Quick Reads

मिडनाईट इन पॅरिस: पॅरिस आणि प्रणयरम्यता

‘स्पॉटलाईट’ सदर

Credit : Sony Pictures Classics

स्पॉइलर्स अहेड. कारण या सुंदर सिनेमाविषयी तो काही एक प्रमाणात स्पॉइल केल्याशिवाय बोलता येणं अशक्य आहे. 

‘मिडनाईट इन पॅरिस’मध्ये लेखक-दिग्दर्शक वुडी अॅलनने काय करणं बाकी राहतं, तर उत्तर असेल काहीच नाही. तो या चित्रपटाच्या माध्यमातून स्थळकाळवेळेशी खेळतो. स्थळ-काळात स्वैर वावर करत असताना साहित्य, संगीत, नृत्य, चित्र, चित्रपट अशा नानाविध कला प्रकारांचा, संदर्भांचा अभूतपूर्व वापर करतो. हे करत असताना त्याच्या पात्रांना एक विशिष्ट अशी मेटा शैली प्राप्त करून देतो. त्यांच्यातील संभाषणं ही कळत-नकळतपणे त्यांच्याच आयुष्यावर टिप्पणी करत राहतात, अगदी जोवर त्यांना याची जाणीव होत नाही तोवर. यातून  अॅलनच्या प्रसिद्ध शैलीतील विनोद तर निर्माण होतोच, मात्र महत्त्वाचं म्हणजे ही पात्रं नि हे कथानक मानवी भावभावना, संवेदना, प्रेम, आकर्षण आणि भूतकाळात रममाण होण्याची मानवी प्रवृत्ती अशा क्लिष्ट संकल्पनांचा आढावा घेऊ लागतं. एखाद्या विशिष्ट स्थळाचं, विशिष्ट व्यक्तीचं, विशिष्ट काळाचं आपल्याला असलेलं आकर्षण, त्यामागील आपली भूमिका, त्यात सालसपणाचं प्रमाण किती नि कशालातरी, कुणालातरी कवटाळून बसण्यातील सुप्त स्वार्थीपणा किती या गोष्टी इथे चर्चिल्या जातात. ही पात्रं दिवस रात्र शहरात भटकतात, त्या शहराच्या प्रणयरम्यतेची चर्चा करतात. यातील पात्रं काळाला प्रणयरम्य बनवतात. काही वेळा स्वतःच्या अस्तित्वाकडे अशाच प्रणयरम्य नजरेनं पाहतात. 

‘मिडनाईट इन पॅरिस’च्या प्रत्येक दृश्यचौकटीत, ऐकू येणाऱ्या प्रत्येक आवाजात साहित्यिक, सांगीतिक नि एकुणातच कलात्मक संवेदना ओतप्रोत भरलेल्या आहेत. चित्रपटाची सुरुवातच मुळी होते ती एका दीर्घ माँटाजने. यामध्ये पॅरिसमधील रस्ते, इमारती सकाळ ते रात्र अशा सगळ्या वेळांत दिसतात. प्रखर सूर्यप्रकाश ते पॅरिसमधील पाऊस अशी दोन्ही टोकं दिसतात. पॅरिस आणि प्रणयरम्यता (मग ती शहरापासून ते व्यक्ती, कालखंड अशी कशाबाबतही असू शकते) या दोन गोष्टी इथल्या सर्व घटनांचं, भौतिक आदिभौतिक संकल्पनांचं केंद्रस्थान आहेत. इथल्या पहिल्याच माँटाजमध्ये पॅरिस या शहराचा, त्याच्या गतीचा, त्याच्या अस्तित्वाचा सगळा अर्क एकवटला जातो. सोबत ‘सी तू व्हॉ मा मेअर्’ वाजत असतं, नि इथल्या संगीतानुसार समोरच्या चित्रचौकटी बदलत जातात. शहर नि संगीत हे दोन मुख्य घटक लागलीच दिसू, ऐकू येऊ लागतात. 

 

चित्रपटाची श्रेयनामावली समोर दिसत असताना एका जोडप्यातील संभाषण ऐकू येऊ लागतं. त्यातील पुरुष पॅरिसचं, इथल्या पावसाचं कौतुक करत असतो. सोबत असलेल्या स्त्रीला लग्नानंतर इथे स्थलांतरित होण्याचं आपलं दिवास्वप्न ऐकवून दाखवत असतो. १९२० च्या दशकात हे शहर कसं होतं याचे गुणगान गात असतो. तर, त्यासोबत असलेली स्त्री “तुला प्रत्येक शहरातील पावसाचं आकर्षण का आहे?” अशा अर्थाचे प्रतिप्रश्न करत असते. ती म्हणते त्यात काही प्रमाणात तथ्य असतं, सदर पुरुष एका अशक्यप्राय कल्पनेच्या प्रेमात असतो. तो मात्र, लटकेच तिला “मी तर तुझ्या प्रेमात आहे!” म्हणतो. हे जोडपं म्हणजे गिल आणि इनेझ. गिल पेन्डर (ओवेन विल्सन) हा एक प्रसिद्ध नि यशस्वी अमेरिकन पटकथाकार आहे. लवकरच उच्चभ्रू कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या इनेझशी (रेचल मॅकअॅडम्स) त्याचं लग्न होणार असतं. या पहिल्याच संक्षिप्त संभाषणात या दोघांमधील नात्याचं चित्र समोर उभं राहतं. व्यावसायिक, सामाजिकदृष्ट्या यशस्वी असलेला गिल मुळातच सर्जनशील स्वभावाचा आहे. तो भौतिक गोष्टींच्या नव्हे, तर इनेझ म्हणते तशा अशक्यप्राय, पण सुंदर कविकल्पनांच्या प्रेमात पडणाऱ्या प्रवृत्तीचा आहे. त्यामुळेच तर तो हॉलिवुडच्या जाचातून दूर, नयनरम्य पॅरिसमध्ये येऊन आपली कादंबरी पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत आहे. 

गिल इथे म्हणतो तसं ‘बेवर्ली हिल्स’मधील घर सोडून पॅरिसमध्ये स्थायिक होणं त्याच्यालेखी फारसं अवघड नाही. इनेझ मात्र भौतिकवादी आहे. पुढे जाऊन एके ठिकाणी ती आणि तिची आई, हेलन (मिमी केनेडी) वीस हजार डॉलर किंमतीची खुर्ची खरेदी करण्याची चर्चा करतात. साहजिकच दोघांच्या प्रेमाच्या संकल्पनाही भिन्न आहेत. गिलला या रोमँटिक शहरात इनेझसोबत फिरायचं असतं, त्यात सोबतीला पाऊस असेल तर त्याच्या दृष्टीने सोन्याहून पिवळं. त्याचे हे मनसुबे मात्र पॉल (मायकल शीन) आणि कॅरल बेट्स (निना अॅरिएंडा) या इनेझच्या ओळखीच्या जोडप्याशी अनपेक्षितरीत्या झालेल्या भेटीमुळे उधळून लावले जातात. इनेझ पॉलकडे आकर्षित होत असल्याचं सुरुवातीपासूनच स्पष्टपणे दिसत राहतं. आधीच स्वतःच्या अपूर्ण असलेल्या लिखाणामुळे त्रस्त असलेला गिल त्याच्या दृष्टीने उथळ आणि छद्म-बुद्धिवादी असलेल्या पॉलच्या आसपास असण्याने अधिकच अस्वस्थ होऊ लागतो. इनेझचं मत असतं की गिलने त्याचं लिखाण पॉलला दाखवून त्याचं मत विचारात घ्यावं, जे त्याला अजिबातच मान्य नसतं. 

गिल आणि पॉल हे दोघेही समोरासमोर आले की एकमेकांवर वैचारिकरीत्या कुरघोडी करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. अशातच ही दोन्ही जोडपी एकत्र असताना गिलच्या कादंबरीवर चर्चा सुरु असते, नि त्याच्या कादंबरीतील पात्र नॉस्टॅल्जिया शॉपमध्ये काम करत असल्याचं पॉलला कळतं. पॉल लागलीच भूतकाळात अडकणाऱ्या लोकांवर टीका करतो. इथे चित्रपटातील आणखी दोन महत्त्वाच्या संकल्पना समोर येतात, त्या म्हणजे - नॉस्टॅल्जिया आणि आधुनिकता. गिल सोडून इतर तिघांचं किंबहुना त्याच्या भोवतालच्या सर्वांचंच म्हणणं असतं की नॉस्टॅल्जिया हा वर्तमानाला, वर्तमानातील घडामोडींना नाकारण्याचा एक पलायनवादी प्रकार आहे. गिल हा नेमक्या याच प्रकाराची साथ घेणाऱ्या रोमँटिक प्रवृत्तीचा आहे. ही चर्चा असो, किंवा इनेझच्या आई-वडिलांचं गिलबाबत असलेलं मत असो, सगळीकडे त्याच्या या स्वभावावर टीका केली जाते. कारण, भौतिकवादी आणि सारासार विचार करणाऱ्या, भांडवलवादी अर्थव्यवस्थेवर पोसलेल्या लोकांना त्याच्या या कल्पना मान्यच नसतात. त्यांच्या दृष्टीने पॅरिससारखं शहर म्हणजे केवळ काही दिवस फिरण्याचं शहर असतं. त्यामुळेच कोणे एकेकाळी हेमिंग्वे किंवा फिट्झजेराल्ड जोडपं इथे लेखनकामाठी करत बसलं म्हणून गिलने त्या प्रभावाखाली राहून इथे येऊन स्थायिक होण्याचा विचार करणं हे त्यांच्यादृष्टीने हास्यास्पद असतं. 

वाइन टेस्टिंगवरून परतताना इनेझ पॉल आणि कॅरलसोबत फिरत असताना पॅरिसमध्ये रात्री एकट्याच फिरणाऱ्या गिलसोबत एक वैचित्र्यपूर्ण घटना घडते. रात्री बाराच्या ठोक्याला एक जुनाट धाटणीची गाडी त्याच्यासमोर येऊन उभी राहते. त्या गाडीतील लोकांच्या आग्रहावरून तो त्या गाडीत बसतो नि एका पार्टीमध्ये जाऊन पोचतो. तिथे एक व्यक्ती पियानोवर ‘लेट्स डू इट’ नामक गाणं वाजवत असते. लागलीच त्याला एक जोडपं भेटतं, जे आपण झेल्डा (अॅलिसन पिल) आणि स्कॉट फिट्झजेराल्ड (टॉम हिडलस्टन) असल्याचं सांगतं. आधीच पियानो वाजवत असलेली व्यक्ती कोण हे त्याला आठवत नसतं. आणि आताच भेटलेलं हे जोडपं आपण प्रसिद्ध साहित्यिक जोडपं फिट्झजेराल्ड्स, नि ती व्यक्ती म्हणजे संगीतकार कोल पोर्टर असल्याचं सांगत असतं. गिल सुरुवातीला गोंधळून जातो, मात्र हळूहळू सगळा प्रकार त्याच्या लक्षात येतो. काहीएक विचित्र प्रकार घडून तो एकोणिसशे वीसच्या दशकामध्ये येऊन पोचलेला असतो. एव्हाना स्पष्ट झालेल्या संकल्पनांचा मागोवा घेण्यासाठी लेखक-दिग्दर्शक वुडी अॅलन एक रंजक कल्पना राबवतो. ती म्हणजे टाइम ट्रॅव्हल. आता हे कसं घडलं याचं काहीएक स्पष्टीकरण दिलं जात नाही. ते ना गिलला मिळतं, ना सदर चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला. तसं ते गरजेचंही नसतं. तो एक विस्मयकारक, जादुई अनुभव असतो इतकं पुरेसं असतं. पुढे जाऊन अॅलन आणखी एका चित्रपटात, ‘मॅजिक इन मूनलाईट’मध्येही (२०१४) तो अशक्यप्राय कल्पना त्यांची सत्यासत्यता बाजूला सारून सुंदरपणे राबवताना दिसतो. 

मॅन रे आणि दाली 

एकदा वीसच्या दशकातील पॅरिसमध्ये जाऊन आल्यावर या दशकात गिलच्या वारंवार फेऱ्या होणं साहजिक असतं. इथे अॅलन तत्कालीन साहित्य, चित्रपट, संगीत नि एकूणच कला जगताशी संबंधित अनेकविध लोक समोर उभे करतो. त्याने निर्माण केलेल्या या विश्वात तो या पात्रांच्या निमित्ताने नुसता धुमाकूळ घालतो. हेमिंग्वेपासून (कोरी स्टोल) ते पाब्लो पिकासो, सॅल्वादोर दाली, लुई ब्युन्युएल, टी. एस. एलियटपर्यंत अनेक लोक इथे हजेरी लावून जातात. चित्रपटात एकापाठोपाठ एक अशी संस्मरणीय दृश्यांची रांग लागत जाते. सांस्कृतिक जगतातील नानाविध लोक समोर उभे करत अॅलन एकीकडे वैचारिक चर्चा करतो, तर दुसरीकडे या विश्वात साजेसा विनोद इथे निर्माण करतो. उदाहरणार्थ, गिल हा काळप्रवास करून वीसच्या दशकात आला आहे या गोष्टीत दाली, मॅन रे आणि लुई ब्युन्युएल या सरीयलिस्ट विचारसरणी असलेल्या लोकांना काहीच अविश्वासास्पद किंवा आश्चर्यजनक वाटत नाही. तर, हेमिंग्वे त्याच्या स्वभावविशेषाला अनुसरून शौर्य, पौरुषत्वाच्या त्याच्या संकल्पना याबाबत बोलत राहतो. 

हेमिंग्वे

भूतकाळ आणि वर्तमानातील दृश्यांमध्ये परस्परविरोधी घडामोडी घडताना दिसतात. स्वतःच्या वर्तमानातील इतर कुणालाही आपलं लेखन दाखवायला नकार देणारा गिल मात्र हेमिंग्वेच्या सल्ल्यानंतर थेट गर्ट्रूड स्टाइनला (कॅथी बेट्स) आपल्या कादंबरीचा पहिला खर्डा वाचायला देतो. स्टाइनच्या घरी जमणाऱ्या मैफिलींमध्ये तो पिकासो नि त्याचे जिच्यासोबत विवाहबाह्य संबंध असतात अशा अॅड्रियनाला (मॅरियन कॉटिलर्ड) भेटतो. वर्तमानात इनेझपासून दूर जात असणं, नि भूतकाळातील भेटींमध्ये अॅड्रियनाकडे आकर्षिलं जाणं यातून गिलची मूलतः रोमँटिक स्वभाव नि इनेझसोबतचं नातं म्हणजे त्याचं तिच्यावर प्रेम आहे अशी स्वतःची समजूत घालणं असल्याचं स्पष्ट होतं. गिल जेव्हा अॅड्रियनासोबत रेनसान्स काळात जातो, तेव्हा तो जसा वीसच्या दशकाकडे आकर्षित झालाय तशीच ती या काळाकडे आकर्षित झाल्याचं त्याला समजतं. सोनेरी युग ही किती व्यक्तीसापेक्ष, स्थळकाळसापेक्ष संकल्पना आहे हे तो स्वतःच सांगू लागतो. इथल्या प्रसंगांच्या निमित्ताने काळ या संकल्पनेकडे पाहण्याचा एक चौकटीबद्ध, मर्यादित तऱ्हेचा मानवी दृष्टिकोन दिसतो. 

 

हे विश्व उभं करत वुडी अॅलन प्रेम, नॉस्टॅल्जिया, काळाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन अशा एक अन् अनेक अमूर्त संकल्पना हाताळतो. याखेरीज प्रेमाखालोखाल येणाऱ्या नात्यांमधील फोलपणा, तडजोडी या त्याच्या चित्रपटांत यापूर्वी दिसलेल्या संकल्पनाही इथे विस्तृतपणे येतात. या कथात्म पातळीवरील संकल्पनांपासून ते चित्रपटात येणारं संगीत ते अगदी समोर दिसणाऱ्या दृश्यांपर्यंत सगळेच घटक ‘मिडनाईट इन पॅरिस’ला एक मोहक चित्रपट बनवतात. मात्र, सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे सदर चित्रपट अॅलनचं या शहरावर असलेलं प्रेम दर्शवतो. आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे जरी पहायचं असेल तर अॅलन एखाद्या शहराकडे ज्या अंदाजात पाहतो त्या अंदाजात, त्या नजाकतीनं पहायला हवं. शहरांवर असलेलं त्याचं प्रेम, शहराला त्याच्या कथानकात असलेलं महत्त्वाचं स्थान याचित्रपटापूर्वीही ‘मॅनहॅटन’ (१९७९), ‘न्यू यॉर्क स्टोरीज’मधील (१९८९) त्याने दिग्दर्शित केलेला भाग आणि ‘मॅनहॅटन मर्डर मिस्ट्री’च्या (१९९३) रुपात दिसून आलं होतं. इथे मात्र तो न्यू यॉर्कच्या पुढे जात पॅरिसकडे एखाद्या प्रियकराने प्रेयसीकडे पहावं अशा प्रणयरम्य नजाकतीनं पाहतो. यापुढच्या वर्षात आलेल्या ‘टू रोम इन लव्ह’मध्ये (कसला सुरेख शब्दच्छल आहे हा!) तो रोममध्ये जातो, तर अलीकडेच बनवलेल्या ‘अ रेनी डे इन न्यू यॉर्क’च्या निमित्ताने तो पुन्हा त्याच्या हक्काच्या शहराकडे वळला आहे. मग तो त्या त्या शहराचा भूतकाळ, तिथल्या भौगोलिक, सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण अशा जाणिवा किती प्रगल्भपणे टिपतो हेही पहावेसे ठरते. 

Image 6 : 

मॅरियन, ओवेन आणि वुडी ‘मिडनाईट इन पॅरिस’च्या सेटवर

‘मिडनाईट इन पॅरिस’ अनेक कारणांसाठी पुन्हा पुन्हा पाहत रहायला हवा. एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या शहराच्या किंबहुना कुठल्याही मूर्त अमूर्त गोष्टीच्या प्रेमात पडायचे धडे त्याकडून घेण्यासाठी तो पहायला हवा. श्रवणीय संगीत आणि प्रेक्षणीय दृश्यांसाठी तो पाहत रहायला हवा. त्याची प्रत्येक वेळा पाहताना वाढत जाणारी जादू अनुभवण्यासाठी तो पाहत रहायला हवा. किंबहुना तो पाहतच रहायला हवा.