Quick Reads

कामयाब: जे चित्रपट पाहत मोठे झालो त्यात पाहिलेल्या चेहऱ्यांची वैश्विक कथा

स्पॉटलाईट सदर

Credit : Red Chillies Entertainment

हार्दिक मेहता दिग्दर्शित ‘कामयाब’ गेल्या वर्षी क्वेंटिन टॅरेंटिनो दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्याही पूर्वीपासून जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये फिरत आणि पुरस्कार जिंकत आलेला आहे. ‘कामयाब’च्या प्रदर्शनाची तारीख उजाडता उजाडता मात्र मधे बराच काळ निघून गेला. ‘कामयाब’बाबत बोलताना ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ आठवण्याचं कारण म्हणजे या दोन्ही चित्रपटांच्या मध्यवर्ती पात्रांमध्ये एकेकाळी यशस्वी असलेल्या दोन अभिनेत्यांचा समावेश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही चित्रपटांमध्ये एक समान दृश्य आहे, ज्यामध्ये मध्यवर्ती पात्राला अभिनय न जमल्यामुळे सर्व लोकांसमोर मान खाली घालावी लागते. दोन्ही चित्रपटांचा आशय आणि आवाका वेगळा असला तरी या विशिष्ट दृश्यांची तीव्रता मात्र सारखीच आहे. 

चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा सुधीरने (संजय मिश्रा) शेवटच्या चित्रपटात काम करून मधे बरीच वर्षं गेलेली असतात. पत्नीच्या मृत्यूनंतर एकल आयुष्य जगणारा सुधीर आर्थिकदृष्ट्या स्थिरावलेला असल्याने त्याला गेली बरीच वर्षं काम करण्याची गरज भासलेली नाही. शिवाय, काही वर्षांपूर्वी एका चित्रपटामुळे घडलेल्या घटनेमुळे त्याने आता काम करू नये असं वचन त्याच्या मुलीने घेतलेलं असतं. ही घटना म्हणजे एका दिग्दर्शकाने सुधीरला पुश अप्स मारताना चित्रीत करत हा शॉट एका अभिनेत्रीच्या जणू संभोगक्रिया करतानाच्या तुकड्यासोबत जोडून चित्रपटात वापरला होता. हा प्रसंग अभिनेता धर्मेंद्र आणि दिग्दर्शक कांती शाह यांच्यादरम्यान घडलेल्या खऱ्या घटनेवर आधारलेला आहे. खरंतर नानाविध भारतीय चित्रपट आणि चित्रपटसृष्टीत घडलेल्या घटना या ‘कामयाब’मागील प्रेरणा आहेत. 

‘कामयाब’च्या सुरुवातीला एक मॉन्टाज येतो ज्यात सुधीरने एकेकाळी बऱ्या-वाईट चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांचा कोलाज आहे. एक स्थानिक वृत्त वाहिनीची प्रतिनिधी दुर्लक्षिल्या गेलेल्या चरित्र अभिनेत्यांवरील एका कार्यक्रमाकरिता त्याची मुलाखत घेत असते. या पहिल्याच दृश्यात त्याच्या एकंदरीत आयुष्याबाबत समाधानी नसलेला सुधीर दिसतो. चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनेत्यांना न मिळणाऱ्या महत्त्वाबाबत तो बोलतो. त्याच्या या दृष्टिकोनामुळे अपेक्षित तशी मुलाखत न झाल्याने वृत्तवाहिनीची टीम त्रस्त झालेली असते. ज्यात ते त्याने कसं ४९९ चित्रपटांमध्ये काम केलं आहे याचा उल्लेख करतात. हे ऐकून मात्र त्याचा चेहरा खुलतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं. तो आधी होता त्याहून कैकपटीने अधिक प्रसन्नतेने बोलू लागतो. मात्र, लगेचच वीज जाते आणि मुलाखत बारगळते. 

हे एकच दृश्य चित्रपटाचे लेखक राधिका आनंद-हार्दिक मेहता आणि दिग्दर्शक मेहताची कौशल्यपूर्ण कामगिरी दाखवण्यास पुरेसं ठरतं. यात केवळ प्रासंगिक विनोद किंवा मध्यवर्ती पात्राचा समर्पक परिचय घडत नाही, तर त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्यासोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती होते. तो प्रामाणिकपणे काम करत असूनही शेवटी त्याच्या हाती समाधान लागत नाही. एखादं दृश्य, त्यात असलेला विनोदाचा समावेश आणि त्याला असणारी कारुण्याची किनार ही कमी अधिक फरकाने पुढे संपूर्ण चित्रपटभर दिसणाऱ्या दृश्यांतील वैशिष्ट्यं दिसायला सुरुवात होते ती इथूनच. 

आपण ४९९ चित्रपटांत काम केल्याचं ऐकून आनंदित झालेला सुधीर एका मित्राच्या सांगण्यावरून त्याच्या पाचशेव्या चित्रपटात काम करण्यास सज्ज होतो. गुलाटी (दीपक डोब्रियाल) या त्याच्या परिचयाच्या कास्टिंग डिरेक्टरच्या माध्यमातून तो एका ऐतिहासिक चित्रपटात कामही मिळवतो. याच चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सुरुवातीला उल्लेखलेलं दृश्य घडतं. अभिनयाच्या सर्वस्वी भिन्न आणि जुनाट शाळेतून आलेला सुधीर नवीन, ‘वास्तववादी’ अभिनयाची अपेक्षा ठेवणाऱ्या चित्रपटसृष्टीत आधी होता तितकाच उपरा ठरतो. संपूर्ण क्रूसमोर स्वतःचे संवाद न आठवणारा सुधीर आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’मधील रिक डाल्टन (लिओनार्डो डी’कॅप्रिओ) यांच्यात मला काहीच फरक जाणवत नाही. दोघांची मनःस्थिती आणि खिन्नता यांतही काहीच फरक नाही. इतर चरित्र अभिनेत्यांप्रमाणेच सुधीरचा एकमेव प्रसिद्ध संवाद म्हणजे “बस एन्जॉइंग लाईफ, और ऑप्शन क्या हैं?” ही एक ओळ त्याच्या आणि त्याच्यासारख्या इतर अभिनेत्यांच्या मनातील भावनांना किती अचूकपणे टिपते! 

 

‘कामयाब’ हा केवळ भूतकाळात रममाण न होता एकेकाळी आपण जे चित्रपट पाहत मोठे झालो त्यांमध्ये पाहिलेल्या चेहऱ्यांमागील एक वैश्विक कथा समोर आणतो. सुधीरला इतक्या वर्षांनंतरही चित्रपटसृष्टीत उपरं वाटण्यामागे इथली  स्टार सिस्टीम आणि सहाय्यक, चरित्र अभिनेत्यांना विसरण्याचा मोठा भूतकाळ कारणीभूत आहे. सुधीरच्या मुलीला, भावनाला (सारिका सिंग) त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल आस्था नसण्याचं कारण (तिच्या दृष्टीने) त्याला जवळपास काहीच न देणाऱ्या चित्रपटसृष्टीच्या नादात कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्याचा त्याचा स्वभाव आहे. आताही त्याला पाचशेवा चित्रपट मिळाल्यावर पुन्हा कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्याच्या त्याच्या भूतकाळाची पुनरावृत्ती होते. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यादरम्यान होणारी ओढाताण दिसते. सुधीरच्या तपशीलवार दिसणाऱ्या व्यावसायिक आयुष्यासोबतच बाप आणि मुलीतील नातं दिसतं. सुधीरची आयुष्यात शेवटचं, स्वतःला समाधान मिळवून देईल असं काहीतरी करण्याची धडपड दिसते. विनोद, नाट्य आणि कारुण्य यांचा अचूक समतोल इथे साधला जातो. 

सुधीर राहतो त्या इमारतीत नुकतीच राहायला आलेली एका वेब सिरीजमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेली तरुणी (इशा तलवार) आणि त्याच्यातील दृश्यं इथल्या काही सुरेख दृश्यांपैकी एक आहेत. एका दृश्यात खिन्नता आणि दारू या दोन गोष्टींमुळे एकत्र बसलेले ते दोघे सुधीरच्या दिवंगत पत्नीच्या गाण्याच्या आवडीवर आणि ‘जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्किल पड जाए’ या गाण्याबाबत बोलत असतात. त्यावेळी सुधीर त्याच्या पत्नीला जेव्हा हे गाणं कुठल्याशा इंग्रजी गीतावरून उचललेलं असल्याचं कळालं तेव्हा तिला किती दुःख झालं होतं याचा उल्लेख करतो. साहजिकच भारतीय चित्रपटसृष्टीत चालणाऱ्या संगीतचौर्यावरील ही टिप्पणी असते. पुढच्याच संवादात ती त्याला न आठवणारं मूळ इंग्रजी गाण्याचं नाव सांगते. दोघे बसलेले असताना तो हिंदी गाणं, तर ती ‘फाइव्ह हन्ड्रेड माइल्स’ या त्याच्या मूळ इंग्रजी आवृत्तीतील गाण्याचे बोल गात असताना कॅमेरा पुल आऊट होतो. आणि चित्रपटातील संस्मरणीय दृश्यांत आणखी एका दृश्याची भर पडते. 

Advt.Advert under the DBA Entrepreneur initiative

इथली अनेक दृश्यं ही लेखक-दिग्दर्शकांच्या निरीक्षणांतून, त्यांच्या भारतीय चित्रपटांवर असलेल्या प्रेमातून निपजलेली असावीत. चित्रपटाच्या सेटवर घडणाऱ्या घडामोडी, अनेक ज्ञात/अज्ञात किस्से, जाताजाता समकालीन घटनांवरील केलेली टिप्पणी या गोष्टी चित्रपटाला अधिक परिणामकारक बनवतात. सुरुवातीच्या मॉन्टाजमध्ये आपण लहानपणी कधीतरी पाहिलेले चित्रपट आणि अभिनेत्यांच्या छटा आपल्याला आढळू शकतात. चित्रपटकर्त्यांच्या निरीक्षणशक्तीकडे पहायचं झाल्यास - सुधीरला पाचशेवा चित्रपट करण्याबाबत सल्ला देताना त्याचा मित्र म्हणतो, “देख, अब ओम पूरी रहे नहीं, परेश रावल पॉलिटिक्स मेईन बिझी हैं और अनुपम खेर ट्विट करने में…’ या दृश्याकडे किंवा सुधीरला मिळालेला चित्रपट नेमका सध्या बॉलिवुडमध्ये आलेल्या ऐतिहासिक चित्रपटाच्या लाटेचा भाग कसा वाटतो हेही पाहता येईल. धर्मेंद्र-कांती शाहच्या किस्स्याचा संदर्भ असलेलं दृश्य किंवा विजू खोटे, लिलीपुट, अवतार गिल या एकेकाळच्या प्रसिद्ध चरित्र अभिनेत्यांनी स्वतःच्याच भूमिका साकारत समोर येणंदेखील चित्रपटकर्त्यांचं चित्रपट या माध्यमावरील प्रेम दर्शवतं. चित्रपटात असे अनेक संदर्भ आहेत. मुख्य पात्राच्या सुधीर या नावालाही प्रसिद्ध चरित्र अभिनेता सुधीरचा संदर्भ असणारच! 

पियुष पुतीचं छायाचित्रण आणि हार्दिक मेहताचं दिग्दर्शकीय कौशल्य यांतून हृदयात जतन कराव्यात अशा फ्रेम्स आणि दृश्यं समोर मांडली जातात. रचिता अरोराचं स्वप्नवत भासणारं संगीत इथल्या अशाच दृश्यांना पूरक ठरतं. उदाहरणार्थ, पहिल्याच दृश्यात जेव्हा ४९९ संख्येबाबत कळतं तेव्हा मिश्राच्या डोळ्यात जी चमक येते, त्याबरोबर सुरु होणारं संगीत ऐकावं. चित्रपटात अनेकदा गिटार आणि ट्रम्पेटचा क्रिसेन्डो निर्माण करण्यासाठी केलेला वापर पहावा. 

चित्रपट त्यांचं पडद्यावरील शेवटचं काम ठरलेल्या दिवंगत विजू खोटेंना समर्पित केलाय. याखेरीज, चित्रपटाच्या शेवटी शुभा खोटे, मॅकमोहन, बॉब क्रिस्टो, रझाक खान, महेश आनंद, जॉनी वॉकर, सुधीर, जगदीश राज अशा बऱ्याच कलाकारांची नावं आणि छायाचित्रं श्रेयनामावली सुरु असताना त्याशेजारी झळकतात. इथे आपल्या ओळखीचे कित्येक चेहरे आढळतील. हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटांमधील दुर्लक्षिली गेलेली सहाय्यक पात्रं आणि गर्दीतील चेहऱ्यांच्या भूमिका साकारणाऱ्या अशाच दुर्लक्षिल्या गेलेल्या अभिनेत्यांच्या आयुष्याला वाहिलेली मानवंदना आहे. 

‘कामयाब’ हा फार काळजीने, हळवेपणाने आणि आपुलकीने बनवलेला एक सुरेख चित्रपट आहे. त्यात शोकांतिक संकल्पना असल्या तरीही शेवटी तो त्यातील मध्यवर्ती पात्रासारखा आहे. असमाधानी, तरीही काहीसा आशावादी. काहीसा परस्परविरोधी भावनांचं एकत्र अस्तित्त्व असलेला. तो त्यासाठीच पहायला हवा. चित्रपटांवर काम करणाऱ्या ज्ञात-अज्ञात चेहऱ्यांसाठी आणि चित्रपटांवरील प्रेमासाठी!