Quick Reads

‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’ : व्यवस्था आणि पात्रांमधील परस्परसंबंध

‘स्पॉटलाईट’ सदर

Credit : Netflix in Belgie

मॅनहंट : यूनाबॉम्बर’ आणि ‘माइंडहंटर’ या नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या दोन्ही मालिकांमधील रूढ अर्थाने नायक आणि खलनायक मानता येतील अशी पात्रं गडद छटा असलेली आहेत. त्या दोन्हींमध्ये मानसिक पातळीवर विलक्षण साम्य आहे. दोघेही समाज आणि व्यवस्थेच्या नियमांनुसार वागत नाहीत. ‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’मध्ये तर याचा आढावा अधिक विस्तृतपणे घेतला जातो. व्यवस्था आणि पात्रांमधील परस्परसंबंधांचे परिणामकारक रेखाटन करणाऱ्या या मालिकेवरील लेखाचा हा पहिला भाग. 

जो पेनहालने तयार केलेली ‘माइंडहंटर’ ही नेटफ्लिक्स ओरिजनल सिरीज मला अलीकडील काळातील काही सर्वोत्तम मालिकांपैकी एक वाटते. ‘माइंडहंटर’मध्ये अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऊर्फ एफबीआय या राष्ट्रीय पातळीवर स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या संस्थेच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाची कथात्म मांडणी केली गेलेली आहे. एफबीआय अंतर्गत जी कामं पाहिली जातात त्यात राष्ट्रीय सुरक्षा, गुन्हे अन्वेषण, इत्यादी बाबींचा समावेश होतो. या संस्थेने गेल्या एक शतकाहून अधिक लांबीच्या आपल्या इतिहासात बदलत्या काळात गुन्ह्यांच्या बदलत्या पद्धती लक्षात घेत स्वतःच्या गुन्हे अन्वेषणाच्या पद्धतीतही बरेच बदल आत्मसात केले आहेत. ज्यामध्ये त्या त्या काळात संस्थेत कार्यरत असलेल्या अनेक हुशार लोकांच्या चाकोरी बाहेरच्या विचारसरणीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यातूनच सत्तरच्या दशकात एफबीआयमध्ये गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ‘बीहेवोरियल सायन्स युनिट’ची निर्मिती केली गेली. ‘माइंडहंटर’मध्ये या युनिटची निर्मिती कशी झाली याचं, आणि सोबतच गुन्हेगारांच्या मानसिकतेचं विश्लेषण अगदीच अप्रतिमरीत्या करण्यात आलेलं आहे. 

आता ‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’ आणि ‘माइंडहंटर’ या दोन्ही मालिकांमधील संबंध केवळ संकल्पनात्मक साधर्म्य किंवा एफबीआयचा समावेश इतकंच नाहीये. या दोन्ही मालिकांमध्ये गुन्हेगारी मानसशास्त्राचं केलेलं चित्रण अभूतपूर्व आहे. ‘माइंडहंटर’मध्ये निरनिराळ्या सिरीयल किलर्सचा अभ्यास करत गुन्हे अन्वेषण आणि गुन्हेगारी मानसशास्त्राच्या एका नवीनच शाखेची निर्मितीची प्रक्रिया उलगडली आहे. तर ‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’मध्ये अनेक वर्षं सोडवल्या न गेलेल्या एका विशिष्ट गुन्ह्याचा तपास, आणि त्यानिमित्ताने जेम्स फिट्झजेराल्ड (सॅम वर्थिंग्टन) या अधिकाऱ्याने फॉरेन्सिक लिंगूइस्टिक या गुन्हेगाराची ओळख पटवण्याच्या नवीन पद्धतीचा शोध लावण्याच्या प्रकरणाचा सविस्तर प्रवास दिसून येतो. 

१९७८ ते १९९५ या सतरा वर्षांच्या काळात ‘यूनाबॉम्बर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गुन्हेगाराने एकूण सोळा बॉम्बस्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोटाचे बळी असलेल्या लोकांमध्ये काहीही संबंध दिसत नसल्याने, आणि बॉम्ब टपालाने डिलिव्हर होत असल्याने १९९५ पर्यंत एफबीआयकडे गुन्हेगाराविषयी अगदीच त्रोटक माहिती उपलब्ध होती. त्यातही पुन्हा अनेक वर्षांपासून चकवा देणाऱ्या या गुन्हेगाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने अनेक अधिकारी कार्यरत असले तरी दरवेळी त्यांच्या प्रयत्नांना अपयश येत तपासाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागत होती. असं असताना यूनाबॉम्बरच्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या संभाव्य व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करणारा क्रिमिनल प्रोफायलर म्हणून जेम्स फिट्झजेराल्डची नियुक्ती होते, आणि या प्रकरणाला गती लाभते. 

फिट्झजेराल्ड ऊर्फ फिट्झ हा त्याच्या कारकिर्दीत कायम दुर्लक्षिला गेलेला एक महत्त्वाकांक्षी अधिकारी आहे. पोलीस अधिकारी म्हणून काम सुरु केलेल्या फिट्झजेराल्डने अकरा वर्षांच्या कालावधीतच एफबीआयमध्ये बढत मिळवण्यापर्यंत मजल मारली. ‘नॅशनल सेंटर फॉर द अनॅलिसिस ऑफ व्हायोलण्ट क्राइम’ विभागात (हा विभाग आणि ‘बीहेवोरियल सायन्स युनिट’ पुढे जाऊन ‘बीहेवोरियल अनॅलिसिस युनिट’मध्ये रूपांतरित झाले) कामाला सुरुवात केल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच त्याने ‘यूनाबॉम्बर’बाबतची आधीची गृहितकं धुडकावून लावत एफबीआय डायरेक्टर डॉन अॅकरमन (क्रिस नॉथ) आणि स्टॅन कोल (जेरेमी बॉब) यांच्या मतांशी असहमती दर्शवायला सुरुवात केली. 

याच सुमारास यूनाबॉम्बरने ‘द न्यू यॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या दैनिकांना पत्रं पाठवत जगाशी संवाद साधू पहायला सुरुवात केली. त्याने ‘इंडस्ट्रियल सोसायटी अँड इट्स फ्युचर’ नामक एक विस्तृत प्रबंध या दैनिकांमध्ये छापण्याची मागणी एफबीआय आणि परिणामी सरकारसमोर ठेवली. 

दरम्यान फिट्झजेराल्डला यूनाबॉम्बरच्या अटकेच्या नजीक जाण्याचा मार्ग केवळ त्याच्या भाषेमध्ये दिसत होता. त्याची सहकारी टॅबी मिलग्रीमच्या (केईशा कॅसल-ह्युजेस) सहाय्याने तो यूनाबॉम्बरची मोजकीच पत्रं आणि आता प्रबंधाच्या रूपात हाती आलेल्या यूनाबॉम्बरच्या भाषेच्या खजिन्याच्या माध्यमातून त्याचा शोध घेता येईल का हे पाहत आहे. नॅटली रॉजर्सदेखील (लिन कॉलिन्स) त्याला मदत करतेय. तर दुसरीकडे अॅकरमनला एफबीआयने तपासाच्या दिशेने टाकलेली सगळी पावलं चुकीची असल्याची माहिती मिळते. त्यामुळे त्याला फिट्झच्या फॉरेन्सिक लिंगूइस्टिक्सवर अवलंबून राहण्याखेरीज दुसरा पर्याय उरत नाही. यूनाबॉम्बरच्या लिखाणातील भाषेचा विचार करता तो एका विशिष्ट भागातील रहिवासी असल्याचा फिट्झचा कयास लक्षात घेता यूनाबॉम्बरचा प्रबंध ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये छापण्याचा निर्णय घेतला जातो. हा प्रबंध म्हणजे त्याच्या पकडल्या जाण्याच्या दिशेने एफबीआयला सहाय्यक ठरला. त्याच्या परिचयाची कुणीतरी व्यक्ती त्याचं लिखाण वाचून एफबीआयला कळवेल ही आशा फोल ठरत असतानाच डेव्हिड कझिन्स्की (मार्क ड्युप्लस) त्यांना संपर्क साधतो आणि तपासाला नवं वळण प्राप्त होतं. 

‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’ची मांडणी करताना कथानक दोन निरनिराळ्या टाइमलाइन्सच्या आलटून पालटून केलेल्या मांडणीतून समोर मांडलं जातं. यात एकीकडे १९९५ मध्ये यूनाबॉम्बरच्या पकडण्याआधीपासून कथा सुरु राहते, तर दुसऱ्या १९९७ मध्ये घडत असलेल्या टाइमलाइनमधील प्रसंगांत तो पकडला गेल्यानंतर त्याच्यावर खटला दाखल केलेला असताना फिट्झजेराल्डला भेटायची इच्छा व्यक्त करतो त्यानंतर काय घडतं याचा उलगडा केला जातो. परिणामी इथे गुन्हेगार पकडला जातो की नाही यातील नाट्य समांतरपणे सुरु असलं तरी त्याची विचारप्रक्रिया आणि त्याच्या मानसिकतेचा आढावा यांना काहीसं अधिक महत्त्व प्राप्त होतं. 

त्यामुळेच ‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’ आणि ‘माइंडहंटर’मध्ये संकल्पनात्मक साम्य दिसून येतं. फक्त इथे फरक इतकाच की एका विशिष्ट गुन्हेगारावर लक्ष केंद्रित केलेलं असल्याने त्याच्या आणि नायकातील संबंधांवर लक्ष केंद्रित केलं जातं. ज्याद्वारे एकप्रकारे गुन्हेगार आणि त्याला पकडणारा अधिकारी यांच्यातील मानसिक पातळीवरील साम्य अधोरेखित केलं जातं (‘माइंडहंटर’मध्येही ही संकल्पना अस्तित्त्वात आहे). 

मालिकेच्या पहिल्या भागात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा फिट्झजेराल्ड एकटाच नव्हता. टेड कझिन्स्कीसुद्धा (पॉल बेटनी) असाच व्यवस्थेशी फटकून वागणारा, तिला न जुमानणारा आहे. हे व्यवस्थेला, जगाच्या नियमांना न जुमानणं केवळ एक विकृत गुन्हेगार या भावनेतून आलेलं नाही. तर त्याची विस्तृत कारणमीमांसा त्याने त्याच्या प्रबंधात केली आहे. एक उत्तम गणितज्ञ आणि सुशिक्षित तरुण असणाऱ्या कझिन्स्कीने असं का करावं याची त्याने दिलेली कारणं काही अंशी पटतील इतपत विचारपूर्वक मांडलेली आहेत. पण जगाच्या अनुक्रमात, नियमबद्ध व्यवस्थेमध्ये विश्वास न ठेवण्याच्या मानसिकतेला आणि विचार जगापुढे येतील यामागील त्याच्या हिंसक आणि केऑटिक कृत्यांना काहीच अर्थ नाही हे त्याला उमगत नाही. 

त्यामुळेच फिट्झजेराल्ड त्याला भेटायला गेल्यावर त्यांच्यात वेळोवेळी घडणारा संवाद म्हणजे केवळ त्याला गुन्हेगार सिद्ध करण्याचा प्रयत्न वाटत असला तरी खोलवर पाहता फिट्झ कझिन्स्कीचा आस्थापूर्वक विचार करताना दिसतो. त्यामुळेच तर त्याला पकडल्यानंतर फिट्झ स्वतःच्या कोशात जात एकाकी रहायला लागतो, कझिन्स्कीच्या राहणीचा आणि विचारांचा अवलंब करतो. मालिकेत दिसणाऱ्या प्रसंगांमध्ये त्यांच्यातील साम्य आणि फरक स्पष्टपणे जाणवतात. गुन्हेगार आणि त्याला पकडणाऱ्या यंत्रणेतील व्यक्तींची म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे पुन्हा एकदा दिसून येतं. दोघेही हुशार आणि महत्त्वाकांक्षी आहेत, पण दोघांच्याही जीवनात घडलेल्या घडामोडींमुळे त्यांचं एकप्रकारे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. दोघांचंही वैयक्तिक आयुष्य फारसं समाधानकारक नाही. त्यातूनच आपण जगाहून वेगळे आणि लायक आहोत हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने त्यांना व्यवस्थेशी तडजोड करणं शक्य नसतं किंबहुना ते त्यांना मान्यच नसतं. 

फिट्झ आणि कझिन्स्की हे दोघेही विलक्षण विचारशक्ती आणि बुद्धिमता असलेले लोक आहेत. मात्र त्यांना व्यवस्थेच्या नियमबद्ध प्रक्रियेत समाधानकारक काम करण्याची संधी अगदीच क्वचित मिळते. एकाअर्थी सगळ्यांकडे आपल्या रूढ दृष्टिकोनातून पाहणारा समाज आणि व्यवस्था दोघांनाही सामावून घेण्यात अयशस्वी ठरते. त्यांच्यातील फरक इतकाच की यंत्रणेतील अधिकारी असलेल्या व्यक्तीने जगाच्या नियमांशी तडजोड करत आपलं मानसिक स्थैर्य प्राप्त केलेलं असतं (किंवा किमान तसा प्रयत्न सुरु असतो), तर गुन्हा करणारा जगाला आपला शत्रू मानत हिंसेच्या सहाय्याने त्याच्याशी लढत असतो. फिट्झला ऑर्डर बिघडवत गोंधळ, केऑस निर्माण करणं त्याला मान्य नाही. याउलट कझिन्स्की मात्र आपण व्यवस्थेला बांधील नसायला हवं हे सिद्ध करू पाहताना अराजक माजवत नेमकं हेच करताना दिसतो. नायक आणि खलनायक या दोन्हींना वेगळं करणारी रेषा किती छोटी आणि नाजूक असते याचंच हे उदाहरण मानावं लागेल. 

‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’ आणि ‘माइंडहंटर’ या दोन्ही मालिका मानवी इतिहासातील घटनांना नाट्यमय रूप देतात. तरीही त्या आक्षेपार्ह ठरत नाहीत, कारण मानसिक, भावनिक पातळ्यांवर परिणामकारक अशी पात्रं उभी करत समाज, व्यवस्था आणि पात्रांमधील परस्परसंबंध रेखाटतात. त्यामुळेच त्यांच्याकडे कथात्म मांडणीचे अभिजात प्रयोग म्हणून पाहता येणं शक्य होतं.