Quick Reads

ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाइव्ह: कल्पकतेतून बहरणारा आधुनिक व्हॅम्पायरपट 

‘स्पॉटलाईट’ सदर

Credit : Recorded Picture Company

‘ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाइव्ह’च्या सुरुवातीला ओपनिंग क्रेडिट्सच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या आकाशातील ताऱ्यांच्या फिरत्या चित्रचौकटीची जागा जुन्या फोनोग्राफ रेकॉर्डची फिरती तबकडी अगदी अलवारपणे घेते. या तबकडीवर वांडा जॅक्सनचं ‘फनेल ऑफ लव्ह’ नावाचं एक सुंदर गाणं सुरु असतं. इव्ह (टिल्डा स्विन्टन) बेडला टेकून आणि अॅडम (टॉम हिडलस्टन) काऊचवर डोळे मिटून पडलेला आहे. ही दोघं असलेल्या दृश्यांत कॅमेरा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरतोय, आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरणारी तबकडी स्थिरदृश्यात दिसते अशी तिन्ही दृश्यं आलटून पालटून समोर दिसत राहतात. गाण्याचे बोल आहेत ‘हिअर आय गो/फॉलिंग डाऊन डाऊन डाऊन/माय माइंड इज अ ब्लँक/माय हेड इज स्पिनिंग अराऊंड अँड अराऊंड/अॅज आय गो डीप इन्टू द फनेल ऑफ लव्ह’. एक प्रकारे या बोलांना खरं ठरत कॅमेरा नेमून दिलेल्या दिशेनं गोलाकार फिरत खाली जात राहतो. त्याची गतीही हळूहळू वाढत जाते, नि गाण्याचा काहीएक भाग झाला की कॅमेरा स्थिरावतो. या दृश्यांत चित्रपटातील काही महत्त्वाचे घटक दिसतात. इव्हच्या चहुबाजूला पुस्तकं दिसतात, तर अॅडमच्या हातात, तो बसलाय त्या काऊचच्या मागे गिटार आहे. फोनोग्राफ रेकॉर्ड दिसतं, ज्यामुळे चित्रपट आला त्या काळात, २०१३ मध्येही पात्र अॅनालॉग यंत्र वापरत असल्याचं दिसतं. 

हे सुरुवातीचं दृश्य इतक्या सविस्तरपणे सांगण्याचा उद्देश हा की, संगीत आणि साहित्य इथले अविभाज्य घटक आहेत. किंबहुना ‘ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाइव्ह’ एकुणातच साहित्यिक, सांस्कृतिक, सांगीतिक जाणिवा आणि संदर्भांनी समृद्ध आहे. हे संदर्भ या चतुराईने लिहिलेल्या चित्रपटात पात्रं आणि कथानकाच्या प्रौढ जाणिवांमुळे येतात. अॅडम आणि इव्ह हे दोघे व्हॅम्पायर्स आहेत. त्यामुळे दोघेही नश्वर आहेत, आणि गेल्या काही शतकांपासून नात्यात आहेत. गेल्या काही काळापासून ते झॉम्बीजची (इथे अनर्थ मनुष्यजात) आत्मनाशाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल पाहत आलेले आहेत. आता इथे सांस्कृतिक, साहित्यिक, वगैरे संदर्भ येतात ते या दोघांच्या याच अनेक वर्षांपासून जिवंत असण्याच्या अनुषंगाने. 

दोघांनाही अनेकविध लेखक, कवी, संगीतकार, शास्त्रज्ञांचा सहवास लाभलेला आहे. याखेरीज अॅडम स्वतः संगीतकार असल्याचं कळतं. इतकंच नव्हे, तर याआधी होऊन गेलेल्या अनेक संगीतकारांची कामगिरी मुळात त्याचीच असल्याचं सांगितलं जातं. कुठलाही कलाकार कला कुणासाठी बनवतो, फक्त स्वतःसाठी की कुणीतरी ती अनुभवावी यासाठी याचं एक अंग इथे दिसतं. अॅडम त्याच्या व्हॅम्पायर असण्यामुळे आणि इतर काही कारणांमुळे प्रसिद्धीपासून दूर राहत असला तरी स्वतःची कला इतरांपर्यंत पोचणं कुठेतरी त्याला गरजेचं वाटतं. ज्यासाठी तो इतरांच्या नावे स्वतःचं संगीत जगासमोर आणण्यासारख्या कृती करत असल्याचं कळतं. 

एकविसाव्या शतकात पूर्वीच्या व्हॅम्पायर्सप्रमाणे थेट माणसांना मारून रक्त प्राशन करणं त्या दोघांना काही पटत नाही. महत्त्वाचं म्हणजे अगदीच प्रदूषित वातावरण असलेल्या एकविसाव्या शतकात असं करणं जीवास धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे अॅडम ब्लड बॅंकेमधून डॉ. वॉटसनकरवी (जेफ्री राईट), तर इव्ह त्यांचा मित्र असलेल्या क्रिस्टोफर मार्लोकडून (जॉन हर्ट) रक्त मिळवत असते. इतक्या काळापासून एकत्र असलेले अॅडम आणि इव्ह चित्रपट सुरु होतो तेव्हा डिट्रॉइट आणि मोरॉको अशा भिन्न शहरांमध्ये राहत असतात. स्काईपवरून एकमेकांशी बोलणं होत असतं. इव्हला अॅडमची सध्याची मानसिक अवस्था काहीशी उदासीन असल्याचं जाणवतं नि ती लागलीच डिट्रॉइटला यायला निघते. 

दोन तास लांबीच्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या अर्ध्या तासात या मोजक्या घडामोडी घडतात. या सगळ्यात एक निवांतपणा आहे. हा मुद्दामहून कायम ठेवलेला निवांतपणा म्हणजे चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक असलेल्या जिम जारमुशच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. हा चित्रपटही झटपट घडणाऱ्या घडामोडींपेक्षा कमीत कमी घडामोडी, दृकश्राव्य पातळीवर अधिक संपन्न असे घटक, आणि आशयावर, संवादांवर अवलंबून असणारा आहे. जारमुशची विक्षिप्त विनोदबुद्धी आणि त्याच्या चित्रपटांतील विशिष्ट तऱ्हेचा विनोद इथेही अस्तित्त्वात आहे. म्हणजे एका दृश्यात वॉटसनकडून आणलेल्या रक्ताला गोठवून त्याचा आस्वाद आइसक्रीम म्हणून घेताना दिसतात. त्याच्या ‘द डेड डोन्ट डाय’ या २०१९ आलेल्या झॉम्बी-कॉमेडी चित्रपटातही त्याची ही विशिष्ट अशी शैली कायम राहिलेली होती. त्यामुळे त्यापूर्वी आलेल्या ‘ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाइव्ह’सारख्या स्टायलिस्टिक चित्रपटात ती दिसणं तर तसं स्वाभाविकच आहे. 

 

 

इव्ह डिट्रॉइटला आल्यावर त्यांच्यातील नातेसंबंध भलेही न्यूनतम पातळीवर का असेना, पण उलगडत जातात. याखेरीज चित्रपटातील सांस्कृतिक संदर्भांमध्ये अधिक भर पडते. असं करताना जारमुशची कल्पकता अधिकाधिक बहरत जाते. इथल्या पात्राचं केवळ नावच क्रिस्टोफर मार्लो या प्रसिद्ध नाटककाराकडून येत नाही, तर मुळात मार्लो हा व्हॅम्पायर आहे आणि त्याने एकेकाळी स्वतःच्या मृत्यूचं नाट्य रचलं असं कथानकाच्या ओघात सांगितलं येतं. याखेरीज शेक्सपिअरची बहुतांशी नाटकं मार्लोने लिहिलेली आहेत हेही म्हटलं जातं. अॅडम हा पी. बी. शेली आणि लॉर्ड बायरनसारख्या एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश कवींसोबत असायचा असा उल्लेख एके ठिकाणी येतो. 

अॅडम डॉ. वॉटसनला भेटायला जातो तेव्हा त्याने घातलेल्या अॅप्रनवर एकदा ‘डॉ. कॅलिगरी’ नावाचा, तर आणखी एकदा ‘डॉ. फॉस्ट’ नावाचा बॅज असतो. यातल्या एका भेटीत वॉटसन त्याला ‘डॉ. स्ट्रेंजलव्ह’ म्हणून संबोधतो. साहजिकच इथे ‘द कॅबिनेट ऑफ डॉक्टर कॅलिगरी’ (१९२०) हा जर्मन एक्स्प्रेशनिस्ट सिनेमा, स्टॅन्ली कुब्रिकचा ‘डॉ. स्ट्रेंजलव्ह’ (१९६४) आणि जर्मन लोककथेतील फॉस्ट असे संदर्भ असतात. हे सगळं काही प्रमाणात वुडी अॅलनच्या ‘मिडनाईट इन पॅरिस’मधील (२०११) गमतीशीर प्रसंगांना समांतर जाणारं आहे. 

योजेफ वान विजेमचं संगीत आणि एकूण चित्रपटाचा साऊंडट्रॅक या दोन्ही गोष्टी इथल्या सांगीतिक वातावरणाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आहेत. विजेमला त्याच्या या चित्रपटाच्या स्कोअरकरिता ‘कान चित्रपट महोत्सवा’तील ‘साऊंडट्रॅक अवॉर्ड’ मिळाला होता. इथल्या पात्रांच्या काहीशा सुंदर अर्थाने हॉंटेड आणि अनंत आयुष्याला पूरक अशी सौंदर्य दडलेली उदासीनता त्याच्या संगीतात जाणवते. जारमुश योरिक ल् सोक हा छायाचित्रकारासोबत काम करत इथल्या प्रत्येक चित्रचौकटीत, प्रत्येक दृश्यात रंग कसे वापरतो, त्यांना अधिकाधिक रंजक कसं बनवतो हे पहावंसं ठरतं. 

‘ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाइव्ह’ हा पदोपदी मोहक वाटत राहतो. ही मोहकता जितकी तो ज्या पद्धतीने समोर मांडला जातो त्यात, आणि त्यातील संकल्पनांमध्ये दडलेली आहे, तितकीच जारमुश इथलं विश्व ज्या नजाकतीनं रचतो यात दडलेली आहे. श्रवणीय संगीत आणि प्रेक्षणीय दृश्यांसाठी तो पहायला हवा हे सांगणे न लगे. पण याहून महत्त्वाचं म्हणजे जिम जारमुश या सुंदर चित्रपटकर्त्याशी अजून परिचय नसेल तर तो आवर्जून पहायला हवा.