Quick Reads

परियेरूम पेरूमल: भाबडा तरी गरजेचा म्हणावासा आशावाद

स्पॉटलाईट सदर

Credit : परियेरुम पेरुमल

‘परियेरूम पेरूमल’च्या ट्रेलरमध्ये काळ्या चित्रचौकटीवर ‘एज्युकेट, ऑर्गनाइज, रिव्हॉल्ट…’ ही अक्षरं उमटतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश सदर चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेला अचूक शब्दांत वर्णितो. पुढे येणाऱ्या एका दृश्यात गावातील जातबांधवांवर होणारे अत्याचार पाहून एक व्यक्ती पेरियन या मुख्या पात्राला शिक्षण घेऊन समर्थ बनण्याविषयी सांगते. पेरियनही ‘हो, मी शिकणार, कायद्याचं शिक्षण घेऊन वकील बनणार नि आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांना कायदेशीररीत्या उत्तर देणार’ अशा अर्थाचं वाक्य म्हणतो. या वाक्याला इथे महत्त्व आहे कारण आधीच्याच दृश्यात केवळ एका विशिष्ट जातीत जन्म झाला आहे म्हणून ज्यांना गुन्हेगार गृहीत धरत पोलिसांकडून मारहाण केली जात आहे असे तरुण पाहिलेले असतात. शिकून, संघटीत होऊन संघर्ष करण्याच्या गरजेमागील मूळ इथे आपल्याला पदोपदी दिसत असतं. किंबहुना खरंतर त्याच्या अस्तित्त्वाच्या जाणीवेनं बोचत असतं. ही अस्वस्थता निर्माण करणं हाच खरंतर मारी सेल्वाराज दिग्दर्शित ‘परियेरूम पेरूमल’चा खरा उद्देश आहे, नि ही अस्वस्थता निर्माण होणं हे त्याचं यश आहे.

परियेरूम पेरूमल ऊर्फ पेरियन (कथिर) हा तामिळनाडूतील एका जिल्ह्याजवळील लहानशा खेड्यात राहणारा, खाली मान घालून जगणारा तरुण आहे. गावातील इतर दलितांप्रमाणेच त्याचं दलित असणं हे उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या त्याच्या मानसिक-शारीरिक शोषणाच्या मुळाशी आहे. दिग्दर्शक सेल्वाराज हे दोन्ही तऱ्हेचं शोषण शक्य तितक्या अंगावर येईल अशा पद्धतीने समोर मांडतो. हे शोषण म्हणजे ‘फँड्री’मधील जांबुवंत ऊर्फ जब्याची होणारी मानसिक हेटाळणी, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’मध्ये वेगवेगळ्या आदिवासी लोकांचा होणारा शारीरिक छळ, ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘आर्टिकल १५’सारख्या चित्रपटांमध्ये दिसणारी जातीव्यवस्थेची उतरंड अशा एक अन् अनेक प्रसंगांशी नातं सांगणारं आहे. इथं शोषित, त्याची भाषा, त्याचा प्रांत बदलतो, मात्र त्याच्या शोषणाच्या मुळाशी असलेलं जातीय द्वेष सर्वत्र समप्रमाणात आढळतो. त्यामुळेच पेरियन हा प्रस्थापितांच्या याच व्यवस्थेत स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्त्व, वेगळा ठसा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पहायला मिळतं. त्याला तालुक्याच्या शहरात लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो तेव्हा आंबेडकरांप्रमाणे वकील बनावं ही इच्छा जशी त्याच्या मनात असते, अगदी त्याचप्रमाणे हा मुलगा शिकल्याने आपल्या शोषित असण्याच्या सामाजिक परिस्थितीत काहीतरी बदल घडतील अशी आशा संबंधितांमध्ये दिसते.

शहरात आल्यावर कॉलेजमधील वातावरण आणि तोंडावर मारली जाणारी इंग्रजी यांमुळे हा तरुण भांबावून जातो. आनंदच्या (योगी बाबू) रुपात त्याला त्याच्याशी नातं सांगणारा त्याच्याचप्रमाणे अभ्यासात यतातथा असणारा मित्र लाभतो. सोबतच इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात अपयशी ठरणाऱ्या म्हणा किंवा असं करण्याबाबत अजिबातच प्रयत्नशील नसणाऱ्या व्यवस्थेचं दर्शनही इथं घडतं. परिणामी एकप्रकारे प्रस्थापितांनी आपला कंपू बनवत ज्यांच्याकडे माहिती नि तिच्या उपयोजनाचे तितके स्त्रोत नाहीत अशांना पुन्हा त्यापासून दूर ठेवत शोषणाचं चक्र अविरतपणे चालू ठेवण्याच्या घटनाही दिसतात.

ज्योती ऊर्फ जो (आनंदी) ही त्यांची सहाध्यायी मात्र यात मोडत नाही. ती पेरियनला इंग्रजीचे धडे देते. अनोळखी आणि बेभरवश्याच्या अशा चेहऱ्यांच्या शहरात ती त्याला मानसिक-भावनिक आधार देणारी मैत्रीण बनते. वरवर पाहता सगळं काही सुरळीत सुरु असताना त्याला तिच्या बहिणीच्या लग्नात बोलावण्यानंतर समोरच्या चित्रातून काही एक मिनिटं नाहीसा झालेला जातसंघर्ष आणि जातीभेद पुन्हा एकदा उफाळून समोर येतो. इथे जातीभेदाचे दोन निराळे प्रकार समोर येतात. एकीकडे शंकरलिंगम (लिंगेश) हा जोचा चुलतभाऊ त्याला दमदाटी करत बेदम मारहाण करतो, तर दुसरीकडे तिचा पिता पेरियनपुढे हात जोडून त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर राहण्याची विनंती करतो. इथे कौटुंबिक, सामाजिक बंधनांमुळे अपेक्षित असलेली काहीतरी कृती करताना त्याची हतबलता दिसते.

पेरियनच्या मनात त्याच्या वडिलांचं किन्नर नृत्य करण्याचं काम आणि राहणीमान याबाबत असलेला न्यूनगंडदेखील चित्रपटाचा काही भाग व्यापतो. पुन्हा एकदा हा गंड ‘फँड्री’मधील जब्याच्या मनात त्याच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीबाबत असणाऱ्या भावनेशी समांतर जाणारा आहे. असे अनेक सिनेमॅटिक पॅरलल्स आपल्याला आढळतील. पुढे जाऊन पेरियन आणि शंकरलिंगम यांच्यात घडणाऱ्या द्वंद्वाच्या निमित्ताने पुन्हा त्याच्या वाट्याला येणारी मानसिक, भावनिक हतबलता नि छळवणूक दिसून येते. हे शोषित असणं, नि शोषणाचे निरनिराळे प्रकार वेगवेगळ्या प्रसंगांच्या रूपात चित्रपटभर विखुरलेले आढळतात. या प्रसंगांतून चित्रपट मांडू पाहत असलेले मुद्दे अधिक ठळकपणे अधोरेखित होत राहतात. इथे दलित तरुणांना यमसदनी पाठवण्यात तरबेज असलेल्या, एका तऱ्हेने हिटमॅन म्हणाव्याशा वृद्धाच्या रुपात एक खलपात्रही उपस्थित आहे. वास्तविक पाहता पेरियनच्या परिचयाची असणारी ही व्यक्तीही पारंपरिकता नि संस्कृतीच्या अभिमानातून झिरपणाऱ्या तिच्या मनातील जातीद्वेषामुळे त्याच्या नि त्याच्यासारख्याच इतरांच्या जीवावर उठते. परिणामी वरवर पाहता ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’-वजा आव आणत मनात मात्र द्वेषभाव बाळगण्याच्या प्रकाराचं हे मूर्त रूप मानता येईल.

श्रीधरचं नितांतसुंदर आणि वेळप्रसंगी अंगावर येईलशी दृश्यं टिपणारं छायाचित्रण इथे आहे. हे छायाचित्रण पुढे जाऊन करुप्पीच्या निळ्या रंगात समोर येण्यासारख्या इथल्या थेट प्रतीकांना समोर आणण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं. महत्त्वाचं म्हणजे सदर चित्रपटाला ‘अ संतोष नारायणन म्युजिकल’ म्हटलं गेलं आहे ते काही उगाच नाही. संतोष नारायणनने आजवर केलेलं काम पाहता भारतीय लोकसंगीत आणि पॉप्युलर संगीत, रॉक, जॅझ, इलेक्ट्रॉनिक संगीत यांचं मिश्रण असलेली त्याची गाणी आणि साऊंडट्रॅक्सचं वेगळेपण लक्षात राहणारं आहे. इथेही तो अलवार प्रेमगीत ते पेरियनचं ज्यावर जीवापाड प्रेम आहे अशा करुप्पी या कुत्र्यास समर्पित असं एक गाणं अशा नानाविध आशय केंद्राशी घेऊन असणाऱ्या गाण्यांना भारतीय-पाश्चात्य संगीत प्रकारांचं मिश्रणातून श्रवणीय नि वैशिष्ट्यपूर्ण बनवतो.

‘कास्ट अँड रिलीजन आर अगेन्स्ट ह्युमॅनिटी’ ही चित्रपटाच्या सुरुवातीला झळकणारी अक्षरं आणि चित्रपटाचा शेवट या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरणाऱ्या आहेत. या शेवटात म्हटलं तर भाबडा नि म्हटलं तर गरजेचा म्हणावासा आशावाद दडलेला आहे. तशीही या आशावादाची कधी नव्हे इतकी गरज आता आहे.