Quick Reads

प्राइड मंथच्या निमित्ताने: सिनेमा आणि समलैंगिकता

स्पॉटलाईट सदर

Credit : The Federal

२८ जून १९६९ मध्ये अमेरिकेतील मॅनहॅटन शहरातील एका समलैंगिक व्यक्तींसाठीच्या बारमध्ये पोलिसांनी धाड टाकली. तिथे उपस्थित असलेल्या जमावाने या अन्यायी प्रकरणाचा विरोध केल्याने त्यावेळी मोठा दंगा घडून आला. ही घटना म्हणजे आपल्या हक्कांकरिता लढल्याची एक महत्त्वाची घटना मानली जाते. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम घडून कालांतराने जगभरात जून महिना हा ‘एलजीबीटीक्यू प्राइड मंथ’ म्हणून पाळला जातो. या दरम्यान जगभरात समलैंगिक व्यक्तींप्रती केला जाणारा भेदभाव आणि हिंसा यांच्याविरुद्ध प्रदर्शनं घडून येतात. याखेरीज लिंगभेद, समलैंगिक व्यक्तींचे हक्क, लिंगसमभाव, इत्यादी गोष्टींबाबत जनजागृती घडवून आणणं सुद्धा या परेड्सचा उद्देश असतो. 

पाश्चात्य देशांमध्ये समलैंगिक संबंधांना एक बराच विस्तृत काळ कायदेशीर-सामाजिक मान्यता मिळाली नव्हती. तिथे अजूनही समलिंगी व्यक्तींवर हल्ले घडून येत असल्याच्या घटना समोर येत राहतात. धार्मिक, सांस्कृतिक वातावरण वेगळं असलं तरी भारतातही कमी-अधिक तीव्रतेने हीच गोष्ट प्रतिबिंबित झाल्याची दिसते. आपल्याकडे अगदी अलीकडेपर्यंत समलिंगी प्रेम अनैसर्गिक मानले जात होते किंबहुना अजूनही मानले जातात. त्यामुळेच अगदी २०१८ पर्यंत भारतात समलैंगिक संबंध ठेवणे हे बेकायदेशीर मानलं जात होते. शिवाय, अशा नात्यात असणं म्हणजे अजामीनपात्र गुन्हा मानला जात होता.

समाजाचा आरसा मानल्या जाणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून या प्रकाराविरुद्ध भाष्य करणे, या विषयाला वाचा फोडणे, या विषयाचं अस्तित्व घराघरात पोहोचवणे अपेक्षित होते. कायदेशीर - सामाजिक बंधनांमुळे आणि चित्रपट निर्मात्यांनी निवडलेल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे काही मोजके अपवाद वगळता असं होऊ शकलं नाही. असं जरी असलं तरी १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला दीपा मेहतांचा ‘फायर’ ते यावर्षी आलेला आयुष्यमानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रवास आहे. हा प्रवास करत असताना असंख्य आव्हाने, अडचणी समोर आल्या. त्यावर मात करून आज चित्रपट इथवर पोहोचला आहे. त्या प्रवासाचा आढावा आणि त्यासोबत बदलणारा आपला समाज याचा आढावा या लेखात घेऊ.

 

 

१९९६ ची गोष्ट. दीपा मेहतानी दोन स्त्रियांमधील संबंधांवर आधारित ‘फायर’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर तो भारतात प्रदर्शित व्हायला मधे दोन वर्षांचा काळ लागला. त्यानंतरही त्याविरुद्ध हिंसक निदर्शनं घडून आली. मेहतानी त्याविरुद्ध कायदेशीर आणि घटनात्मक मार्गांनी लढा दिला असला तरी पुढे जाऊन त्यांना देश सोडावा लागला. आता २०१८ मध्ये समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर परिस्थिती काहीशी बदलली आहे असं म्हणायला वाव असला तरी मेहतांच्या ‘फायर’वरून गदारोळ माजलेला भारत आणि अगदी अलीकडेपर्यंतचा भारत यांत समलिंगी प्रेमाकडे पाहण्याच्या दृष्टीने सामाजिक स्तरांवर फारसा फरक दिसून येत नाही. कारण, हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ (२०१५) ज्या घटनेवर आधारित होता ती - अलिगढ विद्यापीठातील प्राध्यापक रामचंद्र सिरास यांच्या घरात घुसत त्यांच्या हक्कांना पायदळी तुडवलं जाणं, आणि त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाईची घटना २०१० मध्ये घडली होती. म्हणजे ‘फायर’नंतरचा घटनाक्रम आणि सदर चित्रपट येण्यापर्यंतचा काळ यांच्यात पंचवीसेक वर्षांचं अंतर होतं. असं असलं तरी समाजाची मानसिकता साधारण एकाच तऱ्हेची होती. त्यामुळेच या काळात कलात्मक धाटणीचे मोजके चित्रपट आले असले तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांनी, काही मोजके अपवाद वगळता समलैंगिक पात्रांकडे म्हणजे दोन मिनिटांच्या भूमिकेत विनोद उकळण्याचं साधन या चुकीच्या दृष्टीकोनातूनच पाहिलं. 

हिंदीमध्ये ओनिरच्या ‘माय ब्रदर… निखिल’ (२००५) आणि ‘आय अॅम’मध्ये (२०११), तर प्रादेशिक भाषांमध्ये रितुपर्णो घोष अभिनित ‘अरेक्ती प्रेमेर गोल्पो’ (२०१०), ‘मेमरीज इन मार्च’च्या (२०१०) निमित्ताने समलैंगिक संबंध असलेल्या पात्रं परिणामकारकरीत्या हाताळली गेली. मराठीतील ‘बायोस्कोप’ या अँथॉलॉजी चित्रपटामधील ‘मित्रा’ या लघुपटातही समलिंगी प्रेम दिसतं. तर, मुख्य प्रवाहातील ज्या काही मोजक्या सिनेमांमध्ये समलैंगिक पात्रांचा भावनिक कोलाहल दिसला त्यात ‘बॉम्बे टॉकीज’मधील (२०१३) करण जोहर दिग्दर्शित ‘अजीब दास्तां हैं ये’ हा लघुपट, आणि जोहरचीच निर्मिती असलेला ‘कपूर अँड सन्स’ (२०१६) या चित्रपटांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. परिणामी सिनेमाचा विचार करता या चित्रामध्ये सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. आणि समलिंगी पात्रं आणि त्यानिमित्ताने व्यक्तींच्या भावना व्यक्त करणारा स्वतःचा असा आवाज मिळत आहे. हे चित्रपट महत्त्वाचे का ठरतात, तर ते समलिंगी संबंध चितारत असताना गरजेचा असा परिपक्व दृष्टिकोन बाळगतात. समलिंगी प्रेमाच्या निरनिराळ्या छटा दाखवण्याचा प्रयत्न करतात.

 

 

अगदी अलीकडेपर्यंत समलिंगी प्रेम हे मुख्यत्वे प्रादेशिक आणि प्रायोगिक चित्रपटांपुरते मर्यादित होते. मात्र, अलीकडील काळात व्यावसायिक चित्रपटांतही हा विषय पुरेशा गांभीर्याने हाताळला जात आहे. २०१९ मध्ये आलेल्या शेली चोप्रा-धर दिग्दर्शित ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ आणि यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ ही त्याची दोन महत्वाची उदाहरणे. यांची गुणवत्ता कमी असली तरी या अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व व्यावसायिक चित्रपटात आणि चित्रपट सृष्टीतील आघडीच्या अभिनेत्यांकडून होत आहे ही महत्वाची बाब आहे. या उदाहरणांसोबतच गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सुपर डिलक्स’मध्ये गुणवत्ता आणि व्यावसायिकता या दोन्ही बाबी उजव्या होत्या. या चित्रपटात तृतीयपंथी पात्राकडे एका संवेदनशील नजरेनं पाहिलं गेलं आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडलं.

चित्रपटात असलेलं हे प्रतिनिधित्व नवीन आलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिकांमध्ये देखील दिसून आले. ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘पाताल लोक’मध्येही तृतीयपंथी पात्रं आणि मूळ कथानकाच्या समांतरपणे चालणारं त्यांचं छोटेखानी प्रेम दाखवलं आहे. झोया अख्तर-रीमा कागती यांच्या ‘मेड इन हेव्हन’ या अॅमेझॉन प्राइमवरील मालिकेतील नायक स्वतः समलैंगिक असल्याने हा विषय त्यामध्ये त्याचं वैयक्तिक आयुष्य, समाजाच्या विविध स्तरातून पाहणारे विविध दृष्टिकोन, त्याने उभारलेली चळवळ असा विस्तृतपणे हाताळला आहे. या साऱ्या घटना म्हणजे या मुद्द्याला अधिकाधिक चर्चेत आणण्याच्या दिशेने टाकलेली सकारात्मक पावलं आहेत. 

स्वतःची लैंगिकता, लैंगिक जीवन ही एक वैयक्तिक बाब असते. मात्र, भारतीय समाजव्यवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंब ही संकल्पना ‘स्व’ला दाबून टाकत आलेली आहे. हे अर्थातच सरसकटीकरण करणारं विधान असलं तरी एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहिल्यास भारतीय समाजातील एका मोठ्या वर्गाला हे लागू पडेल. समलिंगी संबंधांबाबत तर जरा अधिकच. अशावेळी वर उल्लेखलेले चित्रपट हे यासाठी महत्त्वाचे ठरतात की, त्यातील त्यामध्ये समलैंगिक प्रेम या संकल्पनेला अधिक सुस्पष्ट आणि व्यापक प्रकारे समोर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यानिमित्ताने या विषयाचं सामान्यीकरण होण्याच्या शक्यता वाढतात. 

भारतात ३७७ सारखा अन्यायकारक कायदा रद्द होण्यात नाझ फाउंडेशनसारख्या संघटना, आणि प्राइड मंथ, समलिंगी व्यक्तींमधील एकजूट आणि जागरूकता या गोष्टींचा महत्त्वाचा वाटा आहे. समलिंगी संबंधांना सामाजिक स्तरावर होणारा विरोध म्हणजे सर्वच व्यक्तींवर अन्यायकारक आणि जाचक मानव्याशा पुरुषसत्ताक संस्कृतीचं, समाजातील लिंगभेदाचं एक अपत्य आहे. जोवर संभोग आणि प्रेमसंबंध या कुठल्याही व्यक्तीच्या खाजगी बाबी आहेत हे आपण लक्षात घेत नाही, आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणं सोडत नाही तोवर ‘समलैंगिक संबंध म्हणजे अनैसर्गिक कृत्य’ हा समज मुळापासून नाहीसा होणार नाही. चित्रपट, मालिका या माध्यमांची विस्तृत पोहोच पाहता ही माध्यमं सदर संबंधांना समाजमान्यता मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात. सद्यस्थितीत लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्राइड मन्थसारखी पावलं ही प्रत्यक्षपणे महत्त्वाची ठरतात. तर, सिनेमा हे माध्यम यात अप्रत्यक्षरीत्या महत्त्वाचं ठरतं.

या लेखातील काही अंश यापूर्वी बहुविध.कॉमवर प्रकाशित झालेला आहे.