Quick Reads

आखुनी (Axone): सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणात आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा चित्रपट

स्पॉटलाईट सदर

Credit : Saregama India

‘विविधतेत एकता’ असं म्हणत प्रत्यक्षात मात्र संकुचित दृष्टिकोन बाळगून असणं, भेदभाव करणं हे एक खास भारतीय वैशिष्ट्य आहे. देशाच्या नैऋत्य भागातील नागरिकांना निंदानालस्ती करीत हिणवणं, दक्षिणेकडील विविध राज्यांतील सर्व नागरिकांची भाषा, राज्य एकच आहे असा समज बाळगून असणं अशा बऱ्याच कृती म्हणजे या दृष्टिकोनाचं द्योतक आहेत. ‘आखुनी’मधील प्रमुख पात्रांचा संच हा मूळच्या भारताच्या नैऋत्येकडील रहिवाश्यांच्या दिल्लीतील वास्तव्याचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यामुळे साहजिकच त्याला विशिष्ट असा प्रादेशिक आणि सामाजिक संदर्भ आहे. 

मिनम या त्यांच्या मैत्रिणीचं लग्न असल्याने इथल्या इतर पात्रांना नैऋत्येकडील खाद्यसंस्कृतीतील ‘आखुनी’ याच नावाचा पदार्थ बनवायचा आहे. मात्र, हा पदार्थ बनवताना निर्माण होणारा उग्र वास ही इथली समस्या आहे. दिल्लीसारख्या महानगरात जागेची समस्या असल्याने आखुनीची निर्मितीप्रक्रिया अधिकच अवघड होऊन बसते. हा पदार्थच इथल्या सर्व घडामोडींच्या मुळाशी आहे. आणि पुढे वाढून ठेवलेल्या घडामोडी पाहता ‘अ रेसिपी फॉर डिझास्टर’ ही चित्रपटाची टॅगलाईन अगदीच चपखल आहे. 

चित्रपटात दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी समांतरपणे घडत राहतात. पहिली म्हणजे आखुनी बनवण्याचे अविरत प्रयत्न सुरु असतात. आखुनी बनवत असल्याने यापूर्वी अनेकांना घरमालकांनी राहत्या घरातून बाहेर काढल्याच्या घटना घडलेल्या असल्याने उपासना (सयानी गुप्ता) आणि चन्बी (लिन लैश्रम) या घरमालक नानीपासून (डॉली अहलुवालिया) बचावत आखुनी बनवण्याच्या प्रयत्नात असतात. मग त्यात शिव (रोहन जोशी) या नानीच्या नातवाची मदत घेणं अपरिहार्य बनतं. शिवचा पिता (विनय पाठक) आणि नानी या पात्रांच्या तिरकस स्वभावामुळे, आणि शिवच्या कृतींमुळे इथे विनोद निर्माण होत राहतो. 

 

 

दुसरीकडे, उपासना आणि तिचा प्रियकर झोरेम यांच्यातील तुटण्याच्या बेतात असलेलं नातं, चन्बी आणि तिचा प्रियकर बेन्दांग यांच्यातील नातं अशी नातेसंबंधांची बरीच गुंतागुंत उलगडत असते. तर, तिसरीकडे या सर्व पात्रांना देशाच्या राजधानीत सामोऱ्या जाव्या लागत असलेल्या विखारी द्वेषाचे प्रसंग घडत असतात. साहजिकच या तिन्ही गोष्टी टोनली अगदीच भिन्न तऱ्हेच्या आहेत. मात्र, समोर मांडल्या जात असताना त्या तशा विस्कळीत वाटू न देणं गरजेचं होतं. जे दिग्दर्शक निकोलस खारकोंगुर साध्य होत नाही. समस्यांचं अतिसुलभीकरण आणि वाढती भावनिक क्लिष्टता यांच्यातून एक प्रकारचा असमतोल इथे निर्माण होतो. 

अर्थात ‘आखुनी’च्या विस्कळीत कथानकापेक्षा इथली मांडणी आणि आशय हे घटक अधिक इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे आहेत. चित्रपट त्याचं अगदीच व्हायब्रंट रंगसंगती असलेलं अतिशय लक्षवेधक असं छायाचित्रण आणि वैविध्यपूर्ण संगीत यांच्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. मसाले आणि मांस आणण्याच्या अगदी सुरुवातीच्या दृश्यापासूनच पराशर बरुआचं छायाचित्रण व्हिज्युअल ट्रीट म्हणून काम करू लागतं. सोबतीला असणाऱ्या अपबीट पार्श्वसंगीतातील भाव पुढे चित्रपटभर कायम राखला जातो. 

तांत्रिक सफाईच्या पलीकडे जाणारा काही मोजक्या दृश्यांत जरासा उपदेशपर सूर लागणारा इथला आशय ही इथली आणखी एक महत्त्वाची बाब. इथल्या पात्रांना पावलोपावली वंशविद्वेश आणि लिंगभेदाला सामोरं जावं लागतं. ‘तुम सब एक जैसे ही तो दिखते हो!’ - ही बहुतांशी भारतीयांची मानसिकता इथल्या मध्यवर्ती पात्रांच्या सभोवताली असलेल्या व्यक्तींच्या कृतींमधून आणि संवादांतून दिसत राहते. खुद्द स्वतः अशा वृत्तीला सामोरी जात असलेली पात्रंदेखील आपापसांबद्दल किंवा आफ्रिकन शेजाऱ्यांबाबत अशीच मतं बाळगून असतात असा विरोधाभासदेखील इथे दिसून येतो. अशा टिप्पण्या, अशी मतं ही आपल्या मनात घट्ट रुतलेली आहेत. ‘आखुनी’मध्ये ही डिश बनवणं हे केवळ एक साधन आहे असं मानता येऊ शकेल. हा पदार्थ एका संस्कृतीचं प्रतीक मानलं तर आपण एक समाज म्हणून एकमेकांप्रती किती आकस बाळगून आहोत याचं ठळक चित्र समोर दिसू शकतं. यासाठी चित्रपटच पहायला हवा अशातला भाग नाही. कारण, वंशविद्वेशातून झालेल्या हिंसाचाराच्या घटना बातम्यांतून दिसत असतातच. 

‘आखुनी’ सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणात आत्मपरीक्षण करण्याची गरज अधोरेखित करणारा चित्रपट आहे. तो चित्रपट म्हणून सर्वार्थाने निर्दोष असा नाही, पण प्रत्येक चित्रपटाने परिपूर्ण असायलाच हवं अशातला भाग नसतो. इथे आशयाला आणि रंजक सादरीकरण या दोन बाबींचा प्रभाव पुरेसा ठरतो. ‘फूड कॉम’ अशी जाहिरात केली गेली असली तरी तो या दोन गोष्टींहूनही अधिक काही देतो. 

टीप: सदर चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नसला तरी वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांत त्याची स्क्रीनिंग झालेली आहे.