Quick Reads

मॅरेज स्टोरी: एका नात्याच्या अंताची नाजूक गोष्ट

स्पॉटलाईट सदर

Credit : Netflix

सोफिया कपोला लिखित-दिग्दर्शित ‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ (२००3) आणि स्पाईक जोन्झ लिखित-दिग्दर्शित ‘हर’ (२०१३) हे दोन्ही चित्रपट एकमेकांना पूरक असल्याचं मानलं जातं. याचं कारण म्हणजे सोफिया आणि स्पाईक हे दोघेही एकेकाळी एका नात्यात होते. काळाच्या ओघात ते एकमेकांपासून दूर गेले नि त्याची परिणीती ते नातं तुटण्यात झाली. पुढे जाऊन दोघांनी हे दोन्ही चित्रपट बनवले, ज्यात त्या त्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी त्या त्या दिग्दर्शकाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती होती. हे दोन्ही चित्रपट म्हणजे एका अर्थी प्रेमाच्या कथा होत्या. प्रेमकथा नव्हे, तर प्रेमाच्या कथा. माणसं प्रेमाच्या शोधात असण्याच्या कथा. दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांना परिपूर्ण बनवणारी अशी एक प्रकारची खिन्नता अस्तित्त्वात होती. साहजिकच दोन्ही चित्रपटकर्त्यांमधील नातं आणि त्यांनी बनविलेल्या कलाकृतींमधील संकल्पनात्मक साधर्म्य, मानवी भावभावना आणि नातेसंबंध समोर मांडण्याची अलवार शैली यांच्यामुळे या चित्रपटांचं नाव सोबतच घेतलं जातं. 

नोआ बॉमबाख लिखित-दिग्दर्शित ‘मॅरेज स्टोरी’ची पडद्यामागील कथाही काहीशी अशीच आहे. नोआचं अभिनेत्री जेनिफर जेसन लीसोबत असलेलं नातं आणि घटस्फोटाच्या रूपात त्या नात्याचा शेवट म्हणजे ‘मॅरेज स्टोरी’मागील थेट प्रेरणा असल्याचं त्याने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या तिन्ही चित्रपटांची विश्वं ही त्या त्या चित्रपटकर्त्यांच्या वैयक्तिक अनुभव आणि अवकाशातून निर्माण झालेली आहेत असं मानता येईल. आणि हेच ठळक वैशिष्ट्य सदर चित्रपटांना अधिक परिपूर्ण बनवणारं आहे. 

कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, नात्यांतील तणाव, एकल जगणं या नोआ बॉमबाखच्या चित्रपटांमधील काही नेहमीच्या संकल्पना आहेत. अनेकदा तो त्याच्या चित्रपटांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनात चाललेला भावनिक, मानसिक कोलाहल, वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव अशा अमूर्त भावना आणि संकल्पना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नातेसंबंध मग ते प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नीमधील असोत की भावंडं, पालकांशी असलेले, या नात्यांची गुंतागुंत तो मांडू पाहतो. 

चार्ली (अॅडम ड्रायव्हर) हा न्यू यॉर्कमधील एका नाटक कंपनीचा मालक आणि दिग्दर्शक आहे. न्यू यॉर्क हे शहर त्याच्यासाठी सर्व काही आहे. त्या शहरात, तिथल्या आपल्या आयुष्यात तो खुश आहे. मात्र, एक समस्या आहे, ती म्हणजे त्याच्या पत्नीला, निकोलला (स्कार्लेट जोहान्सन) असं अजिबात वाटत नाही. ती एक अभिनेत्री आहे. एकेकाळी त्याच्यासाठी तिची अभिनेत्री म्हणून असलेली व्यावसायिक कारकीर्द सोडून ती न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झाली असली तरी आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. तिला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जाणिवांनी, चौकटीबद्ध आयुष्याने त्रस्त केलं आहे. चार्लीची नाटक दिग्दर्शक म्हणून असलेली भूमिका कायमच या दोघांच्या नात्यातही तशीच राहिलेली आहे. ती म्हणजे सतत समोरच्या व्यक्तीला, निकोलला नियंत्रित करू पाहणाऱ्या व्यक्तीची. निकोलने कायमच त्याच्या या वर्चस्ववादी भूमिकेपुढे नमतं घेतलेलं आहे. मात्र इथून पुढे असं घडणं तिला शक्य वाटत नाही. या नात्यात राहणं तिला शक्य वाटत नाही. यावेळी ती तिच्या नेहमीच्या पॅसिव्ह भूमिकेत न राहता एका मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने लॉस अँजेलिसमध्ये येते नि तिथेच घटस्फोटासाठी अर्ज करते. निकोलला कायदेशीर प्रक्रियेचा आधार घ्यावासा वाटल्याने चार्लीलाही या धबडग्यात पडण्यावाचून इलाज नसतो. आणि कायदेशीर प्रक्रियात्मक बाबींमुळे एका समंजसरीत्या वेगळं होणं अपेक्षित असलेल्या नात्याच्या शेवटाची प्रक्रिया तीव्र स्वरूपात घडू लागते. 

 

 

चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा दोघे एका मॅरेज काउन्सेलरसमोर बसलेले असतात. त्याने दोघांनाही एकमेकांमधील चांगले गुण लिहिण्यास सांगितलेलं असतं. दोघांनी लिहिलेला मसुदा ऐकू येत असला तरी ते दोघेही एकमेकांसमोर तो वाचत नाहीत. इथूनच त्यांच्यातील वादाचं स्वरूप समोर दिसू लागतं. दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना असल्या तरी एकमेकांप्रती असलेला आदर मधे कुठेतरी हरवल्याचं जाणवतं. यांच्यातील वादाचा, रागाचा आलेख सरत्या प्रत्येक क्षणानिशी वाढत जातो. 

या सगळ्या क्लिष्ट आणि वेदनादायक प्रक्रियेतही विनोदाचं अस्तित्त्व कायम राहतं. हा विनोद अनेकदा व्यक्तीकेंद्रित प्रकारचा आहे. चार्ली, निकोल, नोरा, चार्लीचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा वकील - बर्ट स्पिट्झ (अॅलन अल्डा) आणि जे मरोटा (रे लियोटा), निकोलची आई सॅन्ड्रा (ज्युली हागेर्टी) या सर्वांचे अगदी विशिष्ट आणि परस्परविरोधी स्वभाववैशिष्ट्यांतून हा विनोद निर्माण होतो. असं करताना बॉमबाख बरीचशी निरीक्षणं नोंदवत राहतो. चार्ली आणि निकोलच्या वकिलांमधील द्वंद्वामुळे त्यांच्या जीवनातील गुप्त असणं अपेक्षित असलेल्या गोष्टींचे उल्लेख येऊन वैयक्तिक आयुष्याच्या चिंधड्या उडत राहतात. लग्नसंस्था आणि ही घटस्फोटाची प्रक्रिया अशा दोन्ही बाबींकडे गंभीर चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. 

बॉमबाख चार्ली आणि निकोलच्या आयुष्यातील चढ आणि उतार दोन्ही दाखवतो. मुख्य म्हणजे तो कुणाचीही बाजू घेत नाही. नाही म्हणायला घटस्फोटाच्या दिशेने निकोलने पहिलं पाऊल उचलणं, आणि तिची वकील, नोराची (लॉरा डर्न) काहीशी आक्रमक भूमिकेमुळे सहानुभूती चार्लीकडे जाण्याची शक्यता असली तरी त्याचं तिला नियंत्रित करू पाहण्याचं वर्तनही इथे दिसतं. एके ठिकाणी निकोल म्हणते, “आय डिडन्ट बिलॉंग टू मायसेल्फ”. किंवा आणखी एका ठिकाणी म्हणते, “ही डिडन्ट सी मी अॅज सेपरेट फ्रॉम हिमसेल्फ”. याखेरीज त्याच्या विवाहबाह्य संबंधांचा मुद्दाही इथे उपस्थित होतो. यावर चार्लीचा युक्तिवाद असतो की गेले कित्येक महिने आम्हा दोघांमध्ये कुठलेही शारीरिक संबंधच उरले नसल्याने हे घडणं स्वाभाविक असतं. 

 

 

साहजिकच चार्ली किंवा निकोलपैकी कुणीही पूर्णतः ब्लॅक किंवा पूर्णतः व्हाईट अशा छटांमध्ये दिसत नाही. कारण मानवी स्वभाव हा अशा काळ्यापांढऱ्याहून अधिक क्लिष्ट असतो. चार्ली त्याच्या स्वप्नपूर्तीच्या ध्यासात इतका गुंतलेला असतो की त्याला आपण निकोलला गरजेचं असलेलं अवकाश पुरवू शकत नाही आहोत याची जाणीवही दिसत नाही. त्याच्यासाठी त्याचं आयुष्य न्यू यॉर्क आणि ब्रॉडवेशी संबंधित असतं. लॉस अँजेलिसमध्ये निकोलचं कुटुंब राहतं हा भाग सोडता हे शहर त्याच्या विश्वाचा भाग तसं कधीच नसतं. हेच निकोलबाबत उलट असतं. तिला अभिनेत्री म्हणून गरजेचं असलेलं एक्स्पोजर मिळण्याच्या शक्यता केवळ एलएमध्ये असतात. न्यू यॉर्कमध्ये ती केवळ चार्लीच्या नाटकांत काम करणारी एक अभिनेत्री आणि त्याची पत्नी असते. याउलट लॉस अँजेलिसमध्ये येऊन ती स्वतः दिग्दर्शक बनते, आणि एमी पुरस्कार सोहळ्यात नामांकनही मिळवते. चित्रपटात एके ठिकाणी वापरली जाणारी ‘अ बिट ऑफ अर्थ दॅट्स युअर्स’ ही संज्ञा इथे खऱ्या अर्थाने सत्यात उतरते. ती किंबहुना दोघेही ज्या नात्यात नाखूष आहेत अशा अत्यंत क्लेशकारक नात्यात राहण्यात अर्थ नसतो हे स्वाभाविक असतं. किमान त्या नात्यातून बाहेर पडल्याने त्यांना स्वतःचं असं अवकाश गवसतं. 

रँडी न्यूमन या संगीत क्षेत्रातील एका उस्ताद व्यक्तिमत्त्वाचं संगीत म्हणजे ‘मॅरेज स्टोरी’मधील एक महत्त्वाचा आणि प्रभावी घटक आहे. याखेरीज बॉमबाख अनेक दृश्यं संगीतविरहित रुपात समोर मांडतो. हा संगीताचा अभाव आणि ध्वनी आरेखन अनेक महत्त्वाच्या दृश्यांना अधिक प्रभावी आणि अंगावर येणारं बनवतं. 

चित्रपटाच्या शेवटाकडे चार्ली ‘कंपनी’ या ब्रॉडवे म्युजिकलमधील स्टीव्हन सॉन्डहाइमचं ‘बीइंग अलाइव्ह’ हे गीत गातो. ‘कंपनी’मध्ये हे गाणं येतं तेव्हा त्यातील नायक, रॉबर्ट एका अर्थाने त्याच्या (संभाव्य) एकाकी जीवनाची व्यथा व्यक्त करत असतो. जीवन जगण्यासाठी किंबहुना जिवंत असल्याची भावना अबाधित राखण्यासाठी कुणातरी व्यक्तीची सोबत गरजेची असल्याची ही भावना या गाण्यातून व्यक्त होते. ‘मॅरेज स्टोरी’मध्ये चार्ली हे गाणं गातं तेव्हा तोही एकाकी पडलेला असतो. त्यामुळे या गाण्याला ‘कंपनी’मध्ये जितकं महत्त्व होतं, तितकंच महत्त्व चित्रपटातही प्राप्त होतं. चित्रपटाचा यानंतरचा भाग हा कथेचा उपसंहार म्हणून काम करतो. कारण, एव्हाना एका लग्नाची ही गोष्ट पूर्ण झालेली असते. आता ते नातं नसलं तरी ती माणसं उरलेली असतात. प्रेमळ माणसं, समंजस माणसं.