Quick Reads

‘कडक’: परिणामकारक ब्लॅक-कॉमेडी

स्पॉटलाईट सदर

Credit : Sony LIV

नैतिकता आणि तिचं स्वरूप हा कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. जर समाजाचं किंवा कायद्याचं भय मनात नसतं, तर नैतिकतेचं स्वरूप कशा प्रकारचं राहिलं असतं, हा वेळोवेळी चर्चिला गेलेला मुद्दा आहे. रजत कपूर दिग्दर्शित ‘कडक’मध्ये समोर उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने नैतिकतेचे निरनिराळे कंगोरे दाखवले जातात. इथली परिस्थिती एका अनपेक्षित घटनेमुळे उद्भवली आहे. होतं असं की, सुनीलच्या (रणवीर शौरी) घरी राघव (चंद्रचूर राय) नावाची एक व्यक्ती येते. राघव हा सुनीलचं जिच्यासोबत विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरु आहे त्या छायाचा नवरा आहे. राघवला म्हणे समोरासमोर बसून चर्चा करायची आहे. मात्र, लवकरच या चर्चेला शाब्दिक द्वंद्वाचं स्वरूप प्राप्त होतं आणि राघव सुनीलच्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतो. सगळ्या प्रकरणाची सुरुवात एका खोट्या आणि अनैतिक गोष्टीपासून झालेली असताना झालेली घटना लपवण्यासाठी सुनीलला पुन्हा खोटं बोलावं लागतं, आणि इथल्या घटनाक्रमाला सुरुवात होते. 

हे सगळं घडतं तो दिवस दिवाळीचा असतो, नि सुनीलच्या घरी एक पार्टी योजिलेली असते. पार्टीसाठी घरात येऊ घातलेले पाहुणे आणि ज्याने घरात आधीच हजेरी लावली असा एक आगंतुक पाहुणा - या सरळसोट संकल्पनेपासून सुरु झालेलं कथानक उत्तरोत्तर अधिकाधिक मजेशीर आणि गंभीर होत जातं. सुनीलला राघवचा मृतदेह लपवण्यासोबतच राघवच्या मृतदेहामुळे आपल्या विवाहबाह्य संबंधाचं सत्य उघडकीस येऊ न देण्याचे प्रयत्न करावे लागतात अशी दुहेरी कसरत इथे दिसते. मालतीला (मानसी मुलतानी), म्हणजेच त्याच्या पत्नीला, त्याचं प्रेमप्रकरण माहित नसल्याने मृतदेह लपवण्यात ती त्याची मदत करते. त्यानिमित्ताने नैतिकतेचे दुहेरी पदरही इथे दिसतात. समोर असलेल्या मृतदेहापेक्षा आपलं प्रेमप्रकरण उघडकीस येऊ नये ही समस्या अधिक महत्त्वाची ठरते. चित्रपटाच्या शीर्षकानंतर येणाऱ्या ‘अ-मॉरल टेल’ या शब्दाच्या कक्षा अधिक विस्तारत जातात. स्त्री-पुरुष नातेसंबंधांतील तणावासोबतच संभाव्य कायदेशीर शिक्षेपासून पळवाट शोधण्याचे प्रयत्न इथे दिसतात. 

सगळं कथानक एकाच ठिकाणी घडत असल्याने परस्परविरोधी विचारसरणी असलेली पात्रं इथे एकत्र येतात. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील तितक्याच विक्षिप्त समस्यांनाही इथे स्थान आहे. एकल पालकत्व निभावणारी स्त्री, एक घटस्फोटीत पुरुष, एक मोटिवेशनल स्पीकर, एक उदयोन्मुख लेखक असे बरेचसे नमुने इथे आहेत. जसजसा चित्रपट पुढे सरकत जातो तसे त्यांच्यातील परस्परसंबंध उलगडत जातात. आत्मीयतेसोबतच आपसातील हेवेदावे दिसू लागतात. काही क्षणिक भावनिक विस्फोट सोडल्यास इथल्या पात्रांमध्ये एक कमालीचा थंडपणा आहे. हा थंडपणा इथल्या उच्चभ्रू वातावरणात शोभणारा, काहीएक प्रमाणात अस्वस्थ करणारा आहे. कारण, त्या थंडपणामागे अगदी विशिष्ट असं कातडीबचाव धोरण आहे. ज्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर सगळी पात्रं एकत्रितपणे चर्चा करत असल्यासारखी दृश्यं पाहायला मिळतात. चर्चा करत असताना ‘ब्रेकिंग बॅड’ मालिकेत अॅसिडचा वापर केला होता असा संदर्भ येतो. आणखी कुणीतरी, त्या व्यक्तीने आत्महत्या केली म्हणून तो सुटला, मात्र आपल्याला अडकवून गेला अशी खंत व्यक्त करतं. हे सगळं चित्र ब्लॅक-कॉमेडी विधेतील कुठल्याही इतर चित्रपटात आढळून येईल असं आहे. 

 

 

असंबद्धता किंवा अब्सर्डिटी हे ‘कडक’चं वैशिष्ट्य आहे. ही असंबद्धता जितकी लिखाणाच्या पातळीवरील आहे, तितकीच दृक-श्राव्य मांडणीच्या पातळीवरील आहे. उदाहरणार्थ, चित्रपटात सुरुवातीला संगीताचा अभाव आहे. मात्र, राघवने स्वतःवर गोळी झाडून घेतल्यानंतर उत्कट संगीताला सुरुवात होते. नंतरही इथल्या गोंधळाला जॅझ संगीताची साथ लाभते. एका अर्थी हे संगीत इथल्या असंबद्धतेला पूरक आहे. मात्र, ही असंबद्धता कुणा व्यक्तीच्या मृत्यूमधून उद्भवलेली असताना तिच्यासोबतीने येणारं उत्साहवर्धक जॅझ संगीत काहीसं विरोधाभासी आहे. जे इथल्या ब्लॅक-कॉमेडीला पूरक आहे. चित्रपटात संकल्पना आणि सादरीकरण अशा दोन्ही स्तरांवर गांभीर्य आणि विनोद यांचं मिश्रण दिसून येतं. नैतिकता, मृत्यू या संकल्पना समोर मांडल्या अथवा चर्चिल्या जात असताना त्यावरचे विनोद इथे दिसतात. हॉलमध्ये मांडलेल्या बुकशेल्फसमोर ‘द बॉडी’ या नावाचं पुस्तक मांडलं जातं. इतरही अनेक शॉट्समध्ये हे पुस्तक दिसत राहतं. शेवटाकडील भाग सोडल्यास जवळपास संपूर्ण चित्रपट एकाच ठिकाणी घडत असल्याने जागेचा आणि ती दर्शवताना कॅमेऱ्याचा केलेला वापर पाहावासा आहे. 

इथलं कथानक पाहता आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘रोप’ (१९४८) या चित्रपटात त्याची प्रेरणा दडलेली आहे, हे काहीसं साहजिक आहे. तिथे जसं कथानकासोबतच त्याच्या मांडणीतील नावीन्य चित्रपटाचं वैशिष्ट्य बनलं होतं, तसं कथानकासोबत त्याचं रंजक विनोद-गंभीर सादरीकरण हे इथलं वैशिष्ट्य आहे. वास्तववादी शैलीला जोडून येणारा विक्षिप्त दृष्टिकोन हे कमी-अधिक प्रमाणात रजत कपूरच्या इतरही चित्रपटांत आढळणारं मिश्रण इथे आहे. इथली कल्पना छोटीशी आणि सोपी आहे. मात्र, तिचं सादरीकरण तिला रंजक बनवणारं आहे. 

संख्येने अधिक असलेल्या पात्रांचं अस्सल चित्रण आणि समोर आलेल्या परिस्थितीला ती कशी सामोरी जातात यातून इथला संमिश्र दृष्टिकोन निर्माण होतो. इथं आशयसूत्राचं अस्तित्त्व असलं तरी चित्रपट ठाम असं भाष्य करणारा, निष्कर्ष काढणारा नाही. तो फक्त काही प्रश्न/मुद्दे समोर मांडतो. हे मुद्दे मांडले जातात ते इथल्या पात्रांच्या अनुषंगाने. इथल्या बहुतांशी जोडप्यांतील संबंध तणावपूर्ण आहेत. इतरांमध्ये पारोवर (नुपूर अस्थाना) एकल पालकत्वाची जबाबदारी आहे, आणि जोशीचा (सागर देशमुख) घटस्फोट झालाय. त्यामुळे स्त्री-पुरुष नातेसंबंधांतील नैतिकतेची बाजू इथे सुरूवातीपासून हजर आहे. राघवच्या मृत्यूमुळे ते उघडकीस येण्याची शक्यता निर्माण होते, इतकंच काय ते घडतं. 

इथे पात्रांच्या विस्ताराला पुरेसा अवकाश मिळतो तो चित्रपटाला निष्कर्षापर्यंत जायची घाई नसल्याकारणाने. कारण, इथे शेवटापेक्षा आपण तिथपर्यंत कसं पोचतो आणि त्यादरम्यान काय घडतं याला अधिक महत्त्व आहे. शिवाय, चित्रपटाचा पात्रांसोबतच नैतिकता, मृत्यू अशा काहीएक संकल्पनांवर भर असला तरी तो तात्त्विक चर्चेवर फार भर देणारा नाही. त्याअर्थी तो निर्णायक नाही. अर्थात, तो संकल्पनांशी किंवा पात्रांच्या अस्सलतेशी तडजोड करतो असं घडत नाही. फक्त नैतिकतेच्या स्वरूपाविषयी चर्चा करण्याऐवजी तिच्या अभावामुळे काय घडतं याभोवती फिरणाऱ्या प्रसंगांतून तिचा आढावा घेतला जातो. त्यातून निर्माण होणाऱ्या चित्राला मनोरंजक बनवणं हा इथला खरा उद्देश आहे, ज्यात तो यशस्वी ठरतो. त्यापलीकडे जात मांडल्या जाणाऱ्या प्रश्नांतून काही मंथन घडल्यास उत्तमच. नसता एक ब्लॅक-कॉमेडी चित्रपट म्हणून तर तो परिणामकारक आहेच!