Quick Reads

पाताल लोक: समकालीन समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि माध्यमव्यवस्था यांचं प्रभावी चित्रण करणारी सिरीज

स्पॉटलाईट सदर

Credit : Amazon

स्पॉइलर्स अहेड. 

एक समाज म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आपण पॉलिटिकल करेक्टनेस या गोष्टीकडे ज्या प्रकारे पाहतो ते फार मजेशीर आहे. शिवाय, खऱ्या जगात, खऱ्या आयुष्यात असलेल्या गुणदोषांकडे दुर्लक्ष करतो. आणि पॉप्युलर कल्चर तसेच मीडियामधील पात्रं आणि घटनांकडून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरील निर्दोष प्रतिनिधित्व आणि चित्रणाची अपेक्षा ठेवतो. त्यामुळे अलीकडील काळात कुठलीही नवी कलाकृती समोर आल्यावर तिच्यातील पात्रांची प्रत्येक कृती नैतिक पारड्यात तोलली जाते. आता आक्षेपार्ह गोष्टींचे उदात्तीकरण केले जाऊ नये हे मान्य असले तरी त्यांच्या उदात्तीकरणाखेरीजही त्यांचे अस्तित्त्व या कलाकृतींमध्ये असूच शकते. या पॉलिटिकल करेक्टनेसच्या अट्टाहासापायी अनेकदा या पात्रांच्या अस्तित्त्वावर घाला घातला जातो. शिवाय, आपल्या सामाजिक, राजकीय भोवतालात असं काही घडतच नाही असा आव आणत हात वर करण्याचा अधिक सोयीस्कर मार्ग अंगिकारला जातो. हे करत असताना साहजिकपणे प्रत्येकाची वैयक्तिक ओळख आणि तिच्यासोबत येणारी विचारसरणीचा मोठा प्रभाव असतो. अलीकडेच अमेझॉन प्राइमवर आलेल्या ‘पाताल लोक’ या सिरीजमुळे अशा चर्चा पुन्हा घडू लागल्याने आपला हाच वैयक्तिक, राजकीय, सामाजिक अवकाश ढवळून निघाला आहे. 

‘पाताल लोक’चं मध्यवर्ती कथानक म्हणजे - ‘सीबीआय’ची एक टीम दिल्लीतील रस्त्यांवरून एका गाडीचा पाठलाग करत आहे. एका पुलावर या गाडीला घेरण्यात ‘सीबीआय’ यशस्वी होते. घटनास्थळी मीडियाची एक ओबी व्हॅन उपस्थित असल्याने पाठलाग केलेल्या गाडीतून उतरलेल्या चारही लोकांना चकमकीत ठार मारण्याची ‘सीबीआय’ची योजना यशस्वी होत नाही. लागलीच पोलिस तिथे पोचल्याने पकडल्या गेलेल्या चारही लोकांना त्यांच्या हाती सोपवलं जातं. हे लोक संजीव मेहरा (नीरज काबी) या उच्चभ्रू पत्रकाराची हत्या करण्यासाठी इथे आल्याचं उघडकीस येतं. त्यांची योजना अयशस्वी झालेली असल्याने, आणि हे प्रकरण अगदीच साधं सरळ असल्याचे सांगत सीबीआय पोलिसांना तडकाफडकी निकाल लावण्यास सांगते. ज्याच्याकडे ही केस सोपवण्यात आलेली असते त्या हाथीराम चौधरी (जयदीप अहलावत) या पोलिस अधिकाऱ्याला मात्र सगळं प्रकरण दिसतं त्याहून गंभीर असल्याचं लक्षात येतं. या प्रकरणाची पाळंमुळं खोलवर रुजलेली असल्याचं जाणवल्याने तो आपला तपास चालू ठेवतो. 

 

 

आता या सगळ्या चित्रात सामाजिक राजकीय संदर्भ कुठे येतात, तर ते येतात या मध्यवर्ती प्रकरणाचा भाग असलेल्या पात्रांच्या आणि त्यांच्या सभोवतालाच्या निमित्ताने. मालिकाकर्ते यातील जवळपास प्रत्येक पात्राला एक विशिष्ट अशी ओळख आणि भूतकाळ प्राप्त करून देतात. ही ओळख आणि त्यांचा भूतकाळ हा त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचं लिंग आणि आर्थिक-सामाजिक परिस्थिती अशा गोष्टींशी घनिष्ठ संबंध बाळगून असलेला आहे. चौधरी हा पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत लहानाचा मोठा झालेला मध्यम वर्गीय पोलिस अधिकारी आहे. सुरुवातीला तो स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोक अशा तीन स्तरांमध्ये विभागणी करत समाजातील स्तर उलगडतो. तेव्हाच आर्थिकदृष्ट्या मधल्या वर्गात मोडणाऱ्या चौधरीला कुणाही व्यक्तीप्रमाणे वरच्या वर्गात जाण्याची आकांक्षा असल्याचं दिसून येतं. ही केस म्हणजे कित्येक वर्षांत हाती आलेल्या पहिल्या आणि कदाचित शेवटच्या महत्त्वाच्या केसपैकी एक आहे. त्याच्या हाती वरच्या वर्गात जाण्याचा तो एक मार्ग असतो. त्याच्या सभोवतालचे बहुतांशी पोलिस अधिकारी इम्रान अन्सारी (इश्वक सिंह) या त्याच्या कनिष्ठ सहाय्यकाच्या धार्मिक ओळखीमुळे हातचं राखून वागत असताना तो तसं करीत नाही. त्याचं असं न वागणं आणि चिकाटीने या केसची पाळंमुळं शोधत राहणं ही त्याची दोन वैशिष्ट्यं आहेत. 

नेमक्या इथूनच ‘हिंदूफोबिया’ (हिंदूद्वेष) या संज्ञेचा आणि या मालिकेचा (तथाकथित) संबंध येतो. आता हे का घडतं, तर ‘पाताल लोक’मध्ये भारतातील जातीव्यवस्थेचे स्तर उलगडत या व्यवस्थेवर टीका केली जाते. आणि हे करत असताना पोलिस अधिकारी अन्सारी, किंवा पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांपैकी कबीर (असिफ खान) या लोकांचं मानवीकरण (ह्युमननायजेशन) केलं जातं. त्यांना सहानुभूती मिळेल अशा प्रकारे सादर केलं जातं. हे दाखवताना धार्मिक संदर्भांत मुस्लिम ही ओळख बाळगून असलेल्या पात्रांकडे संशयित म्हणून पाहणं किंवा वांशिक शिवीगाळ केली जाणं या गोष्टी आपल्या समाजात कशा रीतीने घडतात याबाबतची दृश्यं येतात. साहजिकच या मुस्लिमद्वेषी व्यक्ती हिंदू धर्मातील असल्याने सदर मालिका हिंदूद्वेषी आहे असा निकाल लावला जातो. जे पुन्हा एकदा सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या मुद्द्याजवळ आणून सोडतं. मालिकेला अमुकद्वेषी असा शिक्का मारत असताना जणू त्या त्या गोष्टी घडतच नाहीत असा आव आणला जातो. प्रत्यक्षात मात्र सदर मालिका अशा गोष्टींची सत्यता आणि अस्तित्त्व अधोरेखित करते, इतकंच काय ते घडतं. 

मालिका धर्म-संस्कृती, जातीयवाद या संदर्भांत येणारे उच्च-नीच स्तर आणि त्यावरून होणारा भेदभाव दर्शवते. समाजाचं आर्थिक पातळीवरही विभागलं जाणं दिसतं. इथे शोषित वर्ग हा आर्थिक, जातीय आणि धार्मिक संदर्भव्यवस्थेत खालच्या स्तरात मोडणारा आहे. मालिका अल्पसंख्यांक श्रेणीत मोडणाऱ्या शोषितांच्या प्रश्नाला वाचा फोडत असताना या व्यवस्थेत वरच्या वर्गात मोडणाऱ्या मोठ्या गटाच्या नाजूक भावना दुखावल्या जातात. आपल्या छोटेखानी विश्वाच्या पलीकडेही एक जग आहे, हे नाकारत मुळात उच्च वर्ग-वर्णच कसा शोषित आहे असं एक समांतर कथन रचलं जातं. महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना ‘पाताल लोक’ असो किंवा ‘सेक्रेड गेम्स’ असो, या मालिका हिंदू मिथकांचा वापर करीत सगळी टीका करतात, हे अधिक जिव्हारी लागणारं ठरतं. 

मालिकेच्या मध्यवर्ती कथानकात पकडले गेलेले चारही गुन्हेगार हे या ना त्या प्रकारे शोषणाचे बळी ठरलेले आहेत. यातील एक हिंदू आहे, दुसरा मुस्लिम, तिसरा शीख, तर चौथी स्त्री ही भारताच्या ईशान्येकडील रहिवासी आहे. यापैकी टोप सिंह (जगजीत संधू) आणि विशाल त्यागी (अभिषेक बॅनर्जी) हे दोघे त्यांच्या स्वतःच्याच जातीतील अंतर्गत संघर्षाचे बळी आहेत. हा अंतर्गत संघर्ष समोर मांडत असताना मालिका जाताजाता पुरुषव्यवस्थेवरही कशा प्रकारे भाष्य करते हे महत्त्वाचं ठरतं. हे दोघेही जातीअंतर्गत शोषणाचे बळी ठरलेले असले तरी त्यांच्यावरील शोषणाचं मूळ हे पितृसत्ताक व्यवस्थेत आहे. म्हणायला त्यांचं शोषण घडलेलं असलं तरी शोषणाचं साधन (आणि खऱ्या बळी) खरंतर त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया ठरलेल्या आहेत. दोघांच्याही कुटुंबातील स्त्रियांवर घडलेले बलात्कार हे याचं द्योतक आहेत. 

अभिषेक चौबेच्या ‘सोनचिडिया’मधील एक पात्र म्हणतं त्यानुसार, ‘यह ब्राम्हण, ठाकूर, क्षत्रिय, शूद्र सब मर्दों में तय होवे हैं. औरतों की जात ही अलग होवे हैं. इन सब से परे, इन सब से नीचे’. ‘पाताल लोक’मधील स्त्री-पुरुष नात्याचं राजकारणदेखील अशाच प्रकारचं आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक स्तरावर पुरुषांचं शोषण होत असताना त्याला समांतर पद्धतीने अगदी सूक्ष्म स्तरावर स्त्रियांचं लैंगिक शोषण घडत राहतं. नेहमीप्रमाणे धर्म, जातीय अस्मिता दुखावल्या जात असताना सूक्ष्म पातळीवर प्रभावीपणे उलगडत जाणारं हे शोषण दुर्लक्षितच राहतं. अपवाद फक्त एका दृश्याचा. गृहिणी असलेली हाथीराम चौधरीची बायको, रेणू (गुल पनाग) मुलावर लक्ष ठेवत नाही म्हणत हाथीराम तिच्या कानाखाली मारून बाहेर निघून जातो. सगळं प्रकरण मिटल्यावर मात्र घरी आलेल्या रेणू त्याच्या कानाखाली मारायला विसरत नाही. रेणू असो किंवा संजीवची पत्नी, डॉली (स्वस्तिका मुखर्जी) असो, मालिकेतील बहुतांशी स्त्रिया या पुरुषांच्या जगात वावरणाऱ्या स्त्रिया आहेत. मात्र, पतीच्या कानाखाली मारून एव्हाना स्वतःवर झालेल्या अन्यायाला इतक्या तीव्र प्रकारे प्रत्युत्तर देणं हे बहुधा तिला एकटीलाच जमतं. 

तर, पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांमध्ये कबीर या मुस्लिम समुदायातील व्यक्तीचाही समावेश आहे. जे पुन्हा आधीच्याच मुद्द्याकडे आणून सोडतं. मालिकेत इतर पात्रांसोबत या पात्राचंही मानवीकरण केलं जाणं हे ‘हिंदूफोबिक’ ठरतं. याखेरीज या चौघांमध्ये एका तृतीयपंथी महिलेचा, मेरी लिंग्डोचाही (मैरेम्बम रोनाल्डो सिंह) समावेश आहे. या पात्राच्या लैंगिकतेवरून इतर पात्रांकडून केला जाणारा भेदभाव आणि अमानवी व्यवहारदेखील समाजातील लैंगिकतेचे पदर उलगडणारा आहे. या पात्राचं मॉंगलॉइड आणि नेपाळी वंशाचं असणं यातून होणारा वांशिक द्वेष आणि लैंगिक भेदभाव असा दुहेरी द्वेष इथे दिसतो. यातही संदर्भ लक्षात न घेता ही शिवीगाळ म्हणजे वंशद्वेषाला चालना देणारी असल्याची मतं आली आहेतच. मात्र, पुन्हा इथेदेखील मुद्द्यांचं अस्तित्त्व मान्य करणे हे मुद्द्याला बढावा देणारं नसतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. संदर्भ म्हणून खुद्द एका नेपाळी समुदायाचा भाग असलेल्या स्त्रीने लिहिलेला हा लेख वाचावा. यासोबतच ‘पाताल लोक’ आणि ‘दिल्ली क्राइम’ या दोन्ही सिरीजमध्ये पोलिसांची क्रूरतादेखील स्पष्टपणे दिसून येते. या चारही गुन्हेगारांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्या धर्म-लिंगानुसार या वागणुकीत घडणारे बदलही दिसतात. 

आता साहजिकपणे हे सगळे मुद्दे हाताळले असल्याने मालिका डाव्या विचारांची ठरते. एकवेळ मालिकेचं डाव्या विचारांचा पुरस्कार करणं मान्य केलं तरीही त्याने उपरोक्त मुद्दे चूक किंवा ते मांडणं चूक ठरतं का, तर नाही. कारण, सरतेशेवटी भारतीय समाजातील इथे मांडलेले स्तर हे वास्तवावर आधारित असेच आहेत. हे सगळं चित्र परिपूर्ण आहे असा दावा मी करत नाही. कारण, हे स्तर उलगडत असताना स्टीरियोटिपीकल ठराव्यात अशा काही बाबी घडलेल्या आहेतच. फक्त या काही गोष्टींमुळे मालिकेत मांडलेल्या इतर मुद्द्यांची तीव्रता कमी केली जाऊ नये, इतकंच. 

मालिकाकर्त्यांची उदारमतवादी धोरणं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मालिकेत प्रतिबिंबित झालेली आहेत. मुळातच मालिकाकर्ते हे त्यांच्या विचारांबाबत जागरूक आहेत. त्यामुळेच मालिकेत ‘वुई लिबरल्स आर सच अ क्लिशे. ऑल वुई नीड फॉर अ ह्युमन स्टोरी इज अ मुस्लिम क्रिमिनल ऑर अ एलजीबीटी कॅरेक्टर’ असे मेटा डायलॉग्ज येतात. आणि मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांकडून उजव्या विचारसरणीची कथनं राजरोसपणे मांडली जात असताना जर त्याला समांतरपणे डावी कथनव्यवस्था उभी राहत असेल तर निवडक टीका करण्यात अर्थ उरत नाही. 

 

 

जे आणतं मालिकेतील आणखी एका महत्त्वाच्या घटकाकडे, प्रसार माध्यमांकडे. इथली प्रसार माध्यमंदेखील मालिकेतील इतर घटकांप्रमाणे उच्च-नीच अशा दोन वर्गांत विभागली गेली आहेत. त्यामुळेच संजीव मेहरा, सारा मॅथ्यू (निहारिका लायरा दत्त) ही दिल्लीतील एसी ऑफिसमधून कार्यरत असणारी पात्रं आणि आशुतोषसारखी गाव-खेड्यांत काम करणारी पात्रं असे दोन गट दिसतात. आशुतोष म्हणतो त्याप्रमाणे इंडिया आणि भारत या दोन वेगळ्या संकल्पना असणं हे अशाच प्रकारे समाजाच्या आर्थिक, सामाजिक पातळीवर दुभंगलेलं असण्यातून येतं. शिवाय, एका मोठ्या स्तरावर पाहायला गेल्यास प्रसार माध्यमं ही केवळ राजकीय घटनांमध्ये वापरलं जाणारं एक साधन म्हणून समोर येतात. मालिकेचा शेवट जरी पाहिला तर समांतर व्यवस्थेत त्यांचं अस्तित्त्व कवडीमोल उरल्याचं दिसतं. आता इथल्या प्रसार माध्यमांचं हेतूपुरस्सररीत्या उथळ चित्रणदेखील आपल्या समांतर व्यवस्थेतील माध्यमं आणि माध्यमकर्मींच्या जवळ जाणारं ठरतं ते याचमुळे. 

‘पाताल लोक’ ही सर्वार्थाने परिपूर्ण नसेलही. मात्र, ती समकालीन समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि माध्यमव्यवस्था यांचं प्रभावी चित्रण करणारी सिरीज आहे. ती सभोवतालातील प्रश्न मांडून समाजाचा बुरखा फाडते, व्यवस्थेचं भयावह रूप समोर मांडते. इथे घडणाऱ्या जातीय, वांशिक, लैंगिक शोषणाच्या घटना म्हणजे आपल्या सभोवतालाच्या भयाण चित्राचा एक भाग आहेत. अगदी त्याही कुणाला अस्वस्थ करत नसतील तर मात्र अवघड आहे.