Quick Reads

पाम स्प्रिंग्ज: एक दिवस आणि दोन समदुःखी जीव

स्पॉटलाईट सदर

Credit : Hulu

मानवी जीवनातील निरर्थकता, या निरर्थकतेच्या जाणिवेतून आलेला निराशावाद आणि प्रेम या संकल्पनांचा एकत्रितपणे विचार करणाऱ्या बऱ्याचशा कलाकृती यापूर्वी निर्माण झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या चित्रपटांतून - मानवी जीवन हे किंचितही सुखकर नाही. मात्र, आपल्याइतक्याच दुःखी आणि असमाधानकारक असलेल्या व्यक्तीसमवेत हे जीवन किमान सुसह्य बनू शकतं - हा विचार मांडला गेल्याचंही दिसलेलं आहे. मॅक्स बर्बाकाव दिग्दर्शित ‘पाम स्प्रिंग्ज’मध्येही हेच दिसत असलं तरी यावेळी चित्रपटात एका ओळखीच्या मध्यवर्ती संकल्पनेची नाविन्यपूर्ण मांडणी केलेली आहे. ज्याच्या एकत्रित परिणामातून आपल्याला एक प्रचंड सुंदर आणि मनमोहक कलाकृती पहायला मिळते. 

काही चित्रपटांची मध्यवर्ती संकल्पनाच अशी असते की, ते काहीएक प्रमाणात स्पॉइल केल्याशिवाय त्यांच्याविषयी लिहिणं अवघड असतं. मॅक्स बर्बकाऊ दिग्दर्शित ‘पाम स्प्रिंग्ज’ हा अशाच चित्रपटांमध्ये मोडतो. त्यामुळे जर कुणाला हा चित्रपट पहायचा असेल, तर प्रस्तुत लेख वाचण्यापूर्वी तो पहावा. 

 

 

स्पॉयलर्स अहेड! 

लॉकडाऊन काळात आपण एकाच ठिकाणी अडकून पडणं म्हणजे काय असतं हे जवळून अनुभवलं आहे. काळ थांबला आहे आणि जीवनातील रोजच्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती घडत असल्याचं आपल्यातील अनेकांना वाटून गेलं असेल. हे असं वाटणंच ‘टाइम लूप’ या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या कथांमध्ये सत्यात उतरतं. कारण, अशा कथेत सगळी पात्रं निरंतरपणे एकच दिवस जगत असतात. मात्र, आपण एकच दिवस जगत आहोत याची जाणीव केवळ एखाददुसऱ्या मुख्य पात्राला असते आणि इतर सगळी पात्रं दिवस संपताच घडलेलं सगळं विसरून जात असतात. त्यामुळे आपण कालप्रवाहात अडकून पडलो आहोत हे कळणाऱ्या पात्राने केलेल्या कृतीचे केवळ एका दिवसापुरते टिकणारे परिणाम वगळता इतर सगळं निरंतरपणे घडत आलंय तसंच घडत राहतं. 

रोमँटिक कॉमेडी आणि टाइम लूप या दोन गोष्टी एकत्र येतात म्हटल्यावर बिल मरीचा ‘ग्राउंडहॉग डे’ (१९९३) डोळ्यासमोर येणं काहीसं स्वाभाविक आहे. कारण, या चित्रपटाच्या निमित्ताने ही संकल्पना लोकप्रिय झाल्यानंतर तिचा आधार घेत वेगवेगळ्या विधांमध्ये जे चित्रपट निर्माण झाले त्यात बऱ्या-वाईट रोमँटिक कॉमेडीजचाही समावेश होतो. ‘पाम स्प्रिंग्ज’मध्ये ही कल्पना नव्याने कशी येते, तर इथे नायकासोबत नायिकेलाही आपण विशिष्ट कालप्रवाहात अडकलो असल्याची जाणीव असते. त्यामुळे इथली कथा नायक आणि नायिका अशा दोघांचाही दृष्टिकोन विचारात घेत समोर मांडली जाते. जे ‘ग्राउंडहॉग डे’मध्ये घडत नाही. शिवाय, इथला नायक चित्रपटाला सुरवात व्हायच्या आधीपासूनच या लूपमध्ये अडकून पडलेला असतो. ज्यानंतर नायिकेने उत्सुकता आणि नायकाच्या काळजीपोटी या लूपमध्ये अडकण्याची घटना घडते. 

 

एक दिवस आणि दोन समदुःखी जीव 

टाला आणि एबच्या लग्नाकरिता उपस्थित असलेल्या अनेक लोकांपैकी एक असतो नाईल्स (अँडी सॅमबर्ग). त्याची प्रेयसी मिस्टी (मेरेडिथ) टालाची (कमिला मेंडीस) मैत्रीण असल्याने तो तिच्यासह इथे आलेला असतो. त्याचा दिवस ज्या प्रकारे पार पडतो त्यानुसार तो काही फार समाधानी आहे असं दिसत नाही. अगदी नाईल्स आणि मिस्टीमधील नात्यातही बराचसा विचित्रपणा आणि दुरावा दिसतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य तिन्हीही सारखेच आणि निरर्थक आहेत असं तो म्हणून दाखवतो. 

 

 

दुसरीकडे, सॅरा (क्रिस्टीन मिलीयोटी) ही एकल आयुष्य जगणारी, आपल्या स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांच्या टीकेला कारणीभूत ठरणारी व्यक्ती आहे. त्यामुळे एकीकडे तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न होतंय, तर दुसरीकडे ती अजूनही मद्याचे प्याले रिचवत आपल्या एकाकी जीवनशैलीचं समर्थन करत असल्याचं चित्र दिसतं. त्यामुळे आयुष्यात आणि प्रेमात दोन्हीमध्ये अपयशी ठरलेल्या नाईल्स आणि सॅरा या दोन व्यक्ती इथे भेटतात. साहजिकच दोघांच्याही आयुष्याच्या निरर्थकतेविषयीच्या कल्पना सारख्याच असतात. प्रेम आणि आशावाद या गोष्टींवर त्यांचा विश्वास नसतो. इतकंच काय तर, याचा पुरावा म्हणून मिस्टी दुसऱ्या कुणासोबत तरी सेक्स करत त्याची फसवणूक असल्याची प्रसंग खुद्द नाईल्स सॅराला दाखवतो. अशावेळी घडायचं ते घडतं आणि आयुष्याबाबत असमाधानी असलेल्या या दोघांनाही आपण समदुःखी असल्याची जाणीव होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर जेव्हा हे दोघेही कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात सेक्स करणारच असतात की, (पुढे जाऊन कळणाऱ्या) कारणांनी नाईल्सच्या जीवावर उठलेला रॉय (जे. के. सिमन्स) अचानक येतो नि त्याच्यावर हल्ला करू लागतो. या सगळ्याची परिणती नाईल्स आणि रॉय या दोघांनी टाइम लूप जिथून सुरु झालं असतं त्या गुहेतील गेटमधून गायब होण्यात होते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, सॅरादेखील त्याच्यापाठोपाठ जाते आणि तीदेखील या कालप्रवाहात अडकून पडते. 

 

पुनरावृत्ती, जादुई वास्तव आणि निराशावाद

पहिल्या दिवसाचा शेवट होतो तेव्हा सॅरादेखील टाइम लूपमध्ये अडकते. त्यामुळे या प्रकारच्या चित्रपटात नायिकेचं घडणाऱ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असणं इथे घडत नाही. तिच्या लक्षात येतं तेव्हा साहजिकच चिडचिडीमुळे ती नाईल्सला दोष देते. हा दिवस संपवण्यासाठी आत्महत्येचे प्रयत्नही करून पाहते. यातून सुटका नाही हे लक्षात आल्यावर हेच आपलं आयुष्य आहे, हे ती मान्य करते. चित्रपटात ज्या दिवसाची पुनरावृत्ती घडते त्या दिवसाच्या निवडीपासूनच इथल्या निराशावादी विनोदाची सुरुवात होते. कारण, हा दिवस असतो एका लग्नाचा. त्यामुळे प्रेम या संकल्पनेवर विश्वास नसलेल्या दोन व्यक्तींचं एका लग्नात भेटणं, आणि त्यांना आयुष्यात आणि प्रेमात अपयश आलेलं असताना दुसऱ्या कुणाचं तरी लग्न रोज निरंतरपणे पहावं लागणं हे एक दुःस्वप्न मानता येईल. एकट्या व्यक्तीला दुःस्वप्न वाटणारा हा दिवस मात्र नाईल्स आणि सॅरा दोघेही यात एकत्र अडकल्याने अधिक सुखकर बनतो. वेगवेगळ्या मॉन्टाजेसमधून त्यांचं निरर्थक आयुष्य जगण्याचे प्रयत्न आपल्याला दिसतात. मात्र, हा आनंद कितीसा टिकणारा असतो? कारण, नातं आलं म्हणजे वचनबद्धता आली, समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेणं आलं. आपण वारंवार एकच दिवस जगत असल्याने आपला भूतकाळ महत्त्वाचा नाही, फक्त वर्तमान महत्त्वाचा असा कितीही आव आणला तरी प्रत्यक्षात तसं नसतं. त्यामुळे इथून पुढचा भाग हा त्यांच्यातील नात्याभोवती फिरतो. इथे नायक आणि नायिका दोघेही समदुःखी असण्यासोबत सारख्याच प्रमाणात सदोष आहेत, हाही एक महत्त्वाचा मुद्दा येतो. ज्यामुळे चित्रपटात केवळ साखरेहूनही गोड प्रेमकथा पहायला मिळते असं घडत नाही. 

 

 

मुळात हे लोक या एकाच दिवसात का अडकून पडतात, वगैरेचं स्पष्टीकरण इथे येत नाही. नाही म्हणायला पुढे जाऊन वाळवंटात आलेला भूकंप आणि पुढे जाऊन सॅरा क्वांटम फिजिक्सचा उल्लेख करत असली तरी चित्रपटाचा या मुद्द्यांवर भर नाही. त्यामुळे या साऱ्या प्रकरणात मॅजिकल रिअॅलिजम (जादुई वास्तववाद) पाहायला मिळतो. वुडी अॅलनच्या ‘मिडनाईट इन पॅरिस’ आणि ‘मॅजिक इन मूनलाईट’सारख्या चित्रपटांची आठवण येते. शिवाय, त्याच्या चित्रपटांमध्ये येणाऱ्या पात्रांचं एकाकी जीवन, मानवी नातेसंबंध, विवाहबाह्य संबंध, निराशावाद, अस्तित्त्ववाद अशा बऱ्याच संकल्पनाही इथे आढळतात. या गंभीर संकल्पना अस्तित्त्वात असल्या तरी ‘पाम स्प्रिंग्ज’ त्याचवेळी प्रचंड मजेदारही आहे. ज्याचं श्रेय लेखक अँडी सिएरा आणि दिग्दर्शक मॅक्स बर्बकाऊसोबत इथल्या कास्टलाही जातं. ज्यात त्याच्या नेहमीच्या अंदाजात एकाचवेळी प्रचंड चार्मिंग आणि विक्षिप्त असणारा अँडी सॅमबर्ग, चित्रपटाचं शक्तीस्थान असलेली क्रिस्टीन मिलीओटी आणि तुलनेनं संक्षिप्त भूमिकेतही वेडेपणाचा कळस गाठणारा जे. के. सिमन्स इथल्या प्रत्येक दृश्याला पटकथेत असेल त्याहून कैकपटींनी प्रभावी बनवतात. 

वुडी अॅलनच्या ‘लव्ह अँड डेथ’मध्ये (१९७५) एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे - “To love is to suffer. To avoid suffering one must not love. But then one suffers from not loving. Therefore, to love is to suffer; not to love is to suffer; to suffer is to suffer. To be happy is to love. To be happy, then, is to suffer, but suffering makes one unhappy. Therefore, to be happy one must love or love to suffer or suffer from too much happiness.” ‘पाम स्प्रिंग्ज’मध्ये मुख्य पात्रांसोबत जे काही घडतं, ती जे करतात  त्याला ही वाक्यं काहीएक प्रमाणात लागू पडतात. शिवाय, काहीही करून दुःखापासून सुटका होणार नसेल, तर किमान आपलं अस्तित्त्व, आयुष्य आधी होतं त्याहून काहीसं अधिक सुखकर नि सुसह्य बनवणाऱ्या कुणासोबत तरी जगणं श्रेयस्कर असल्याचं दिसतं.