित्त्वात आहे तीदेखील प्रत्येक व्यक्तीमध्ये आंतरिक स्वरुपात. ‘द प्लॅटफॉर्म’चा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मांडणी अधिक अस्वस्थ आणि हतबल करणारी आहे. आणि गडद छटा, निराशावादी दृष्टिकोनाचं अस्तित्त्व अधिक प्रबळ आहे. अगदी शेवटाकडे जाताना जाणवणारा इथला आशावादही अगम्य प्रकारचा आहे. 

‘द प्लॅटफॉर्म’ म्हणजे अनेक अर्थी कालसुसंगत अशी रूपककथा आहे. जी तितक्याच प्रभावी रुपात समोर मांडली जाते. शिवाय, चित्रपट पहायला सोपा नसला तरी तो आवर्जून पहावासा आहे. सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.