Quick Reads

द डिसायपल’: नैतिकतेच्या 'गुरु'त्वाची कक्षा

स्पॉटलाईट सदर

Credit : इंडी जर्नल

विरोधाभास हा चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’मधील स्थायीभाव आहे. हा विरोधाभास अनेक प्रकारचा, अनेक कंगोरे असलेला आहे. इच्छा-आकांक्षा आणि त्या पूर्ण न झालेले आयुष्य, स्वप्न आणि वास्तव यांच्यातील तफावत, आदर्श जीवन आणि रुक्ष वास्तव यांच्यातील संघर्ष, भूतकाळ आणि वर्तमानाची केलेली विरोधाभास असणारी मांडणी – अशा बऱ्याचशा गोष्टी इथे अस्तित्त्वात आहेत. या सगळ्या विरोधाभासाच्या केंद्रस्थानी आहे कला आणि कलोपासना. कलेची उपासना करणाऱ्या कलावंताला त्यातून आधी मानसिक आणि मग भौतिक सुखं प्राप्त व्हावीत, ही झाली आदर्श स्थिती. मात्र, अनेकदा ही आदर्श स्थिती सत्यात उतरतेच असे नाही. मग कलेची तपश्चर्या करूनही मानसिक, शारीरिक आणि भौतिक सुखांपैकी काहीच प्राप्त न झाल्यावर काय होतं? ‘द डिसायपल’मधील मुख्य पात्राच्या कथेतून याच प्रश्नाचं उत्तर मिळतं. 

‘द डिसायपल’चे स्वरूप हे कॅरेक्टर स्टडीचे आहे. ताम्हाणेच्या ‘कोर्ट’प्रमाणे (२०१५) तो व्यवस्थेबाबत नसून व्यक्तीबाबत अधिक आहे. ‘कोर्ट’मध्ये व्यक्तींच्या माध्यमातून व्यवस्थेकडे पाहिले गेले होते. इथे तसे घडत असले तरी अशा प्रसंगांचे किंवा उपकथानकांचे प्रमाण कमी आहे. संगीत क्षेत्रातील तपशील, व्यावसायिक गणिते या मुद्द्यांचा एक स्तर इथे अस्तित्त्वात जरूर आहे. मात्र, हा स्तर व्यवस्थेच्या चित्रणाच्या उद्देशापेक्षा व्यक्तीच्या कथानकाला पूरक अशा अर्थाने येतो. असे असले तरी दृश्य शैली आणि मांडणीच्या दृष्टीने ‘द डिसायपल’ आणि ‘कोर्ट’मध्ये बरीचशी साम्यं आहेत. पण, ही मांडणीदेखील आवर्जून व्यक्ती केंद्रित राहणारी आहे. 

 

 

शरद नेरुळकर (आदित्य मोडक) हे इथले प्रमुख पात्र. शरद हा शास्त्रीय गायक विनायक दातार (डॉ. अरुण द्रविड) ऊर्फ गुरुजी यांचा शिष्य. शरदच्या पात्राभोवती फिरणाऱ्या ‘द डिसायपल’चे दोन भाग पडतात. पहिला भाग हा त्याच्या संगीत क्षेत्रातील विद्यार्थीदशेत असण्याचा २००६ मधील काळ. गुरुजींकडून गायनाचे धडे घेणं, आपण आत्मसात करू पाहत असलेल्या कलेवर पकड घेण्याचे प्रयत्न करणं, संगीत आणि जीवन यांचा अर्थ लावू पाहणं — या गोष्टी तो या काळात करत असतो. शरद हा नम्र आणि आज्ञाधारक तसेच प्रयत्नशील शिष्य असला तरी गानदेवता काही त्यावर प्रसन्न नसते. कला पूर्णतः आत्मसात करण्याकरिता स्थितप्रज्ञ बैठकीची, आत्मपरीक्षणाची गरज असते. आणि शरदच्या मनात मात्र सतत कोलाहल माजलेला असतो. या कोलाहलामागे अनेक कारणं असतात. त्याचे वडील (किरण यज्ञोपवित) हेदेखील शास्त्रीय गायक होते. त्यामुळे आपण गुरुजींचे शिष्य आहोत, या भावनेसोबत त्याच्या वडिलांच्या वारशाचे दडपणही त्यावर असते. दडपण यासाठी की, त्याच्यासाठी आदर्श असलेल्या या दोन्ही गायकांपैकी वडिलांना त्याने (काही अंशी) अपयशी होताना पाहिलेले असते. उत्तम गायक असूनही रूढ अर्थाचे यश त्यांना मिळाले नाही, ही भावना त्याला टोचत असते. त्यामुळे त्याच्याभोवती व्यक्तिरेखांचे अनेक साचे अस्तित्त्वात असताना या सगळ्यात आपले स्थान कुठे, हा प्रश्न त्याच्या मनात सातत्याने सलत असतो. आपली जागा शोधताना आपली ओळख हरवून बसण्याचा धोका कायम अस्तित्त्वात असतो. आणि तसे होऊ द्यायचे नसल्यास काय करावे, हा मोठा गहन प्रश्न असतो. 

शरदच्या मनातील या कोलाहलाला आणि द्वंद्वाला काही अंशी कमी करण्याचे काम होते ते माईंच्या माध्यमातून. माई (सुमित्रा भावे यांचा आवाज) या गुरुजींच्या गुरु. पैसा आणि प्रसिद्धीसाठी गायला नको, या भूमिकेमुळे ज्या थोर गायिकेच्या गाण्याची कुठलीच ध्वनीफीत अस्तित्त्वात नाही, अशा माईंच्या आवाजाचा ठेवा शरदला सापडतो. कुणीतरी चोरून ध्वनीमुद्रित केलेल्या त्यांच्या आवाजात शरदला कला, कलेचे महत्त्व, कलाकाराने करणं अपेक्षित असलेली उपासना, कलेच्या तपश्चर्येमागील तत्वज्ञान असे अनेक अमूल्य विचार गवसतात. आपणही असेच जगायला हवे, ही भावना त्याच्या मनात निर्माण जरूर होते. शरद मध्यरात्री निर्मनुष्य रस्त्यांवर गाडीवरून फिरत असताना माईंचा आवाज ऐकू येत राहतो. त्या आवाजात एक गूढ, तरीही निर्भेळ असा आश्वासक आणि अधिकारयुक्त सूर असतो. या साऱ्या भावना शरदच्या मनात निर्माण होत असल्या तरीही प्रत्यक्ष गायनात मात्र त्या उतरतातच असे नाही. आपली उपासना कमी पडते या भावनेमुळे तो काही अंशी आत्मक्लेशाच्या गर्तेत ढकलला जाऊन अधिकाधिक व्याकूळ होत जातो. 

एके ठिकाणी गुरुजी शरदला विचारतात की, तुला घाई कसली आहे? आमच्या गुरुला प्रतिप्रश्न विचारण्याचीही आम्ही कधी प्रयत्न केला नाही. आमच्या पिढीने आयुष्यातील अनेक वर्षे कलोपासनेत व्यतीत केली, कलेवर प्रभुत्व मिळवण्याचे प्रयत्न करीत राहिल्यावर कुठे आमच्यावर गानदेवता प्रसन्न झाली. मग, तुला (आणि तुझ्या पिढीला) घाई कसली आहे? — आता गुरुजीच्या वयाच्या आणि पिढीच्या व्यक्तीला शरद किंवा त्याच्यासारखे इतर लोक कसे समजावून सांगणार की घाई कसली आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘रॅट रेस’मध्ये सहभागी व्हावे लागत असताना, आणि ‘थांबला तो संपला’चा सोयीस्कर अर्थ लावीत श्रेष्ठत्वाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी थांबणाऱ्याला अपयशी ठरवले जाण्याच्या काळात घाई न करणे कुणाला परवडणारे आहे? उत्कृष्टतेपेक्षा निकृष्टतेचे सोहळे साजरे केले जाण्यामागे कारण असते की, निकृष्ट व्यक्ती स्वतःची प्रसिद्धी करण्यात यशस्वी होतो. अशावेळी यशापयशाच्या रूढ आणि कठोर व्याख्या ठरलेल्या असताना स्वतःच्या कोषात राहून कलेवर प्रभुत्व मिळवण्याचा वेळ कुणाकडे आहे? त्यामुळे माईंचे शब्द कानात साठवले जात असले तरी त्याची फलश्रुती प्राप्त होत नसताना पाहणे शरद किती काळ सहन करू शकणार? 

‘द डिसायपल’मधील कलेबाबतचे भाष्य फक्त संगीत क्षेत्रापुरते मर्यादित न राहता एका व्यापक अर्थाने एकूणच सर्व कलांना लागू पडणारे आहे. कारण, कलेच्या उपासनेची गरज, जगातील अनेक विख्यात कलावंतांचे अखेरचे जीवन दुःख आणि अपयशी भावनेने व्यर्थ झाल्याचे किस्से, कलेच्या क्षेत्रातील नैतिकदृष्ट्या भ्रष्ट कारभार असे अनेक मुद्दे वैश्विक स्तरावर लागू पडणारे आणी कुठल्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित नसणारे आहेत. त्यामुळे इथले मुद्दे साहित्य, नृत्य, चित्रपट निर्मिती, इत्यादी अनेक कलाक्षेत्रांना लागू पडतील, असे बनतात. 

 

‘द डिसायपल’मधील कलेबाबतचे भाष्य फक्त संगीत क्षेत्रापुरते मर्यादित न राहता एका व्यापक अर्थाने एकूणच सर्व कलांना लागू पडणारे आहे.

 

नोकरी करण्याच्या, संगीत क्षेत्रातील व्यावसायिकतेच्या विरोधात असलेल्या शरदला विद्यार्थीदशेच्या पश्चात याच गोष्टी कराव्या लागतात. चित्रपटातील दुसरा भाग फिरतो तो हळूहळू नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होत जाणाऱ्या शरदभोवती. २००६ मधील घटनाक्रमाला बारा वर्षं उलटून गेलेली असतात. शरद आता एका स्थानिक संगीत अकादमीमध्ये शिक्षक म्हणून काम करीत असतो. तो आता प्रस्थापित झालेला असतो. त्याचे गाण्याचे कार्यक्रम होत असतात. मात्र, तो अजूनही एकाकी आणि अस्वस्थ असतो. मधल्या काळात शरदच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडलेले असतात की, त्याच्या मनात देवाच्या स्थानी असलेल्या गुरुजी आणि माईंभोवती असलेल्या वलयाचा फुगा फुटतो. तरीही तो वृद्ध गुरुजींची काळजी घेणं, त्यांची देखरेख करणं सोडत नाही. मात्र, त्यांची त्याच्या मनातील प्रतिमा आता देवघरातून बाहेर काढली गेलेली असते. गुरुजींची आताची आर्थिक, सामाजिक स्थिती ही त्यांना त्याच्याइतकंच सामान्य आणि सर्व अर्थांनी मानवी बनवणारी असते. असे असले तरी, माईंचा आवाज आणि त्याच्या वडिलांसोबत व्यतीत केलेले प्रसंग (जे फ्लॅशबॅकच्या माध्यमातून वेळोवेळी समोर येत राहतात) त्याच्या मनात अजूनही प्रकट होत असतात, त्याला साद घालत असतात. मात्र, पुन्हा एकदा या भावनिक सादाचे प्रत्यक्ष आयुष्यात मानसिक स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने परिवर्तन होत नाही. 

वैयक्तिक स्तरावर शरद नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होत जात असतो, तर सामाजिक स्तरावर संगीत क्षेत्रातील व्यावसायिकरणात अधिक भर पडत असते संगीतातील रिॲलिटी शोच्या माध्यमातून. शरदला मिळत असलेले अपयश आणि रिॲलिटी शोमध्ये कुणा व्यक्तीला मिळालेले यश आणि सामाजिक, आर्थिक स्थैर्य अशी विरोधाभास असलेली मांडणी इथे दिसते. त्यामुळे आधी उल्लेख केल्याप्रमाणे, संगीत क्षेत्राबाबतही काही भाग चित्रपटात येतो. याखेरीज पुनरावृत्ती हादेखील इथल्या मांडणीतील एक महत्त्वाचा घटक आहे. शरदच्या अपयशाची, माईंचा आवाज ऐकत रस्त्यांवर फिरणाऱ्या दृश्यांची, रटाळ जीवनाची पुनरावृत्ती इथे होते. शेवटी या ना त्या प्रकारे शरदच्या आतमध्ये धुमसत असणाऱ्या अस्वस्थतेचा विस्फोट होणे स्वाभाविक असते. या विस्फोटाच्या प्रसंगानंतर जे घडते त्याचे स्वरूप एपिलॉगचे अधिक आहे. आणि हा एपिलॉग शरदच्या हळूहळू भ्रष्ट होत जाण्याचेच एक एक्स्टेंशन आहे. ज्यात तो शिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडत व्यावसायिक बनून संगीताचा धंदा करू लागतो. हे अवस्थांतर त्याच्या भ्रष्ट होत जाण्याचा कळस. 

‘डार्क’ या जर्मन सिरीजमध्ये एक संवाद आहे, तो असा — “A human lives three lives. The first ends with the loss of naiveté, the second with the loss of innocence, and the third with the loss of life itself. It is inevitable that we will go through all three stages.” शरदच्या अवस्थांतरामध्ये अशाच प्रकारे त्याच्यातील विनयशील शिष्य मरत जातो. आधी विद्यार्थीदशेत साधासरळ असलेला शरद नाहीसा होतो, त्यानंतर तो आपण संगीताचा धंदा करीत नसल्याने निरपराधी असल्याचा साळसूद भाव स्वीकारतो. लवकरच हीदेखील अवस्था संपते नि त्याच्यातील निरपराधीपणाचाही अंत होतो. ‘कोर्ट’मध्ये व्यवस्थेतील फोलपणा दिसला होता, ‘द डिसायपल’मध्ये व्यक्तीमधील भ्रष्टपणा दिसतो.