Quick Reads

कोविड-१९ पॅन्डेमिक आणि ‘मंक’

स्पॉटलाईट सदर

Credit : USA network

कोरोनाच्या उद्रेकानंतर एक प्रजाती म्हणून आपल्याला या आपत्तीला द्यावा लागणारा प्रतिसाद हा इंटरेस्टिंग होता. इंटरेस्टिंग या अर्थी की, एखाद्या जागतिक अरिष्टादरम्यान आपलं तग धरून जिवंत राहणं हे मोठ्या स्तरावरील घटनांवर अवलंबून नव्हतं. याउलट रोजच्या जीवनात करणं अपेक्षित असलेल्या छोट्यामोठ्या गोष्टींनाच महत्त्व होतं. मानवी संपर्क टाळत शक्यतो घरात बसून राहणं, सार्वजनिक ठिकाणी जायची गरज भासलीच तर मास्क लावणं, जीवघेणे ठरू शकणारे विषाणू आपल्या संपर्कात येणार नाहीत यासाठी काळजी घेणं, इत्यादी बऱ्याच गोष्टींचा यात समावेश होता. अगदी हात धुण्यासारख्या गोष्टी आवर्जून कराव्या लागत होत्या. या सगळ्या गोष्टी एव्हाना सोशल नॉर्म बनल्या आहेत. (अर्थात बहुतांशी लोक या अगदी सामान्य गोष्टी पूर्वी करत नव्हते, हा बऱ्याच लोकांसाठी आश्चर्याचा मुद्दा होताच.) त्यामुळे मास्क लावून फिरणारी आणि हॅन्डवॉश नि सॅनिटायझर घेऊन फिरणारी माणसं दिसणं आपल्या सवयीचं झालेलं आहे. 

त्यानिमित्ताने पोस्ट-अपॉकलिप्टिक साहित्य, सिनेमे आणि इतर कलाकृती आवडणाऱ्या लोकांची (दुः)स्वप्नं आणि चिंता एका अर्थी सत्यात उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, या चिंता फक्त पोस्ट-अपॉकलिप्टिक कलाकृतींमध्येच दिसतात का, तर त्याचं उत्तर असेल नाही. कारण, अगदी नेहमीच्या जगात नि जीवनात अशा अनेकविध चिंतांचं ओझं आपल्या मनावर घेऊन जगणारी बरीचशी पात्रं यापूर्वी दिसलेली आहेत. त्यामुळेच कुठल्याही व्यक्तीशी (शारीरिक) संपर्क येऊ देण्यास कचरणारी किंवा काही कारणाने शारीरिक संपर्क आला, तर सॅनिटायझर वापरणारी माणसं पाहून मला ‘मंक’ या अमेरिकन मालिकेची प्रकर्षाने आठवण आली. 

विचार करा की, कोविड-१९ नंतर आता बहुतांशी लोक ज्या चिंता आणि भीती उराशी बाळगून जगत आहेत, तसं जगणं म्हणजे एखाद्या व्यक्तीकरिता नेहमीचं आयुष्य आहे. ‘मंक’मधील एड्रियन मंक (टोनी शाल्हुब) या मुख्य पात्राचं जगणं म्हणजे याच विचाराचं प्रत्यक्ष रूप. कारण, मंक हा जंतूंपासून ते दुधाच्या भीतीपर्यंत अनेकविध गोष्टींच्या फोबियाने ग्रासलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा दुसऱ्याने हाताळलेल्या वस्तूच्या संपर्कात आल्यावर हात धुणं किंवा किमान टिश्यू पेपर वापरण्यासारख्या कृती त्याच्यासाठी नेहमीच्या आहेत. अशावेळी सभोवतालात घडणाऱ्या घटना पाहून ‘मंक’ची आठवण येणं काहीसं साहजिकच होतं. 

 

‘मंक’ची संकल्पना आणि पार्श्वभूमी 

‘मंक’ ही २००२ ते २००९ दरम्यान प्रसारित झालेली एक लोकप्रिय अमेरिकन टीव्ही सिरीज आहे. एड्रियन मंक या पेशाने गुप्तहेर असलेल्या पात्राभोवती फिरणाऱ्या या मालिकेचं स्वरूप पोलिसी कारवायांना महत्त्व देणारं आहे. ज्यात काहीएक प्रमाणात लेखक सर आर्थर कॉनन डॉयलच्या शेरलॉक होम्स या लोकप्रिय पात्रासारखा अतिचतुर मंक नवनवीन गुन्ह्यांची उकल करत जातो. त्या अर्थी ‘मंक’चा दृष्टिकोन आणि वाटचाल ही बऱ्यापैकी सरळसोट आणि परिचयाची अशी आहे. 

मालिकेची सुरुवात होते तेव्हा एड्रियन मंक हा पोलिस दलात समाविष्ट नसतो. कारण, साडे तीन वर्षांपूर्वी त्याची पत्नी, ट्रुडी हिचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झालेला असतो. आधीच काहीसा विक्षिप्त असलेला मंक तिच्या मृत्यूनंतर नैराश्याच्या गर्तेत अडकत जातो. ज्याचा परिणाम म्हणून तो पुढची साडे तीन वर्षं स्वतःला घरात कोंडून घेतो. दरम्यानच्या काळात त्याची सहाय्यिका शरोना फ्लेमिंग (बिटी श्रॅम) त्याची देखरेख करणं, त्याला गरजेच्या गोष्टी पुरवणं यासारख्या बाबींमध्ये त्याला मदत करत असते. शोच्या पहिल्या भागात मंक इतक्या वर्षांत पहिल्यांदा घराच्या बाहेर पडतो. त्यानंतर कॅप्टन स्टॉटलमायरला (टेड लेविन) गुन्हे सोडवायला मदत करणे, पोलिस दलात पुन्हा एकदा गुप्तहेर म्हणून रुजू होता येईल का पाहणे, वगैरे गोष्टी करत शो पुढे जातो. शिवाय, मंक ट्रुडीच्या मृत्यूचं रहस्य सोडवण्याचे प्रयत्न करताना दिसतो. 

 

 

‘मंक’: ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिटेक्टिव्ह 

मालिकेत मंकच्या पेशामुळे गंभीर गुन्हे आणि रहस्यं दिसत असली तरी मालिकेचं स्वरूप हे गंभीर नाट्यासोबत विनोदचाही समावेश असलेलं आहे. ज्यातील बराचसा भाग हा मंक हे अतिशयोक्तीपूर्ण पात्र, त्याचं विक्षिप्त वागणं याभोवती फिरणारा आहे. मंक हा ‘ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर’ किंवा ‘ओसीडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराने ग्रासलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ठराविक पद्धतीने, अगदी मोजूनमापून करणं, सभोवतालातील अगदी छोट्यामोठ्या चुकांमुळेही प्रचंड अस्वस्थ होणं हे त्याच्याबाबत घडतं. त्यात पुन्हा मंकला अनेकविध गोष्टींची वाटत असणारी भीती, त्याचा फोबिया यामुळे त्याच्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांमध्ये भर पडते. ज्यामुळे त्याच्या दृष्टीने अगदीच न्याय्य असलेलं वागणंदेखील इतर लोकांना विचित्र वाटू लागतं. त्याला स्वतःलादेखील आपल्या या वागण्याची जाणीव आहे. मात्र, त्याला त्याचा नाईलाज असतो. सतत भयग्रस्त असतं त्याच्या जीवनाचा एक भाग बनलेला असतो. (मालिकेत केलं गेलेलं या आजाराचं चित्रण कसं चुकीचं आहे याबाबतचा एक लेख इथे वाचता येईल.) या साऱ्यामुळे मालिकेची जाहिरातदेखील ‘ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिटेक्टिव्ह’ अशी केली गेली होती. 

रँडी न्यूमन या गीत-संगीतकाराने लिहिलेलं ‘इट्स अ जंगल आऊट देअर्’ हे मालिकेचं (दुसऱ्या सीझनपासूनचं) एमी पुरस्कार मिळवलेलं थीम सॉंग ऐकलं तर त्यातही मंकचा स्वभाव आणि त्याची भीती चितारलेली आहे. मंकची भीती, अँक्झायटी, सतत पिच्छा पुरवणारी असुरक्षितेची भावना, नैराश्य या गोष्टी त्याला अधिक रिलेटेबल बनवण्यात महत्त्वाच्या ठरतात. ज्यामुळे त्याचं वागणं अतिशयोक्तीपूर्ण नि विक्षिप्त वाटत असलं तरी तो ‘शेरलॉक’ (२०१०-) किंवा (शेरलॉकचंच डॉक्टरी पेशातील रूप असलेल्या) ‘हाऊस एम. डी.’ (२००४-२०१२) या आणखी दोन शोजमधील पात्रांच्या जवळ जाणारं बनतं. अर्थात, मंक हा या दोन पात्रांहून अधिक प्रेमळ आहे. तो आत्मकेंद्री असला तरी उद्धट नाही. तो अप्रिय ठरत असेल तर फक्त त्याच्या विश्वात सभोवतालच्या लोकांना त्याचं वागणं विक्षिप्त वाटल्याने. त्याचा स्वच्छतेचा आग्रह, त्याला पब्लिक प्लेसेसची आणि एकूणच लोकांची वाटणारी भीतीदेखील याला कारणीभूत असते. कारण, पात्र म्हणून तर मंक तसाही सहजासहजी आवडेल असा आहे. शिवाय, सध्या ‘द मार्व्हलस मिसेस मेझल’मध्ये मिसेस मेझलच्या पित्याच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेल्या टोनी शाल्हुबला त्याच्या आणखी एका जबरदस्त भूमिकेत पाहायचं असेल, तर त्याने साकारलेला मंक पाहणं गरजेचं आहे. 

 

 

उपसंहार: अर्थात मंक आणि आपण 

‘मंक’ची टीम आणि ‘द अॅट होम व्हरायटी शो’ यांनी काही महिन्यांपूर्वी एकत्र येत साधारणतः कोविड-१९ नंतर सगळे कसे मंक बनले आहेत, हे हेरून त्याविषयी ‘मि. मंक शेल्टर्स इन प्लेस’ नावाची एक शॉर्ट बनवली होती. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, मंकची (नि स्टीव्हन किंगसारख्या लेखकांची) एरवी अनेकांना अतिशययोक्तीपूर्ण वाटली असती अशी कल्पना/भीती सत्यात उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे मंक कधी नव्हे इतका रिलेटेबल झाला आहे. 

सोशली ऑकवर्ड आणि अँक्शियस असणाऱ्या लोकांचं हे वैश्विक रूप तितकंच इंटरेस्टिंग आहे. लेख लिहायला अंमळ उशीर झालेला असला तरी नकळतपणे नि नाईलाजाने का होईना, पण एका येऊ घातलेल्या अरिष्टातून सुखरूप वाचण्याची पूर्वतयारी करणाऱ्या दृष्ट्या पात्राभोवती फिरणारी ही मालिका आवर्जून पाहायला हवी.