Quick Reads

जोजो रॅबिट: कट्टरतावादाचा निरागस उपहास

स्पॉटलाईट सदर

Credit : TSG Entertainment

मायनर स्पॉयलर्स अहेड. 

‘जोजो रॅबिट’मधील मुद्द्याला कायम मनोरंजन आणि विनोदाच्या आवरणाखाली ठेवलं जातं. उपहास हा एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. इथे ज्या बाबींची खिल्ली उडवली जात आहे त्या बाबींचं अस्तित्त्व समकालीन कालखंडातही आहे या जाणिवेतून ही अस्वस्थता निर्माण होते (काहीसं काही वर्षांपूर्वी आलेल्या हिटलरवरील व्यंगात्मक चित्रपट, ‘लूक हूज बॅक’सारखं). 

जोहान्स ऊर्फ जोजो बेट्झलर (रोमन ग्रिफिन डेव्हिस) हा दहा वर्षांचा मुलगा नाझी जर्मनीतील ‘हिटलर युथ ऑर्गनायझेशन’च्या कॅम्पमधील एक सदस्य आहे. त्याला अडॉल्फ हिटलरचं प्रचंड आकर्षण आहे. हिटलर आणि महायुद्ध या दोन्ही गोष्टींच्या आकर्षणातूनच तो या कॅम्पमध्ये सहभागी झालेला आहे. ‘जोजो रॅबिट’ची सुरुवातच मुळी या कॅम्पमध्ये घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून होते. इथे एका मॉन्टाज-वजा प्रसंगात कॅप्टन मार्टिन (सॅम रॉकवेल) हा कॅम्प चालवणारा अधिकारी आणि त्याचे सहाय्यक पुस्तकं अजिबातच गरजेची नाहीत असं सांगत मुलांकडून पुस्तकं जाळून घेताना दिसतात. पुस्तकं जळत असल्याच्या दृश्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी रोमांचक घडत असल्याची भावना निर्माण करणारं संगीत वाजत राहतं. भारतात लहान मुलांच्या हाती तलवारी देण्याचे किंवा बाबरी मस्जिद प्रकरणावरील नाटक बसवून घेण्याचे प्रसंग इथे प्रकर्षाने आठवू शकतात. समकालीन वास्तव आणि ‘जोजो रॅबिट’मधील घडामोडी यांच्यात एक विलक्षण साम्य कायमच दिसून येत राहतं. 

जोजोचा एक मित्र आहे किंबहुना खरंतर काल्पनिक मित्र आहे, तो म्हणजे अडॉल्फ हिटलर (टाइका वैटिटी). हा हिटलर जोजोला त्याची गरज असते तेव्हा प्रकट होणारा, साहजिकच हिटलरचं एक विनोदी आणि एका अर्थी बालिश रूप असणारा आहे. मात्र, त्याचा बालिशपणा तो म्हणजे जोजोच्या मनातील कलाकृती आवृत्ती आहे हे अधोरेखित करणारा आहे. आणि त्याचं हे असं असणं हे एक विशिष्ट प्रसंग सोडता इतर सर्वत्र कायम राहतं. चित्रपटाच्या शेवटाकडील एका प्रसंगात त्याच्या मनातील हिटलरमध्ये खऱ्या हिटलरची झाक दिसून येते नि तो त्याच आविर्भावात आदेश देत, वरच्या स्वरात ओरडताना दिसतो. ही त्याच्या दोन्ही रूपांतील तफावत खरी अस्वस्थ करणारी ठरते. इथे विनोद किंवा उपहास हा त्याच्या वरवरच्या कृत्रिमतेतून वास्तवात शिरकाव करतो. 

 

 

‘जोजो रॅबिट’मध्ये काही विशिष्ट गोष्टींचे संदर्भ, संकल्पनांचे उल्लेख, मग ते दृश्य पातळीवर असतील किंवा मग पात्रांच्या संवादांच्या रुपात असतील, पण ते चित्रपटभर येत राहतात. एकूण चित्रपटाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास या एका तऱ्हेच्या रुपकांना महत्त्वाचं स्थान आहे. उदाहरणार्थ, बुटांच्या नाड्या आणि नृत्य या बाबींचे उल्लेख इथे वारंवार येत राहतात. चित्रपटाच्या सुरुवातीचा एक प्रसंग म्हणजे हिटलर जोजोच्या बुटांच्या नाड्या बांधत आहे. आणखी एका दृश्यात रोझी (स्कार्लेट जोहान्सन) ही जोजोची आई हेच करताना दिसते. पुढे जाऊन मोठ्या पटलावरील हे बिंदू जोडले जातात, नि भावनिक, मानसिक पातळीवर हे मुद्दे ट्रिगर करत राहतात. चित्रपटाच्या नावाबाबतचा विस्तृत प्रसंग इथे आहे. ज्यात सशाच्या नेहमीच्या प्रतिमेकडे एका निराळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्याचं भित्रं असणं ही त्याची खरी ताकद आहे असं सांगितलं जातं. हे असं रूढ संकल्पनांना छेद देणं इथे वारंवार घडतं. विरोधाभास, त्यातून केली जाणारी विनोदनिर्मिती आणि उपहास ही वैटिटीची बलस्थानं आहेत. ज्याचं उपयोजन असलेले कित्येक प्रसंग चित्रपटभर पेरलेले आहेत. हिटलर, त्याचे अनुयायी, त्याचं सैन्य इथे वैटिटीच्या विनोदबुद्धीचे स्वाभाविक शिकार आहेत. 

ज्यूंबाबत तिरस्कार असणाऱ्या जोजोच्या घरात, खुद्द त्याच्या आईनेच आश्रय दिलेली चौदा वर्षीय ज्यू मुलगी, एल्सा (थॉमसिन मॅकिंझी) राहत असणं या विरोधाभास असलेल्या परिस्थितीतून सुरु झालेली गोष्ट बरीच गंभीर वळणं घेत जाते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे इथे उपहास हा गंभीर, अस्वस्थ करणाऱ्या वास्तवापर्यंत पोचण्याचा एक मार्ग आहे. पात्रं आणि प्रसंगांप्रतीची सतत अस्तित्त्वात असलेली नीरसता, चतुराईने लिहिलेले विचित्रपणाचं अस्तित्त्व असलेले विनोदी प्रसंग या बाबी लेखक-दिग्दर्शक टाइका वैटिटीच्या विनोदात कायम आढळून येतात. मुख्य म्हणजे तो या सगळ्यास एक भावनिक किनार प्राप्त करून देतो. ज्यूंचा तिरस्कार करणारा जोजो आणि नाझींची विरोधक असलेली त्याची आई, रोझी या दोघांमधील तरल नात्यातून हे घडतं. बुटांच्या नाड्या आणि नृत्य या दोन्ही गोष्टींना चित्रपटात आणि जोजोच्या आयुष्यात महत्त्वाचं ठरवणारी व्यक्ती तीच असते. मायकल जकिनोचं संगीत इथल्या भावनिक प्रसंगांपासून ते विनोदी प्रसंगांपर्यंत कशा रीतीने बदलत जातं हे पहावं. 

टाइका वैटिटी इथे संगीत कशा प्रकारे वापरतो हेही महत्त्वाचं ठरतं. सुरुवातीला नाझी जर्मनीतील घडामोडींचा समावेश असलेली ब्लॅक अँड व्हाईट चित्रफीत दाखवल्यानंतर ‘बीटल्स’ या ब्रिटीश म्युजिक बँडचं ‘आय वाना होल्ड युअर हँड’ या गाण्याचं जर्मन व्हर्जन वापरतो. आणखी एका महत्त्वाच्या जागी डेव्हिड बोई या ब्रिटीश संगीतकार, गायकाच्या ‘हिरोज’चं जर्मन व्हर्जन वापरतो. हे करत असताना दोन्ही गाण्यांच्या निर्मात्यांचं ब्रिटीश असणं हे इथे कायम असतं. एका प्रसंगात इथला हिटलर जोजोचं घर जाळून त्याचा ठपका विन्स्टन चर्चिल या तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधानावर ठेवण्याचा प्रस्ताव समोर मांडतो. साहजिकच नाझी जर्मनीवरील चित्रपटात ब्रिटीश कलाकारांच्या गाण्यांच्या जर्मन आवृत्त्या वापरणं, चतुराईने पेरलेले राजकीय विनोद एका विशिष्ट आणि विचित्र अर्थाने विनोदी आहे. 

 

 

नृत्य, संगीत, चित्रपट यासारख्या सर्वच दृकश्राव्य कला या स्वातंत्र्याचं किंवा अधिक व्यापक दृष्टिकोनातून सांगायचं झाल्यास व्यक्त होण्याचं एक उत्तम मार्ग आहेत. अशा रीतीने व्यक्त होणं हे आतासारख्या निराशाजनक कालखंडात तर अधिकच गरजेचं आहे. ‘जोजो रॅबिट’च्या निमित्ताने वैटिटी आणि सदर चित्रपटातील इतरही कलाकार हे एका अर्थाने व्यक्त झाले आहेत. त्यांचं हे व्यक्त होणं केवळ दखलपात्रच नव्हे, तर सिनेमॅटिकही आहे! 

हे करत असताना या कलाकृतीचं समकालीन परिस्थितीशी, वास्तवाशी जाणवत असलेलं साधर्म्य ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. हे साधर्म्य जगभरातील अनेक राष्ट्रांत हुकूमशाही, एकाधिकारशाही गाजवू पाहणाऱ्या राज्यकर्त्यांच्या पलीकडे जाणारं आहे. हे चित्र अधिक विस्तृत दृष्टिकोनातून जगभरातील द्वेष, हिंसा, एखाद्या गोष्टीवरील आत्यंतिक श्रद्धा आणि अतिरेकीपणावर बोट ठेवणारं आहे. चित्रपटात एक संवाद आहे, “अ १० इयर ओल्ड शुडन्ट बी सेलिब्रेटिंग वॉर अँड टॉक अबाऊट पॉलिटिक्स”. आणखी एका दृश्यात एक नाझी जोजोला म्हणतो की, तुझ्यासारखा धर्मांधपणा इतर मुलांमध्येही असायला हवा होता. या दोन्ही वाक्यांचा एकत्रित अर्थ आणि परिणाम इथे मांडला जाणारा मुद्दा अधिक तीव्रपणे अधोरेखित करतो. डोळे बंद करून धर्म, राष्ट्र, समुदाय, इत्यादी संकल्पनांच्या स्वाधीन होणं खरंतर जगाच्या पाठीवरील सर्वच राज्यकर्त्यांना हवं आहे, मात्र तसं होऊ न देणं खरं गरजेचं आहे.